गुणवत्तापूर्ण आंब्याला मिळवली ग्राहक बाजारपेठ

मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) येथील विद्याधर पुसाळकर यांनी समुद्रकिनाऱ्यापासून जवळच असलेल्या आपल्या २७ एकरांत पुनरुज्जीवन, सेंद्रिय व्यवस्थापन याद्वारे दर्जेदार, स्वादिष्ट आंबा पिकवला आहे. राज्यासह परराज्यांतही प्रयत्नपूर्वक थेट ‘मार्केटिंग’ करीत आपल्या आंब्यासाठी थेट ग्राहक बाजारपेठही तयार केली आहे.
mango packing
mango packing

मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) येथील विद्याधर पुसाळकर यांनी समुद्रकिनाऱ्यापासून जवळच असलेल्या आपल्या २७ एकरांत पुनरुज्जीवन, सेंद्रिय व्यवस्थापन याद्वारे दर्जेदार, स्वादिष्ट आंबा पिकवला आहे. राज्यासह परराज्यांतही प्रयत्नपूर्वक थेट ‘मार्केटिंग’ करीत आपल्या आंब्यासाठी थेट ग्राहक बाजारपेठही तयार केली आहे. मालगुंड हे रत्नागिरी तालुक्यात समुद्रकिनारी वसलेले गाव आहे. अशा किनारपट्टी भागात कातळावरील हापूसच्या बागा हंगामापेक्षा लवकर येतात आणि त्यातून बागायतदारांना अधिकचे उत्पन्न मिळते. याच गावातील विद्याधर पुसाळकर यांच्या आजोबांची (भालचंद्र) आठ एकर जमीन होती. त्यात आंबा बाग होती. वडील शशिकांत यांनी ती प्रयत्नपूर्वक वाढवली. वडिलांचा वारसा तिसऱ्या पिढीतील विद्याधर आज चालवीत आहेत. वडिलांच्या हाताखाली त्यांनी शेती व्यवस्थापनाचे धडे घेतले. आंबा बागेसह दोन एकर भात, रब्बी हंगामात उडीद, चवळी आणि अन्य भाजीपाला व स्वतःची राइस मिल असा व्यवसाय विस्तार त्यांनी केला आहे. शेती दृष्टिक्षेपात

  • एकूण फळबागायती- २७ एकर
  • हापूस- १२०० झाडे, केसर १००, पायरी २०० झाडे, नारळ १२५, सुपारी ८० झाडे.
  • आंतरपीक हत्तीगवत.
  • सेंद्रिय व्यवस्थापनावर भर

  • अधिकाधिक सेंद्रिय व्यवस्थापनावर भर. काही झाडे शंभर वर्षांहून जुनी. त्यांना कोणतेच खत दिले जात नाही.
  • टप्प्याटप्प्याने विकसित केलेल्या बागांत जूनमध्ये झाडांच्या वयानुसार १५ ते २० किलो खत. जुलैमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये. पावसाळ्यात रासायनिक खतांचा गरजेपुरताच वापर.
  • ऑगस्टमध्ये प्रत्येक झाडाला दहा लिटर जिवामृत. मोहोरानंतर दर दहा दिवसांनी ठिबक सिंचनाद्वारे पाणी. त्यामधून एखाद्यावेळी जिवामृतही. यामुळे फळांची गळ कमी होते आणि पुनर्मोहराचे प्रमाण घटते. जिवामृतामुळे झाडे टवटवीत राहतात.
  • झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळावा यासाठी सप्टेंबरमध्ये विरळणी.
  • -आंबा तोडणीपूर्वी कीडनाशकांच्या सुमारे पाच फवारण्या.
  • ठळक बाबी कलम करण्याची पद्धत वातावरणातील बदलामुळे हापूसचे उत्पादन कमी होत असून झाडे रोगराईला बळी पडतात. त्याला सामोरे जाण्यासाठी रायवळ आंब्याच्या रोपांचे मातृवृक्ष करून कलम करण्याचा प्रयोग सुरू केला आहे. रायवळच्या बाटीतून रुजून आलेले वर्षाचे रोप जमिनीत लावले जाते. त्याला कोचीकलम बांधले जाते. त्यातून तीन वर्षांची झाडे तयार झाली आहेत. त्यांची रोगप्रतिकारकशक्ती अधिक राहील व फळेही चांगली येतील अशी पुसाळकर यांना आशा आहे. मल्चिंग  जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला की झाडाची ताकद वाढते. त्यासाठी ऑगस्टमध्ये ‘ग्रासकटर’द्वारे बागेची सफाई होते. कापलेले गवत, पीकअवशेष, पालापाचोळा, भाताचा कोंडा यांचे सातत्याने मल्चिंग केले जाते. विविध झाडांच्या फांद्या तोडून यंत्राद्वारे बारीक करून झाडाच्या बुंध्यात वापरल्या जातात. पावसाळ्यात जीवामृत, गांडूळ खत वापरल्यानंतर त्यात गांडुळे तयार होतात आणि कसदार खत तयार होते. मग झाडे दर्जेदार फळे देतात असे पुसाळकर सांगतात. झाडांचे पुनरुज्जीवन  तीन वर्षांपूर्वी चाळीस वर्षांपूर्वीच्या सुमारे २०० झाडांचे पुनरुज्जीवन केले. ती झाडे थोडं थोडं उत्पादन देऊ लागली आहेत. छाटणी करून फांद्यांना बोर्डो पेस्ट लावली. वर्षभरात त्यास पुन्हा फांद्या येऊ लागल्या. पानांवर बुरशीनाशकांची फवारणीही केली. फवारणी  बागेत उंच ठिकाणी पाचशे लिटरच्या दोन टाक्या आहेत. तेथे विजेवरील पंप असून अर्धा इंचाची छोटी पाइपलाइन फवारणीसाठी संपूर्ण बागेत फिरवली आहे. चाळीस मीटरवर एक याप्रमाणे जोडण्या आहेत. त्यास स्प्रेपंप जोडला, की आजूबाजूच्या चार ते पाच झाडांची फवारणी होते. आठ दिवसांचे हे काम चार दिवसांत होते. त्यामुळे वीज, वेळ व मजुरी याची बचत होते. गांडूळ खत प्रत्येकी दोन म्हशी व गायी आहेत. वर्षाला दहा टन गांडूळ खत लागते. त्यासाठी दोन मोठी आणि चार लहान युनिट आहेत. त्यासाठी कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेतला. जिवामृत वर्षाला दहा हजार लिटर लागते. देशी गाईचे शेण, गोमूत्र, बेसन पीठ, ताक, वडाखालील माती एकत्रित करून ते तयार केले जाते. आंब्याचे ‘मार्केटिंग’ मालगुंड हे पर्यटन स्थळ असल्याने बागेजवळ ‘येथे हापूस आंबा मिळेल’ असे बॅनर तयार करून तसेच व्हॉट्‍सॲप ग्रुपद्वारे ग्राहकांत ‘प्रमोशन’ केले. त्यातूनच मध्यस्थ व व्यापाऱ्यांवरील अवलंबित्व कमी करून पुसाळकर यांनी अधिकाधिक थेट ग्राहकांची बाजारपेठ विकसित केली. दरवर्षी चार हजार ते पाच हजार पेटी आंब्यांची बॉक्समधून विक्री होते. राज्यातील शहरांसह दिल्ली, चंडीगडपर्यंत आंबा कुरिअरमार्फत पाठवला जातो. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी ठिकाणी वितरक असून, वाहतुकीसाठी वाहन आहे. हंगामाच्या सुरुवातीला १२०० रुपये प्रतिपेटी व अखेरीस हा दर ३०० ते ४०० रुपये मिळतो. जीआय मानांकन आंब्याला जीआय मानांकन केल्याचाही फायदा मिळत असल्याचे पुसाळकर सांगतात. दोन एकरांचे पीजीएस (सामूहिक) सेंद्रिय प्रमाणीकरण गटाद्वारे केले आहे. चार वर्षांपूर्वी दुबईला अर्धा टन हापूस आंब्याची निर्यात केली. यंदा इंग्लंडसाठी ऑर्डर आली आहे. आंब्याव्यतिरिक्त नारळ १८ ते २० रुपये, शहाळे १४ रुपये प्रति नग दराने, तर सुपारीची ३५० रुपये प्रति किलो दराने विक्री होते. प्रतिक्रिया नैसर्गिकरीत्या पिकलेला दर्जेदार आंबा देण्यासाठी बागेची चांगली निगा राखण्यावर भर असतो. त्यामुळेच ग्राहक अनेक वर्षे टिकून राहिला आहे. - विद्याधर शशिकांत पुसाळकर, ९४२२३८२२१२  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com