agricultural news in marathi success story intercrop of basil in rose cultivation | Agrowon

गुलाबामध्ये तुळशीचे आंतरपीक ठरतेय फायदेशीर

गणेश कोरे 
मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021

कोरोना संकट ही संधी समजून कवडी माळवाडी (ता. हवेली, जि.पुणे) येथील प्रयोगशील  शेतकरी विजय चांदणे यांनी गुलाब लागवडीत तुळशीचे आंतरपीक घेत चांगला आर्थिक नफा मिळविला. कोरोनातील काळातील आंतरपीक प्रयोग गुलाब शेतीला नवी दिशा देणारा ठरला आहे.
 

कोरोना संकट ही संधी समजून कवडी माळवाडी (ता. हवेली, जि.पुणे) येथील प्रयोगशील  शेतकरी विजय चांदणे यांनी गुलाब लागवडीत तुळशीचे आंतरपीक घेत चांगला आर्थिक नफा मिळविला. कोरोनातील काळातील आंतरपीक प्रयोग गुलाब शेतीला नवी दिशा देणारा ठरला आहे.

पुणे- सोलापूर महामार्गावरील कवडी माळवाडी (ता.हवेली,जि.पुणे) येथील विजय चांदणे हे गेल्या २२ वर्षांपासून खुल्या प्रक्षेत्रावर गुलाब लागवड करणारे प्रयोगशील शेतकरी.  पुणे बाजार समितीमध्ये गुलाब फुलांच्या थेट विक्रीसह विविध मंदिरांना फुलांचा पुरवठा हा त्यांचा पांरपारिक व्यवसाय. सध्या त्यांची सहा एकर क्षेत्रावर डच आणि सोफिया गुलाबाची लागवड आहे. बाजार समितीमध्ये गुलाबांची विक्री करताना, ग्राहक तुळशीची मागणी करत असल्याने विजय चांदणे यांनी गुलाब शेतीच्या बरोबरीने ५ ते १० गुंठे क्षेत्रावर तुळशीची देखील लागवड केली. 

दीड वर्षांपुर्वी कोरोनाचे संकट आल्यानंतर बाजार समिती, मंदिरे बंद होती. लग्न समारंभांसह सर्वच धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने गुलाब फुलांची मागणी आणि विक्री बंद झाली. काही दिवस गुलाब फुले फेकून देण्याची वेळ आली. या काळात कोरोनाची लागण होऊ नये म्हणून विविध आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा समाजमाध्यमांवर प्रचार, प्रसार होऊ लागला. यामध्ये तुळशीची मागणी वाढू लागली. बाजार समितीमध्ये फूलबाजार ११ वाजेपर्यंत सुरु असल्याने गुलाबाला नाही, मात्र तुळशी जुडीची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली. 

असे केले नियोजन 
तुळशीची मागणी वाढू लागल्याने चांदणे यांनी तुळस लागवडीचा निर्णय घेतला.  सहा महिन्यात एक एकरापासून ते साडेतीन एकरांपर्यंत तुळशीचे क्षेत्र वाढविले. गुलाबाचे संपूर्ण क्षेत्र ठिबक सिंचनाखाली असल्याने गुलाबामध्ये आंतरपीक म्हणून तुळशीची लागवड केली.  

तुळशीचे बियाणे घरचेच होते. चांदणे यांनी गादी वाफ्यावर तुळशीचे रोपे तयार केली. योग्य उंचीची रोपे होताच त्यांची लागवड गुलाबात आंतरपीक म्हणून केली.  सोफिया गुलाबाच्या दोन ओळीतील अंतर सहा फूट आहे. त्यामध्ये तुळशीच्या पाच ओळी लावल्या. डच गुलाबाच्या दोन ओळीतील अंतर पाच फूट आहे,त्यामध्ये तुळशीच्या दोन ओळी लावल्या. गुलाबासाठी ठिबक सिंचनाद्वारे देण्यात येणाऱ्या विद्राव्य खतांवरच तुळशीची वाढ सुरू झाली. तूळस हे तसे काटक पीक. त्यामुळे यावर फारसा कीड,रोगांचा प्रादुर्भाव नव्हता. त्यामुळे तुळशी साठी फवारणी आणि खतांचा खर्च करावा लागला नाही. 

असा मिळाला दर  
तुळशीच्या एका जुडीला सर्वसाधारण ५ ते १० रुपये दर मिळतो. मात्र कोरोना काळात आयुर्वेदिक उपचार पद्धतीने प्रतिकारक्षमता वाढीसाठी तुळशीच्या पानांची मागणी वाढू लागली. त्यामुळे चांदणे यांना पुणे बाजारात एका जुडीला २५ ते ३० रुपये दर मिळाला होता. अनेक आयुर्वेदीक औषधी उत्पादक कंपन्यांकडून पानांची पावडर आणि गोळ्या करण्यासाठी तुळशीची मागणी वाढली. तसेच किरकोळ खरेदीदार थेट शेतावर येऊन खरेदी करु लागले. थेट खरेदीदारांना २० रुपये जुडीचा दर होता. गेले वर्षभर चांदणे यांनी रोज साधारण एक हजार तुळशीच्या जुड्यांची विक्री केली. 

एक एकर क्षेत्र कायम 
चांदणे यांना तुळशीचे व्यावसायिक उत्पादन घेण्याची संधी कोरोना संकटात गवसली. कोरोना संकटात तुळशीची प्रचंड मागणी वाढल्याने त्यांनी गुलाबाचे उत्पादन कमी करुन, तुळशीचे क्षेत्र साडेतीन एकरापर्यंत वाढविले होते. या एक वर्षाच्या काळात खर्च वजा जाता चांदणे यांना साडे तीन लाखांचे उत्पन्न मिळाले. आता मात्र कोरोना संकट कमी झाल्याने तुळशीची मागणी देखील घटली आहे. मात्र चांदणे यांनी एक एकरातील गुलाबामध्ये तुळशीचे आंतरपीक कायम ठेवले आहे. त्यामुळे वर्षभर बाजारपेठेत तुळशीची जुडी विकणे शक्य होणार आहे.

तुळस देते भांडवली खर्च 
तुळशीच्या वर्षभराच्या उत्पन्नातून गुलाब पिकाच्या व्यवस्थापनाचा काही प्रमाणात भांडवली खर्च निघतो. त्यामुळे गुलाब उत्पादन खर्च कमी होतो. गुलाब लागवडीनंतर खते, कीडनाशकांचा खर्च तुळशीच्या उत्पन्नातून निघत असल्याने तुळस परवडते असा चांदणे यांचा अनुभव आहे. एका जुडी तुळशी उत्पादन आणि पुणे बाजार समितीपर्यंतचा वाहतूक खर्च तीन रुपये आहे. बाजारपेठेत तुळशीची जुडी ५ ते १० रुपये दराने विकली जाते. कोरोना काळात मात्र चांदणे यांना प्रति जुडी २५ ते ३० रुपये दर मिळाला होता.

गुणवंत गुलाब उत्पादक शेतकरी पुरस्कार 
दि पुणे रोझ सोसायटी आणि टिळक महाराष्‍ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने उघड्या प्रक्षेत्रावर दर्जेदार आणि सातत्यपुर्ण यशस्वी गुलाब पुष्प उत्पादनासाठी २०१२ या वर्षी  गुणवंत गुलाब उत्पादक शेतकरी पुरस्काराने विजय चांदणे यांचा गौरव माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

गुलाबाची करार शेती 
चांदणे यांच्या माध्यमातून एका उद्योगाने गुलाबाची करार शेती केली आहे. चांदणे यांचे सहा एकर आणि परिसरातील शेतकऱ्यांचे सहा एकर क्षेत्र गुलाबाच्या करार शेतीखाली आले आहे. या क्षेत्रावर डच गुलाब लागवडीचे नियोजन सुरू आहे. या करार शेतीतून रोज एक हजार जुड्यांची मागणी आहे. एका जुडीमध्ये १० फुले असतात.  संबधित उद्योग थेट शेतातून एका जुडीला जागेवर २५ रूपये खरेदी दर देणार आहे, असे चांदणे यांनी सांगितले. 

तूळस लागवड क्षेत्रात वाढ 
तुळशीची मागणी वाढू लागल्याने कवडी माळवाडी परिसरातील शेतकरी तूळस लागवडीकडे वळले आहे. गेल्यावर्षी नेहमीपेक्षा सुमारे १५ ते २० एकरापर्यंत लागवड क्षेत्र वाढले आहे. चांदणे यांचे लागवड क्षेत्र हे एक एकरावरुन साडेतीन एकरावर गेले. यंदा मात्र क्षेत्र आणि उत्पादन वाढल्याने तुळशीच्या जुडीचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या परिसरातील शेतकऱ्यांना १० रुपये प्रति जुडी असा दर मिळत आहे.

सणाच्या काळात तुळशी जुडीला मागणी 
आषाढी, कार्तिकी एकादशी, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळीत तुळशीला चांगली मागणी असते. याकाळात एका जुडीचा दर १० ते १५ रुपये असतो. मात्र इतर काळात सर्वसाधारण दर ५ ते १० रुपये असतो. वर्षभरात तुळशीच्या उत्पादनातून तीन लाखांचे उत्पन्न मिळते, असा चांदणे यांचा अनुभव आहे.

- विजय चांदणे, ९८२२४३४३१४


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
शेती, पर्यावरण संवर्धनातून वाघापूरची...पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले...
सुयोग्य व्यवस्थापनातून हरभरा पिकात तयार...बुलडाणा जिल्ह्यातील सवडद येथील विनोद देशमुख यांनी...
अॅपलबेरचे निर्यातक्षम उत्पादन. पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. जुन्नर) येथील...
ट्रॅक्टरचलित विविध यंत्रांद्वारे वेळ,...ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने पेरणी वा कोळपणी...
योग्य व्यवस्थापनातून वाढविला १९०...गोठा, म्हशींचे संगोपन व दूध विक्री या स्तरांवर...
दुग्धव्यवसायातून संयुक्त फोलाने...नगर जिल्ह्यात कुकाणे येथील संयुक्त फोलाने...
संघर्षातून फुलले शेतीमध्ये 'नवजीवन'अवघी दोन एकर जिरायती शेती. खाण्यापुरती बाजरी...
झेंडूसह अन्य फुलांमध्ये शिरसोलीची ओळखजळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी...
प्रयत्नशील व प्रयोगशीलतेचा पडूळ...लाडसावंगी (जि.. औरंगाबाद) येथील प्रयोगशील, जिद्दी...
देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीसाठी...कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने...
फळे- भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म...नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने (...
दुग्ध व्यवसायातून बसविली आर्थिक घडीसातारा जिल्ह्यात कोपर्डे (हवेली) येथील कैलास...
निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात देशमुख...सुलतानपूर (जि. नगर) येथील विजय देशमुख यांनी नऊ...
डाळ निर्मिती उद्योगातील ‘अनुजय' ब्रॅण्डढवळी (ता.वाळवा,जि.सांगली) येथील सौ.चारुलता उत्तम...
महिला गटाने दिली कृषी,ग्राम पर्यटनाला...पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेने मार्गासनी (ता....
वांगे भरीत पार्टीद्वारे व्यवसाय...डांभुर्णी (ता. यावल, जि. जळगाव) येथील राणे...
लाकडी घाण्याद्वारे दर्जेदार तेल, खाद्य...अकोला जिल्ह्यातील अकोट येथील कांचन अशोकराव चौधरी...
भिडी गावाने उभारल्या अवजारे बॅंका,...काळाची पावले ओळखत विदर्भातील अनेक गावांनी...