agricultural news in marathi success story of Pandharinath and Chandrakant Hyalij from nashik district | Page 2 ||| Agrowon

संकटांशी झुंजत फळबागांतून आणली जीवनात मधुरता

मुकुंद पिंगळे
गुरुवार, 1 जुलै 2021

आखतवाडे (ता. सटाणा, जि. नाशिक) येथील पंढरीनाथ व चंद्रकांत या ह्याळीज पितापुत्रांनी विविध संकटे, संघर्ष समस्यांचा धैर्याने सामना केला. अभ्यासू, प्रयोगशील वृत्तीने डाळिंब, द्राक्षाची शेती यशस्वी केली.  

आखतवाडे (ता. सटाणा, जि. नाशिक) येथील पंढरीनाथ व चंद्रकांत या ह्याळीज पितापुत्रांनी विविध संकटे, संघर्ष समस्यांचा धैर्याने सामना केला. अभ्यासू, प्रयोगशील वृत्तीने डाळिंब, द्राक्षाची शेती यशस्वी केली. सिंचन व पीक व्यवस्थापन साधले. सफरचंदाचा सात गुंठ्यांत प्रयोग करून आकर्षक लाल रंगाच्या फळांचे उत्पादन व विक्रीही यशस्वी केली आहे. 

नाशिक जिल्ह्यात कसमादे भागातील आखतवाडे (ता. सटाणा) येथील पंढरीनाथ नेवबा ह्याळीज सूतगिरणीत नोकरीला होते. गिरणी १९९९ मध्ये बंद पडली. बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. मग गावाची वाट धरत घरची पाच एकर शेती करण्याचे ठरविले. अनेक आव्हाने समोर होती. जमिनीचे सपाटीकरण, विहीर खोदून शेती विकसित केली. नवे बदल स्वीकारून फलोत्पादनाची कास धरली. एकुलता एक मुलगा चंद्रकांत याने ‘मोटर मेकॅनिक’ हा ‘आयटीआय’ अभ्यासक्रम पूर्ण केला. नाशिक, पुणे आदी ठिकाणी नोकरी केली. परंतु स्थैर्यता नसल्याने तोही घरी परतला. 

संकटांवर संघर्षातून केली मात 
बिकट आर्थिक परिस्थिती, भांडवल, नैसर्गिक आपत्ती, शेतीमालाचे दर अशी अनेक आव्हाने होती. ती पेलत कष्ट अन् प्रयोगशीलतेची जोड देत बापलेक एकविचाराने शेती करू लागले. सन २००५ मध्ये दोन एकरांत भगव्या डाळिंब वाणाची लागवड केली. व्यवस्थापनातून बाग बहरली. व्यापाऱ्यासोबत प्रति किलो १०८ रुपयांप्रमाणे सौदाही झाला. मात्र २०१२ मध्ये गारपीट झाली. १५ ते २० टन तयार माल खराब झाला. त्यातून नैराश्य झाले. भांडवल संपुष्टात आल्याने पदरमोड करून बाजरी, खरीप व उन्हाळी कांदा अशी पिके घेतली. मिळालेल्या उत्पन्नातून एकेक पैसा कष्टाने जमवून भांडवल उभे केले. पुन्हा २०१४ मध्ये ५० गुंठ्यांत डाळिंब लागवड केली. दरवर्षी आंबिया बहर घेऊन एकरी सरासरी ७ टनांपर्यंत उत्पादनाची मजल गाठली. सरासरी ४५ ते ५० रुपये प्रति किलो दर मिळवला. 

द्राक्षातून पीकबदल
पुढे पाणीटंचाई, तेलकट डाग रोग व गारपिटीमुळे डाळिंब अडचणीत आले. मग क्षेत्र कमी केले. ‘थॉम्‌सन’ द्राक्षाची  सव्वा एकरात लागवड केली. आता दरवर्षी पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन घेण्यात येते. खरड छाटणीनंतर शेणखत देऊन दिवसाआड १ तास १५ लिटर प्रति झाड सिंचन केले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत आर्द्रता टिकविण्यासाठी उसाच्या पाचटाचे आच्छादन केले जाते. शेणखत, गोमूत्र, विविध डाळीचे पीठ, गूळ यांच्यापासून जिवामृत तयार केले जाते. गोड्या छाटणीनंतर दर दहा दिवसांनी झाडाला दोन्ही बाजूंनी १ लिटर देण्यात येते. डिसेंबरमध्ये माल विक्रीसाठी तयार होतो. व्यापाऱ्यांमार्फत दिल्ली, अहमदाबाद, जयपूर येथे विक्री होते. 

प्रयोगशीलता 
सुरुवातीला एकच विहीर असल्याने पाण्याची टंचाई वाढत गेली. मग दुसरी विहीर व १७ गुंठ्यांत शेततळे उभारले. संपूर्ण क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा अवलंब केला. मशागत, सिंचन आदी कामे पंढरीनाथ, तर फवारण्या, खत व्यवस्थापन, शेतीमाल विक्री व नोंदी या जबाबदाऱ्या चंद्रकांत पाहतात. पंढरीनाथ यांच्या पत्नी शोभा यांचीही मदत होते. नवे तंत्रज्ञान, मशागत, फवारणीसाठी यांत्रिकीकरण केले आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांकडे भेटी देऊन शेतीत बदल करतात. चर्चासत्रे, परिसंवाद, वेबिनार यांत सहभाग घेतात. ‘ॲग्रोवन’चे नियमित वाचक असून, तांत्रिक लेख, यशोगाथांचे वाचन करतात. फळझाडे व फुलझाडे लागवडीचा कुटुंबाला छंद आहे. अंजीर, जांभूळ, आंबा, पेरू, सीताफळ, रामफळ यांसह फुलझाडे, औषधी वनस्पतींची लागवड केली आहे.

सफरचंदाचा प्रयोग 
चंद्रकांत यांना २०१६ मध्ये ‘एचआरएमएन-९९’ या सफरचंद वाणाबद्दल माहिती मिळाली. जुलै-२०१७ मध्ये विलासपूर (हिमाचल प्रदेश) येथे जाऊन अधिक माहिती घेतली. प्रति रोप १५० रुपयांप्रमाणे ३० कलम रोपांची मागणी नोंदविली. डिसेंबर २०१७ मध्ये रोपे उपलब्ध झाली. जोखीम पत्करून जानेवारी २०१८ मध्ये सात गुंठे हलक्या व पाण्याचा निचरा होणाऱ्या क्षेत्रावर लागवड केली.

प्रयोगातील ठळक बाबी 

 • लागवडीचे अंतर- १४ बाय १३ फूट
 • लागवड केलेली झाडे- ३०, उत्पादनक्षम- २३ 
 • पर्जन्यमान व हवामान- मध्यम 

वाणाविषयी
समशीतोष्ण वातावरणात येणारा ‘एचआरएमएन-९९’ वाण विलासपूर, हिमाचल प्रदेश येथील.  सफरचंद उत्पादक हरीमन शर्मा यांनी विकसित केलेला. 

पिकाची वाढ 

 • जानेवारी २०२०- फुलोरा सुरुवात
 • जून ते जुलै- पहिली फळ काढणी
 • जुलै ते डिसेंबर- खते देऊन बागेला विसावा  डिसेंबर- दुसरी छाटणी
 • ५ ते २३ जून, २०२१- पुढील फळ काढणी.  

पीक व्यवस्थापनातील बाबी 

 • सन २०२०-२१ मध्ये बुरशीनाशक, कीटकनाशक फवारणी, विद्राव्य खते, मळी यांसाठी १० हजार रुपये एकरी खर्च.
 •  पिकाचे हंगामनिहाय वेळापत्रक समजून घेत सिंचन, खते, कीड-रोग व्यवस्थापन यांच्याकडे काटेकोर लक्ष दिले.
 • बुरशीजन्य रोग, थ्रीप्स, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या. प्रादुर्भावित फळे काढून टाकली.  फळे तयार झाल्यानंतर चालू वर्षी पाऊस झाल्याने तडे जाऊन काही अंशी नुकसान.  
 • फळपक्वता कालवधीत उष्ण हवा व जमिनीत कमी वा जास्त ओलावा झाल्यास फळे तडकतात. त्यामुळे आर्द्रता टिकविण्यासाठी पालापाचोळा, कापलेले गवत व टाकाऊ नैसर्गिक घटक यांपासून जैविक आच्छादन. 
 • परिपक्वता काळात अवकाळी पाऊस झाल्यानंतर साचलेले पाणी आळ्याबाहेर काढून दिले.
 • गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी अतिरिक्त फळांची विरळणी.  फळांचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी बर्डनेट व कापडी पिशव्यांचा वापर.लाल-पिवळसर छटा येऊन पक्व होऊ लागल्यानंतर टप्प्याटप्प्याने फळकाढणी.  

विक्री व्यवस्था 

 •  पहिल्या वर्षी प्रति झाड पाच किलो. दुसऱ्या वर्षी (यंदा) ८ ते १५ किलोपर्यंत उत्पादन.  फळ फिक्कट लाल, पिवळसर आकर्षक रंगाचे, रवाळ व २०० ते २५० ग्रॅम वजनाचे.
 •  सुमारे ५० ते ६० फळे वाटप वा नमुन्याची चव दाखवण्यात संपली.  यंदा पंचक्रोशीत १५० रुपये प्रति किलो दराने थेट ग्राहकांना विक्री. मौखिक प्रसिद्धीनंतर काही ग्राहकांकडून घरी खरेदी.  
 •  काटेकोर व्यवस्थापनातून सफरचंद प्रयोग यशस्वी झाला. मात्र सध्याच्या पीक पद्धतीला पर्याय म्हणून त्याकडे शेतकऱ्यांनी पाहू नये. ज्यांना लागवड करायची आहे त्यांनी हवामान, बाजारपेठ यांचा अभ्यास करावा. कमी क्षेत्र, कमी रोपे लावूनच प्रयोग करून पाहावा. मगच निर्णय घ्यावा असे चंद्रकांत यांनी सांगितले. अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी भेटी देत बापलेकांचे कौतुक केले आहे.  

प्रतिक्रिया
नवा कोणताही प्रयोग कौतुकास्पदच आहे. मात्र व्यावसायिकदृष्ट्या तो यशस्वी होण्याची गरज आहे. बाजारपेठेत विविध राज्यांतून, देशांमधून सफरचंदे किंवा तत्सम शेतीमाल येत असतो. त्याच्याशी आपली स्पर्धा असते. नव्या प्रयोगात आपले भांडवल गुंतत असते. त्यामुळे एखाद्या नव्या पिकातून पुढे दीर्घकाळ बाजारपेठ व आर्थिक लाभ मिळणे या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रयोगाची दिशा असावी.  
- विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी, मोहाडी, जि. नाशिक

हवामानानुसार वाणांची निवड, एकूण पीक व्‍यवस्थापन, छाटणी, बहर तंत्र चोख ठेवल्यास एखादे नवे पीक यशस्वी करता येते. सफरचंदाच्या या प्रयोगातून हे सिद्ध झाले आहे. नव्या प्रयोगांची दखल घ्यायलाच हवी. ‘मार्केट’ व उत्पन्न या बाबी पुढेही  मिळत राहतील का याचाही अभ्यास हवा.
- मधुकर गवळी, ओम गायत्री शेतकरी उत्पादक कंपनी, नाशिक  

- चंद्रकांत ह्याळीज  ९१३०७५७२८५


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
उत्कृष्ट व्यवस्थापनातून जोपासलेली नारळ...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता. वेंगुर्ला)...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
पंचवीस वर्षांपासून सीताफळाची जोपासनासांगली जिल्ह्यात अंजनी (ता.. तासगाव) येथील...
उस्मानाबादी शेळ्यांचा यशस्वी जोपासलेला...परभणी शहरापासून नजीक पारवा शिवारात सतीश रन्हेर व...
जल प्रदूषण मुक्तीसाठी ‘गोदावरी नदी संसद...नांदेड जिल्ह्यात ‘गोदावरी नदी संसद’ ही जलसंवर्धन...
भाजीपाला, पूरक उद्योगातून गटांची प्रगतीरत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गटातील सदस्यांनी...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
खोडवा उसाची अधिक उत्पादनक्षम शेती.महाराष्ट्र- कर्नाटक राज्याच्या सीमेवरील सिदनाळ (...
कृषीसह पिंपळगावाने केले वसुंधरेलाही...नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत गावाचा कृषी...
वर्षभर वांगी उत्पादनाचे गवसले तंत्रपुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील योगेश तोडकरी...
बोलके यांचे दर्जेदार संत्रा उत्पादनकचारी सावंगा (ता. काटोल, जि. नागपूर) येथील आशिष...
पोल्ट्री व्यवसायातून कुटुंब झाले आर्थिक...फळबागायती आणि भातशेती सामायीक. त्यामुळे मालगुंड (...
श्रीराम गटाचे पावडरीद्वारे हळदीचे...लाख (रयाजी) (ता. दिग्रस, जि. यवतमाळ) येथील...
पीक नियोजनातून बसविले आर्थिक गणितपुणे जिल्ह्यातील केंदूर (ता. शिरूर) येथील संदीप...
प्रतिकूल परिस्थितीवर सुनंदाताईंनी केली...माणूस संकटाच्या काळात धीर सोडत असला तरी त्या...
औषधी वनस्पती प्रयोगासाठी ‘शेवंतामाता’...नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातील निवघा बाजार...
पदवीधर तरूणाचा ‘काकतकर’ ब्रँडसिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्हावेली रेवटेवाडी येथील...
पोल्ट्री उद्योगात विट्याची दमदार ओळखसांगली जिल्ह्यातील विटा शहराची ओळख...
कमी खर्चिक किफायतशीर कापूस पीक...घाडवेल (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील देवेंद्र...
तंत्रज्ञान, व्यवस्थापनासह टोमॅटो...नाशिक जिल्ह्यातील दरी येथील सतीश, सचिन व नितीन या...