‘कोरोना’नंतर आकार घेतेय फुलांची बाजारपेठ

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पुणे बाजार समितीतील फुलबाजाराला जणू ग्रहण लागल्यासारखी अवस्था होती. यंदा मात्र गौरी-गणपतीच्या निमित्ताने ही बाजारपेठ चांगलीच सजली, फुलली आहे. मागणी वाढल्याने फुलांच्या आवकेत व दरांत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.
Flower market flourishing in Pune Bazar Samiti due to Ganeshotsav.
Flower market flourishing in Pune Bazar Samiti due to Ganeshotsav.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पुणे बाजार समितीतील फुलबाजाराला जणू ग्रहण लागल्यासारखी अवस्था होती. यंदा मात्र गौरी-गणपतीच्या निमित्ताने ही बाजारपेठ चांगलीच सजली, फुलली आहे. मागणी वाढल्याने फुलांच्या आवकेत व दरांत वाढ झाल्याने फूल उत्पादक, व्यापाऱ्यांसह लहान- मोठ्या व्यावसायिकांना दिलासा मिळत आहे. विविध फुलांना श्रावणापासून मागणी वाढू लागते. गणपतीबरोबरच गौरींसाठीही फुलांची मागणी वधारते. मागील दोन वर्षांत कोरोना संकटामुळे सर्वाधिक फटका फूल उत्पादकांना बसला. या वर्षी संकटाची तीव्रता काहीशी कमी झाल्याने प्रशासनाने निर्बंध कमी केले. त्यामुळे गुलटेकडी येथील पुणे बाजार समितीतील फुलबाजार सुरळीत होऊ लागला आहे. अखिल फुलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर म्हणाले की मंदिरेही बंद असल्याने फुलांची मागणी घटली होती. शेतकऱ्यांनी लागवडक्षेत्र कमी केले होते. गेल्या वर्षी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर निर्बंध शिथिल केल्याने फुलांना मागणी वाढली. त्या तुलनेत आवक कमी राहिल्याने दर मोठ्या प्रमाणावर वाढले. या वर्षी निर्बंध तुलनेत कमी असल्याने श्रावणाच्या नियोजनानुसार शेतकऱ्यांनी फुलांच्या लागवडी केल्या. त्यामुळे आवक चांगली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दर कमी असले तरी संतुलित आहेत.   अशी वाढते मागणी गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधीच उपनगरातील हार, फुले व्यावसायिकांकडून मागणी वाढण्यास सुरू होते असे व्यापारी सागर भोसले म्हणाले. प्रामुख्याने झेंडू, शेवंती, ॲस्टर, गुलछडी यांना अधिक मागणी असते. व्यावसायिक दोन- तीन दिवस अगोदर हार करून शीतगृहात ठेवतात. ऐन गणेशोत्सवात तुलनेने मागणी कमी मात्र दर टिकून राहतात. आवक- जावक 

  • पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगावसह दौंड, पुरंदर, बारामती तालुक्यांतून होते आवक. 
  • नगर, सोलापूर, सातारा, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून शेवंती आणि झेंडू येतो.  
  •  पुणे बाजार समितीतून राज्याच्या विविध भागांत फुलांची पाठवणूक. (प्रामुख्याने कोकणातील विविध जिल्‍ह्यांसह गोव्याला)  
  • शेवंतीला विशेष मागणी दरवर्षी बंगळूरसह कर्नाटकातील अन्य भाग, हैदराबाद येथून पुणे बाजार समितीत शेवंतीची मोठी आवक होते. कोरोना संकटामुळे दोन वर्षांत त्या भागातील लागवड क्षेत्र कमी झाले. परिणामी, व्यापाऱ्यांनी यंदा पुणे जिल्ह्यासह सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केली. आवक तुलनेने कमी राहून दर तेजीत राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. या वर्षी पुण्यात शेवंतीला किलोला १०० रुपयांपर्यंत कमाल तर सरासरी दर ७० रुपयांपर्यंत होता. दक्षिणेत हेच दर ८० ते १२० रुपयांपर्यंत होते. आवकेत प्रामुख्याने भाग्यश्री, ऐश्‍वर्या, पेपर व्हाइट, सेंट व्हाइट, पर्पल, पेपर यलो या वाणांचा समावेश आहे.   कोलकाता झेंडूला मागणी  आकाराने लहान, डेरेदार, एकसारखा आकार आणि जास्त टिकवणक्षमता यामुळे या फुलाला हार व्यावसायिकांकडून आणि घरगुती पूजेसाठी विशेष मागणी असते. दर ५ ते १० रुपयांनी जास्त असतात.  शोभिवंत फुलांची मागणी  प्रमुख विक्रेते किरण ननावरे म्हणाले, की जरबेरा, कार्नेशन, डच गुलाब, ऑर्किड या फुलांबरोबरच फिलर्सना (विविध शोभेची पाने) मागणी आहे. यात गोल्डन रॉड, ढाकळी, कामिनी, स्प्रिंगेरी, लिलीयम,  एशिॲटिक आदींचा समावेश आहे. कोरोना काळात पॉलिहाउसमध्ये उत्पादित शोभिवंत फुलांचा देशांतर्गत व्यापार, निर्यात ठप्प झाली. काही शेतकरी आणि उद्योग समूह पर्यायी व्यवसायाकडे वळले. त्यामुळे शोभिवंत फुलांचे उत्पादन २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घटले. परिणामी मागणी आणि दर संतुलित आहेत. दिवाळी व नाताळ हंगामात चांगले दर राहतील असा अंदाज आहे.  अलिकडील प्रतिकिलो दर (रू.)

    फूल प्रकार      कमाल   किमान      सरासरी 
    गुलछडी       ४००      १००      २५० 
    झेंडू      ५०      २०     ३५ 
    तुळजापुरी झेंडू    ३०     २०     २५ 
    बिजली      ६०     ३०     ४५ 
    शेवंती      ७०     ३०     ५० 
    ॲस्टर      ५०     ३०     ४० 

     ( आकडेवारी स्रोत- पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती)   शोभिवंत फुलांचे दर (रुपये)  जरबेरा (१० फुलांची गड्डी)......................... ३० ते ५० कार्नेशन (२० फुलांची गड्डी)....................... २००-३००  डच गुलाब (२० फुलांची गड्डी)..................... १००-१५०  ऑर्किड (गड्डी).......................................... ५०० ते ६००  फिलर्स   (प्रति गड्डी)  गोल्डन रॉड.................. १०-२०  ढाकळी....................... १०-२०  कामिनी....................... ५-१० स्प्रिंगेरी......................... १०-२० 

    प्रतिक्रिया दरवर्षी श्रावण आणि गणपती सणासाठी फुले आणण्याचे नियोजन करतो. यंदा सव्वा एकरात झेंडू आणि कोलकाता झेंडूची लागवड आहे. आम्ही चार-पाच शेतकरी मिळून दररोज दोन टन झेंडू पुणे बाजार समितीत पाठवितो. श्रावणात यंदा किलोला २० ते ४० रुपये, तर सद्यःस्थितीत गणपती सण सुरू होण्याच्या दोन दिवस आधी तो ८० ते ९० रुपये दर मिळाला. सध्या तो ५० ते ६० रुपये सुरू आहे.  - दीपक तरटे  ९५१८५५५६३९  बावधन, वाई, जि. सातारा 

    गणपती आणि नवरात्री सणासाठी गुलछडीची लागवड केली आहे. चार- पाच दिवसांपासून काढणी सुरू आहे. सध्या दररोज चार-पाच किलो माल पाठवतो. गेल्या पाच दिवसांत ३०० ते ५०० रुपये प्रति किलो दर मिळाला.   - सागर दोरगे   ९६२३२०००९४ यवत, ता. दौड, जि. पुणे  

    अर्धा एकरात ॲस्टर लागवड आहे. गणपती सणासाठी दररोज १० ते १५ हजार जुड्या पुणे बाजार समितीमध्ये पाठवतो. चार जुड्यांच्या गड्डीला १५ ते २० रुपये दर मिळत आहे.  - सुनील भाडळे  ९०११३८९९८४ कोयाळी, आळंदी, ता. खेड, जि. पुणे  - अरुण वीर  ९८५०५०४१९०  (अध्यक्ष, अखिल पुणे फूल बाजार अडते असोसिएशन)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com