देशी दुधाचा लोकप्रिय सात्विकी ब्रॅण्ड

मुंबई (वाशी) येथील व्यावसायिक मल्हारी चव्हाण गावी विठ्ठलवाडी, वडज (ता.जुन्नर. जि. पुणे) यांनी सुमारे ६० गीर गायींच्या संगोपन केले आहे. दररोज सुमारे दीडशे लिटर संकलनासह थेट ग्राहकांचे ‘नेटवर्क‘ उभारून ‘सात्विकी‘ हा दुधाचा ब्रॅण्ड त्यांनी लोकप्रिय केला आहे.
Satviki brand of Gir cow's milk
Satviki brand of Gir cow's milk

मुंबई (वाशी) येथील व्यावसायिक मल्हारी चव्हाण गावी विठ्ठलवाडी, वडज (ता.जुन्नर. जि. पुणे) यांनी सुमारे ६० गीर गायींच्या संगोपन केले आहे. दररोज सुमारे दीडशे लिटर संकलनासह थेट ग्राहकांचे ‘नेटवर्क‘ उभारून ‘सात्विकी‘ हा दुधाचा ब्रॅण्ड त्यांनी लोकप्रिय केला आहे.   पुणे जिल्ह्यात विठ्ठलवाडी, वडज (ता. जुन्नर) येथे मल्हारी चव्हाण कुटुंबीयांची दोन एकर पारंपरिक शेती आहे. त्यांनी नऊ एकर शेती खंडाने घेतली आहे.  त्यात भाजीपाला, गहू, ज्वारी, कांदा आदी पिके घेतली जातात. मल्हारी वाशी (मुंबई) येथे मॉड्युलर फर्निचर व्यावसायिक आहेत.  सध्या ते आठवड्यातील चार दिवस गावी येऊन गीर गायींच्या संगोपनाचा व्यवसाय पाहतात. एरवी आई, वडील व कुटुंबीय पूर्णवेळ गोठा व्यवस्थापन पाहतात.   देशी दुधाची मागणी ओळखली  चव्हाण कुटुंबाकडे पूर्वी जर्सी गायींचा दुग्धव्यवसाय होता. आर्थिकदृष्ट्या परवडेनासे झाल्यानंतर त्यांनी तो व्यवसाय थांबवला. अलीकडील काळात देशी गायीच्या दुधाला असलेली मागणी ओळखून त्यांनी पुन्हा या व्यवसायाकडे वळायचे ठरवले. जुन्नर, आंबेगाव, दौंड, सांगली, सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गोठ्यांना भेटी देऊन अर्थकारण समजून घेतले. या भेटीदरम्यान आपण हा व्यवसाय करू शकतो असा आत्मविश्‍वास आला.  व्यवसाय वाढवला  सन २०१७ मध्ये चाकण (जि. पुणे) येथून दोन गीर गायी खरेदी केल्या. त्यांच्या दुधाची जुन्नर शहरात थेट विक्री सुरु केली. यासाठी चुलत भाऊ नीलेश यांनी मोलाची मदत केली. माहितीपत्रकांद्वारे जाहिरात केली. सुरवातीला चार- पाच लिटर असलेली दूध विक्री हळूहळू २५ ते ३० लिटरपर्यंत पोचली. मग टप्‍याटप्याने गायी वाढविल्या. तीन वर्षात लहान-मोठ्या धरून त्यांची संख्या ६० पर्यंत पोचली आहे. मुक्त आणि बंदिस्त गोठाही बांधला आहे.  ग्राहकांचे नेटवर्क  जुन्नर बरोबरच वाशी येथेही ग्राहक बाजारपेठ वाढवण्याचे ठरवले. तेथे मल्हारी यांचे नातेवाईक आहेत. पैकी एकाचा ‘बुक स्टॉल’ आहे. या सर्वांच्या आधारे ग्राहकांचे ‘नेटवर्क’ उभारण्यास सुरवात झाली.  सुरवातीला ‘पाऊच पॅकिंग’ द्वारे ८० रुपये प्रति लिटर प्रमाणे विक्री व्हायची. मागणी वाढल्याने दुधाचे ‘ब्रॅडिंग’ करण्याचे ठरवले. ‘सात्विकी‘ असे नामकरण केले. त्यासाठी बाटली पॅकिंग सुरु केले. आज वाशी परिसरात सुमारे ७० ते ७५ ग्राहक तयार केले असून ११० रुपये प्रति लिटर दराने विक्री होते. बाटली ना परतावा तत्त्वावर दिली जाते. ती पुन्हा माघारी घ्या, स्वच्छ करा या माध्यमातून दुधाचा दर्जा खालावू नये याची काळजी घेतली जाते. जुन्नर भागातही सुमारे ३५ ग्राहक तयार झाले आहेत.तेथे ६० रुपये प्रति लिटर दराने विक्री होते.   गोठा व्यवस्थापन  सुमारे १२ गुंठ्यावर मुक्त व बंदिस्त गोठे उभारण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी गायी बंदिस्त गोठ्यात सोडल्या जाता. सकाळी दूध काढल्यानंतर त्या पुन्हा मुक्त गोठ्यात सोडल्या जातात. तेथे चारा- पाण्याची सोय केलेली आहे. गायींची देखभाल, दूध काढणी व अन्य कामांसाठी एक दांपत्य ठेवले आहे. मुक्त गोठ्यातील वातावरणामुळे गायींची चांगली हालचाल होते. निरोगी राहून त्या दूध चांगल्या प्रकारे देतात. औषधोपचाराचा खर्च फारसा होत नाही. वर्षाला लाळ्या खुरकूत, फऱ्या यांचे लसीकरण केले जाते.  पशुवैद्यकाची गरज फार कमी वेळा पडत असा चव्हाण यांचा अनुभव आहे.  चाऱ्यासाठी दोन एकर क्षेत्र  चाऱ्यासाठी दोन एकरांत ज्वारी, लसूण घास, मका, हत्ती गवताची लागवड केली आहे. कुट्टी स्वरूपात खाद्य दिले जाते. याशिवाय मका, तुरीचा भरडा व चुनी यांचा वापर होतो. खाद्य पहाटे चार ते सात आणि सायंकाळी चार ते सात या दोनच वेळेत दिले जाते.  तुपाची निर्मिती  व्यायलेल्या गायींची संख्या वाढली, अतिरिक्त दूध निर्माण झाले तर तूप बनविले जाते. अर्थात ग्राहकांची मागणी देखील लक्षात घेतली जाते. कोरोना टाळेबंदीमध्ये दूध पुरवठ्यावर परिणाम झाला. मात्र चव्हाण कुटुंबीयांनी खचून न जाता त्यावर मार्ग शोधला. सुमारे ९० किलो तूप तयार केले होते. त्याची अडीच हजार रुपये प्रति किलो दराने यशस्वी विक्री केली.  ‘खिलार’ आमची दौलत   चव्हाण कुटुंबीय पांरपारिक बैलगाडा शौकीन आहेत. मल्हारी यांनी देखील हा शौक जपला आहे. बैलगाडा शर्यतीसाठी न्यायालयीन बंदी आहे. तथापि सहा खिलार बैलांची जोपासना केली आहे. खिलार आणि शर्यतीचे बैल ही आमची दौलत असल्याचे चव्हाण अभिमानाने सांगतात. अर्थकारण  दररोज सुमारे १२५ ते १५० लिटरपर्यंत दुधाचे संकलन होते. प्रति गाय दररोज ८ ते १० लिटर दूध देते. चारा, पशुखाद्य, दूध वितरण व एकूण रोजचा खर्च सुमारे सात हजार रुपयांपेक्षा कमी नाही. वर्षाला सुमारे सव्वा दोन ते अडीच लाख रुपये उलाढाल करण्यापर्यंत मजल मारली आहे. उत्पन्नाच्या साधारण ३० टक्के नफा होतो असे मल्हारी यांनी सांगितले. - मल्हारी चव्हाण, ९९२०४६५४२० ९००४५१५७३१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com