पीक बदलातून शेती झाली किफायतशीर

नांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) येथील नम्रता आत्माराम नांदोसकर यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून पारंपरिक पीक पद्धतीमध्ये बदल करून कलिंगड आणि भाजीपाला लागवडीला सुरुवात केली.
Nandoskar family busy in the management of watermelon crop.
Nandoskar family busy in the management of watermelon crop.

नांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील चव्हाणवाडी येथील नम्रता आत्माराम नांदोसकर यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून पारंपरिक पीक पद्धतीमध्ये बदल करून कलिंगड आणि भाजीपाला लागवडीला सुरुवात केली. सुधारित तंत्राचा अवलंब करीत शेती किफायतशीर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परिसरातील महिला गटाच्या माध्यमातून त्यांनी कृषी तंत्रज्ञान प्रसाराला सुरुवात केली आहे. कसाल-मालवण मार्गावरील कट्टा बाजारपेठेलगत नांदोस हे निसर्गरम्य गाव. या गावशिवारातील चव्हाणवाडीमध्ये नांदोसकर कुटुंबीयांचे घर आहे. या भागात भात, नाचणी, आंबा,काजू  हीच उत्पन्न देणारी पिके.  या शिवारात नांदोसकर कुटुंबाची वडिलोपार्जित एक एकर आणि वैयक्तिक खरेदी केलेली एक एकर अशी दोन एकर शेतजमीन आहे. परंतु ही सर्व जमीन वरकस पद्धतीची आहे.या शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीनेच भात लागवड  सुरू होती.    नम्रता यांचे बीकॉम पर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी दोन वर्ष पुणे येथील एका  कंपनीत नोकरी केली.त्यांचा विवाह आत्माराम नांदोसकर यांच्याशी झाल्यानंतर त्या नांदोस येथे आल्या. सुरवातीला त्यांनी शासकीय नोकरीकरिता प्रयत्न केले.विविध स्पर्धा परीक्षांचा अहोरात्र अभ्यास केला.परंतु थोडक्यात त्यांना यश हुलकावणी देत होते.परंतु त्या नाराज झाल्या नाहीत. नांदोसकर कुटुंब वडिलोपार्जित वरकस जमिनीत भात लागवड करत होते. परंतु या शेतीतून अपेक्षित फायदा मिळत नव्हता. शेती पूर्णतः पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसाच्या लहरीपणाचा फटका भातशेतीला बसत होता. ही शेती किफायतशीर करण्यासाठी नम्रताताईंनी पुढाकार घेतला. नोकरीऐवजी त्यांनी व्यावसायिक शेतीचे नियोजन सुरू केले. या नियोजनाला नम्रताईंचे पती आत्माराम यांनी खासगी नोकरी सांभाळून चांगली साथ दिली.   पीक बदलास सुरुवात   नांदोसकर कुटुंबीय दोन एकर शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीने भात लागवड करत होते. या शेतीमध्ये भात पिकानंतर पहिल्या टप्यात एक प्रयोग म्हणून त्यांनी पाच वर्षांपूर्वी तीस गुंठ्यात कलिंगड लागवड करण्याचा निर्णय घेतला. या लागवडीपूर्वी त्यांनी परिसरातील प्रयोगशील कलिंगड उत्पादकांशी चर्चा केली. लागवड आणि पीक व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन घेतले. यातून असे लक्षात आले की,  कलिंगड पिकासाठी आच्छादन,ठिबक सिंचन,पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मोठा खर्च येणार होता. हा आर्थिक गुंतवणुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी एका संस्थेतून ५५ हजारांचे कर्ज घेतले. या रकमेतून पाणी पुरवठा आणि तीस गुंठे क्षेत्रावर कलिंगड लागवडीच्यादृष्टीने खर्चाचे नियोजन केले. घरातील सर्व कामे सांभाळून त्यांनी कलिंगड व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले. प्रयोगशील शेतकऱ्यांच्याकडून सुधारित पद्धतीने लागवड तंत्र, पिकासाठी खत व्यवस्थापन,कीड-रोग नियत्रंणाबाबत बारकाईने माहिती घेतली. त्यानुसार त्यांनी पिकांचे व्यवस्थापन ठेवले. सेंद्रिय खते, कीडनाशकांच्या  वापरावरच त्यांनी भर दिला. काटेकोर नियोजनामुळे पहिल्याच वर्षी उत्तम दर्जाच्या कलिंगडाचे  उत्पादन मिळाले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांच्या शेतावर येऊन कलिंगडाची खरेदी केली. दरही चांगला मिळाला. या उत्पन्नामुळे शेतीमधील विश्वास वाढला.   भाजीपाला लागवडीला चालना   कलिंगड पिकातून व्यावसायिक शेतीचा अनुभव घेतल्यानंतर  बाजारपेठेचा अभ्यासकरून नम्रताताईंनी भाजीपाला लागवडीचा निर्णय घेतला. कलिंगड  लागवड केलेल्या ३० गुंठ्यात आच्छादन आणि ठिबक सिंचन यंत्रणा होती. त्यामुळे या क्षेत्रात त्यांनी वाल, दोडका, भेंडी,गवार या पिकांची लागवड केली.  साधारणपणे दीड, दोन महिन्यात पिकांचे उत्पादन सुरू झाले.कट्टा बाजारपेठ जवळच असल्यामुळे तेथेच बहुतांशी भाजीपाल्याची विक्री होऊ लागली.याशिवाय काही ग्राहक शेतावर येऊन भाजीपाल्याची खरेदी करू लागले. भाजीपाला पिकातूनही त्यांना अपेक्षित नफा मिळू लागला.  लागवड क्षेत्रात वाढ    कलिंगड आणि त्यानंतर भाजीपाला लागवडीचे गणित चांगले जमले.दोन वर्षांपूर्वी नांदोसकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजनेअंतर्गत विहीर आणि सौरपंपाचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी सौरपंप पॅनेल खरेदी केले. विहिरीची खोदाई केली. या सौर पॅनेलवर तीन एचपी पंप चालतो.त्यामुळे विजेवर होणारा खर्च कमी झाला.पीक व्यवस्थापनाचे चांगले नियोजन झाल्यानंतर नांदोसकर यांनी बाजारपेठ लक्षात घेऊन कलिंगड लागवडीचे क्षेत्र एक एकरांपर्यंत वाढविले. तिसऱ्या वर्षी दीड एकर आणि चौथ्या वर्षी दोन एकर अशा प्रकारे कलिंगड आणि भाजीपाला लागवडीत त्यांनी टप्प्याटप्याने वाढ केली.  दोन वर्षांपूर्वी दीड लाख रुपये कर्ज घेऊन संपूर्ण क्षेत्रावर ठिबक सिंचन संच बसविला. क्षेत्र वाढीबरोबर त्यांनी टॉमेटो, ढोबळी मिरची, कारली, मिरची,गवार,वाल या पिकांची लागवड सुरू केली. एकाच शेतकऱ्यांकडे विविध प्रकारचा भाजीपाला मिळत असल्यामुळे ताजी भाजी खरेदी करण्यासाठी गावपरिसरातील ग्राहक त्यांच्या घरी येऊन खरेदी करू लागले. कलिंगड आणि भाजीपाला पिकातील भांगलणी, भर देणे,पाणी देणे ही कामे स्वतः नम्रताताई करतात. गरज भासल्यास महिला बचत गटातील सदस्यांची मदत घेतली जाते. कीडनाशक तसेच विद्राव्य खतांची फवारणी आत्माराम नांदोसकर करतात. येत्या काळात बुश मिरी लागवडीचे त्यांनी नियोजन केले आहे.  शेतीची राखण आणि अभ्यासही नांदोसकर दांपत्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.दोघेही सध्या शालेय शिक्षण घेत आहेत. सकाळच्या वेळी ही दोन्ही मुले कलिंगड पिकांच्या राखणीसाठी जातात. तेथेच झाडांच्या सावलीला बसून शाळेचा अभ्यास करतात. त्यामुळे पिकाची राखण आणि अभ्यासही होतो. कुटुंबाची भक्कम साथ   गृहिणी ते यशस्वी व्यावसायिक शेतकरी या प्रवासात नम्रता नांदोसकर यांना पती,मुले यांची खंबीरपणे साथ आहे. याचबरोबरीने त्यांच्या सासू सुलोचना नांदोसकर यांची भाजीपाला विक्रीसाठी चांगली मदत होत आहे.  कुटुंबाच्या मदतीने शेती किफायतशीर झाली आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्नातही चांगली वाढ मिळाली आहे. कलिंगड, भाजीपाला लागवड फायदेशीर 

  • २०१६ मध्ये ३० गुंठ्यांत कलिंगड लागवड- १५ टन उत्पादन- नफा ७० हजार
  • भाजीपाला लागवडीतून नफा ः २५ हजार.
  • २०१९ मध्ये दीड एकरमध्ये कलिंगड लागवड - २० टन उत्पादन- नफा १ लाख
  • भाजीपाला लागवडीतून नफा ः ३५ हजार.
  • सन २०२० मध्ये  दोन एकरामध्ये कलिंगड लागवड -२८ टन उत्पादन- नफा १,२० लाख 
  • भाजीपाला लागवडीतून नफा-४० हजार.
  • ॲग्रोवन ठरला प्रेरणादायी   गेल्या चार वर्षांपासून नम्रताताई दै.ॲग्रोवनच्या वाचक आहेत. ॲग्रोवनमधील तांत्रिक माहिती, शेतकरी यशोगाथांमधून विविध पिकांचे प्रयोग आणि प्रेरणा मिळते, असे त्या सांगतात. दोन वर्षांपूर्वी नम्रताताईंनी गावातील ११ महिलांना सोबत घेऊन  ‘उमेद’ अंतर्गत  वैष्णवी महिला स्वयंसाह्यता समूह तयार केला. या गटातील महिला देखील सुधारित पद्धतीने भात आणि भाजीपाला शेती करतात.यातून रोजगारनिर्मिती झाली आहे. - नम्रता नांदोसकर,  ९४०३५३३५०७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com