agricultural news in marathi success story of kesar mango cultivation by In Situ method | Page 2 ||| Agrowon

‘इन सिटू’, छाटणी, अन्य तंत्रांतून मोहोरला केसर आंबा

राहुल घाडगे
गुरुवार, 27 मे 2021

नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राने एक हजार झाडांची आंबा बाग जोपासली आहे. इन सिटू, छाटणी तंत्र, वाढ नियंत्रक वापर, किडी-रोगनियंत्रण व काढणी नियोजन आदी टप्प्यांवर प्रयोग करून त्याचे आदर्श व्यवस्थापन बागेच्या रूपात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे.

नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राने एक हजार झाडांची आंबा बाग जोपासली आहे. इन सिटू, छाटणी तंत्र, वाढ नियंत्रक वापर, किडी-रोगनियंत्रण व काढणी नियोजन आदी टप्प्यांवर प्रयोग करून त्याचे आदर्श व्यवस्थापन बागेच्या रूपात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. एप्रिलच्या हंगामात त्याद्वारे आंबा बाजारपेठेत आणणे शक्य असल्याचे या प्रयोगातून सिद्ध केले आहे.

नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राचे (केव्हीके) सुमारे ५० एकर क्षेत्र आहे. त्यावर शेतकऱ्यांसाठी नवीन प्रात्यक्षिके वा प्रयोग घेण्यात येतात. यात फळबागांचे प्रामुख्याने क्षेत्र आहे. त्यामध्ये डाळिंब, पेरूची अतिघन लागवड, पपई, सीताफळ, द्राक्षाचे ज्यूससाठीचे मेडिका व एआईआर- ५१६ वाण व केसर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची फळबाग रोपेही उपलब्ध करून दिली जातात. त्याचबरोबर उत्कृष्ट उगवणक्षमता असलेले कांदा व सोयाबीनचे बियाणे प्रक्षेत्रावर तयार केले जाते.

आंबा बागेतील प्रयोग
केव्हीकेची सुमारे एक हजार झाडांची आंबा बाग आहे. सर्वसाधारणपणे कोकणातील आंबा एप्रिल व त्याआधी बाजारपेठेत येतो. हंगामात तो उपलब्ध होत असल्याने त्यास दरही चांगला मिळतो. राज्यातील बाकी ठिकाणी आंबा मेनंतर उपलब्ध होत असल्याने तुलनेने त्यास कमी दर मिळतो. ही बाब लक्षात घेऊन दर चांगले मिळण्याच्या दृष्टीने हा आंबा हंगामात वेळेवर कसा आणता येईल यासाठी केव्हीकेने सुमारे चार वर्षांपूर्वी आंबा बागेत प्रयोग सुरू केले.

लागवडीसाठी समतलचर पद्धत
केव्हीकेच्या प्रक्षेत्रावर सुमारे २.५ हेक्टर क्षेत्र डोंगर उताराचे आहे. ते लागवडीखाली आणणे ही प्राथमिकता होती. त्यासाठी डोंगर उताराचे सर्वेक्षण करून घेतले. त्यानंतर समतलचर पद्धतीने आंबा लागवडीचे धोरण केंद्राने ठरविले. सन २०१६ मध्ये माती व पाणी परीक्षण करून घेतले. त्यामध्ये समतल पद्धतीने चर खोदण्यात आले. त्या चरांमध्ये मार्किंग करून त्यात कुजलेले शेणखत, निंबोळी पेंड, माती वापरून खोऱ्याने एकत्र केले. चरांमध्ये प्रत्येकी तीन अशा रायवळ कोया वापरण्यात आल्या. त्यांची निवड करण्याचे कारण म्हणजे कोयीची मुळी सरळ जमिनीत जाते व रोपांची वाढ चांगली होते. तसेच पुढे जाऊन त्यावर कलमे बांधल्यानंतर ९५ टक्क्यांपर्यंत रोपे जिवंत राहतात.

लागवडीची इनसिटू पद्धत
इनसिटू पद्धत म्हणजे जागेवर कोयी लावून त्यावर नंतर योग्यवेळी कलमीकरण करणे होय. या पद्धतीचा अवलंब केल्यास बराच फायदा दिसून येतो. रायवळ आंब्याच्या कोयांचा ज्या ठिकाणी
वापर केला तिथे एक वर्षानंतर फुटलेल्या रोपट्यांना केशर जातीची कलमे बांधण्यात आली. पुढे सहा महिन्यांपर्यंत ती तशीच वाढविली. त्यापैकी चांगले फुटलेल्या व सशक्त असलेल्या एकाच कलमाची वाढ व देखभाल पुढे करण्यात आली. त्यामुळे मुळे, पाने व फांद्यांची वाढ चांगली झाली.

‘इनसिटू’ लागवडीचे फायदे

  • जागेवरच कोय लागवडीमुळे रोपाचे सोटमूळ कोणत्याही अडथळ्याविना जमिनीत सरळ खोल जाते.
  • कलमांची मुळे मात्र पिशवीत केली असल्याने त्यांची पिशवीत गोल वेटोळी चुंबळ बनते. त्यामुळे खड्ड्यात लागवड केल्यानंतर ती जमिनीत खोलवर जाऊ शकत नाहीत.
  • हलक्‍या, मुरमाड जमिनीत हा प्रश्‍न आणखी गंभीर होतो.
  • 'इनसिटू’ पद्धतीच्या झाडांची वाढ जोमदारपणे होते.
  • त्यात किडी-रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी प्रमाणात जाणवतो.
  • एका रोपास बाजूच्या दोन-तीन रोपांचा जोड दिलेला असतो. त्यामुळे कलमाला तीन-चार रोपांची ताकद मिळून कलम शीघ्रतेने वाढते. 

स्वयंचलित ठिबक पद्धती
केव्हीकेने दीड कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले आहे. त्यावर ‘ड्रीप ऑटोमेशन यंत्रणा बसविण्यात आली. त्यामध्ये‘ कंट्रोलर’, सॉलिनॉईड व्हॉल्व्ह, ऑटो क्लीनर, डोसींग पंप, पीसी ड्रीपर ही उपकरणे बसवण्यात आली. त्यामुळे पिकाच्या गरजेनुसार पाणी व खते देणे सोईस्कर झाले. ‘लॅटरल’ला ‘पीसी ड्रीपर’ बसविल्यामुळे कमी व जास्त उतारावर एकसारखा दाब राहतो, त्यामुळे प्रत्येक झाडाला एकसारखे पाणी व खत मिळते. शेततळ्याजवळ सोलर पंपही बसविण्यात आला आहे.

छाटणीचे तंत्रज्ञान
जुन्या बागांमध्ये झाडांचा घेर मोठा झाल्याने सूर्यप्रकाश आतपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. परिणामी, नवी पालवी फार कमी येते. अशा बागेत कीडनाशके व संजीवके यांची फवारणी करणेही कठीण जाते. परिणामी, रोग व किडीचे नियंत्रण योग्य प्रकारे न होऊन मोहोर तसेच फळ गळतात. या बागांमधील झाडे फार उंच वाढलेली असल्याने फळे काढणे व तत्सम कामे करणे जिकिरीचे होते. झाडांवर बांडगुळे मोठ्या प्रमाणावर वाढतात. फांद्यांना अन्नपुरवठा न झाल्याने फांद्या सुकतात. या सर्व कारणांमुळे आंब्याची छाटणी घेणे गरजेचे असते. छाटणीमुळे चांगला आकार व सर्व झाडांना सूर्यप्रकाश मिळतो. जोमदार पाने येतात. एकमेकांना भेदलेल्या शाखा काढून टाकता येतात. फवारणी व काढणीही सोपी होते. प्रयोगात आंब्याचा मधला शेंडा कापल्याने झाडाच्या आतील भागात सूर्यप्रकाश पोहोचण्यास मदत झाली. त्यामुळे प्रकाश संश्‍लेषण क्रियेस गती मिळाली. पानांमध्ये अन्ननिर्मिती चांगली झाली. काडी लवकर पक्व बनली. छाटणी केल्यानंतर काडीला बोर्डो पेस्ट लावल्याने रोग टाळणे शक्य झाले.

पीक संरक्षण व संजीवके वापर
कीड- रोग नियंत्रणात जैविक नियंत्रण पद्धतीवर अधिक भर दिला. मोहोर येण्यापूर्वी व आल्यानंतर तुडतुडे, मावा, लाल कोळी व बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण केले. या वर्षी पहिल्यांदाच ऑगस्टमध्ये पॅक्‍लोब्युट्राझोल हे वाढ नियंत्रक प्रति लिटर पाणी दोन मिलि प्रमाणात मुळांच्या कक्षेत दिले.

त्यामुळे मोहोर दोन ते तीन आठवडे लवकर आला. त्याची टक्केवारी वाढली. संयुक्त फुलांचे
प्रमाण वाढल्याचे लक्षात आले. मोहोर फुलोऱ्यात असताना मधमाशी पेट्या बागेत ठेवण्यात आल्या. त्यामुळे परागीभवन उत्कृष्ट झाले. फळाचे सेटिंग चांगले झाले.

काढणी व्यवस्थापन
वेळोवेळी आंतरमशागत पद्धतींचा अवलंब केला. एकूण व्यवस्थापनातून लागवडीनंतर चौथ्या वर्षी मोठ्या प्रमाणात मोहोर लागला. प्रामुख्याने केसर आंबा आहे. सुमारे चारशे झाडे मोहरली. प्रति झाड सरासरी पाच ते सहा किलो फळे आली. योग्य संख्या झाडावर राहिल्यामुळे त्यांचा आकार चांगला राहिला. साधारण प्रति फळ वजनाला २५० ग्रॅमच्या वर राहिले. पहिली काढणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केली. काढणी सकाळी लवकर आणि संध्याकाळी केली. फळे काढताना देठ साधारणपणे ३ ते ५ सेंमी ठेवला. त्यामुळे देठातून गळणाऱ्या चिकापासून संरक्षण मिळाले.

विक्री व उत्पन्न
साधारणपणे पहिल्याच वेळी घेतलेल्या सुमारे ३५० ते ४०० झाडांपासून एकूण दोन टनांपर्यंत उत्पन्न मिळाले. विक्री सरासरी प्रतवारी व वजनानुसार प्रति डझन २०० ते ४०० रुपयांपर्यंत केव्हीकेच्या प्रक्षेत्रात थेट करण्यात आली. नवी मुंबई येथील वाशी मार्केटलाही सुरुवातीला काही माल पाठविण्यात आला. परंतु बाजारातील चढ उतार, खर्च आणि कोरोना संकट यांचा
विचार करून स्थानिक स्तरावरच विक्रीचा निर्णय घेतला. ग्राहकांच्या मागणीनुसार दोन डझनचे बॉक्स पॅकिंग केले. त्यामध्ये ए वन आकारात २५० ग्रॅम पेक्षा मोठा, एटू मध्ये १८० ग्रॅमपेक्षा मोठा
व ए थ्री मध्ये १५० ग्रॅमपेक्षा मोठा असे पॅकिंग करण्यात आले. विक्रीसाठी सोशल मीडियाच वापर करण्यात आला. त्यामुळे ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद लाभला.

बाजारपेठेत लवकर आणणे शक्य
योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर जुन्नर, नारायणगाव भागातील आंबादेखील कोकणाप्रमाणेच एप्रिल- मेच्या कालावधीत बाजारपेठेत आणता येतो. याचे प्रात्यक्षिक केव्हीकेच्या प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केल्याचे केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिलतात्या मेहेर म्हणतात. अति घन लागवड तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच या पिकाकडे व्यापारी दृष्टिकोनातून पाहिल्यास शेतकऱ्यांना निश्‍चित फायदा होईल असेही त्यांचे म्हणणे आहे. केंद्राचे प्रक्षेत्र व्यवस्थापन वैभव शिंदे पाहतात. त्यांना केंद्रप्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे, भारत टेमकर, योगेश यादव व डॉ. दत्तात्रेय गावडे यांचे मार्गदर्शन लाभते.

संपर्क : राहुल घाडगे, ९४२२०८००११
(लेखक नारायणगाव केव्हीके येथे विषय विशेषज्ज्ञ (कृषी विस्तार) आहेत.)

वैभव शिंदे, ९८९०२३१८९१
प्रक्षेत्र व्यवस्थापक


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
गुलाब, लिली, शेवंतींनं अर्थकारण केलं...शिरसोली (ता.जि.जळगाव) येथील रामकृष्ण, श्रीराम व...
शेतीला मिळाली बचत गटाची साथ शेणे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सुनंदा उदयसिंह...
ग्राम, आरोग्य अन् शेती विकासामधील ‘...सातारा जिल्ह्यातील अन्नपूर्णा सेवाभावी संस्था...
एकात्मिक शेतीतून अर्थकारण केले सक्षमरेवगाव (ता. जि. जालना) येथील आनंदराव कदम यांनी...
गुऱ्हाळघरातून मिळविला उत्पन्नाचा हुकमी...खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर तुळशीराम...
पडसाळी झाले ढोबळी मिरचीचे ‘हब’बोर, कांद्यासाठी प्रसिद्ध पडसाळी (जि. सोलापूर)...
गांडूळ खतासह सेंद्रिय मसाला गूळनिर्मितीसातारा जिल्ह्यातील मालदन येथील कृषी पदवीधर विजय...
साहिवाल गोसंगोपनासह शेण, गोमूत्राचे...सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील निकम कुटुंबाने...
आदिवासी पाड्यात रुजले भातशेतीत...नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग आदिवासीबहुल असून भात...
नांदेडचे कापूस संशोधन केंद्र कोरडवाहू...नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात बीटी, नॉन बीटी...
प्रयोगशीलतेतून एकात्मिक शेतीचा आदर्शमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटकातील बुदिहाळ (ता...
पीक नियोजन, थेट विक्रीतून वाढविला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता. वेंगुर्ला)...
कुक्कुटपालन, भाजीपाला लागवडीतून तयार...लखमापूर (ता. सटाणा, जि. नाशिक) येथील आश्‍विनी...
तुरीच्या बीडीएन ७११ वाणाने दिली...बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राद्वारे प्रसारित...
डाळी, बेसनपीठ निर्मितीतून ७०...हिंगोली येथील रमेश पंडित यांनी डाळनिर्मितीसह बेसन...
गोरव्हाच्या ग्रामस्थांनी घडवली...अकोला जिल्ह्यातील गोरव्हा (ता.. बार्शीटाकळी) या...
कांकरेड गोपालनासह मूल्यवर्धित उत्पादनेहीनाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद येथील संजय ताडगे यांनी...
बारमाही उत्पन्न देणारी व्यावसायिक शेतीवनोली (जि..जळगाव) येथील युवराज चौधरी यांनी...
डाळिंब, भाजीपाला पिकात केले यांत्रिकीकरणआटपाडी (जि.. सांगली) येथील किशोरकुमार देशमुख...
राहुरीच्या कृषी विद्यापीठात कडधान्य...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...