मसाला उद्योगासोबत सेंद्रिय शेतीकडे वाटचाल...

लवळे (ता.मुळशी, जि. पुणे) येथील ज्योती दत्तात्रय सातव यांनी गावातील महिलांना सोबत घेत स्वयंसिद्धा महिला बचत गटाची स्थापना केली. मसाला, लोणचे निर्मितीच्या बरोबरीने त्यांनी बाजारपेठेचा अंदाज घेत सेंद्रिय भाजीपाला उत्पादन आणि विक्रीला सुरुवात केली आहे.
Cultivation of vegetable crops by women members
Cultivation of vegetable crops by women members

लवळे (ता.मुळशी, जि. पुणे) येथील ज्योती दत्तात्रय सातव यांनी गावातील महिलांना सोबत घेत स्वयंसिद्धा महिला बचत गटाची स्थापना केली. मसाला, लोणचे निर्मितीच्या बरोबरीने त्यांनी बाजारपेठेचा अंदाज घेत सेंद्रिय भाजीपाला उत्पादन आणि विक्रीला सुरुवात केली आहे.  पुणे जिल्ह्यातील मुळशी हा भात शेतीसाठी प्रसिद्ध तालुका. भात काढणीनंतर  घरातील पुरुष मंडळी नोकरीसाठी पुणे, पिंपरी- चिंचवड परिसरात जातात. महिला घरगुती, शेती कामात व्यस्त असतात. गेल्या काही वर्षांपासून मुळशी तालुक्यात औद्योगिकीकरण आणि त्या माध्यमातून होणाऱ्या शहरीकरणामुळे लोकवस्ती वाढू लागली. शहरी लोकांची वाढती मागणी लक्षात घेऊन ज्योती सातव यांनी शेतीपूरक उद्योगाच्या दृष्टीने घरगुती स्तरावर मसाला निर्मितीचा विचार केला. यासाठी त्यांनी २०१६ मध्ये पौड पंचायत समितीच्या माध्यमातून मसाला निर्मितीसाठी प्रशिक्षण घेतले.  गटामार्फत मसाला, लोणचे निर्मिती ज्योती सातव यांची दोन एकर शेती असून, भात, गहू पिकांच्याबरोबरीने भाजीपाला लागवड करतात. हापूस आंब्याची जुनी सहा कलमे आहेत. ज्योतीताईंनी मसाला निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गावातील अकरा महिलांना  सोबत घेत २०१६ साली स्वयंसिद्धा महिला बचत गटाची सुरुवात केली. सध्या बाजारपेठेच्या मागणीचा विचार करून गटातर्फे सहा प्रकारचे मसाले आणि पाच प्रकारच्या लोणच्यांची निर्मिती केली जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार मसाल्याचे १०० ग्रॅम, २५० ग्रॅम,५०० ग्रॅम आणि एक किलो वजनाचे पॅकिंग करून, त्याची विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये विक्री केली जाते.परिसरातील शाळांमध्येही बचत गटाने मसाला उद्योगाची जाहिरात केल्याने पालकांच्याकडून मागणी आहे.  स्वाद आणि गुणवत्तेमुळे दरवर्षी मागणी वाढत आहे.      ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन गटातर्फे कांदा-लसूण मसाला, चहा मसाला, बिर्याणी मसाला, पुलाव मसाला, कोल्हापुरी मसाला, मत्स्य पदार्थांसाठी मालवणी मसाला, गोडा मसाला निर्मिती केली जाते. या मसाल्याचा प्रति किलोचा दर ६०० रुपये आहे. कैरी, मिरची, कारले, लिंबू, आवळा लोणचे ३०० रुपये प्रति किलो  दराने विकले जाते. वर्षभरात मसाला, लोणचे विक्रीतून सुमारे दीड लाख रुपयांची उलाढाल होते. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गाव परिसरातील लहान उद्योग समूह बंद झाले आणि कंपन्यांमधील कामगारांचे कुटुंब गावाकडे गेले असल्याने मागणी कमी झाली. त्यामुळे निर्मितीचा वेग कमी झाला होता. परंतु पुन्हा एकदा यंदाच्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणावर मसाला, लोणचे उत्पादन आणि विक्रीचे नियोजन महिला गटाने आहे.  ‘लुपीन’ची साथ  गावातील महिला गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी लुपीन फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या कंपनीमध्ये दर शुक्रवारी स्थानिक महिला बचत गटांतर्फे उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. दर आठवड्याला साधारणपणे पाच ते सहा हजार रुपयांची विक्री होत असल्याचे सातव यांनी सांगितले.मसाले, लोणचे निर्मिती बरोबर ज्योती सातव यांनी सुरेखा सातव, अनिता आल्हाट, रोहिणी आल्हाट, वैशाली नाणेकर यांच्या सोबत सेंद्रिय शेतीकडे वाटचाल सुरु केली आहे. लुपीन फाउंडेशनच्या वतीने गटातील महिलांना शेणखत, जिवामृताबरोबर सेंद्रिय शेती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले.  सेंद्रिय शेतीकडे वाटचाल  उपलब्ध पाणी आणि जमिनीनुसार प्रत्येक सदस्याने सरासरी दहा गुंठे क्षेत्रावर चक्राकार पद्धतीने भाजीपाला लागवडीचे नियोजन केले आहे. यामध्ये टोमॅटो, मिरची,वांगी, मेथी, कोथिंबीर,आळू, चवळी, शेपू, पालक या भाज्यांचा समावेश आहे. महिला गटातर्फे सेंद्रिय भाजीपाला विक्रीचा पहिलाच प्रयोग असून लवळे परिसरातील दोन गृहनिर्माण सोसायट्यांसोबत चर्चा झाली आहे. त्यांच्या मागणीनुसार प्रत्येक आठवडा किंवा मागणीनुसार भाजीपाला पुरवठा केला जाणार आहे. येत्या काळात भाजीपाल्याची मागणी वाढल्यास महिला शेतकरी गट स्थापन करून याद्वारे सेंद्रिय भाजीपाला उत्पादन, खरेदी आणि विक्री सुरु करण्यात येणार आहे. गटातर्फे शिवारफेरीचेदेखील आयोजन केले जाते. गटातर्फे गाव परिसरातील शेतकऱ्यांकडूनही भाजीपाल्यासोबतच भात, गहू, कडधान्ये अशा  शेतीमाल  खरेदीचे नियोजन आहे.  स्थानिक शेतकऱ्यांनाही योग्य दर मिळतील, असा प्रयत्न आहे. येत्या काळात गटातर्फे दूध प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात येणार आहे.   उत्पादनाची वेगळी ओळख लवळे परिसरातील सिम्बायोसिस संस्थेमधील कला शाखेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून स्वयंसिद्धा बचत गटाच्या विविध उत्पादनांचे लोगो तयार करून दिले.  गटाच्या माध्यमातून आम्ही मसाले व लोणच्याच्या उत्पादनाला सेंद्रिय भाजीपाला उत्पादनाची जोड दिली आहे.सध्या प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक सदस्याने दहा गुंठ्यावर भाजीपाला लागवड केली आहे. यामध्ये मेथी, कोथिंबीर, पालक, आळू, शेपू, चवळी लागवड आहे. येत्या काळात  परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सीताफळ, पपई, पेरू आणि चिकू विक्री केली जाणार आहे. - ज्योती सातव,  ७२१८७९९७६०,  (प्रमुख, स्वयंसिद्धा महिला बचत गट)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com