जुन्नर परिसर झाला टोमॅटोचे क्लस्टर

जुन्नर (जि. पुणे), संगमनेर (जि. नगर) व परिसरातील तालुके भाजीपाला व त्यातही टोमॅटो उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. नारायणगाव येथे देशपातळीवरील फक्त टोमॅटोसाठी खुला उपबाजार भरतो. विविध राज्यांतील व्यापाऱ्यांकडून खरेदी होत असून, भाजीपाला वार्षिक उलाढाल २०० कोटींच्या घरात आहे.
Arrival of tomatoes in Narayangaon sub-market
Arrival of tomatoes in Narayangaon sub-market

जुन्नर (जि. पुणे), संगमनेर (जि. नगर) व परिसरातील तालुके भाजीपाला व त्यातही टोमॅटो उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. नारायणगाव येथे देशपातळीवरील फक्त टोमॅटोसाठी खुला उपबाजार भरतो. विविध राज्यांतील व्यापाऱ्यांकडून खरेदी होत असून, भाजीपाला वार्षिक उलाढाल २०० कोटींच्या घरात आहे. परिसरातील भागांत विकसित झालेली शेती, शेतकऱ्यांचे प्रयत्न, निविष्ठा, रोपवाटिका आदींच्या रूपाने टोमॅटो पिकाचे क्लस्टर व अर्थकारण विकसित झाले आहे.  पुणे- नाशिक महामार्गावर नारायणगावच्या हद्दीत प्रवेश करताना जून- जुलै काळात रस्त्यांच्या दुतर्फा पिकअप व्हॅनच्या लांबच लांब रांगा व त्यात प्लॅस्टिक क्रेटमध्ये खचाखच भरलेले टोमॅटो असे चित्र दृष्टीस पडते. सकाळी नऊच्या दरम्यान देशातील विविध व्यापाऱ्यांसमोर टोमॅटोचे खुले लिलाव येथे सुरू होत असल्याने सर्वत्र लगबग असते. परिसरात विकसित झालेली टोमॅटो शेती, शेतकऱ्यांचे प्रयत्न, निविष्ठा बाजारपेठा हे क्लस्टर अभ्यासण्याजोगे आहे.  खुले मार्केट उपलब्ध झाले  सन १९९०-९५ मध्ये जुन्नर भागातील शेतमाल जुन्या मुंबई- पुणे महामार्गावरून भायखळा- मुंबई येथील बाजार समितीत जायचा. माळशेज घाटाचाही पर्याय होता. अनेक वेळा सततच्या वाहतूक कोंडीमुळे वाहने दहा तास घाटात अडकून पडायची. त्यामुळे मुंबई बाजार समितीत टंचाई निर्माण होऊन  उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना टोमॅटो जास्त दरात खरेदी करावा लागे. तोही मुबलक मिळत नसे. मग व्यापाऱ्यांनी आपला मोर्चा जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्‍या थेट बांधावर वळविला. थेट खरेदी सुरू झाली. मात्र या व्यवहारात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ लागली. शेतकऱ्यांचे पैसे बुडवण्याचे प्रकार झाले. मग शेतकरी आणि व्यापाऱ्यांना एकाच ठिकाणी लिलावासाठी आणण्याची कल्पना जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे आणि सहकाऱ्यांच्या मनात आली. खरेदीदारांना एकाच ठिकाणी टोमॅटो व सोयीसुविधा तसेच शेतकऱ्यांना विना आडतीशिवाय विक्री शक्य होणार असल्याने एकमान्यता झाली. त्यासाठी नारायणगाव उपबाजार विकसित करण्यात आला. १० ते १२ वर्षांत ही संकल्पना वाढली. दरवर्षी येथे देशभरातून सुमारे २०० खरेदीदार येतात. दोन वर्षांच्या हंगामात प्रति क्रेट सरासरी दर २५० रुपये तर कमाल दर ६०० रुपयांपर्यंत मिळाला.    कृषी उद्योजकतेला प्रोत्साहन

  • ठिबक, मल्चिंग पेपर व सुधारित तंत्राच्या आधारे परिसरात उन्हाळी टोमॅटो लागवडीचे प्रमाण वाढले.
  • गुढीपाडवा, अक्षय तृतीयेच्या सुमारास लागवड. अन्य भाजीपाला पिकांनाही चालना.
  • पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूरसह नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील शेतकरी नारायणगाव उपबाजारावर अवलंबून.
  • पूर्वी निवडक गावांपुरत्याच असलेल्या कृषी सेवा केंद्रांचा विस्तार खेड्यापाड्यांत.
  • त्यातून ग्रामीण भागात निविष्ठा व्यवसायाला चालना. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल.   
  • टोमॅटोची प्रातिनिधिक उलाढाल (नारायणबाग उपबाजार)

    वर्ष क्रेट्‍सची संख्या     उलाढाल 
    २०१६-१७    ४४ लाख  ३६ हजार ८१०  १४४ कोटी ९५ लाख ४३ हजार ८५० 
    २०१९-२०  ४८ लाख  ६९ हजार ५९० १७३ कोटी ३४ लाख २ हजार ८८८ 
    २०२०-२१  ३५ लाख ३५ हजार ७७५  १०६ कोटी ४१ लाख  ६१ हजार ६४५ 

    प्रमुख पिकांची उलाढाल  (सन २०१९-२०)

    पीक     रक्कम (कोटी रुपये) 
    कांदा   ४४० कोटी 
    टोमॅटो   १७३ कोटी 
    भाजीपाला     २०० कोटी 
    डाळिंब ९ कोटी 
    एकूण     ८२२ कोटी 

    क्लस्टरचा विकास  धामणखेल (ता. जुन्नर) येथील बाळकृष्ण वर्पे म्हणाले, की १९९५ पर्यंत गाव जिरायती होते. उन्हाळ्यात विहिरींचे पाणी संपत आल्यावर पिण्यासाठी राखून ठेवावे लागे. गावात पहिली उपसा सिंचन योजना १९९५ मध्ये आली. आता ८ ते १० योजना झाल्यामुळे ८५ टक्के क्षेत्र बारमाही सिंचनाखाली आले आहे. परिणामी, उन्हाळी टोमॅटो शेतीचे प्रमाण वाढले. गुढीपाडव्याच्या दरम्यान दोनशे एकरांपर्यंत लागवड असावी.  - बाळकृष्ण वर्पे,  ९५६१८३२२४२

    जुन्नर येथील राकेश कृषी उद्योगाचे संचालक राकेश पांडव म्हणाले, की मी १९९९ मध्ये व्यवसाय सुरू केला. त्या वेळी निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांचे प्रमाण कमी होते. मात्र २०१० नंतर पाणी वापर संस्था वाढल्या. ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर व विद्राव्य खतांचा वापर वाढला. गेल्या १० वर्षांत टोमॅटोसह भाजीपाला निविष्ठांच्या विक्रीत तिप्पट वाढ झाली आहे.  - राकेश पांडव,  ७०२०१३१३२२ 

    जुन्नर- आंबेगाव तालुका नर्सरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश गावडे म्हणाले, की २००४ नंतर शेतकरी स्वतः रोपवाटिका करू लागले. मात्र वीज, मजूर समस्या, हवामान बदल आणि अवकाळी पाऊस या कारणांमुळे रोपांचे नुकसान व्हायचे. मग नर्सरींकडे मागणी वाढली. पॉलिहाउस, ग्रीन हाउसमध्ये रोपे तयार होऊ लागली. यात लागवड कालावधी, फवारणी या बाबी कमी होत गेल्या. उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन चांगले मिळू लागले. आता नारायणागाव, मंचर परिसरात सुमारे ५५ नर्सरीज असून, केवळ माझ्याकडून उन्हाळी हंगामासाठी १५ ते २० लाख रोपांचा पुरवठा होतो. नाशिक, नगर, संगमनेर येथून मागणी असते.  - राजेश गावडे,  ७५८८५९४७७९   भविष्यातील नियोजन  

  • जुन्नर आवारातील वाढत्या व्यापारासाठी सहा हजार चौरस मीटर लिलाव गृहाची उभारणी. 
  • आळेफाटा उपबाजार विस्तारासह अन्य विस्तारासाठी जमिनीचे संपादन. 
  • पुणे-नाशिक महामार्गावर अत्याधुनिक शीतगृहासह निर्यात सुविधा केंद्राची उभारणी.
  • भव्य शेतकरी निवासाची उभारणी. 
  • - संजय काळे,  ९८८१२५७९२१ (सभापती, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती) - रूपेश कवडे (सचिव),  ९९७५४९६९२१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com