फळबागकेंद्रित पीक पद्धतीतून साधला उत्कर्ष

परभणी जिल्ह्यातील राधेधामनगाव (ता. सेलू) येथील गोरे बंधूंनी फळबागकेंद्रित पीक पद्धतीतून आपला उत्कर्ष साधला आहे. लिंबू, डाळिंब, सीताफळ यांचे उत्पादन आणि विक्री व्यवस्था उभी केली आहे. विशेषतः लिंबू उत्पादन, मार्केटिंग आणि रोपवाटिका अशा उत्पन्न स्रोतातून कुटुंबाची आर्थिक घडी बसवली आहे.
Pralhadrao Gore and Vinayak Gore in the custard apple field.
Pralhadrao Gore and Vinayak Gore in the custard apple field.

परभणी जिल्ह्यातील राधेधामनगाव (ता. सेलू) येथील गोरे बंधूंनी फळबागकेंद्रित पीक पद्धतीतून आपला उत्कर्ष साधला आहे. लिंबू, डाळिंब, सीताफळ यांचे उत्पादन आणि विक्री व्यवस्था उभी केली आहे. विशेषतः लिंबू उत्पादन, मार्केटिंग आणि रोपवाटिका अशा उत्पन्न स्रोतातून कुटुंबाची आर्थिक घडी बसवली आहे. सेलू -पाथरी राष्ट्रीय महामार्गापासून पश्‍चिमकडे जाणाऱ्या देऊळगाव गात फाट्यावरून खवणे पिंपरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर राधेधामनगाव हे गाव आहे. येथील सुदामराव गोरे यांच्या मधुकरराव, प्रल्हादराव, विनायक या तीन मुलांसह १८ सदस्यांचे एकत्रित कुटुंब. त्यांच्याकडे ३३ एकर हलकी ते मध्यम जमीन आहे. १९९८ पर्यंत मूग, तूर, कापूस अशा पारंपरिक पिकांचे उत्पादन घेत. एकतर जिरायत शेती, त्यात बदलत्या हवामानामुळे दुष्काळाचे सावट यामुळे उत्पादन, उत्पन्न आणि संयुक्त कुटुंबाच्या किमान आर्थिक गरजा यांचा मेळ बसत नव्हता. निम्मी जमीन हलकी असल्याने उत्पादकताही कमी होती. सेलूचे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी डी. बी. काळे यांनी लिंबू लागवडीचा सल्ला दिला. कृषी विभागामार्फत रोजगार हमी योजनेमध्ये ‘एक गाव एक फळपीक’ अंतर्गत लिंबू लागवड योजना होती. ठिंबक सिंचन पद्धतीवर सुरुवातीलाच १९९८ मध्ये कागदी लिंबाच्या प्रमालिनी आणि विक्रम या वाणांची १० एकरांवर लागवड केली. या वेळी सुदामराव यांच्यासमवेत मधुकरराव, प्रल्हादराव हेच शेती करत. विनायक यांचे शिक्षण सुरू होते. २००० मध्ये विनायक हे एसटी मध्ये वाहक म्हणून रूजू झाले. २००२ पासून लिंबू उत्पादन सुरू झाले. दरवर्षी लिंबू उत्पादनातून खात्रीशीर उत्पन्न मिळू लागले. २००७ पासूनच विनायक यांनी नोकरी सांभाळत राज्य लिंबू उत्पादक महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. अप्पासाहेब भुजबळ यांच्यासोबत लिंबू लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न केले. पुढे २००९ मध्ये एसटीची नोकरी सोडून पूर्णवेळ लिंबू उत्पादनावरच लक्ष केंद्रित केले. सेलू तालुक्यात राधेधाणनगावसह परिसरातील डासाळा, रवळगाव, देऊळगाव गात, खवणे पिंपरी आदी गावात लिंबू लागवड झाली. लिंबू उत्पादनातून शाश्‍वत उत्पन्न मिळू लागल्यामुळे गोरे कुटुंबीयांसह अनेक शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला उभारी मिळाली. सेलू तालुका जिल्ह्यातील प्रमुख लिंबू क्लस्टर म्हणून ओळखला जातो. वर्षेभर उत्पन्न देणारे लिंबू... लिंबू बागेचे वर्षात - आंबिया, मृग, हस्त असे तीन बहर. या शिवाय अडकिन बहरातूनही कमी उत्पादन मिळते. आंबिया, मृग बहरांच्या तुलनेत हस्त बहराचे उत्पादन कमी असते. मात्र मागणी अधिक असल्याने चांगले दर मिळतात. योग्य खत, पाणी, तण व्यवस्थापनातून सहा वर्षे व त्यापुढील वयाच्या एका लिंबू झाडापासून तीन बहरांचे साधारणतः दोन क्विंटल उत्पादन मिळते. पुनररुज्जीवनातून उत्पादन सातत्य तीन वर्षांपूर्वी दुष्काळामुळे दहा एकरांतील अनेक लिंबू झाडे वाळू लागली. मात्र या झाडांना खत पाणी देऊन त्यांचे पुनरुज्जीवन केले. काही झाडे वाचवता आली नसली तरी बहुतांश झाडे उत्पादनक्षम करण्यात यश आले. जुन्या लिंबू बागेत दोन ओळींमध्ये नवीन लिंबू लागवड केली असून, त्यांचे उत्पादन सुरू झाल्यानंतर बागेतील कमी उत्पादन देणारी जुनी टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे नियोजन आहे. यामुळे उत्पादन पर्यायाने उत्पन्नातही खंड पडणार नसल्याचे प्रल्हादराव गोरे यांनी सांगितले. देशभरात लिंबू विक्रीसाठी स्वतःची व्यवस्था... मधुकरराव, प्रल्हादराव यांच्याकडे शेती कामाचे व्यवस्थापन, तर विनायक यांच्याकडे फळ विक्रीचे नियोजन अशी घरातील कामांची विभागणी आहे. २००७ पर्यंत सेलू व परभणी येथील मार्केटमध्ये लिंबाची विक्री केली जाई. मात्र पुढे गावातील लागवड क्षेत्र व उत्पादनात वाढ झाली. गोरे यांनी वाहतुकीसाठी वाहन खरेदी केले. औरंगाबाद, पुणे, मुंबई येथील बाजारपेठेत लिंबू पाठवू लागले. २०१०-११ पासून रेल्वेद्वारे पंजाबमधील अमृतसर, लुधियाना, राजस्थानातील जयपूर, तसेच हैदराबाद येथील बाजारपेठेमध्ये लिंबू पाठवतात. प्रतवारीसह क्रेट ठरते फायदेशीर २०११ मध्ये हिमाचल प्रदेशातील सोलन येथील कृषी विद्यापीठात काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाचे आत्मा विभाग आयोजित आठ दिवसांचे प्रशिक्षण घेतले. झाडावरून साधारणतः ३० मिमीपेक्षा अधिक व्यासाची व हिरव्या पोपटी रंगाची लिंबू फळे तोडली जातात. काढणीनंतर व्यवस्थित प्रतवारी करून क्रेटमध्ये किंवा तागाच्या पिशव्यांमध्ये भरले जाते. अन्य शेतकऱ्यांकडून वजन करूनच लिंबू फळे खरेदी केली जाते. त्यानंतर ए ग्रेड आणि लो ग्रेड अशी प्रतवारी केली जाते. लो ग्रेड मध्येही बी, सी ग्रेड अशी प्रतवारी केली जाते. त्यानुसार शेतकऱ्यांना रोखीने चुकारे अदा केले जातात, असे विनायक गोरे यांनी सांगितले. फळपिकातून आली समृद्धी.... लिंबू 

  • ‘लिंबू क्लस्टर’मुळे शेती क्षेत्र वाढले. पीक व्यवस्थापनापासून प्रतवारी, विक्रीपर्यंतची कामे सोपी झाली. लिंबू फळ काढणीनंतर चार ते पाच दिवस टिकून रहाते. साधारणपणे वर्षभर मागणी असते. प्रति किलो १० ते ३५ रुपयांपर्यंत दर मिळतात.
  • १० एकरमध्ये एकूण लिंबू झाडे १०००. प्रति वर्ष प्रति झाड दीड ते दोन क्विंटल उत्पादन मिळते. खर्च जाता त्यातून वर्षाकाठी १५ ते २० लाख रुपये उत्पन्न मिळते.
  • अन्य शेतकऱ्यांच्या लिंबू मार्केटिंगमधून सुमारे तीन ते चार लाख रुपये उत्पन्न मिळते.
  • डाळिंब - भगवा वाण - तीन एकर उत्पादन - १८ ते २० टन (तीन एकरांतून) उत्पन्न - सरासरी ६ ते ७ लाख रुपये. सीताफळ - एनएमके १ वाण - एक एकर उत्पादन - ३ ते ४ टन. निव्वळ उत्पन्न - सरासरी ५० ते ७० हजार रुपये. पारंपरिक पिके  मूग, कापूस, उडीद, तूर, सोयाबीन. १४ ते १५ एकर क्षेत्र. त्यातून प्रति वर्ष ४ ते ४.५ लाख रुपयांचे उत्पन्न हाती येते. एकरी ३० हजार रुपये. मनुष्य व्यवस्थापन 

  • तीन सालगडी कामासाठी आहेत.
  • बारमाही सहा ते सात महिला मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
  • रोपवाटिकेमध्ये दोन जोड्या, तीन लिंबू खरेदी केंद्रावर प्रत्येकी एक माणसे कामाला आहेत. गरजेनुसार मजुरांची संख्या कमी जास्त केली जाते. मार्केंटिंगसाठी दोन पीकअप आणि एक फोर व्हिलर आहे.
  • खात्रीशीर उत्पन्नामुळे...

  • लिंबू उत्पादन आणि विक्रीबरोबरच अन्य फळपिकांतून गोरे कुटुंबाचे अर्थकारण सक्षम झाले. यातून शेतातील सिंचन स्रोत बळकट केले. ३ विहिरी, ५० बोअरवेल आणि एक शेततळे यांची कामे केली. उन्हाळ्यात पाणी कमी पडल्यावर काही काळ टॅंकरने घेऊन बाग जगवली. पुढे सहा किलोमीटरवरील खवणे पिंपरी शिवारातून जायकवाडी डाव्या कालव्या जवळून पाइपलाइनने पाणी आणले.
  • सेलू येथे जागा विकत घेऊन पक्के घर बांधले आहे.
  • कुटुंबातील ८ मुलामुलींचे उच्च शिक्षण शक्य झाले. घरातील २ मुलींची लग्ने मानाप्रमाणे करता आली.
  • उत्पन्नातील नफ्यातून दरवर्षी एक ते दीड लाख रुपयाची बचत कटाक्षाने करतात. त्यातून भविष्यकालीन गरजांची तरतूद होऊ शकेल.
  • रोपवाटिका सेलू, पाथरी, मानवत तालुक्यातून फळ रोपांची मागणी वाढत आहे. त्यामुळे विनायक गोरे यांनी सेलू पाथरी रस्त्यावरील बोरगव्हाण येथे करार पद्धतीने जमीन घेऊन रोपवाटिका सुरू केली. रोपवाटिकेस चांगला प्रतिसाद मिळतो.

  • सेलू -पाथरी रस्त्यावरील गुगळी धामनगाव येथे दोन एकर जमीन खरेदी केली असून, या वर्षीच तिथेही रोपवाटिका सुरू केली.
  • सध्या सेलू, राधेधामणगाव, गुगळी धामणगाव येथे प्रत्येक एक गुंठे क्षेत्रावर लिंबू खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. प्रमुख रस्त्यावरील या खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांची सोय होत असल्याचे विनायक गोरे सांगतात.
  • - विनायक गोरे, ९९२१४५१९३०, ९३०९१५१८७०.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com