agricultural news in marathi success story of poultry industry in vita region in sangli district | Page 2 ||| Agrowon

पोल्ट्री उद्योगात विट्याची दमदार ओळख

अभिजित डाके
शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021

सांगली जिल्ह्यातील विटा शहराची ओळख वस्त्रोद्योगासाठी आहे. सुमारे चाळीस- पंचेचाळीस वर्षांपूर्वी या परिसरात पोल्ट्री व्यवसाय सुरू झाला. अनेक संकटे आली तरी त्यावर मात देत अनेक व्यावसायिकांनी त्यात चांगली वाटचाल ठेवली. 

सांगली जिल्ह्यातील विटा शहराची ओळख वस्त्रोद्योगासाठी आहे. सुमारे चाळीस- पंचेचाळीस वर्षांपूर्वी या परिसरात पोल्ट्री व्यवसाय सुरू झाला. अनेक संकटे आली तरी त्यावर मात देत अनेक व्यावसायिकांनी त्यात चांगली वाटचाल ठेवली. आर्थिक सक्षमता व रोजगारनिर्मिती केली. वस्त्रोद्योगापाठोपाठ पोल्ट्री उद्योगातही विटा भागाने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

सांगली जिल्ह्यातील विटा हे प्रसिद्ध शहर आहे. विटा-खानापूर हा दुष्काळी तालुका मानला जातो. तालुक्यात द्राक्ष, ऊस यासह हंगामी पिके घेतली जातात. मुळात विटा शहराची ओळख वस्त्रोद्योगानं झाली. सुमारे शंभर वर्षांची ही परंपरा आजही जपण्यात आली आहे. याच शहराने पोल्ट्री उद्योगातही विशेष ओळख निर्माण केली आहे. शहराच्या दहा ते पंधरा किलोमीटर परिघात उभारलेल्या या व्यवसायाला ४० वर्षांचा काळ लोटला आहे.  

व्यवसायाची सुरुवात 
सन १९७३ ते ७५ चा काळ. दुष्काळी परिस्थिती होती. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून घरखर्च कसाबसा चालायचा. वस्त्रोद्योग हा विटेकरांचा मूळ व्यवसाय. शेतीला पूरक म्हणून गुळवणी आणि कंपनी, अण्णा सगरे आणि दशरथ तारळेकर यांनी लेअर पोल्ट्री व्यवसायाला सुरुवात केली. दोनशे पक्ष्यांपासून ते ५०० पक्ष्यांपर्यंत बॅच सुरू झाली. पक्षी आणण्यापासून ते अंड्याची विक्री करण्यापर्यंत अनुभव नवाच होता. अभ्यास आणि अनुभवाच्या जोरातून जोमाने काम सुरू केले. हळूहळू व्यवसाय वाढू लागला. मग सुशिक्षित बेरोजगार युवक त्यात उतरले. सुरुवातीच्या मंडळींकडून त्यांनी बारकावे शिकण्यास प्रारंभ केला. नोकरीच्या मागे न लागता बॅंकांकडून कर्ज घेतले. सन १९९० पासून व्यवसाय अधिक वाढला. अनेकांनी भागीदारी केल्या. सन १९८५ च्या दरम्यान अंड्यांसोबत ब्रॉयलर पक्ष्यांची मागणी होऊ लागली. त्याची उभारणी सुरू होऊन तीही हळूहळू वाढू लागली.

संकट काळात मार्गक्रमण
पोल्ट्री व्यवसायात साथीचे रोग, वाढते तापमान यांचा त्रास पक्ष्यांना बसतो. मरतुकही होते. सन २००५-०६ च्या दरम्यान बर्ड फ्लूची साथ आली. त्या वेळी उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसला. अनेक पोल्ट्रीधारकांनी व्यवसाय बंद करण्याचे ठरवले. त्यातूनही उमेद न हारता काहींनी व्यवसाय सावरला. दोन वर्षांपूर्वी कोरोना विषाणूचेही संकट आले. अंडी आणि चिकन खाल्याने कोरोना होतो  अशी अफवा वाऱ्यासारखी पसरली. त्याही अभूतपूर्व परिस्थितीला तोंड देत विटा परिसरातील पोल्ट्री उद्योग मार्गक्रमण करत आहे 

ठळक बाबी

 • पशुवैद्यकाकडून पोल्ट्रीची सातत्याने देखरेख
 • दररोज शेडमध्ये स्वच्छता
 • बहुतांश पोल्ट्रीधारक स्वतः खाद्य तयार करतात. त्यामुळे खाद्यावरील अतिरिक्त खर्च कमी होतो.
 • स्थानिक मजुरांसह परजिल्ह्यातील लोकांच्या हाताला मिळाले काम. (सुमारे ८०० चे एक हजार मजूर)
 • वर्षाला कोंबडीखत विक्री. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळते.
 • व्यावसायिकांच्या मागण्या
 • शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करावा.
 • अंडी-चिकन यांच्या ब्रॅंडिंगसाठी शासकीय मदत व्हावी. त्यास हमीभाव मिळावा. प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरु  व्हावी. 
 • खाद्य तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल सवलतीच्या दरात मिळावा. 

विटा भागातील लेअर पोल्ट्री व्यवसाय (आकडे सुमारे)

 •     पोल्ट्रीधारकांची संख्या- २५० 
 •     पक्षी संख्या- १६ लाख
 •     दररोज सुमारे १३ लाख अंड्यांची विक्री
 •     हंगामानुसार अंड्यांना दर मिळतो.
 •     दररोजची उलाढाल- ६० लाख रु. 
 •     प्रति पक्षी सहा महिन्यांपर्यंतचा खर्च- २७५ रु. 
 •     एक बॅच पाच हजार पक्ष्यांपासून ते २५ हजार पक्ष्यांपर्यंत. 
 •     विक्रीतून मिळणाऱ्या पैशांमधून पुन्हा भांडवल उभे केले जाते. 
 •     विक्री- कोकण, पुणे, मुंबई, आणि खेडोपाड्यांत
 •     हैदराबाद, पुणे, आणि मिरज येथून पक्ष्यांची खरेदी
 •     एकदिवसीय पक्षी खरेदी दर- ४३ रु.

ब्रॉयलर पोल्ट्री दृष्टिक्षेप

 • पोल्ट्रीधारकांची संख्या- ५० 
 •  प्रति दोन ते पाच हजार पक्ष्यांची बॅच. यामुळे देखभाल आणि विक्री व्यवस्था नेटकी सांभाळता येते.
 • दीड ते दोन महिन्यांत विक्रीस येते.
 • प्रति किलोस ८५ रुपये खर्च. 
 • दीड महिन्याची उलाढाल- एक ते दोन कोटी रुपयांपर्यंत.
 • स्थानिक व्यापारी, किरकोळ व होलसेलद्वारे जागेवर खरेदी. 
 • मिरज, पुणे, कर्नाटक, गुजरात येथून पक्षांची खरेदी.  

प्रतिक्रिया
चाळीस वर्षांपासून पोल्ट्री व्यवसाय करत आहे. अनेक वेळा चढ-उतार आले. मात्र अभ्यास सातत्याने सुरू ठेवल्याने समस्यांवर मात करता आली. मध्यंतरी बर्ड फ्लू आला. पुढे मग ब्रॉयलर पोल्ट्री सुरू केली. जेवढे भांडवल गुंतवले त्यातून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न असतो.
- दशरथ तारळेकर, ९२८४९२८९०६

व्यवसायात भांडवल सतत हाताशी लागते. कच्चा माल सतत खरेदी करावा लागतो. ‘लो कॉस्ट टेक्नॉलॉजी’चा वापर करावा लागतो. दहा हजार पक्षी क्षमतेचा व्यवसाय उभारायचा तर बांधकाम किंवा आवश्यक खर्चासाठी सुमारे ४० लाखांहून अधिक रुपयांचे भांडवल आवश्यक असते. जागा स्वतःची नसल्यास त्या खर्चात वाढ होते. शिवाय वीज, पाणी व रस्ते या बाबींचाही वेगळा विचार आर्थिकदृष्ट्या करावा लागतो. पोल्ट्री व्यवसायात अनेक मोठे व्यावसायिक असतात. त्यांच्याशी स्पर्धा करावी लागते. त्यामुळे गुणवत्ता ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. चिकाटी व सातत्य या गोष्टीही तेवढ्याच महत्त्वाच्या असतात.
- शत्रुघ्न जाधव, ९८९०३०७८४५


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
रोपवाटिका व्यवसायासाठी ‘मॅट पॉट’...प्रगत देशामध्ये पर्यावरणपूरक पेपरपॉट निर्मितीसाठी...
जातिवंत दुधाळ गाई,म्हशींच्या पैदाशीसाठी...तामखडा (ता.फलटण,जि.सातारा) येथील प्रयोगशील...
गुलाबामध्ये तुळशीचे आंतरपीक ठरतेय...कोरोना संकट ही संधी समजून कवडी माळवाडी (ता. हवेली...
तीस वर्षांपासून फळपिकांमध्ये सातत्य...भोसे (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील कृषी पदवीधर डॉ...
वन्यप्राणी, संवर्धन, जनजागृतीसाठी ‘...मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वर्धा...
बटण मशरूमचा ‘कॅम्बीअम गोल्ड’ ब्रँडमूळचे जमालपूर (बिहार) येथील नीलकमल झा यांनी...
सेंद्रिय गुळाचा ‘यादवबाग’ ब्रॅण्ड !घरची वर्षानुवर्षांची ऊसशेती. मात्र मिळणाऱ्या कमी...
केळी, कापूस, जलसंधारणात झाली जळके...जळके (ता.जि. जळगाव) गावाने जलसंधारणात भरीव काम...
नागपूरला फुलला सीताफळाचा बाजारनागपूर येथील महात्मा फुले मार्केट सीताफळाने फुलले...
‘मार्केट डिमांड’नुसार देशी वांग्यांची...देशी वांग्याला अस्सल चव असल्याने...
पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला...ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन...
शेळी, कोंबडीपालनात युवा शेतकऱ्याची...बुलडाणा जिल्ह्यातील आडविहिर येथील युवा शेतकरी...
राधानगरीच्या दुर्गम भागात रेशीम शेतीचे...पारंपरिक ऊस, भात य पारंपरिक शेतीपेक्षा थोड्या...
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...