यांत्रिकी पूरक उद्योग ठरताहेत अल्पभूधारकांना आधार

औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील आठवडी बाजाराचं गाव म्हणून ओळख असलेल्या बाबरा गावातील शेतकऱ्यांनी डाळ मिल, शेंगा फोडणी, मसाला गिरणी असे छोटेखानी यांत्रिकी व्यवसाय सुरू केले आहेत.
Dal mill, grain cleaning and grading machine
Dal mill, grain cleaning and grading machine

औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील आठवडी बाजाराचं गाव म्हणून ओळख असलेल्या बाबरा गावातील शेतकऱ्यांनी डाळ मिल, शेंगा फोडणी, मसाला गिरणी असे छोटेखानी यांत्रिकी व्यवसाय सुरू केले आहेत. त्यातून रोजगारनिर्मितीसह चांगले अर्थार्जन होऊन कमी क्षेत्राच्या शेतीला मोठा सक्षम आधार त्यांनी तयार केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील बाबरा हे आठवडी बाजाराचं गाव म्हणून ओळखले जाते. कन्नड, खुलताबाद, फुलंब्री व सिल्लोड तालुक्‍यातील शेतकरी, भुसार माल व्यापारी येथील बाजारात येतात. या सर्वांबरोबरच आपली गरज ओळखून गावातील काही युवा शेतकऱ्यांनी छोटेखानी यांत्रिकीपूरक व्यवसाय सुरू केले आहेत. त्यातून हे गाव क्‍लस्टरचं रूप घेऊ पाहते आहे. त्यातून पंचक्रोशीतील तीन तालुक्‍यांतील १५ ते २० गावांतील शेतकरी, छोट्या भुसार माल व्यापाऱ्यांची सोय व कायमस्वरूपी रोजगारही सुरू झाला आहे. मिनी डाळ मिल गावचे तीन एकर शेती असलेले अल्पभूधारक आजिनाथ पवार शेतीला जोड व्यवसाय करण्याच्या विचारात होते. त्यातून २०१७ मध्ये त्यांनी भागीदारीतून मिनी डाळ मिल व्यवसाय सुरू केला. अकोला येथून यंत्र घेतले. प्रति तास ५ क्‍विंटल त्याची क्षमता आहे. गेल्या तीन वर्षांच्या काळात सुमारे १२०० क्‍विंटलपर्यंत हरभरा, तूर, मूग, उडीद यांच्या डाळी पवार यांनी शेतकऱ्यांना करून दिल्या. त्याचा दर ८०० रुपये प्रति असा आहे. मजूर, वीज व तेल व अन्य मिळून सुमारे ३५० रुपये प्रति क्‍विंटलचा खर्च येतो, तर क्विंटलला ४०० ते ६०० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. एकूण चार लाख रुपयांची गुंतवणूक आहे. वर्षाकाठी दोन- अडीच लाख रुपयांची होणारी उलाढाल माझ्यासारख्या अल्पभूधारक शेतकऱ्याला आर्थिक आधार देण्यासाठी महत्त्वाची ठरल्याचे आजिनाथ सांगतात. संपर्क : आजिनाथ पवार, ९०४९३२८८४६ नारायण यांचा अनुभव

  • पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची गरज ओळखून गावातील नारायण पवार यांनी शेंगा फोडणी यंत्र, मसाला गिरणी व अलीकडेच मिनी डाळ मिल सुरू केली आहे. तुरीवरील साल काढण्यासाठ प्रति तास ४ क्‍विंटल, तर डाळ तयार करण्याची क्षमता दीड- दोन क्‍विंटलपर्यंत आहे.
  • आतापर्यंत विविध धान्यांची १२० क्‍विंटलपर्यंत डाळ प्रति किलो ८ रुपये दराने शेतकऱ्यांना तयार करून दिली आहे. सुमारे एक लाख रुपयांचा व्यवसाय केला. उर्वरित भुश्‍शाचा उपयोग घरच्या २० ते २५ शेळ्यांना खाद्य म्हणून केला जातो. त्याद्वारे शेतीलाही लेंडीखत उपलब्ध झाले आहे.
  • हळद पावडर व मिरपूडही ते तयार करून देतात. सुमारे सात ते आठ लाख रुपये स्वगुंतवणूक त्यांनी केली आहे.
  • शेंगा फोडणी यंत्र पंचक्रोशीत अनेक शेतकरी १० गुंठ्यांपासून एक ते दीड एकरांपर्यंत भुईमूग घेतात. त्यांना यांत्रिक पद्धतीने शेंगा फोडून देण्याची संधी नारायण यांनी शोधली. सन २०१७ मध्ये राजकोटहून यंत्र आणले. सुमारे पावणेदोन लाख रुपयांची गुंतवणूक केली. ताशी ४ ते ५ क्‍विंटल त्याची क्षमता आहे. त्यासाठी एक हजार रुपये प्रति क्‍विंटल दर आकारला जातो. पहिले वर्ष अनुभवात गेलं. पण आता वर्षाला किमान ५०० क्‍विंटल शेंगा फोडून देण्याचे काम ते करतात. शेती व हे पूरक व्यवसाय मिळून वर्षाला सात ते आठ लाख रुपयांची उलाढाल ते करतात. गावातील कृष्णा पवार या अत्यल्पभूधारक शेतकऱ्यानेही २०१९ मध्ये प्रति तास तीन क्‍विंटल क्षमतेचे शेंगा फोडणी यंत्र आणले आहे. दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ८० क्‍विंटलपर्यंत शेंगा फोडणीचे काम त्यांनी केले आहे. संपर्क : नारायण पवार, ९४२०२२२८४२ धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्र गावात संत तुकाराम शेतकरी गट कार्यरत आहे. सोमीनाथ पवार अध्यक्ष व आजिनाथ पवार सचिव आहेत. गटाच्या माध्यमातून यंदाच्या फेब्रुवारीत धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सुमारे १६ लाख १० हजार रुपये किमतीच्या या यंत्राच्या माध्यमातून सात हजार क्‍विंटल गहू, बाजरी यावर प्रक्रिया झाली आहे. यात दहा- बारा व्यापाऱ्यांकडील धान्याचाही समावेश आहे. १०० रुपये प्रति क्‍विंटल दर त्यासाठी आकारला जातो. प्रति क्‍विंटल किमान ३० रुपये खर्च येतो. औरंगाबाद येथील मॉललाही सुमारे १७० क्‍विंटल गहू स्वच्छ व प्रतवारी करून ३० किलो बॅगेतून पुरवला. जवळपास साडेतीनशे क्‍विंटल बाजरी बाजारभावाने खरेदी केली. त्याचाही अकोला येथील व्यापाऱ्याला पुरवठा केला. त्यातून आर्थिक फायदा होण्याबरोबर व्यापारी ‘नेटवर्क’ मिळाले. ठळक बाबी

  • सप्टेंबर ते जूनदरम्यान चालतो डाळ मिल उद्योग
  • भुईमूग शेंगा फोडणीचे काम चालते वर्षभर
  • गटामार्फत बियाणे प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू
  • कृषी विभाग अधिकारी व कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ व शेतकऱ्यांची उद्योगाला भेट
  • प्रतिक्रिया गटाच्या धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्राला शेतकरी व व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. जवळपास सात हजार क्‍विंटल शेतीमालावर त्याआधारे प्रक्रिया पूर्ण होत दहा ते बारा लाखांची उलाढाल झाली आहे. - सोमीनाथ पवार, ९४२३८७८३५९ अध्यक्ष, संत तुकाराम शेतकरी गट, बाबरा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com