ओल्या काजूगरासाठी प्रसिद्ध कुणकवण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण (ता. देवगड) हे गाव ओल्या काजूगरासाठी नावारूपाला आले आहे. कोकणातील स्थानिकसह मुंबईपर्यंतच्या बाजारपेठा मिळवीत गावकऱ्यांनी त्यातून काही लाखांची उलाढाल करीत अर्थकारण उंचावले आहे.
Wet cashews and their packets.
Wet cashews and their packets.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण (ता. देवगड) हे गाव ओल्या काजूगरासाठी नावारूपाला आले आहे. कोकणातील स्थानिकसह मुंबईपर्यंतच्या बाजारपेठा मिळवीत गावकऱ्यांनी त्यातून काही लाखांची उलाढाल करीत अर्थकारण उंचावले आहे.   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मात्र रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेजवळ सुमारे ८९६ लोकवस्तीचे कुणकवण गाव वसले आहे. चहूबाजूंनी निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. दक्षिण दिशेला काही वर्षांपूर्वी आकारास आलेल्या कोर्ले सातंडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे निळेशार पाणी गावाला पर्यटनाच्या नव्या दिशा खुणावत आहे. पूर्वी ग्रामस्थ आंबा, भात, नाचणी अशी पिके घ्यायचे. पूर्ण डोंगराळ असल्याने भातासारखे पीक घरगुती वापराइतकेच घेतले जाते. अलीकडील वर्षांत बाजारपेठेतील संधी व आपल्याकडील नैसर्गिक स्रोत ओळखून शेतकऱ्यांनी शेतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे.  काजू लागवडीवर भर देवगड तालुका हापूस आंब्यासाठी जगभर ओळखला जातो. कुणकवणही त्यास अपवाद नाही. सन १९६४ मध्ये कुणकवण आदर्श फलोत्पादन सहकारी कृषी सहकारी सोसायटीची स्थापना झाली. त्यातून हापूस आंबा लागवडीवर भर दिला. मात्र देवगड समुद्रकिनारपट्टीत जानेवारी, फेब्रुवारीत परिपक्व होणारा आंबा कुणकवण परिसरात मे १५ नंतर परिपक्व होत असल्याचे लक्षात आले. त्याच वेळी वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राने विकसित केलेली वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात जातीची काजू कलमे लोकप्रिय ठरली होती. त्यामुळे काजू लागवडीकडे शेतकऱ्यांनी प्रकर्षाने लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यातून शेकडो एकर जमीन काजूखाली आली. संस्थेचा पुढाकार  कुणकवण लाभक्षेत्रातील कोर्ले सातंडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर २००१ मध्ये प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली. आतापर्यंत पाण्याचे दुर्भीक्ष असलेल्या गावात पाण्याचा सुकाळ नांदू लागला. त्याचवेळी गावात अण्णा तावडे ग्रामविकास संस्थेची स्थापना झाली. संस्थेने दहा लाख रुपये खर्चून १५ एचपीचा पंप बसवून  सुमारे दीड किलोमीटर पाइपलाइन करून  धरणातील पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवले. त्यातून ४० हून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली आले. आता काही शेतकऱ्यांनी कलिंगड, शेवगा, मिरची व अन्य भाजीपाल्याची लागवड सुरू केली. याच संस्थेतर्फे महिला प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. सुसज्ज व्यायामशाळाही संस्थेने उभारली आहे. ओल्या काजूगरसाठी ओळख हवामान बदल, दरांतील चढ-उतार, अवकाळी पाऊस आदी समस्या काजू पिकात उद्‍भवल्या  होत्या.  त्याच वेळी सुक्या काजूपेक्षा ओल्या काजूगरांना मोठी मागणी असल्याचे येथील शेतकऱ्यांच्या लक्षात आले. परिस्थिती व संधी ओळखून शेतकऱ्यांनी मग ओल्या काजूगरांकडे लक्ष वळविले. कोणत्याही यंत्राची मदत नसताना हाताने अख्खा काजूगर काढून मुंबई, पुणे, कणकवली, खारेपाटण आदी बाजारपेठा मिळविण्यास सुरुवात केली. आता अनेक शेतकरी या व्यवसायात उतरले आहेत. ओले काजूगर पुरविणारे गाव अशी गावाची ओळख झाली आहे.  गावातील ठळक बाबी 

  • शंभर एकरांवर हापूस, त्यातून २५ लाखांपर्यंत उलाढाल. ५० एकर भात, कलिंगड, शेवगा, मिरची यांतून उलाढालीस वाव 
  • ग्रामविकास संस्था आणि भगीरथ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने गावात धूरमुक्त गाव अभियान राबविले. त्यातून ४८ बायोगॅस यंत्रणा उभारणी. या उपक्रमामुळे लाकूडतोड थांबली.इंधनावरील खर्च कमी झाला. 
  • आरोग्य शिबिर राबवून गावातील सुमारे ४५० जणांचे ‘हेल्थ कार्ड’ तयार करण्यात आले. गरजू रुग्णांना ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून औषधपुरवठा होतो. 
  • २५ महिलांना ढोल-ताशा वाजविण्याचे प्रशिक्षण. त्यांचे ढोलपथक कार्यरत असून, तालुक्यातील विविध कार्यक्रमांना त्यांना निमंत्रित केले जाते.
  • सहा कुटुंबांनी मुक्त व पारंपरिक शेळीपालन व्यवसायातून आर्थिक सक्षमता साधली आहे. ग्राहक घरी येऊन, चांगला दर देऊन खरेदी करतात.
  • गावात ८ महिला बचत गट कार्यरत. 
  • स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम, पर्यावरण संतुलन, तंटामुक्त आदी पुरस्कारांनी गावचा सन्मान ग्रामसेवक नीलेश पाताडे यांचे सहकार्य 
  • गावातील काजूगर व्यवसाय दृष्टिक्षेपात 

  • सुमारे ८० एकर क्षेत्र काजूखाली 
  • वेंगुर्ला ४ आणि वेंगुर्ला ७ जातींची निवड 
  • काजू बी विक्रीतून सुमारे ३५ लाख, तर ओला काजूगर विक्रीतून सुमारे १५ लाख रुपये उलाढाल
  • ओला काजूगर शेकडा २५० रुपये, तर किलोला ९०० रुपये दर 
  • ७० ते ८० टक्के सेंद्रिय पद्धतीने देखभाल
  • गावात घर तिथे पिण्याचे पाणी आणि रस्ता या पायाभूत सुविधा पोचविल्या आहेत. धूरमुक्त गाव, महिला सक्षमीकरण अशा विविध संकल्पना राबविण्यावर भर आहे. - मनोहर हरी सावंत, ९४२१२३९२६५ सरपंच, कुणकवण माझी काजूची पाचशे ते सहाशे झाडे आहेत. काही वर्षे बी विक्री केली. पाच- सहा वर्षांपासून ओला काजूगर विक्री करीत आहे. त्यातून सुमारे दोन लाख रुपये मिळवितो. मुंबई, पुणे, कणकवली आदी बाजारपेठांत त्यास मोठी मागणी आहे. आंबाही मुंबई बाजारपेठेत पाठवतो.  - सचिन राणे, ८८५०३८४११८ पाण्याच्या उपलब्धतेमुळे चार एकरांत कलिंगड घेतो. एकरी १५ ते १८ टन उत्पादन घेतो. गावात स्टॉलवर तसेच व्यापाऱ्यांनाही विक्री करतो. शेवगा, मिरची देखील आहे. मल्चिंग, ठिबकचा वापर केला आहे. - जितेंद्र बाबाजी कदम, ९४२०२५८५६०, कुणकवणचे सुपुत्र आणि राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून, तसेच आमच्या संस्थेच्या माध्यमातून शेती, पूरक, पाणी, पर्यावरण, शिक्षण, महिला सक्षमीकरण, सेंद्रिय शेती आदी उपक्रम राबवितो आहे.  - विवेक तावडे, संचालक,  अण्णा तावडे ग्रामविकास संस्था

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com