agricultural news in marathi success story pune market flower market | Page 2 ||| Agrowon

‘कोरोना’नंतर आकार घेतेय फुलांची बाजारपेठ

गणेश कोरे 
गुरुवार, 16 सप्टेंबर 2021

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पुणे बाजार समितीतील फुलबाजाराला जणू ग्रहण लागल्यासारखी अवस्था होती. यंदा मात्र गौरी-गणपतीच्या निमित्ताने ही बाजारपेठ चांगलीच सजली, फुलली आहे. मागणी वाढल्याने फुलांच्या आवकेत व दरांत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पुणे बाजार समितीतील फुलबाजाराला जणू ग्रहण लागल्यासारखी अवस्था होती. यंदा मात्र गौरी-गणपतीच्या निमित्ताने ही बाजारपेठ चांगलीच सजली, फुलली आहे. मागणी वाढल्याने फुलांच्या आवकेत व दरांत वाढ झाल्याने फूल उत्पादक, व्यापाऱ्यांसह लहान- मोठ्या व्यावसायिकांना दिलासा मिळत आहे.

विविध फुलांना श्रावणापासून मागणी वाढू लागते. गणपतीबरोबरच गौरींसाठीही फुलांची मागणी वधारते. मागील दोन वर्षांत कोरोना संकटामुळे सर्वाधिक फटका फूल उत्पादकांना बसला. या वर्षी संकटाची तीव्रता काहीशी कमी झाल्याने प्रशासनाने निर्बंध कमी केले. त्यामुळे गुलटेकडी येथील पुणे बाजार समितीतील फुलबाजार सुरळीत होऊ लागला आहे. अखिल फुलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर म्हणाले की मंदिरेही बंद असल्याने फुलांची मागणी घटली होती. शेतकऱ्यांनी लागवडक्षेत्र कमी केले होते. गेल्या वर्षी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर निर्बंध शिथिल केल्याने फुलांना मागणी वाढली. त्या तुलनेत आवक कमी राहिल्याने दर मोठ्या प्रमाणावर वाढले. या वर्षी निर्बंध तुलनेत कमी असल्याने श्रावणाच्या नियोजनानुसार शेतकऱ्यांनी फुलांच्या लागवडी केल्या. त्यामुळे आवक चांगली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दर कमी असले तरी संतुलित आहेत.  

अशी वाढते मागणी
गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधीच उपनगरातील हार, फुले व्यावसायिकांकडून मागणी वाढण्यास सुरू होते असे व्यापारी सागर भोसले म्हणाले. प्रामुख्याने झेंडू, शेवंती, ॲस्टर, गुलछडी यांना अधिक मागणी असते. व्यावसायिक दोन- तीन दिवस अगोदर हार करून शीतगृहात ठेवतात. ऐन गणेशोत्सवात तुलनेने मागणी कमी मात्र दर टिकून राहतात.

आवक- जावक 

  • पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगावसह दौंड, पुरंदर, बारामती तालुक्यांतून होते आवक. 
  • नगर, सोलापूर, सातारा, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून शेवंती आणि झेंडू येतो.  
  •  पुणे बाजार समितीतून राज्याच्या विविध भागांत फुलांची पाठवणूक. (प्रामुख्याने कोकणातील विविध जिल्‍ह्यांसह गोव्याला)  

शेवंतीला विशेष मागणी
दरवर्षी बंगळूरसह कर्नाटकातील अन्य भाग, हैदराबाद येथून पुणे बाजार समितीत शेवंतीची मोठी आवक होते. कोरोना संकटामुळे दोन वर्षांत त्या भागातील लागवड क्षेत्र कमी झाले. परिणामी, व्यापाऱ्यांनी यंदा पुणे जिल्ह्यासह सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केली. आवक तुलनेने कमी राहून दर तेजीत राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. या वर्षी पुण्यात शेवंतीला किलोला १०० रुपयांपर्यंत कमाल तर सरासरी दर ७० रुपयांपर्यंत होता. दक्षिणेत हेच दर ८० ते १२० रुपयांपर्यंत होते. आवकेत प्रामुख्याने भाग्यश्री, ऐश्‍वर्या, पेपर व्हाइट, सेंट व्हाइट, पर्पल, पेपर यलो या वाणांचा समावेश आहे.  

कोलकाता झेंडूला मागणी 
आकाराने लहान, डेरेदार, एकसारखा आकार आणि जास्त टिकवणक्षमता यामुळे या फुलाला हार व्यावसायिकांकडून आणि घरगुती पूजेसाठी विशेष मागणी असते. दर ५ ते १० रुपयांनी जास्त असतात. 

शोभिवंत फुलांची मागणी 
प्रमुख विक्रेते किरण ननावरे म्हणाले, की जरबेरा, कार्नेशन, डच गुलाब, ऑर्किड या फुलांबरोबरच फिलर्सना (विविध शोभेची पाने) मागणी आहे. यात गोल्डन रॉड, ढाकळी, कामिनी, स्प्रिंगेरी, लिलीयम,  एशिॲटिक आदींचा समावेश आहे. कोरोना काळात पॉलिहाउसमध्ये उत्पादित शोभिवंत फुलांचा देशांतर्गत व्यापार, निर्यात ठप्प झाली. काही शेतकरी आणि उद्योग समूह पर्यायी व्यवसायाकडे वळले. त्यामुळे शोभिवंत फुलांचे उत्पादन २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घटले. परिणामी मागणी आणि दर संतुलित आहेत. दिवाळी व नाताळ हंगामात चांगले दर राहतील असा अंदाज आहे. 

अलिकडील प्रतिकिलो दर (रू.)

फूल प्रकार      कमाल   किमान      सरासरी 
गुलछडी       ४००      १००      २५० 
झेंडू      ५०      २०     ३५ 
तुळजापुरी झेंडू    ३०     २०     २५ 
बिजली      ६०     ३०     ४५ 
शेवंती      ७०     ३०     ५० 
ॲस्टर      ५०     ३०     ४० 

 (आकडेवारी स्रोत- पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती)  

शोभिवंत फुलांचे दर (रुपये) 
जरबेरा (१० फुलांची गड्डी).........................३० ते ५०
कार्नेशन (२० फुलांची गड्डी).......................२००-३०० 
डच गुलाब (२० फुलांची गड्डी).....................१००-१५० 
ऑर्किड (गड्डी)..........................................५०० ते ६०० 

फिलर्स  (प्रति गड्डी) 
गोल्डन रॉड..................१०-२० 
ढाकळी.......................१०-२० 
कामिनी.......................५-१०
स्प्रिंगेरी.........................१०-२० 

प्रतिक्रिया

दरवर्षी श्रावण आणि गणपती सणासाठी फुले आणण्याचे नियोजन करतो. यंदा सव्वा एकरात झेंडू आणि कोलकाता झेंडूची लागवड आहे. आम्ही चार-पाच शेतकरी मिळून दररोज दोन टन झेंडू पुणे बाजार समितीत पाठवितो. श्रावणात यंदा किलोला २० ते ४० रुपये, तर सद्यःस्थितीत गणपती सण सुरू होण्याच्या दोन दिवस आधी तो ८० ते ९० रुपये दर मिळाला. सध्या तो ५० ते ६० रुपये सुरू आहे. 
- दीपक तरटे  ९५१८५५५६३९ 
बावधन, वाई, जि. सातारा 

गणपती आणि नवरात्री सणासाठी गुलछडीची लागवड केली आहे. चार- पाच दिवसांपासून काढणी सुरू आहे. सध्या दररोज चार-पाच किलो माल पाठवतो. गेल्या पाच दिवसांत ३०० ते ५०० रुपये प्रति किलो दर मिळाला.  
- सागर दोरगे   ९६२३२०००९४
यवत, ता. दौड, जि. पुणे  

अर्धा एकरात ॲस्टर लागवड आहे. गणपती सणासाठी दररोज १० ते १५ हजार जुड्या पुणे बाजार समितीमध्ये पाठवतो. चार जुड्यांच्या गड्डीला १५ ते २० रुपये दर मिळत आहे. 
- सुनील भाडळे  ९०११३८९९८४
कोयाळी, आळंदी, ता. खेड, जि. पुणे 

- अरुण वीर  ९८५०५०४१९० 
(अध्यक्ष, अखिल पुणे फूल बाजार अडते असोसिएशन)


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
जातिवंत जनावरांसाठी दर्यापूरचा बाजारअमरावती जिल्ह्यात दर्यापूर येथील जनावरांचा बाजार...
‘त्रिवेणी नॅचरल गुळाला’ राज्यभर बाजारपेठपरभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील डॉ.मोहनराव देशमुख...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या...
बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ...पुणे : अंदमान समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र...
कापसाचे दर काहीसे स्थिरावलेपुणे ः वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी बाजारात...
मुसळधार पावसाने दाणादाण पुणे ः राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने कोकण, पश्‍चिम...
फळपीक विमा योजनेवर बहिष्काराचा निर्णयअमरावती ः आंबिया बहर फळपीक विमा योजनेच्या...
द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्याने...नाशिक : प्रतिकूल परिस्थितीत प्रयोगशीलतेने...
देशांतर्गत बाजारात साखर विक्रीचे आव्हानकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेचे दर कमी...
ऊस वाहतूकदरासाठी हवाई अंतराचा निकष लावापुणे ः दोन साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा...
कोल्हापुरात ऊसतोडणी थांबलीकोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
जलसंधारणाचा ‘हायवे’ पॅटर्नलातूर ः मराठवाड्यात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन...
जलसंधारण, शाश्‍वत तंत्राद्वारे...मान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) या गावासह...
कापूस उत्पादकांचा बळी नकोकापसाचे दर वाढल्यामुळे कापूस प्रक्रिया...
सोयाबीन, कापसावर संसदेत चर्चा व्हावीसोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस कमी होण्याची...
रब्बी पिकांसह फळबागांना फटकापुणे ः राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण...
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही...
ऊस वाहतूक दरासाठी टप्पा पद्धतीला...पुणे ः उसाची तोडणी व वाहतूक दर ठरवताना आधीची...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची सरकारकडे...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या...