agricultural news in marathi success story of pramod chavan is teacher by profession doing profitable farming | Agrowon

शिक्षकाची प्रयोगशील शेती ठरतेय फायद्याची

 गोपाल हागे 
रविवार, 11 एप्रिल 2021

आश्रम शाळेत गेल्या २३ वर्षांपासून शिकविणारे सहायक शिक्षक प्रमोद भुरासिंग चव्हाण यांनी दगडपारवा (जि. अकोला) येथील वडिलोपार्जित शेतीत प्रयोगशीलता जोपासत नफ्याचे गणित जुळून आणण्यासाठी प्रयत्न चालविले आहे.

आश्रम शाळेत गेल्या २३ वर्षांपासून शिकविणारे सहायक शिक्षक प्रमोद भुरासिंग चव्हाण यांनी दगडपारवा (जि. अकोला) येथील वडिलोपार्जित शेतीत प्रयोगशीलता जोपासत नफ्याचे गणित जुळून आणण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. कृषी विभाग, शेतकरी गटाच्या माध्यमातून त्यांनी शेतीमध्ये बदल घडविण्यास सुरवात केली आहे.

प्रमोद चव्हाण हे मंगरूळपीर तालुक्यातील कळंबा येथील आश्रम शाळेत सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या गावापासून हे ठिकाण जवळपास ५५ किलोमीटर अंतरावर आहे. दगडपारवा गावात त्यांच्या एकत्रित कुटुंबाची ५० एकर शेती आहे. यातील काही जमीन धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेली आहे. मोठा भाऊ मुंबईत रहात असल्यामुळे या शेतीची संपूर्ण जबाबदारी प्रमोद चव्हाण यांच्याकडे आहे. या शेतात त्यांनी मागील काही वर्षात बाजारपेठेच्या मागणीनुसार पीकपद्धतीत बदल केले. काही क्षेत्रामध्ये ते पारंपारिक पिकांसह नगदी पिके, भाजीपाल्याची लागवड करतात. सध्या त्यांच्या शेतीत १८ एकर भुईमूग आहे.  तीन एकरात टरबूज लागवड असून दोन एकरात ज्वारी, एक एकरात तीळ लागवड आहे. याशिवाय हंगामानुसार ते विविध पिकांची लागवड करतात.शेतीमध्ये केलेल्या कामांतून मिळणारी ऊर्जा शैक्षणिक कामांसाठी प्रोत्साहन, बळ पुरविणारी असल्याचे ते सांगतात.

पीक बदलावर दिला भर
शेती नियोजनाबाबत प्रमोद चव्हाण म्हणाले की, मी वडिलोपार्जित शेतीत बदल करण्यासाठी बार्शीटाकळी कृषी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून शेतीचे नियोजन करतो. हवामानातील बदल, अवकाळी पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे पीक पद्धती बदलावर जोर दिला. बाजारपेठेची मागणी पाहून आता सेंद्रिय निविष्ठांचा जास्तीत जास्त वापर करत आहे. कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद ही पिके घेतानाच हंगामी पिकांवर लक्ष केंद्रित केले. कापसाचे मला एकरी १० क्विंटल, सोयाबीनचे सात क्विंटल उत्पादन मिळते. तुरीचे आंतर पीक असते. रब्बीत जैविक मिशन अंतर्गत सेंद्रिय पद्धतीने बन्सी, खपली, शरबती गव्हाचे उत्पादन घेतले. यंदा उन्हाळी हंगामात भुईमुगाची मोठ्या  क्षेत्रावर लागवड केली आहे. त्यामध्ये जनावरांना चाऱ्यासाठी ठराविक सरी नंतर मका टोकण केली आहे. 

शेतीत केली सुधारणा
चव्हाण यांचा शेती सुधारणांवर सातत्याने जोर आहे. पहिल्यांदा संपूर्ण शेती ओलिताखाली आणण्याचे काम त्यांनी केले. यासाठी तीन विहिरी, दोन कूपनलिका तसेच धरणावरून दोन किलोमीटर पाइपलाइन करून शेतात पाणी नेले. या भागात वन्यजिवांचा मोठा त्रास आहे. त्यामुळे शेताला काटेरी तार कुंपण केले. काही क्षेत्राला तारेचे झटका कुंपण केले. पाण्याची उपलब्धता मुबलक असली तरी पाणी वाया जाऊ नये यासाठी ठिबक, स्प्रिंकलरचा वापर केला आहे.  अनियंत्रित पद्धतीने रासायनिक खतांच्या वापराने पीक उत्पादकता कमी होत चालली आहे. जमिनीचा पोतही तितकासा चांगला राहत नाही. हा अनुभव पाहता चव्हाण यांनी  जैविक शेतीकडे लक्ष केंद्रित केले. गोकृपामृत, दशपर्णी अर्क, एस -९ कल्चर, बायोडायनामिक खतांचा वापर शेतीमध्ये वाढविला आहे. योग्य नियोजन आणि किफायतशीर पीकपद्धतीमुळे रासायनिक खतांचा गरजेपुरता वापर व रासायनिक कीडनाशकांची फवारणी अत्यंत मर्यादित ठेवली आहे. उत्पादित शेतीमालाचे स्वतः प्रतवारी करून शेतकरी गटाच्या माध्यमातून विक्री सुरु केली आहे. यापुढील टप्‍यात शेतकरी कंपनी स्थापन करण्याचा विचार आहे. गावातील शेतीमालाचे स्वतः मार्केटिंग करण्याकडे लक्ष देणार असल्याचे प्रमोद चव्हाण यांनी सांगितले.

एकात्मिक व्यवस्थापनावर भर 
प्रमोद चव्हाण हे प्रयोगशील शेतकरी, तज्ज्ञांच्या कायम संपर्कात असतात. गावामध्ये त्यांचा शेतकरी मित्रांचा प्रभू रामजी जैविक शेतकरी गट आहे. यामध्ये २० शेतकरी सदस्य आहेत.  हे सर्वजण एकमेकांशी चर्चा करून शेतीचे नियोजन करतात. प्रयोगशील शेतकऱ्यांच्याकडून  शेतीतील नवीन तंत्रज्ञानाची माहिती चव्हाण मिळवतात. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटही देतात. व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून शेतीविषयक ज्ञान मिळवतात. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने पीक नियोजन, आंतरपीक पद्धती, ठिबक सिंचन आणि जैविक शेती नियोजनाचा वापर सुरु केला आहे. यातून जमिनीची सुपीकता जपण्यासाठी शेणखत आणि  शेणस्लरीचा वापर करतात. एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रणावर त्यांचा भर आहे. रासायनिक आणि सेंद्रिय कीडनाशकांच्या वापराबरोबरच सापळा पिके, चिकट सापळ्यांचा ते वापर करतात. चव्हाण यांची गावाजवळ चार एकर शेती आहे. याठिकाणी एक एकर क्षेत्रात शेडनेट उभारणीचे त्यांचे नियोजन आहे. त्यामध्ये भाजीपाल्याची पिके घेऊन स्वतः विक्री करण्याचे त्यांनी ठरविले आहे. रस्त्याला लागून शेत असल्याने तसेच अकोला बाजारपेठ जवळ असल्यामुळे हे काम लवकरच सुरू करणार आहेत.

 नोकरी आणि शेतीची कसरत
प्रमोद चव्हाण हे मुलांच्या शिक्षणासाठी अकोला शहरात राहतात. अकोल्यापासून त्यांचे गाव सुमारे ३० किलोमीटरवर आहे.  गावापासून नोकरीचे ठिकाण ५५ किलोमीटर आहे. ते कधी गावी तर कधी अकोल्यात मुक्कामी असतात. गाय, बैलजोडी व इतर शेतीची कामे करण्यासाठी त्यांनी एक कुटुंब शेतात सालाने ठेवले आहे. त्यांच्या माध्यमातून शेतीतील कामाचे नियोजन करून घेतात. काही हंगामी पिकांसाठी ते शेती बटाईनेही देतात. दर रविवारी किंवा सुटी असेल तेव्हा ते शेतीवर जाऊन पुढील नियोजन करतात. खरिपात स्वतः संपूर्ण शेतीत लागवड करतात.    

चव्हाण यांना एक बंधू आणि दोन बहिणी आहेत. चौघांच्या कुटुंबाला वर्षभर पुरेल इतकी  कडधान्ये, डाळी, फळे हे रसायन अवशेषमुक्त पिकविण्यासाठी नियोजन करीत आहेत. स्वतःच्या शेतात भुईमुगाचे पीक घेत असल्याने यापासून तेलही बनविणार आहेत. भावाच्या सहकार्याने शेतीमाल मुंबई मार्केटमध्येही नेण्याचे प्रयत्न करीत असल्याचे प्रमोद यांनी सांगितले.
- प्रमोद चव्हाण  ७५८८९६२३९९


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
फळबागेतून शेती झाली फायद्याची..उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...