गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा दर्जा फुलशेतीला मिळू लागला आहे.
यशोगाथा
दुष्काळात घडविला पोल्ट्री व्यवस्थापनाचा आदर्श
नाशिक जिल्ह्यातील सायगाव (ता.येवला) येथे सतीश पोपट कुळधर सुमारे सहा वर्षांपासून करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय करीत आहेत. शास्त्रीय पद्धतीने व उत्तमरित्या व्यवस्थापनातून त्यांनी आदर्श पोल्ट्री उत्पादक अशी ओळख मिळवली आहे. दुष्काळातही या व्यवसायातून आर्थिक स्रोत निर्माण केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील सायगाव (ता.येवला) येथे सतीश पोपट कुळधर सुमारे सहा वर्षांपासून करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय करीत आहेत. शास्त्रीय पद्धतीने व उत्तमरित्या व्यवस्थापनातून त्यांनी आदर्श पोल्ट्री उत्पादक अशी ओळख मिळवली आहे. दुष्काळातही या व्यवसायातून आर्थिक स्रोत निर्माण केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला हा दुष्काळी तालुका गणला जातो. तालुक्यातील सायगाव येथे सतीश कुळधर यांची सहा एकर जिरायती शेती आहे. लहानपणापासूनच शेतीचा अनुभव घेत ते कृषी पदवीधर झाले. नोकरी, व्यवसाय केला. कुळधर यांच्या शेतात खरिपात कांदा, मका, कापूस, बाजरी ही पिके असतात. पाण्याच्या टंचाईमुळे रब्बी हंगामात अडचण यायची. शाश्वत पीक पद्धतीचा अभाव, निसर्गाचा लहरीपणा या समस्याही होत्या. त्यामुळे २०१५ च्या सुमारास अभ्यासातून कुकुटपालन (पोल्ट्री) व्यवसायाकडे लक्ष वळवले.
करार शेती
नाशिक विभागात अनेक कंपन्या करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय करतात. त्यातीलच योग्य परतावा व सुविधा देणाऱ्या कंपन्यांशी कुळधर जोडले गेले आहेत. पक्षीगृह (शेड) क्षमतेप्रमाणे पक्षी, खाद्य, औषधे या बाबी कंपनीकडून पुरविल्या जातात. पशुवैद्यकांचे मार्गदर्शन मिळते. पक्षांची खरेदी कंपनी करते. कंपनीच्या शिफारशी व धोरणांची अंमलबजावणी केल्याने कुळधर यांनी सहा वर्षांच्या अनुभवातून आदर्श पोल्ट्री उत्पादक अशी ओळख मिळविली आहे.
व्यवसाय दृष्टीक्षेपात
- शेडस २
- आकारमान- ६०० बाय ३० फूट
- प्रति शेड ६.५ हजारांप्रमाणे एकूण १३ हजार पक्षी क्षमता.
- बॅच ४२ ते ४५ दिवसांची. प्रति बॅच सरासरी १२ हजार पक्षांची.
- वर्षभर सहा बॅचेस.
विक्री व अर्थकारणतयार होणारा पक्षी २२०० ते २५०० ग्रॅम वजनाचा असतो. प्रति बॅच ३० हजार किलो तर वर्षाला सरासरी १ लाख ८० हजार किलो चिकन विक्रीसाठी तयार होते. कंपनी वजन करून पक्षी घेऊन जाते. .
पक्षी संगोपन, देखभाल व मरतूक या बाबी तपासून कंपनी प्रति किलो वजनामागे ५ रुपये ६० पैसे प्रमाणे संगोपन परतावा देते. योग्य निगा व वजन तयार केल्याने नेहमी स्टॅण्डर्ड दर मिळतो. प्रतिपक्षी सरासरी १३.५० ते १५ रुपये मिळतात. खाद्य व औषध खर्च कंपनी करते. सहा बॅचेसमधून सुमारे नऊ लाखांपर्यंत उलाढाल होते. प्रति बॅच आठ ट्रॉली खत मिळते. वर्षभरात सहा ट्रॉली घरच्या शेतीसाठी वापरून उर्वरित खताची तीन हजार रुपयांप्रमाणे विक्री होते. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळते.
गुंतवणूक
- २०१५ साली १२ लाख रुपयांची गुंतवणूक करून शेड बांधकाम व साहित्य खरेदी
- सुरवातीला साडेसहा हजार पक्षीसंगोपन
- त्यात यश येताच पुढीलवर्षी तेवढ्याच क्षमतेचे दुसरे शेड उभारले. त्यासाठी १४ लाख रुपये खर्च.
- यात खाद्य व पाणी पात्र, सेमी स्वयंचलित पाणी वितरण व्यवस्था.
भांडवल उपलब्धता
सुमारे १५ लाखांचे कर्ज झाले होते. त्यामुळे जमीन विकण्याची वेळ आली. आलेल्या पैशांतून कर्ज फेडले. उर्वरित रकमेतून पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. बर्ड फ्ल्यू, कोरोना अशा अडचणींचा सातत्याने सामना करावा लागला. खर्च वाढत गेल्याने संगोपन दर मिळण्यात अडचणी येतात. अफवा व गैरसमज या व्यवसायाला मारक आहेत. त्यामुळे खेळते भांडवल राहील यांचे नियोजन असते.
आदर्श व्यवस्थापनातील बाबी
- पाण्यासाठी अर्ध स्वयंचलित यंत्रणा
- पाणी निर्जंतुक ठेवण्यासह सामू नियंत्रित ठेवण्यासाठी कंपनीच्या शिफारशीनुसार कार्यवाही
- भांड्यांची स्वच्छता व पक्षीगृह (शेड) निर्जंतुक करून बेडवर चुन्याचा वापर व भाताचे तूस पसरविण्यात येते.
- ’’ब्रूडिंग’ प्रक्रिया पहिले दोन आठवडे देशी शेगडीच्या वापर करून केली जाते.
- खाद्य खराब होऊ नये यासाठी स्वच्छ व कोरडे वातावरण
- विहिरीतील पाणी वापरत असल्याने ब्लिचिंग पावडर किंवा तुरटीच वापर करून निर्जंतुकीकरण
- टाक्या सावलीत ठेवण्यासाठी शेडवर पत्रे
- उन्हाळ्यात पाणी थंड ठेवण्यासाठी टाकी, शेडमधील पाण्याच्या वाहिनीलाही बारदान
- दुपारी पाईपमध्ये साठणारे गरम पाणी काढून टाकले जाते.
- पक्षांना उन्हाच्या झळा लागू नयेत यासाठी बारदानाचे पडदे सोडून त्यावर ठिबक पद्धतीने पाणी
- शेडलगत गारव्यासाठी शेवरीची झाडे. सूक्ष्म फवारे वापरून गारवा.
- हिवाळ्यात दोन फुटांवर पडदे ठेवले जातात.
- प्रत्येक बॅचनंतर नवी ‘प्लेसमेंट’ करण्यापूर्वी शेड स्वच्छता व निर्जंतुकीकरण
- पक्षांची मरतूक कमी होण्यासाठी जैवसुरक्षेकडे विशेष लक्ष. खाद्य, औषधे, आरोग्य, वजन आदींच्या दैनंदिन नोंदी. ’’प्लेसमेंट’नंतर प्रति पक्षी १३ ग्रॅमप्रमाणे सुरवातीपासून खाद्य. पुढे दर दिवसाला तीन ग्रॅमप्रमाणे दैनंदिन वाढ
- वेळापत्रकानुसार लसीकरण. पक्षांची विष्ठा कोरडी होण्यासह अमोनिया वायू नियंत्रणासाठी सुरवातीला १५ दिवस दररोज तर नंतर ३० दिवसांपर्यंत दिवसाआड तूस हलवून बदल
आर्थिक स्थैर्यता
पक्षाच्या प्रतिकिलो वजनाप्रमाणे संगोपन दर मिळतो. सतीश व लहान भाऊ योगेश यांच्यासह दोघांच्याही पत्नी अर्चना व शीतल यांचा दैनंदिन कामांत सहभाग असतो. कामांचे व्यवस्थापन कुटुंब केंद्रित असल्याने मजूर टंचाईवर मात केली आहे. व्यक्तिगत लक्ष, वेळेत काम, योग्य नियोजन व व्यवस्थापन या त्यांच्या प्रमुख बाजू आहेत. किमान मरतूक, अपेक्षित वजन यामुळे परतावा चांगला मिळतो. शेतीत अनेक कारणांमुळे होत असलेल्या नुकसानीला पोल्ट्रीतून मोठा दिलासा मिळाला. आर्थिक स्थैर्य मिळाले.
- सतीश कुळधर, ९८२२९५७७११
फोटो गॅलरी
- 1 of 98
- ››