भाजीपाला,पूरक उद्योगातून महिलांची आघाडी

मिरजोळी(ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) गावातील उपक्रमशील महिलांनी उमेद अभियानांतर्गत आस्था महिला बचत गटांची स्थापना केली. गेल्या तीन वर्षांपासून महिलांना शेती आणि पूरक उद्योगातून आर्थिक प्रगतीची दिशा मिळाली.पीठ गिरणी, शिवणकाम, लोणची-पापड विक्रीमधून महिलांना उदरनिर्वाहाचे साधन मिळाले आहे.
पालेभाजी काढणी करताना सुगंधा माळी आणि महिला गटातील सदस्या.
पालेभाजी काढणी करताना सुगंधा माळी आणि महिला गटातील सदस्या.

मिरजोळी(ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) गावातील उपक्रमशील महिलांनी उमेद अभियानांतर्गत आस्था महिला बचत गटांची स्थापना केली. गेल्या तीन वर्षांपासून महिलांना शेती आणि पूरक उद्योगातून आर्थिक प्रगतीची दिशा मिळाली.पीठ गिरणी, शिवणकाम, लोणची-पापड विक्रीमधून महिलांना उदरनिर्वाहाचे साधन मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांची चळवळ चांगल्या प्रकारे वाढीस लागली आहे. या अभियानांतर्गत अमोल काटकर, प्रणव कोळेकर यांनी मिरजोळी येथे प्रयोगशील महिलांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये महिलांना बचत गटांचे महत्त्व आणि शेतीपूरक व्यवसायाची माहिती मिळाली. २०१८ मध्ये दहा महिलांनी एकत्रित येऊन आस्था बचत गट स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. गटातील बहुतांश सदस्यांकडे शेती आहे. गटाच्या नोंदणीसाठी साधारण नऊ महिन्यांचा कालावधी लागला. तोपर्यंत महिलांनी स्वतःहून आर्थिक बचतीला सुरवात केली. सध्या गटामध्ये शुभ्रा कानडे (अध्यक्ष),सुगंधा माळी (उपाध्यक्ष), श्रावणी कानडे (सचिव), रूपाली पवार, नम्रता कदम, देविका माळी, स्मिता लाड, जान्हवी कानडे, रेश्मा दळवी, रोशनी साखरपेकर या सदस्या कार्यरत आहेत. बचत गटामधून जमा झालेल्या रक्कमेतून सदस्यांनी स्वतःच्या शेतीमध्ये मेथी लागवडीला सुरवात केली. योग्य व्यवस्थापन ठेवल्याने मेथीची चांगली वाढ झाली. गावातील घराघरात जाऊन महिलांनी मेथीची विक्री केली. त्यानंतर टप्याटप्याने हंगामी भाजीपाला लागवडीला सुरवात झाली. यातून गटाचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू झाला. आर्थिक उलाढालीमुळे गटातील महिलांचा आत्मविश्‍वास वाढला. परसबागेतून एकत्रित भाजी लागवड  आस्था महिला बचत गटातील दहा जणींनी एकत्र येऊन परसबागेत भाजीपाला लागवडीचे नियोजन केले. सुरवातीला बारा गुंठे जमिनीवर लाल भाजी, मुळा, पालेभाजी, गवार, भेंडी आणि मका लागवड केली. भाजीपाला पिकांचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे दिवसाला पालेभाजीच्या ५० जुड्या मिळू लागल्या. गावामध्येच १० रुपये प्रति जुडी या दराने विक्री सुरू झाली. विक्रीसाठी सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार असे उपवासाचे वार ठरवल्याने भाजीला चांगला उठाव मिळाला. भाजीपाला विक्रीतून गटाला दर महिन्याला पाच हजार रुपयांचा फायदा सुरू झाला. परसबागेतून पहिल्या टप्प्यात भेंडी, गवार आणि पालेभाजीचे उत्पादन सुरू झाले. भेंडी,गवारीची प्रति किलो पन्नास रुपये दराने विक्री झाली. गावपरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन महिला गटाने मिरची, वांगी, पालेभाज्या लागवडीवर भर दिला आहे. भाजीपाल्याने दिली आर्थिक साथ  भातशेतीसह भाजीपाला लागवड करणाऱ्या सुगंधा माळी यांनी बचत गटाकडून मिळालेल्या दहा हजार रुपयांचा योग्य विनियोगकरून वांगी, मिरची लागवड करण्याचा निर्णय घेतला. भाजीपाला लागवड आणि व्यवस्थापनामध्ये त्यांना पतीची चांगली साथ मिळाली. सुंगधाताई दरवर्षी दीड एकरावर भाजीपाला लागवड करतात. नोव्हेंबर महिन्यात वांगी,मिरची लागवडीला सुरवात केली. या लागवडीच्या पट्यात आंतरपीक म्हणून लाल माठ, मुळा लागवड केली. भाजीपाला पिकांचे तज्ज्ञांच्या सल्याने योग्य व्यवस्थापन ठेवल्याने वाढ चांगली झाली.तसेच उत्पादनवाढीसाठी फायदा झाला. जानेवारी महिन्याच्या अखेरीस वांगी,मिरचीच्या उत्पादनाला सुरवात झाली. पहिल्या टप्यात ५ ते ८ किलो वांगी उत्पादन होऊ लागले. मात्र कालांतराने एका काढणीमध्ये ४० ते ६० किलो वांगी मिळू लागली. गाव परिसरातील बाजारपेठेत वांग्याला प्रति किलो ५० ते ८० रुपये दर मिळाला. मिरचीला सरासरी ६० रुपये प्रति किलो असा दर मिळाला. चिपळूण शहरातील भाजी व्यावसायिकांसह गावाच्या बाहेरून जाणाऱ्या रस्त्यावर स्टॉल टाकून माळी यांनी भाजीपाला विक्री केली.कोरोनाच्या काळात परजिल्ह्यातून भाजीपाला कमी येत असल्याने गाव परिसरातील भाजीपाला विक्रेते शेतावर येऊन भाजी विकत घेऊन जात होते. बियाणे,मजुरी आणि खतांचा खर्च वगळून दरमहा भाजीपाला उत्पादनातून दरमहा दहा हजारांचा नफा त्यांना मिळतो. या मिळकतीमधून त्यांनी बँकेकडून घेतलेले कर्ज वर्षभरात फेडले. पूरक व्यवसायाकडे कल  गतवर्षी बचत गटातील सदस्यांना भाजीपाला विक्रीतून चांगला आर्थिक नफा मिळाल्यानंतर यंदा गटाने बँकेकडून १ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. यातून प्रत्येकाने २५ हजार रुपये वाटून घेतले. सुगंधा माळी यांनी त्यामधून पीठ गिरणीची खरेदी केली. काही सदस्यांनी शिवण यंत्र, पशूपालन तसेच काही सदस्यांनी लोणची, पापड, विविध प्रकारच्या पीठ निर्मितीला चालना दिली. बचत गटाच्या माध्यमातून सदस्यांना विविध पूरक उद्योगातून आर्थिक नफा होऊ लागला आहे. आर्थिक मिळकतीमधून काही सदस्यांनी शेतीमध्ये पीक बदल तसेच सुधारित तंत्रज्ञानाच्या वापराला सुरवात केली. त्याचा पीक उत्पादनवाढीसाठी चांगला फायदा होत आहे. गावशिवारात नदी असल्याने काही सदस्यांनी भाजीपाला, चारा पिकांची लागवड वाढवली आहे, काही सदस्यांनी पशूपालनाला चालना दिली आहे. सुगंधा आणि संतोष माळी यांचा पूर्वापार दुधाचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे सध्या सहा म्हशी असून दिवसाला ६० लिटर दुधाची ते गाव परिसरातील ग्राहकांना थेट विक्री करतात. जुलै, २०२१ च्या महाप्रलयकारी पुराचा महिला बचत गटातील कुटुंबीयांना आर्थिक फटका बसला. शेतीतील पिके तसेच दुधाळ जनावरे वाहून गेली. परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गटातील महिलांनी नव्याने उभारी घेण्यास सुरवात केली आहे. महिलांच्या एकीमुळे गावशिवारात शेती आणि पूरक उद्योगाला नव्याने चालना मिळाली आहे. संपर्क : सुगंधा माळी,८४५९८०७५७३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com