agricultural news in marathi success story of Nisarg Jagar Pratishthan NGO work | Page 2 ||| Agrowon

शहर, गाव शिवारांमध्ये ‘निसर्ग’चा जागर

गणेश कोरे 
रविवार, 6 जून 2021

निसर्ग वाचायला शिकविले तरच नवीन पिढी निसर्ग वाचवायला शिकेल, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून बारामती (जि. पुणे) येथील निसर्ग जागर प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. 

निसर्ग वाचायला शिकविले तरच नवीन पिढी निसर्ग वाचवायला शिकेल, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून बारामती (जि. पुणे) येथील निसर्ग जागर प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून राज्यभर पर्यावरण शिक्षण, वृक्षारोपण, निसर्ग पर्यटन, ओढे खोलीकरण व रुंदीकरण आणि गवताळ प्रदेशाचे संवर्धन असे प्रकल्प राबविले जातात. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.

बारामती (जि. पुणे) येथे २००४ मध्ये निसर्ग जागर प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेची सुरुवात झाली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. महेश गायकवाड हे पर्यावरणशास्त्र शाखेतील द्विपदवीधर असून, त्यांनी वटवाघळावर संशोधन केले आहे. संस्था राज्याच्या विविध भागांमध्ये पर्यावरण शिक्षण, भंडारदरा आदिवासी पर्यटन प्रकल्प, स्थानिक वृक्षरोपण व जनजागृती, निसर्ग पर्यटन, ओढे खोलीकरण व रुंदीकरण प्रकल्प, गवताळ संरक्षण व संवर्धन प्रकल्प, सह्याद्री बचाव, वटवाघूळ संशोधन आणि जनजागृती प्रकल्प राबविते. 

संस्थेच्या उपक्रमाबाबत डॉ. गायकवाड म्हणाले, की निसर्ग वाचायला शिकविले, तरच नवीन पिढी निसर्ग वाचवायला शिकेल. म्हणूनच बाल्यावस्थेतच मुलांचा पर्यावरणीय बुद्ध्यांक आणि जागृती वाढविणे आवश्यक आहे. मुंग्यांची वारुळे कशी असतात, मुंग्या आणि निसर्गाचे नात काय, हे प्रत्यक्ष मुंग्यांच्या वारुळाला भेट देऊन त्याची शास्त्रीय माहिती शालेय विद्यार्थ्यांना दिली जाते. प्रत्यक्ष पोळे दाखवून मधमाश्यांबद्दल सविस्तर माहिती दिली जाते.  

निसर्ग शिक्षणाचे धडे 
गावशिवारातील स्थानिक जैवविविधता वाचविणे गरजेचे आहे. हे पर्यावरण विषयातील तज्ञांनी शिकविल्यास विद्यार्थांच्या मनामध्ये चांगला परिणाम होऊन निसर्ग शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचते. ताणतणावमुक्त शिक्षण निसर्गातच मिळू शकते. याच संकल्पनेवर संस्था वीस वर्षांपासून कार्य करीत आहे. यामध्ये पर्यावरण शिक्षण प्रकल्प, वृक्षारोपण, सह्याद्री देवराई प्रकल्प, स्थानिक वृक्षसंपदा जागृती मोहीम, शहरी व ग्रामीण भागात पर्यावरण संरक्षण मोहीम, निसर्ग सहली, भंडारदरा आदिवासी पर्यटन प्रकल्प, शहरी भागात उद्याननिर्मिती प्रकल्प, जैवविविधता संरक्षण मोहीम असे प्रकल्प राबविले जातात. 

संस्थेचे विविध उपक्रम 
पर्यावरण शिक्षण आणि जनजागृती प्रकल्प 

 • सन २००४ पासून हा प्रकल्प सुरू आहे. पर्यावरण शिक्षण म्हणजे आपल्या अवतीभोवतीच्या परिसराची शास्त्रीय माहिती घेणे. निसर्ग शिक्षणामध्ये परिसरातील पर्यावरण आणि निसर्ग यांचे नाते लोकांना समजावून सांगितले जाते.  
 • आपला परिसर म्हणजे आपले गाव. गावातील तलाव, ओढे, नद्या, पक्षी जीवन, फुलपाखरे, वटवाघूळ, कीटक, मधमाश्या, मुंग्या, गांडुळे, वन्यजीव, जुनी झाड, वेली, काटेरी झुडपे अशा नानाविध गोष्टी मुलांना लहान वयात शिकविण्यासाठी पर्यावरण शिक्षणावर भर दिला आहे. संस्थेतर्फे जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन केले जाते. 
 • नदी आणि परिसरातील पर्यावरणाचे महत्त्व मुलांना समजाविण्यासाठी परिसरातील प्रदूषित नदीची सहल आयोजित केली जाते. प्रदूषित नदी पात्रातील पाणी आपण पितो हे मुलांना सांगितल्यावर  त्यांना पाणी आणि नदी प्रदूषणाचे महत्त्व समजते. मुले प्रदूषणाबाबत गंभीर होऊन, घरच्यांसोबत चर्चा करतात. याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. 

सह्याद्री बचाव मोहीम

 • राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने ‘सह्याद्री वाचवा’ या संस्थेच्या प्रकल्पाला आर्थिक साह्य केले आहे. सह्याद्री घाट व गवताळ पट्टे वाचविण्यासाठी विविध गावांमध्ये जनजागृतीविषयक उपक्रम घेतले जातात.
 •  स्थानिकांनी आपल्या जमिनी विकू नयेत यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात संस्थेला यश आले. या प्रकल्पात स्थानिकांचा सहभाग असल्याने घाट संरक्षण व संवर्धन करण्यासाठी मोठी मदत होत आहे.

जैवविविधता जनजागृती मोहीम 
राज्यभर अनेक भागात स्थानिक जैवविविधता संवर्धनाबाबत जागृती केली जाते. अगदी मुंगी ते हत्तीपर्यंत दिसणारे स्थानिक वन्यजीव आपल्या शेतीसाठी कसे महत्त्वाचे आहेत, याबद्दल जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. 

स्थानिक वृक्षारोपण जनजागृती

 • स्थानिक वृक्षसंपदा अत्यंत महत्त्वाची आहे. संस्था २०१० पासून याबाबत राज्यभर जनजागृती केली जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अभिनेते सयाजी शिंदे यांच्यापर्यंत सदर बाब पटवून देण्यात संस्थेला यश आले आहे. 
 • गवताळ पट्ट्याचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी संस्थेने उपक्रम हाती घेतला आहे. डॉ. धनंजय नेवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली लामकानी (जि. धुळे) गाव अत्यंत काटेकोरपणे गवताळ पट्याचे नियोजन करीत पाणी व्यवस्थापन करीत आहे. संस्थेतर्फे या गावामध्ये सातत्याने भेट दिली जाते. गवताच्या मुळात पाणी व्यवस्थापनाचे रहस्य दडले आहे, हे ज्यांना माहिती आहे, तेच भूजल पातळी वाढवू शकतात, याबाबात जनजागृती केली जाते.
 • अनेक संस्था देशभर जलसंधारणासाठी ओढे, नद्या खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचे कार्य करीत आहेत. मात्र जिथे वाळू असेल तिथे अजिबात खणू नये, एवढी साधी बाब आजही त्यांना कळत नाही. संस्था वाळू संरक्षण आणि शास्त्रीय पद्धतीने जल, मृदासंधारणाबाबत जनजागृती करत आहे.  

 ‘सकाळ’कडून ‘युवा सन्मान’ 
पर्यावरण आणि जनजागृती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल २०१५ मध्ये खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते डॉ. महेश गायकवाड यांना सकाळच्या ‘युवा सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले. 

वटवाघूळ संशोधन,  जनजागृती प्रकल्प

 • उपक्रमामध्ये वटवाघळांबाबतचे समज - गैरसमज, अज्ञान, वटवाघळांचे शेती आणि पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्व यांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येते. 
 • वाढते शहरीकरण, नागरीकरण, रस्ते विकास यामुळे वटवाघळांची आश्रयस्थाने असलेली वडाची झाडे नष्ट होत आहेत. त्यामुळे वटवाघळांची संख्या कमी होत आहे. परिणामी, पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव वाढू लागला. वटवाघळे रात्रीच्या वेळी पिकांवरील किडी खातात. परंतु आता वटवाघळांची संख्या कमी होत आहे. शेतीमध्ये कीडनियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशकांचा अनियंत्रित वापर वाढला आहे. परिणामी, पीक उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. अनियंत्रित पद्धतीने वापरलेल्या रासायनिक कीडनाशकांचा जमीन, मानवी तसेच जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचे काम सुरू आहे. 
 • द्राक्ष, बोरी बागेचे पक्ष्यांपासून संरक्षणासाठी शेतकरी जाळ्या लावायचे. परंतु यामध्ये पक्षी, वटवाघळे अडकून जखमी होतात. हे लक्षात घेऊन संस्थेने शेतकऱ्यांनी बागेच्या संरक्षणासाठी जाळ्या लावण्याऐवजी जुन्या रंगीबिरंगी साड्यांचा वापर करण्याबाबत जनजागृती केली. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. 

- डॉ. महेश गायकवाड, ९९२२४१४८२२


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
गुलाब, लिली, शेवंतींनं अर्थकारण केलं...शिरसोली (ता.जि.जळगाव) येथील रामकृष्ण, श्रीराम व...
शेतीला मिळाली बचत गटाची साथ शेणे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सुनंदा उदयसिंह...
ग्राम, आरोग्य अन् शेती विकासामधील ‘...सातारा जिल्ह्यातील अन्नपूर्णा सेवाभावी संस्था...
एकात्मिक शेतीतून अर्थकारण केले सक्षमरेवगाव (ता. जि. जालना) येथील आनंदराव कदम यांनी...
गुऱ्हाळघरातून मिळविला उत्पन्नाचा हुकमी...खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर तुळशीराम...
पडसाळी झाले ढोबळी मिरचीचे ‘हब’बोर, कांद्यासाठी प्रसिद्ध पडसाळी (जि. सोलापूर)...
गांडूळ खतासह सेंद्रिय मसाला गूळनिर्मितीसातारा जिल्ह्यातील मालदन येथील कृषी पदवीधर विजय...
साहिवाल गोसंगोपनासह शेण, गोमूत्राचे...सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील निकम कुटुंबाने...
आदिवासी पाड्यात रुजले भातशेतीत...नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग आदिवासीबहुल असून भात...
नांदेडचे कापूस संशोधन केंद्र कोरडवाहू...नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात बीटी, नॉन बीटी...
प्रयोगशीलतेतून एकात्मिक शेतीचा आदर्शमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटकातील बुदिहाळ (ता...
पीक नियोजन, थेट विक्रीतून वाढविला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता. वेंगुर्ला)...
कुक्कुटपालन, भाजीपाला लागवडीतून तयार...लखमापूर (ता. सटाणा, जि. नाशिक) येथील आश्‍विनी...
तुरीच्या बीडीएन ७११ वाणाने दिली...बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राद्वारे प्रसारित...
डाळी, बेसनपीठ निर्मितीतून ७०...हिंगोली येथील रमेश पंडित यांनी डाळनिर्मितीसह बेसन...
गोरव्हाच्या ग्रामस्थांनी घडवली...अकोला जिल्ह्यातील गोरव्हा (ता.. बार्शीटाकळी) या...
कांकरेड गोपालनासह मूल्यवर्धित उत्पादनेहीनाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद येथील संजय ताडगे यांनी...
बारमाही उत्पन्न देणारी व्यावसायिक शेतीवनोली (जि..जळगाव) येथील युवराज चौधरी यांनी...
डाळिंब, भाजीपाला पिकात केले यांत्रिकीकरणआटपाडी (जि.. सांगली) येथील किशोरकुमार देशमुख...
राहुरीच्या कृषी विद्यापीठात कडधान्य...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...