agricultural news in marathi success story of kesar mango grower farmer from solapur district | Agrowon

ऊसपट्ट्यात केसर आंब्याचा दरवळ

सुदर्शन सुतार
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

दगडअकोले (ता. माढा, जि. सोलापूर) येथील संतोष मोरे यांनी नोकरीची जबाबदारी सांभाळत ऊसपट्ट्यात केसर आंबा लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. आंब्याचे चांगले व्यवस्थापन करण्याबरोबर फळपिकांवर लक्ष केंद्रित करून द्राक्षे, केळी आदींची जोड देत अर्थकारण बळकट केले आहे.  
 

दगडअकोले (ता. माढा, जि. सोलापूर) येथील संतोष मोरे यांनी नोकरीची जबाबदारी सांभाळत ऊसपट्ट्यात केसर आंबा लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. आंब्याचे चांगले व्यवस्थापन करण्याबरोबर फळपिकांवर लक्ष केंद्रित करून द्राक्षे, केळी आदींची जोड देत अर्थकारण बळकट केले आहे.  
 

सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीच्या अलीकडे पंढरपूर रस्त्यावर चार-पाच किलोमीटवर दगड अकोले (ता. माढा) गाव आहे. येथील युवा शेतकरी संतोष मोरे यांची सुमारे १८ एकर शेती आहे. वास्तविक हा भाग उजनी धरणाच्या पाण्याने व्यापलेला आहे. सर्वत्र कालवे फिरल्यामुळे पाण्याची चणचण फारशी भासत नाही. सभोवताली उसाचे मळेच मळे पाहायला मिळतात. पण उसाचा वाढता उत्पादन खर्च, उत्पन्न मिळण्यासाठी लागणारा कालावधी हे मुद्दे पाहत संतोष यांनी फळकेंद्रित शेतीची वाट धरली आहे. 

नोकरी सांभाळून शेती 
दहावीचे शिक्षण झाल्यापासून संतोष शेतीत आहेत. गावाशेजारीच असलेल्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यात ते ‘असिस्टंट पॅनमन’ आहेत. नोकरी सांभाळून आपली शेतीही ते करतात. वडील पोपट मोरे व बंधू नितीन यांची शेतीत त्यांना मुख्य साथ आहे. माळीनगर येथील केशर आंबा नर्सरीचे विनय वागधरे यांच्या प्रोत्साहन आणि मार्गदर्शनातून संतोष केशर आंब्याकडे वळले. त्यांच्याच सल्ल्यानुसार ते आंब्याचे व्यवस्थापन करतात.  

असे आहे आंब्यातील व्यवस्थापन
आंब्यासाठी सुमारे एक एकर पाच गुंठे क्षेत्र ठेवले आहे. मध्यम जमिनीची निवड करून १२ बाय सहा फूट अंतरावर ऑक्टोबर २०१६ मध्ये लागवड केली आहे. एकरी सुमारे ६०० झाडे आहेत. रासायनिक व सेंद्रिय अशा एकात्मिक पद्धतीने निविष्ठांचा वापर होतो. लागवडीवेळी प्रतिझाड २००  ग्रॅम निंबोळी पेंड व त्यानंतर ठिबक उभारून घेतले. आठ दिवसांनी ह्युमिक ॲसिडचा वापर केला आहे. १९-१९-१९, कॅल्शिअम, बोरॉन आदी खतांसोबत जिवामृताचा वापर प्रामुख्याने करतात. शेणासाठी दोन देशी गायी आहे. साधारण १० दिवसांना २० किलो शेण त्यांना लागते. गरजेनुसार शेण व गोमूत्र बाहेरून देखील आणले जाते.  

ताण व मोहोर  
 लागवडीनंतर साधारण अडीच वर्षांनी जून २०१८ मध्ये पहिला बहार धरला. फांद्या, शेंडे यांची छाटणी करण्यात आली. त्यानंतर जून व जुलै मध्ये १९-१९-१९, ०-५२.३४ प्रति एकरी पाच किलो महिन्यातून दोन वेळेस दिले. ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर असे तीन महिने बाग ताणावर राहते. या दरम्यान खते देणे थांबवले जाते. बुरशीनाशके आणि कीटकनाशकांच्या फवारण्या मात्र गरजेनुसार घेतल्या जातात.

नोव्हेंबरला मोहोर येण्यास सुरुवात होते. दरम्यान, बंद केलेले पाणी पुन्हा सुरू केले जाते. त्यानंतर प्रत्येक आठवड्याचे नियोजन करून वाढीच्या अवस्थेनुसार विद्राव्य खतांचा वापर  होतो. संतोष यांची बाग पाच वर्षांपूर्वी लागवड केलेली आहे. जुन्या आणि नव्या फांद्यांसह टप्प्याटप्प्याने चार वेळा मोहोर येतो. त्यामुळे बाग टप्प्याटप्याने हंगामात येते. त्याचा विक्रीसाठी फायदा होतो.

यंदाच्या हंगामात त्यांनी पॅक्लोब्युट्राझोल संजीवकाचा वापर केला. त्यामुळे बोरे आणि कैरीच्या आकाराएवढे आंबे सध्या बागेत दिसत आहेत. सर्वसाधारणपणे अन्य केसर आंबा हापूस आंब्यानंतर बाजारात येतो. संतोष यांच्याकडील आंबा मात्र पुढील महिन्यात मार्चमध्येच फळाला येणार आहे. त्याचा दरांमध्ये त्यांना फायदा होऊ शकेल. 

छाटणी व सेंद्रिय व्यवस्थापनावर भर 
आंब्याची काढणी झाल्यानंतर जूनच्या सुमारास पूर्णतः छाटणी केली जाते. त्यामुळे झाड नव्याने सशक्त आणि सुदृढ होते. अधिकच्या उत्पादनासाठी ती फायदेशीर ठरते असे संतोष सांगतात. जिवामृत हा घटक महत्त्वाचा असतोच. शिवाय बहर अंतिम टप्प्यात असताना देशी गाईच्या दह्याची फवारणी घेतली जाते. अखेरच्या महिन्यात रासायनिक कीडनाशकांचा वापर केला जात नाही. सेंद्रिय व्यवस्थापनावर भर दिल्याने फळाची गुणवत्ता व चमक चांगली मिळते असा असा संतोष यांचा अनुभव आहे. 

आश्‍वासक उत्पादन 
लागवडीनंतर तीन वर्षांनी बाग उत्पादनक्षम झाली. पहिल्या वर्षी एकूण क्षेत्रातून सुमारे साडेपाच टन उत्पादन मिळाले. त्या वेळी विक्रीचा फारसा अनुभव नसल्याने प्रति किलो ४० रुपये दरानुसार व्यापाऱ्याला बाग दिली. त्यापुढील वर्षी साडेचार टन उत्पादन मिळाले. कोरोना व लॅाकडाउन संकट त्या वेळी पुढे होते. मात्र ७० रुपये दरांप्रमाणे जागेवर विक्री झाली. यंदाही प्रति झाड १००, १२५ व काही ठिकाणी ७०, ८० च्या पुढे फळे आहेत. फळाचे सरासरी वजन ३०० ते ३५० ग्रॅमपर्यंत मिळते. सरासरी प्रति झाड फळांची संख्या ६० पर्यंत राहील, असा संतोष यांना अंदाज आहे. एकूण विचार करताना एकरी नऊ टनांपर्यंत उत्पादन मिळेल असा अंदाज आहे. ते सांगतात, की साधारण साडेसहा ते सात टन एकरी उत्पादन व ४० रुपये प्रति किलो दर गृहीत धरला तरी तीन लाख रुपये मिळतात. त्यातून एक लाख रुपये खर्च वजा केल्यास दोन लाख रुपये नफा मिळण्यास अडचण येणार नाही.  

उसाचेही आश्‍वासक उत्पादन 
उसाचे एकरी ९० टनांपर्यंत उत्पादन घेण्यात आपण यशस्वी ठरलो असल्याचे संतोष सांगतात.द्राक्षाची बाग नवी आहे. मात्र केळीतून मागील वर्षी पाच लाख रुपयांपर्यंत एकूण उत्पन्न मिळाले आहे. आमच्या भागात उसासारखे पीक महत्त्वाचे असताना त्यास फळपिकांची जोड देऊन अर्थकारण उंचावण्याचा प्रयत्न मी केल्याचे ते म्हणतात.  

संपर्क ः संतोष मोरे  ९७६६५३०९९१


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
पॅलेट स्वरूपातील कोंबडी खतनिर्मितीनाशिक जिल्ह्यातील बल्हेगाव (ता. येवला) येथील...
सुयोग्य व्यवस्थापनाचा आले शेतीतील आदर्शमौजे शेलगाव (खुर्द) (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद)...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...
कडक जमिनींसाठी ठरतोय ‘व्हायब्रेटिंग...खोल जमिनीत तयार झालेला कडक थर फोडण्यासाठी तसेच...
पूरक व्यवसायांतून ‘नंदाई’ ने उभारले...साधारण अठरा वर्षांपूर्वी भावाने रक्षाबंधनाला शेळी...
शेतीचे शास्त्र अभ्यासून आदर्श बीजोत्पादनसवडद (जि. बुलडाणा) येथील विनोद मदनराव देशमुख या...
विषाणूजन्य रोग अन् ‘कीडमुक्त क्षेत्रा’...मागील वर्षी राज्यातील टोमॅटो पट्ट्यात कुकुंबर...
पुन्हा जोडतोय शेतीशीपुणे शहराजवळील पडीक शेत जमिनीवर ‘अर्बन फार्मिंग'...
देवरूख भागात फुलली स्ट्रॉबेरीमहाबळेश्‍वरसारख्या थंड प्रदेशात मोठ्या प्रमाणात...
मांस उत्पादनांची ‘ऑनलाइन’ विक्रीकोरोना संकटाच्या कालावधीत अनेकांच्या नोकरीवर गदा...
साठे यांचे लोकप्रिय पेढेयवतमाळ जिल्ह्यातील लोणीबेहळ (ता. आर्णी) येथील...
जलसमृद्धीतून मिळवली संपन्नता नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव (ता.चांदवड) गावाने...
फळबाग शेतीतून गवसला शाश्‍वत उत्पन्नाचा...कौडगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील अरुण बाबासाहेब...
गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादनात ‘मास्टर’सांगली जिल्ह्यातील नेहरूनगर (निमणी) (ता. तासगाव)...
विद्यार्थी बंधूंनी उभारला जैविक स्लरी...पुणे जिल्ह्यातील नानगाव येथील प्रतीक व प्रवीण या...
स्वादिष्ट हुरड्याचे उत्पादन अन् ‘...परभणी जिल्ह्यातील लिमला येथील तरुण शेतकरी...
भाजीपाला, फळबागेतून बसवली आर्थिक घडीसांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील सोमनाथ...
काटों पे चलके मिलेंगे साये बहार के...रुक जाना नहीं तू कहीं हार के काटों पे चलके...