agricultural news in marathi success story of ranjana bhosale from satara district doing profitable farming by proper management | Agrowon

जिद्द, नियोजनातून शेती केली किफायतशीर

विकास जाधव
रविवार, 25 एप्रिल 2021

पवारवाडी (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील रंजना वसंतराव भोसले यांनी जिद्द आणि शेती विकासाचे ध्येय ठेवून ऊस शेतीच्या बरोबरीने डाळिंब फळबाग, शेततळ्यातील मत्स्यशेतीदेखील यशस्वी केली. रंजनाताई गेली ३१ वर्षे शेती नियोजनात रमल्या आहेत.
 

पवारवाडी (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील रंजना वसंतराव भोसले यांनी जिद्द आणि शेती विकासाचे ध्येय ठेवून ऊस शेतीच्या बरोबरीने डाळिंब फळबाग, शेततळ्यातील मत्स्यशेतीदेखील यशस्वी केली. रंजनाताई गेली ३१ वर्षे शेती नियोजनात रमल्या आहेत. महिला शेतकऱ्यांसाठी त्यांनी तीन शेतकरी गटांची स्थापना केली आहे.

सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील साप आणि पवारवाडी गावशिवारातील प्रयोगशील महिला शेतकरी म्हणून रंजना वसंतराव भोसले यांची ओळख तयार झाली आहे. त्यांचे माहेर मुंबई, त्यामुळे शेतीची पार्श्‍वभूमी नव्हतीच. साप येथील वसंतराव भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यावर त्यांचा ग्रामीण भाग आणि शेतीशी सतत संपर्क येऊ लागला. पवारवाडी येथे भोसले कुटुंबांची २२ एकर कोरडवाहू शेती आहे.

वसंतराव हे नोकरी करत असल्याने शेतीची जबाबदारी रंजनाताईंकडे आली. पतीच्या मार्गदर्शनानुसार रंजनाताईंनी शेती नियोजन सुरू केले. कोरडवाहू शेती असल्याने सुरुवातीच्या काळात पावसाच्या पाण्यावर केवळ दोन एकरावर खरीप, रब्बी ज्वारी लागवडीवर भर असायचा. आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने त्यांनी शेती बागायती करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवले. डोंगराळ जमिनीचे सपाटीकरण केले, शेतात विहिरीची खोदाई केली, परंतु खूप कमी पाणी लागले. त्यानंतर काही वर्षांनी दुसरी विहीर खोदली. या विहिरीस पाणी लागले, परंतु ते मार्च- एप्रिल महिन्यात संपायचे. अशा परिस्थितीत पीक नियोजन करत काही वर्षांनी शेतामध्ये तिसरी विहीर खोदली. याला मात्र चांगले पाणी लागल्याने शेती बागायती होण्यास सुरुवात झाली. रंजनाताईंनी मग पारंपरिक पीक पद्धती ऐवजी सुधारित तंत्राने शेती नियोजनाला सुरुवात केली.  

बागायत शेतीच्या दिशेने 
विहिरीला पुरेसे पाणी लागल्यामुळे रंजनाताईंनी बागायती पिकांच्या लागवडीचा निर्णय घेतला. शेतीची नव्याने आखणी करून सर्व शेतात पाइपलाइन केली. परिसरातील प्रयोगशील शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने ऊस, आले लागवडीचे नियोजन केले. या पिकांच्या बरोबरीने बाजारपेठेचा अभ्यासकरून भोपळा, कलिंगड लागवडीस सुरुवात केली. योग्य आर्थिक नियोजन करून टप्प्याटप्प्याने त्यांनी सर्व शेती लागवडीखाली आणली. 

ऊस उत्पादनवाढीसाठी प्रशिक्षण 
लागवड क्षेत्र जास्त असल्याने रंजनाताईंनी नियोजनाला सोपे जाण्यासाठी पहिल्यांदा ऊस लागवडीवर भर दिला. उसाचे उत्पादन वाढीसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनुसार सुधारित पद्धतीने ऊस लागवडीस सुरुवात केली. सरीचे अंतर साडे चार फूट ठेवत को-८६०३२, ६७१ या ऊस जातींचे दर्जेदार बेणे त्याचबरोबरीने रोप पद्धतीने लागवडीचे तंत्र त्यांनी स्वीकारले. सध्या दहा एकरांवर ऊस लागवड आहे. रंजनाताई गेल्या २८ वर्षांपासून पाचट न जाळता उसाच्या सरीत आच्छादन करतात. उसाला वरून खते न देता पहारीच्या साह्याने दिली जातात. पिकाला माती परीक्षणानुसार खत मात्रा, गरजेनुसार पाणी नियोजन, पाचट आच्छादन आणि जमिनीची सुपीकता जपत त्यांनी गेल्या दहा वर्षांत एकरी ४० टनांवरून १०० टनांचे उद्दिष्ट गाठले आहे.  २०१७-१८ मध्ये को-८६०३२ जातीचा एकरी १२५.८७८ टन ऊस उत्पादनाचा टप्पा गाठला होता.

शेततळ्यामध्ये मत्स्यशेती 
संपूर्ण शेतीला शाश्‍वत सिंचन आणि पूरक उद्योग म्हणून मत्स्यशेती करता यावी यासाठी रंजनाताईंनी कृषी विभागाच्या योजनेतून २०१७ मध्ये १२५ फूट बाय २५० फूट बाय ४० फूट खोलीचे शेततळे खोदले. या शेततळ्याची दोन कोटी लिटर पाणी साठवणक्षमता आहे. शेततळे हे शेताच्या उंच भागात खोदले असल्याने  संपूर्ण शेतीला सायफन पद्धतीने पाणी देता येते. यामुळे विजेचा खर्च कमी झाला. वीज नसतानादेखील पिकाच्या गरजेनुसार पाणी देता येत आहे. मागील दोन वर्षे रंजनाताईंनी शेततळ्यात मत्स्यपालन केले. शेततळ्यात रोहू, कटला, मृगळ या जातींचे दहा हजार मत्सबीज सोडले. या शेततळ्यातून भांडवली खर्च वगळता ८० हजारांचे उत्पन्न मत्स्यशेतीमधून मिळाले होते. गेल्या वर्षी कोरोनामुळे बाजारपेठ विस्कळीत झाल्याने मत्स्यबीज सोडलेले नाही. 

शेती व्यवस्थापनाची सूत्रे

 • पाणी बचत, जमिनीचा पोत टिकवण्यासाठी संपूर्ण क्षेत्रामध्ये ठिबक सिंचन.
 • खतांवरील खर्च कमी करणे, उत्पादन वाढीसाठी प्रत्येक क्षेत्रात रोटेशननुसार हिरवळीच्या पिकांची लागवड. पीक फेरपालटामध्ये हरभरा लागवडीचे नियोजन. 
 • कलिंगडाचे मुख्य पिकात आंतरपीक. 
 • नगदी पिकांबरोबर कलिंगड, भोपळ्याचे दर्जेदार उत्पादन.
 • नवीन तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी प्रशिक्षणावर भर. 
 • ‘आत्मा’अंतर्गत गावातील महिला शेतकऱ्यांचे तीन गटांची उभारणी.
 • गावातील महिलांमध्ये शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार.
 • आकाशवाणीवर शेतीमधील नवीन प्रयोगांची माहिती.

डाळिंब लागवडीला प्राधान्य 
ऊस, आले आदी पिकांबरोबर रंजनाताईंनी फळबाग लागवडीवर भर दिला आहे. २०१४-१५ मध्ये त्यांनी पाच एकर क्षेत्रावर डाळिंबाच्या भगवा जातीची लागवड केली. लागवडीपासून तीन वर्षांनी बहर धरण्यास सुरुवात केली. मागील तीन वर्षांपासून डाळिंबाचे चांगले उत्पादन सुरू झाले. २०१८-१९ मध्ये ५५ टन उत्पादन मिळाले. या वेळी सरासरी ५० ते ५५ रुपये किलो दर मिळाला. डाळिंब बागेमध्ये काटेकोर खत आणि पाणी व्यवस्थापन तसेच जमिनीची सुपीकता जपत उत्पादनाचा आलेख त्यांनी वाढता ठेवला आहे. शेतीच्या व्यवस्थापनात रंजनाताईंना पती वसंaतराव तसेच बंधू तानाजी पवार यांचे मार्गदर्शन मिळते. तसेच मुलगा अजिंक्य, अक्षय हे देखील मदत करतात. शेती तंत्रज्ञानासाठी सातारा जिल्हा बॅंकेतील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, कृषी विभागातील सुनील यादव, सुजित शिंदे, वैशाली सुतार, सुरेखा पवार यांचे मार्गदर्शन मिळते. 

पुरस्कार आणि सन्मान 

 • पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, भारतीय शुगरकडून आदर्श ऊस उत्पादक पुरस्कार.
 •  रहिमतपूर नगरपालिकेचा आदर्श महिला शेतकरी पुरस्कार, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे कृषी कर्तृत्व सन्मान, खासदार श्रीनिवास पाटील चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे प्रगतशील महिला शेतकरी गुणगौरव. 
 • २०१९मध्ये महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ, पुणे विभागाच्या अध्यक्षपदी निवड.
 • आत्माअंतर्गत शेतकरी समन्वय सल्लागार समितीच्या अध्यक्षा.

- रंजना भोसले   ९६३७६१६८७६


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
फळबागेतून शेती झाली फायद्याची..उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...