उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली आर्थिक सक्षमता

बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे यांनी शेती, दुग्धव्यवसाय, ट्रॅक्टर व्यवसाय, व किराणा असे विविध उत्पन्नस्त्रोत तयार केले. त्यातून शेती व कुटुंबाची आर्थिक घडी सक्षम केली आहे.
Chili plot planted by Mahesh Wankhade
Chili plot planted by Mahesh Wankhade

बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे यांनी शेती, दुग्धव्यवसाय, ट्रॅक्टर व्यवसाय, व किराणा असे विविध उत्पन्नस्त्रोत तयार केले. त्यातून शेती व कुटुंबाची आर्थिक घडी सक्षम केली आहे. विशेष म्हणजे मजुरांचा कमीतकमी वापर करीत कुटुंबानेच सर्वाधिक परिश्रमांवर भर देत खर्चातही बचत साधली आहे. अकोला जिल्ह्यात आजही पारंपारिक पिकांखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. खरिपात सोयाबीन, तूर ही प्रमुख पिके आहेत. मात्र उत्पादन तुलनेने कमी, साहजिकच वार्षिक उत्पन्नही समाधानकारक नाही. अशा स्थितीत काही तरुण पूरक व्यवसायांच्या माध्यमातून शेतीवरील भार कमी करण्याची धडपड करीत आहेत. बोरगाव खुर्द (ता.. अकोला) येथील महेश वानखडे त्यापैकीच एक आहे. त्यांचे वडील राजकुमार यांनी एका म्हशीपासून दुग्ध व्यवसायास सुरवात केली. भूमिहिन असलेले हे कुटुंब सचोटी, मेहनतीच्या जोरावर पुढील काळात शेतमालकही झाले. महेश यांनी सांभाळली जबाबदारी महेश यांनी साधारण २००० च्या सुमारास शेतीची सूत्रे हाती घेतली. कुटुंबाच्या साडेदहा एकर शेतीवर पूर्ण विसंबून न राहता उत्पन्नस्त्रोत वाढविण्यावर भर दिला. त्यादृष्टीने दुग्ध व्यवसाय, ट्रॅक्टर भाडेतत्वावर देणे, किराणा दुकान अशी उत्पन्नाची साधने निर्माण केली. त्यातूनच आर्थिक स्थैर्य निर्माण करणे त्यांना शक्य झाले. महेश यांचा दिवस पहाटे पाचला सुरू होतो. पहाटे दुग्धव्यवसायास सुरवात होते. चारा, वैरण, दूध डेअरीला नेऊन देणे, त्यानंतर शेतीतील नियोजन व संध्याकाळी किराण दुकान असा रात्री दहा वाजेपर्यंत दिनक्रम असतो. अर्थात किराणा व्यवसायात आईचा वाटा महत्त्वाचा आहे. उत्पन्नाचे स्रोत निर्माण करताना कष्टांमध्येही वाढ झाली. मात्र त्याशिवाय प्रगती होत नसल्याचे महेश सांगतात. विशेष म्हणजे बहुतांश डोलारा तेच सांभाळतात. आता थांबायचे नसून आहे त्यात वाढ करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. व्यवसायातील कष्ट वानखडे यांच्या कुटुंबाची स्थिती सांगायची तर पूर्वी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करावा लागायचा. वडिलांनी दुग्धव्यवसाय सुरु केला तेव्हा १० किलोमीटर पायी जाऊन मोठ्या गावाच्या ठिकाणी दूध पोच करण्यापर्यंत कष्ट त्यांनी घेतले. नंतर सायकलीने वाटप सुरु केले. महेश यांनी व्यवसाय हाती घेतल्यानंतर सकाळ-संध्याकाळ मिळून सुमारे २०० लिटर दूध ते मूर्तीजापूरला घेऊन जायचे. घरोघरी पोच करायचे. सन २०१० मध्ये किराणा दुकान सुरु केले. मूर्तीजापूरला दररोज जावे लागत असल्याने तेथून दुकानासाठी लागणारे साहित्य आणून गावात विक्री करणे सुरु केले. शेतीपूरक व्यवसाय वाढवीत सन २०१४ मध्ये ट्रॅक्टर विकत घेतला. सोबत रोटाव्हेटर, पेरणीयंत्र, ट्रॉली असे साहित्य घेतले. आज भाडेतत्वावर ते शेतकऱ्यना वर्षभर दिले जाते. दुग्धव्यवसाय सध्या आठ मुऱ्हा म्हशी व दोन जर्सी गायी आहेत. मुऱ्हा म्हशी निवडण्याचे कारण म्हणजे जास्त दिवस दूध देतात. भाकड काळ कमी राहतो. दूध देण्याची क्षमता अधिक आहे. स्थानिक वातावरण या जातीला मानवते. दररोज ५० लिटर दूध मूर्तिजापूर येथील डेअरीसाठी पुरवले जाते. दूध काढणीसाठी येत्या काळात यंत्राचा वापर होणार आहे. गावात गाडी येऊन दूध घेऊन जाते. दर दहाव्या दिवशी फॅटनुसार दुधाचे पेमेंट मिळते. त्यामुळे तालुक्याला जाण्या-येण्याची अडचण दूर झाली. वेळ वाचल्याने अन्य बाबींकडे लक्ष देता आले. चारा पिकांसाठी दोन एकर क्षेत्र राखीव ठेवले आहे. दररोजच्या आहारात किमान २५ टक्के हिरवा चारा असतो. सकाळी व संध्याकाळी ओला व सुका चारा तसेच सरकी पेंड, मका, हरभऱ्याची चुरी वापरण्यात येते. तीन महिन्यातून एकदा जंतनाशकाचा वापर होतो. जागेवर चारा- पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी गव्हाणीत पाण्याचा हौद व शेजारी चाऱ्याची व्यवस्था केली आहे. अतिरिक्त उत्पन्न म्हशीला कुठल्या काळात दर अधिक मिळतात याचा अनुभव आल्याने महेश दरवर्षी पावसाळा संपला की म्हशीची संख्या वाढवितात. या काळात मुबलक चारा असल्याने गाभण म्हशी विकत आणतात. या म्हशींची किंमत तुलनेने कमी असते. उन्हाळ्यापर्यंत त्यांचे पालनपोषण केले की व्यायला तयार झालेली म्हैस विक्री करतात. तीस ते ३५ हजार रूपयांत घेतलेली म्हैस अधिक किमतीत विक्री होते. दरवर्षी सुमारे चार ते पाच म्हशींची विक्री करण्याचे नियोजन असते. त्यातून वर्षाला दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. वर्षभर जवळपास २० ते २५ ट्रॉली शेणखत मिळते. हे सर्व खत घरच्या शेतात वापरले जाते. यातून जमिनीची सुपीकता वाढीस लागली असून रासायनिक खतांचा वापर व त्यावरील खर्च कमी झाला आहे. कुटुंबाची साथ  शेतीतून प्रगती करीत महेश यांनी गावात सुंदर घर बांधले. आई रेखाताई, पत्नी अनुराधा यांचीही त्यांना मोठी मदत आहे. भाऊ प्रशांत काश्मीर भागात सैन्यात नोकरीला आहे. गोठ्यात कामांसाठी मजूर नाही. या भागात पाऊस चांगला होतो. तसेच एक विहीर व चार बोअर्समुळे सिंचनाची सोय निर्माण झाली आहे. दुग्धव्यवसायाबरोबर महेश शेतीकडेही तेवढेच लक्ष देतात.येत्या काळात पारंपारिक पिकांऐवजी व्यावसायिक पिके घेण्याचा प्रयत्न आहे. यंदापासून त्याची सुरवात केली. मल्चिंगवर एक एकर मिरचीचे पीक घेतले आहे. मिरची जोरदार असून पहिल्या तोड्याला मूर्तिजापूर बाजारात सर्वाधिक ४० ते ४५ रुपये प्रति किलोचा दर मिळाला आहे. सोयाबीनचे सात ते आठ क्विंटल, तुरीचे पाच क्विंटल, हरभऱ्याचे ९ ते १० क्विंटल, भुईमुगाचे १२ क्विंटल असे उत्पादन मिळते. संपर्क- महेश वानखडे- ८२०८८९१०४७, ९८२३३८२१३१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com