कांदा बीजोत्पादनात प्रावीण्य मिळवलेले जाधव

अंतापूर (ता.सटाणा. जि. नाशिक) येथील नानाजी मुरलीधर जाधव व मुलगा रोहिदास शास्त्रीय, नियोजनबध्द व प्रायोगिक पद्धतीने कांदा बिजोत्पादन घेतात. एकरी तीन- चार क्विंटल दर्जेदार बियाणे तयार करून रब्बी कांद्याचे १५ ते २५ टनांपर्यंत उत्पादन त्यांनी साध्य केले आहे.
Nanaji Jadhav and his son Rohidas from left in the field of onion seed production.
Nanaji Jadhav and his son Rohidas from left in the field of onion seed production.

अंतापूर (ता.सटाणा. जि. नाशिक) येथील नानाजी मुरलीधर जाधव व मुलगा रोहिदास शास्त्रीय, नियोजनबध्द व प्रायोगिक पद्धतीने कांदा बिजोत्पादन घेतात. एकरी तीन- चार क्विंटल दर्जेदार बियाणे तयार करून रब्बी कांद्याचे १५ ते २५ टनांपर्यंत उत्पादन त्यांनी साध्य केले आहे. नाशिक जिल्ह्यात अंतापूर (ता.सटाणा) येथील नानाजी मुरलीधर जाधव सुमारे वीस वर्षांपासून रब्बी कांदा उत्पादन घेतात. एकूण शेती ८० एकर असून पैकी ३० ते ४० एकरांवर कांदा लागवडीचे नियोजन असते. घरगुती बियाण्यांचा वापर हे त्यांचे मुख्य सूत्र आहे. सात वर्षांपासून बीजोत्पादन घेण्यास सुरवात केली. अलीकडे ३ ते ४ एकरांवर हा कार्यक्रम ते राबवतात. उत्कृष्ट नियोजन, शास्त्रीय पद्धतींचा अवलंब, प्रयोगशीलता व कल्पकता या जोरावर त्यांनी कांदा शेतीत प्रावीण्य मिळवले आहे. नानाजी यांची रोहिदास आता मुख्य जबाबदारी सांभाळतात. मुलगा विकास, भाचे राजेंद्र गवळी, सुनील घरटे यांची मोठी मदत असते. बीजोत्पादन व्यवस्थापन  सुरवातीला सरी पद्धतीने डेंगळे लागवड व्हायची. मात्र त्यात अडचणी यायच्या. आता दोन सरींतील अंतर साडेतीन फूट, अलीकडील दोन वर्षांपासून पॉली मल्चिंग पेपरचा वापर व त्यावर दोन्ही बाजूला एक फूट अंतराने कंद लागवड करतात. अवकाळी वा अति पावसामुळे अतिरिक्त पाणी साचून न राहाता वाफसा लवकर होते. त्यामुळे रोगांना डेंगळे कमी बळी पडत नसल्याचा अनुभव आहे. तणांचा प्रादुर्भावही कमी होऊन खर्च कमी झाला आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर हा बिजोत्पादन लागवडीचा कालावधी असतो. एकरी कांद्याची गरज १० ते १५ क्विंटल असते. कंदाची निवड

  • ‘एनएचआरडीएफ’ संस्थेचे ‘रेड-३’ वाण. टिकवणक्षमता, लाल व हलका रंग, गोलाकार व पातळ मान.
  • उत्तम गुणवत्तेच्या, एकसारख्या आकाराच्या कंदाची निवड.
  • तो मध्यम आकाराचा. सरासरी ५० ते ८० ग्रॅम वजन, ४.५ ते ६ सेंमी. व्यास.
  • कंदाचा वरचा भाग योग्य प्रमाणात कापून नंतर लागवड.
  • अलीकडील काळातील एकरी बिजोत्पादन (क्विंटल)- ३ ते ४ क्विंटल. त्यासाठी उत्पादन खर्च- ५० ते ६० हजार रू. (कंद, पेपर मल्चिंग, इनलाईन ठिबक, तार टोकर बांधणी, पीक संरक्षण, खते, मजुरी आदी)
  • तंत्रज्ञान बाबी

  • पाण्याचा निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीवर लागवड
  • इनलाईन ठिबक पद्धतीचा वापर
  • लागवडीपूर्वी एकरी ३ ते ४ टन शेणखत वापर. घरची सुमारे ८ जनावरे.
  • जमिनीतील बुरशी नियंत्रित करण्यासाठी ट्रायकोडर्माचा एकरी प्रत्येकी २ किलो शेणखतातून वापर.
  • जमीन बदलून दरवर्षी लागवड. माती परीक्षणाआधारे खत व्यवस्थापन
  • पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी ह्युमिक ॲसिडचा वापर
  • डेंगळे वाढीच्या अवस्थेत विद्राव्य पद्धतीने सूक्ष्म अन्नद्रव्ये.
  • जीवामृत ठिबकद्वारे.
  • बियाण्याला मागणी   अलीकडील वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा बियाण्याचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे बाजारात दरवाढीसह गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे रोहिदास यांनी घरगुती पद्धतीने बीजोत्पादन घेत गुणवत्ता राखली आहे. याच बियाण्याचा वापर करून रब्बी कांद्याचे एकरी उत्पादन १५, २० ते कमाल २५ टनांपर्यंत मिळविल्याचे रोहिदास सांगतात. दरवर्षी शेतकरी बियाण्याची आगाऊ नोंदणीही करतात. त्यामुळे पुरवठ्याचा अंदाज येतो. किफायतशीर दर व गुणवत्ता असल्याने शेतकरी थेट घरी येऊन खरेदी करतात. यंदा जवळपास १०० शेतकऱ्यांनी बियाणे नेले. नाशिक जिल्ह्यासह अमरावती, अकोला, वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. ॲग्रोवनमध्ये कांदा उत्पादनाची त्यांची यशोगाथा प्रसिद्ध झाली होती. त्यातून संपर्क वाढून फायदा झाला. बाजारात दर अधिक असल्याने आमच्याकडे मागणी कायम राहिल्याचे रोहिदास सांगतात. चालू वर्षी बियाणे टंचाई असल्याने सप्टेंबरपर्यंत विक्री झाली. मिळालेले दर रू. (प्रति किलो)

  • २०१९- १५०० ते २०००
  • २०२०- २०००
  • २०२१- २५००
  • ठळक प्रयोग

  • डेंगळे वाढीच्या अवस्थेत वादळवाऱ्यात पडू नयेत यासाठी बांबू व दोरी यांचा वापर करून त्यांची बांधणी केली जाते. सरीच्या मध्यभागी १० फुटाच्या अंतरावर बांबूची टोकर रोवून डेंगळे दोन्ही बाजूने दोरीने एकसारखे बांधले जातात. त्यामुळे चालू वर्षी गारपीट व अवकाळी पाऊस असतानाही नुकसान झाले नसल्याचे रोहिदास यांनी आवर्जून सांगितले.
  • परागीभवनासाठी मधमाशांचा अधिवास कायम राहावा यासाठी लगतच्या क्षेत्रात कीटकनाशकांचा वापर कमी. अधिवास वाढल्याने परागीभवन होऊन दर्जेदार बियाणे निर्मिती होते. पिकावर गूळपाणी फवारत असल्याने मधमाशा त्याकडे आकर्षित होतात.
  • बियाणे संकलन, साठवणूक डेंगळे फुलांची पक्वता अवस्थेनुसार तीन टप्प्यात तोडणी होते. लागवडीच्या १५० दिवसानंतर गोंडे तोडून वाळवले जातात. बियाणे नाजूक असल्याने व्यवस्थित चोळून घेतले जाते. उन्हात वाळवणी, उफणणी करून बियाणे हवा बंद पॉलिथिन पॅकिंगमध्ये साठवले जाते. बियाणे विक्री आधी उगवणक्षमता तपासली जाते. नंतरच विक्री होते. तिसऱ्या टप्प्यातील पोकळ बियाणे बाजूला काढून टाकले जाते. प्रतवारी होत असल्याने गुणवत्ता टिकून राहते. संपर्क: रोहिदास जाधव- ९६८९४६५६३१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com