जळगाव ः खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांगला उठाव
यशोगाथा
नागज- जुनोनी... बेदाणानिर्मितीचे जणू ‘हब’च
सांगली- सोलापूर राज्यमार्गावर नागज ते जुनोनी या ३५ किलोमीटरच्या पट्ट्यात बेदाणानिर्मितीचे असंख्य शेड्स दिसून येतात. बेदाण्याची गावे अशी या पट्ट्याने ओळख मिळवली आहे. हवामान अनुकूल असल्याने फेब्रुवारी ते मे या अवघ्या चार महिन्यांत येथे बेदाणानिर्मितीची लगबग सुरू असते. वर्षभर मागणी असलेल्या या उद्योगातून कोट्यवधींची उलाढाल होते.
सांगली- सोलापूर राज्यमार्गावर नागज ते जुनोनी या ३५ किलोमीटरच्या पट्ट्यात बेदाणानिर्मितीचे असंख्य शेड्स दिसून येतात. बेदाण्याची गावे अशी या पट्ट्याने ओळख मिळवली आहे. हवामान अनुकूल असल्याने फेब्रुवारी ते मे या अवघ्या चार महिन्यांत येथे बेदाणानिर्मितीची लगबग सुरू असते. वर्षभर मागणी असलेल्या या उद्योगातून कोट्यवधींची उलाढाल होते.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुका लाल चुटूकदार डाळिंबांसाठी प्रसिद्ध आहे.तालुक्यावर वरुणराजाची अवकृपा असली, तरी म्हैसाळ योजनेच्या पाण्याने गावाचे जीवनमान पालटले. मधूर द्राक्षे पिकू लागली. कारखाना उभारला. त्यामुळे ऊस शेती वाढू लागली. नागजपासून २५ ते ३० किलोमीटरवर सोलापूर जिल्ह्यातील जुनोनी गाव (ता. सांगोला) लागते. हे देखील दुष्काळीच गाव. इथे खिलार जनावरांचे पैदास केंद्र आहे. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या दारी खिलार जनावरे दिसतात.
बेदाण्यासाठी ओळख
कवठेमहांकाळ व सांगोला अशा दोन्ही तालुक्यांना उष्ण व कोरडे हवामान लाभले आहे. दर्जेदार बेदाणा तयार होण्यासाठी ते अनुकूल असल्याने परिसरातील द्राक्ष उत्पादकांनी अभ्यास सुरू केला. सांगली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी माळरान विकत घेतले, तर काहींनी भाडेतत्त्वावर जागा घेतली. केरेवाडी, घोरपडी, जुनोनी भागात १९९७ पासून बेदाणानिर्मितीस प्रारंभ झाला. हळूहळू शेड्स उभी राहू लागली. सन २००५ नंतर त्यांची संख्या वाढली. एकेका शेतकऱ्याकडे १५ रॅक ते ४० रॅक पाहण्यास मिळतात. कवठेमहांकाळ आणि सांगोला तालुक्यातील कुची, आगळगाव, शेळकेवाडी, केरेवाडी, आरेवाडी, नागज, विठ्ठलवाडी, जुनोनी, घोरपडी या परिसराने बेदाणा उद्योगात नाव मिळवले. तासगा व मिरज तालुक्याच्या पूर्व भागातही विस्तार झाला.
रोजगारनिर्मिती
जानेवारी ते एप्रिल असे चार महिने चालणाऱ्या बेदाणा हंगामात नजीकच्या जत, तासगाव, आटपाडी, सांगोला या तालुक्यांसह शेजारील जिल्ह्यातील व बिहार, उत्तर प्रदेशातील मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. बेदाणा रॅकवर टाकणे, उन्हात सुकवणे, बॉक्स पॅकिंग ते शीतगृहापर्यंत जाईतोवर जबाबदारी ते लिलया सांभाळतात. हंगामानंतर गावी परतून शेती कसतात.
वर्षभर मागणी
वाहतुकीच्या दृष्टीनेही येथे चांगल्या सुविधा तयार झाल्या आहेत. बेदाण्याला ड्रायफ्रूट्स, बेकरी, फरसाण, केकनिर्मिती व अन्य उद्योगांतून वर्षभर मागणी असते. विशेषतः दिवाळी, नाताळ, रमझान, छटपूजा, होळी या सणांच्या काळात मागणी वाढते. बिहारमध्ये गया जिल्ह्यात चांगली मागणी असते. प्रामुख्याने थॉमसन या द्राक्ष वाणापासून अधिक व त्यानंतर तास-ए- गणेश, माणिक चमन, क्लोन टू, सोनाका आदींपासून बेदाणा तयार केला जातो. स्वाद उत्कृष्ट, चमकदार, लांबट-गोल आकार व ए, बी, सी अशा ग्रेड्स असतात.
दरांचे विश्लेषण
तासगाव बाजार समिती बेदाण्यासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. गुणवत्तेनुसार प्रति किलो १०० ते १६० रुपये दर मिळतो. गेल्या वर्षी उत्पादनात वाढ झाल्याने दर काहीसे कमी झाले. यंदा मागणी वाढली आहे. ११० ते २२५ रुपये दर मिळत आहे. गुणवत्तेशी तडजोड केली जात नसल्याने अपेक्षित दर मिळतो. यंदा अतिवृष्टी झाल्याने फळ छाटणी वेळाने सुरू झाली. परिणामी, बेदाणा हंगामास विलंब झाला. त्यामुळे उत्पादन स्थिर राहील असा अंदाज व्यक्त केला जात असल्याने दरही चढे राहतील.
बेदाणा उद्योग ठळक बाबी
- २५ ते ३५ अंश से. तापमान व कमी आर्द्रतेमुळे चांगली चकाकी येते. सर्वाधिक तापमानामुळे बेदाणा सुकविण्याचा कालावधीही कमी लागतो.
- लागणारी मधूर, रसाळ द्राक्षे सांगली, सोलापूर आणि विजापूर भागातून येतात.
- एका शेडवर एकावेळी सरासरी पाच हजार पेट्या म्हणजे २० हजार किलो द्राक्षे सुकत टाकली जातात. त्यापासून पाच हजार किलो बेदाणा तयार होतो.
- ३० हजार पेट्यांपर्यंतही बेदाणा तयार करण्याची क्षमता
- प्रति चार किलो द्राक्षापासून एक किलो बेदाणा तयार होतो
- प्रति शेडवर १५ ते २० मजूर काम करतात. प्रतवारीसाठी गरजेनुसार १० ते १५ महिलांची गरज भासते. प्रति महिला दिवसाला १०० ते १५० किलोहून अधिक प्रतवारी करतात.
- प्रति किलोस २ रुपये अशी दिवसाकाठी ३०० ते ४०० रुपये मजुरी मिळते. १५ किलोचे पॅकिंग होऊन बाजारपेठेत माल रवाना होतो.
आधुनिकता येतेय
- नागज- जुनोनी पट्ट्यातील प्रक्रिया उद्योग आधुनिक होत आहे.
- पारंपरिक पद्धतीत बेदाणा निवडण्यासाठी महिलांचे अधिक श्रम होतात. वेळही खूप जातो. आता नागज पट्ट्यात २५ ते ३० बेदाणा उत्पादकांना प्रतवारी यंत्रणा घेतल्याने काम सोपे झाले आहे.
आमची शेती नाही. रब्बी आणि खरिपात शेतात मजुरी करते. बेदाणा हंगामात प्रतवारी करण्यासाठी दोन ते तीन महिने शेडवर काम करते. दिवसाकाठी शंभर ते दीडशे किलो प्रतवारी होते. त्यातून संसाराला चांगला आर्थिक हातभार लागतो.
- शहिना मुलाणी, जुनोनी
बारा वर्षांपूर्वी शेडवर आलो. आता सर्व कामांत कुशल झालोय. गावी तीन एकर शेती आहे. बेदाणा हंगामात इकडे येऊन चार पैसे कमावतो.
- महेश पाल, शिवपुरी, मध्य प्रदेश
आम्ही १९९७ पासून दर्जेदार बेदाणा तयार करतो आहे. जुनोनी शेड उभारले आहे. त्यातून पंचक्रोशीतील महिलांना मोठ्या प्रमाणात काम मिळाले आहे.
- शुभम दानोळे, ८०८०९७३४८२
(एरंडोली, ता. मिरज)
थॉम्पसन वाणाच्या बेदाण्याला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. गोडी, रंग आणि गोलाई त्यास चांगली आहे. आम्ही हाच वाण घेतो.
- पंकज म्हेत्रे, ९४२१२२१३२७
(मिरज, जि. सांगली)
फोटो गॅलरी
- 1 of 97
- ››