agricultural news in marathi success story Mrs. dipali pawar from sangli district started Chutney powder and spice manufacturing industry | Agrowon

परराज्यांतही पोहोचला मसाल्याचा स्वाद

अभिजित डाके
रविवार, 4 एप्रिल 2021

कुंडल (ता. पलूस, जि. सांगली) येथील सौ. दीपाली बाबासाहेब पवार यांनी जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन चटणी पूड आणि मसाला निर्मिती उद्योग सुरू केला. गेल्या सात वर्षांपासून राज्यासह परराज्यांतही त्यांच्या उत्पादनांनी वेगळी ओळख तयार केली आहे.

कुंडल (ता. पलूस, जि. सांगली) येथील सौ. दीपाली बाबासाहेब पवार यांनी जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन चटणी पूड आणि मसाला निर्मिती उद्योग सुरू केला. गेल्या सात वर्षांपासून राज्यासह परराज्यांतही त्यांच्या उत्पादनांनी वेगळी ओळख तयार केली आहे.

तासगाव-कराड रस्त्यावर वसलेले कुंडल गाव. पलूस तालुका म्हटलं, की ऊस आणि द्राक्ष ही दोन नगदी पिके डोळ्यासमोर येतात. याच गावातील सौ. दीपाली बाबासाहेब पवार यांचे शिक्षण बारावीपर्यंत  झालं असले तरी,  चिकाटी, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी मसाला उद्योगात वेगळी ओळख तयार केली आहे.  घरची परिस्थिती तशी बेताचीच. शेतीही फार नाही. अवघी दहा गुंठे. सौ. दीपाली यांचे पती बाबासाहेब खासगी बॅंकेत नोकरी करतात. मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांना नेहमी पडायचा. त्यामुळे पूरक व्यवसाय करण्याच्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचलले.गावातच महिला बचत गट स्थापन केला. कर्जवाटप, गटाच्या माध्यमातून  प्रक्रिया उद्योगाची माहिती त्यांना मिळत गेली. याचदरम्यान म्हैसपालन, कुक्कुटपालनालाही त्यांनी गटाच्या माध्यमातून सुरुवात केली. परंतु अपेक्षित आर्थिक उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष केंद्रित केले.

कुंडल येथे आयोजित एका कार्यक्रमात मान्यवर उद्योजकाचे व्याख्यान ऐकण्याची संधी दीपालीताईंना मिळाली. या व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांना प्रक्रिया उद्योगाची दिशा मिळाली. व्यवसाय उभारणीसाठी शिक्षण कधीच आड येत नाही, त्यासाठी जिद्द हवी असते. हे वाक्य त्यांना भावले. आपणही बचत गटाच्या माध्यमातून नवीन उद्योग उभारू शकतो, हा आत्मविश्वास आला. दीपालीताईंचे पती बाबासाहेब हेदेखील त्यांच्या विचारांशी सहमत झाले. परंतु नक्की कोणत्या उद्योगास सुरुवात करायची, याची दिशा सापडत नव्हती.

प्रक्रिया उद्योगाच्या दिशेने 
सौ. पवार यांचे पाहुणे संजय शेवाळे हे मुंबईत मसाला तयार करतात. शेवाळे गेल्या दोन पिढ्यांपासून मसाला उद्योगात असल्याने दीपालीताईंनी मसाला तयार करण्यासाठी त्यांच्याकडून माहिती घेतली. विविध प्रकारचे मसाले कसे तयार केले जातात, त्याचे प्रमाण किती असावे, त्याचा दर्जा कसा टिकवला पाहिजे, यासह व्यवस्थापनाची माहिती घेतली. आर्थिक परिस्थिती नसल्याने एकाच वेळी एवढे भांडवल कोठून आणायचा हा प्रश्न समोर होता. मात्र त्यांनी कर्जासाठी कागदपत्रांची पूर्तता केली. दीपालीताईंचे पती कार्यरत असलेल्या बॅंकेतून त्यांना प्रक्रिया उद्योगासाठी सहा लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध झाले.

उद्योगाच्या उभारणीबाबत दीपालीताई म्हणाल्या, की २०१४ मध्ये कुंडल पासून अवघ्या सहा किलोमीटरवर असलेल्या पलूस शहरात ‘स्वाद मसाले’ चटणी, मसाला निर्मितीच्या व्यवसायाला सुरुवात केली. त्या ठिकाणी चटणीनिर्मितीचे युनिट उभे केले. परंतु विक्री करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे होते. आम्ही सोशल मीडियाचा प्रचारासाठी वापर केला. त्यातून आमच्याशी ग्राहक जोडला गेला. प्रामुख्याने ग्राहकांना कशा पद्धतीची चटणी तयार करून पाहिजे, त्यानुसार चटणी करून दिली जाते. जेथे चटणी पूडनिर्मिती केली जाते, तेथेही विक्रीस सुरुवात केली. चटणी पूड, मसाल्याची वेगळी चव आणि गुणवत्तेमुळे ग्राहकांकडूनच थेट खरेदी सुरू झाली. त्यामुळे उत्पादनाच्या प्रसाराचा वेळ आणि खर्चही वाचला. या उद्योगात घरच्यांची मोलाची साथ मिळते.

पलूस या तालुक्याच्या ठिकाणी ‘स्वाद मसाले’ या नावाने चटणी, मसाला निर्मितीच्या व्यवसायाला सुरुवात केली; परंतु, विक्री कशी करणार आणि बाजारपेठेतील दुकानांमध्ये ही चटणी पूड, मसाला विक्रीसाठी जाणार कोण? ही अडचण होती. कारण एका बाजूला दररोज चटणी, मसाला निर्मिती आणि गुणवत्तेकडेही लक्ष देणे गरजेचे होते. परिसरातील ग्राहकांच्यामध्ये चटणी पूड आणि मसाला उत्पादनाची चव पोहोचण्यासाठी पलूस आणि परिसरातील गावांमध्ये माहिती पत्रक आणि रिक्षातून प्रचार केला. केवळ चटणी पूड निर्मितीवर न थांबता ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन   मिरची, कांदा, लसूण चटणी मसाला निर्मितीस सुरुवात केली.

असा आहे प्रक्रिया उद्योग

 • मिरची, मसाल्याची खरेदी ः आंध्रप्रदेश, केरळ, तमिळनाडू, गुजरात
 • तयार झालेल्या चटणी-मसाला विक्री ः हॉटेल व्यावसायिक, सांगली,मिरज, पुणे, मुंबई आणि  तमिळनाडू राज्यातील मसाला दुकानदार. 
 • दीपालीताईंकडे तीन कांडप यंत्रे आहेत. चटणी, मसाला निर्मितीसाठी तीस पुरुष-महिलांना रोजगार.
 • पावसाळ्याचे तीन ते चार महिने वगळता  वर्षभर चटणी, मसाला निर्मिती.
 • स्वच्छता आणि पदार्थांच्या गुणवत्तेला प्राधान्य.
 • ग्राहकांच्या मागणीनुसार चटणी, मसाला निर्मिती.
 • गुणवत्तापूर्ण तीन प्रकारची चटणीपूड आणि दहा प्रकारच्या मसाल्याची विक्री.
 • बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या पदार्थांच्या विक्रीस मदत.
 • उन्हाळी पदार्थ तयार करण्यासाठी दहा बचत गटांशी जोडणी.
 • चार वर्षापूर्वी विटा येथे स्वाद मसाला उद्योगाचा विस्तार.
 • कोल्हापूर येथे स्वाद मसाल्याची शाखा.
 • उद्योगासाठी लागलेले भांडवल ः सहा लाख.
 • खर्च वजा जाता वार्षिक उलाढालीच्या दहा टक्के नफा. 

निर्मिती आणि विक्री तंत्रात बदल
चटणी तयार करताना मिरची निवडणे, कांदा, मसाल्याचे घटक भाजणे आणि शेवटी डंकावर मसाला कुटणे अशी साधारण पद्धत आहे. दीपालीताईंनी मात्र ग्राहकांची गरज आणि वेळ लक्षात घेऊन पारंपरिक पद्धतीमध्ये विक्री तंत्रात बदल केला. याबाबत त्या म्हणाल्या, की ग्राहकांनी दुकानात यावे आणि तासाभरात चटणी घेऊन जावे, असे नियोजन मी केले. यासाठी ग्राहकाने मिरची, कांदा, लसूण, मसाल्याचे घटक दुकानातच खरेदी करायचे. त्यानंतर मिरची निवडणे, कांदा, मसाला भाजणे ही कामे गटातील महिला लगेचच करतात. तासभरात ग्राहकाच्या मागणीनुसार चटणी किंवा मसाला तयार होतो. सध्या चटणीचे तीन प्रकार आणि मसाल्याचे दहा प्रकार विक्रीस उपलब्ध आहेत.

बचत गटासाठी हक्काचे  विक्रीचे केंद्र
दीपालीताई म्हणाल्या, की परिसरातील दहा बचत गटांतील महिला शेवया, पापड, सांडगे, उपवासाचे पदार्थ तयार करतात. त्यांना पुरेशी बाजारपेठ मिळत नव्हती. त्यामुळे या महिलांनी उत्पादित केलेल्या विविध पदार्थांची विक्री करण्यासाठी पुढाकार घेतला. मी सुरू केलेल्या दुकानात विविध उत्पादनांची विक्री केली जाऊ लागली. त्यामुळे चटणी खरेदी करणारे ग्राहक आवर्जून वेगवेगळे पदार्थही खरेदी करतात. यामुळे गटातील महिलांना उत्पादन विक्रीसाठी हक्काचे केंद्र मिळाले.

- सौ. दीपाली पवार, ८८५५८०८१६२


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधारखरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी...
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
गाजराने दिले उत्पन्नासह चाराहीनगर जिल्ह्यात अकोल तालुक्यातील गणोरे येथील...
व्यावसायिक दृष्टिकोनातून घडवली...नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक...
अल्पभूधारकांसाठी कमी खर्चातील रायपनिंग...तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी.वाय. पाटील...
शेतकरी गट ते कंपनी उभारली प्रगतीची गुढीशेतकऱ्यांसाठी अल्प दरात विविध अवजारे उपलब्ध...
जिरॅनियम तेलनिर्मिती, करार शेतीतून...देहरे (ता. जि. नगर) येथील वैभव विक्रम काळे या...
कांदा, कलिंगड पिकातून बसवले आर्थिक गणितकरडे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भाऊसाहेब बाळकू...
शिक्षकाची प्रयोगशील शेती ठरतेय फायद्याचीआश्रम शाळेत गेल्या २३ वर्षांपासून शिकविणारे सहायक...
बचत गटांना पूरक उद्योगांची साथपारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता उमेद अभियानाच्या...
तळलेले गरे, फणसाची फ्रोझन भाजी, फणसाचे...फणस हे कोकणातील महत्त्वाचे मात्र दुर्लक्षित पीक...
फुलशेतीतून सुखाचा बहर जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान व व्यावसायिक...
म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी : इरावडीइरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील...
ओल्या काजूगरासाठी प्रसिद्ध कुणकवणसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण (ता. देवगड) हे गाव...
माळरानावर फळबागांतून समृद्धीरांजणगाव देवी (ता. नेवासा, जि. नगर) येथील संयुक्त...
प्रयत्नवाद, उद्योगी वृत्तीने उंचावले...पणज (जि. अकोला) येथील अनिल रामकृष्ण रोकडे यांनी...