agricultural news in marathi success story of Saraswati Self Help Group from amravati district | Page 2 ||| Agrowon

उपक्रमशीलतेतून महिला झाल्या सक्षम

विनोद इंगोले
रविवार, 5 सप्टेंबर 2021

टिमटाळा (जि.अमरावती) येथील सरस्वती स्वयंसाह्यता महिला समूहाने शेतीच्या बरोबरीने विविध उपक्रमातून वेगळी ओळख तयार केली आहे. बीजोत्पादन, अवजारे बॅंक, करारशेती आणि सेंद्रिय निविष्ठांच्या उत्पादनातून आर्थिक प्रगतीकडे  समूहाची वाटचाल सुरू झाली आहे. 

टिमटाळा (जि.अमरावती) येथील सरस्वती स्वयंसाह्यता महिला समूहाने शेतीच्या बरोबरीने विविध उपक्रमातून वेगळी ओळख तयार केली आहे. बीजोत्पादन, अवजारे बॅंक, करारशेती आणि सेंद्रिय निविष्ठांच्या उत्पादनातून आर्थिक प्रगतीकडे  समूहाची वाटचाल सुरू झाली आहे. 

 टिमटाळा (ता. नांदगाव खंडेश्‍वर, जि. अमरावती) येथील सरस्वती स्वयंसाह्यता महिला समूहाने आर्थिक सक्षमतेसाठी एकाच स्रोतावर अवलंबून न राहता उत्पन्नाचे विविध पर्याय शोधले. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन या महिला समूहाने अवजारे बँक, बियाणे बँक, सेंद्रिय निविष्ठा उत्पादनावर भर दिला आहे. 

महिला समूहाची सुरुवात
२००१ मध्ये सरस्वती महिला समूहाची उभारणी करण्यात आली. या गटामध्ये शोभाताई अनिल डवरे, कमल जगताप, अनिता जगताप, नलू प्रमोद जगताप, अनिता साहेबराव काकड, सविता संदीप जगताप, शोभा अंबादास बगाडे, रेखा विश्‍वास कटकतलवारे, लता भिंडारकर, रत्ना मेश्राम, मीना जगताप या सदस्या कार्यरत आहेत. गटाची सुरुवात झाली त्यावेळी दर महिन्याला प्रत्येक सदस्या २५ रुपये बचत करत होती. २०१४ पासून ५० रुपये आणि २०१६ पासून १०० रुपये महिन्याला बचतीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येक महिला सदस्याची बचत आता दहा हजार रुपयांवर पोहोचली आहे.
 
करार शेती, पूरक उद्योग
सरस्वती महिला समुहाने २०१८ मध्ये आठ एकर आणि २०१९ मध्ये  चार एकर शेती करारपद्धतीने करण्यास सुरवात केली. या शेतीमध्ये सोयाबीन आणि तुरीचे आंतरपीक घेण्यात आले. मात्र २०१९ मध्ये तुरीचे पीक फुलोऱ्यावर असताना पिकाला पाण्याची गरज होती. परंतु पाऊस न झाल्याने पीक उत्पादनात मोठी घट झाली तसेच भटक्या जनावरांच्याकडून पिकाचे नुकसान झाले. आर्थिक नुकसानीमुळे समूहाला करार शेती सोडणे भाग पडले. परंतु यावर मार्ग शोधत समूहातील सदस्यांनी शेती विषयक प्रशिक्षणांमध्ये सामील होऊन ट्रायकोकार्ड निर्मिती, अळिंबी उत्पादनाबाबत माहिती घेतली. समूहातील काही सदस्यांनी अळिंबी उत्पादनाला सुरुवात केली. परंतु सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे उत्पादन बंद ठेवले आहे.

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन 
महिला समूहातर्फे निंबोळी अर्क, गांडूळखत, दशपर्णी अर्क  निर्मिती केली जाते. समूहातील सदस्या स्वतःच्या शेतीमध्ये या सेंद्रिय निविष्ठा वापरतात. उर्वरित सेंद्रिय निविष्ठांची विक्री परिसरातील शेतकऱ्यांना केली जाते. सध्या निंबोळी अर्क ५० रुपये लिटर या दराने शेतकऱ्यांना विकला जातो. समूहातर्फे उत्पादित सेंद्रिय निविष्ठांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता दुर्गापूर येथील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाकडून प्रयत्न केले जातात.

  अतिरिक्‍त उत्पन्नाचा स्रोत
महिला समूहाद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेण्यासाठी राज्यभरातून महिला गटांच्या अभ्यास सहली टिमटाळा गावात येतात. या समूहांना चहा, नाश्‍ता आणि जेवण देण्याची जबाबदारी देखील सरस्वती महिला समूहावर आहे. या माध्यमातून समूहाला दीड वर्षामध्ये १ लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न झाले. या उत्पन्नातून समूहाने अतिरिक्‍त तुषार संच खरेदी करून तो भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिला आहे. 

सोयाबीन काढणी करणाऱ्या मजुरांच्या हाताला इजा होते. ही इजा टाळण्यासाठी समूहातील महिला घरातील जुन्या कपड्यांपासून हातमोजे निर्मिती करतात. गावकऱ्यांना २५ रुपयात हे हातमोजे समुहाने उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व उपक्रमांसाठी दुर्गापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक ए. ए. धापके तसेच गृह विज्ञान शाखेच्या अर्चना काकडे यांचे मार्गदर्शन मिळाले. कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाजी महोत्सवात समुहातील सदस्या सक्रिय सहभाग नोंदवितात.

शिवण यंत्राची उपलब्धता
महिला समूहाला कृषी विज्ञान केंद्रातर्फे दोन आणि अमरावती येथील नरसंबा महाविद्यालयातर्फे दोन शिवणयंत्रे मिळाली. कोरोना काळात गटातील सदस्यांनी या शिवण यंत्राचा वापर करून कापडी मास्कची निर्मिती केली. गावकऱ्यांना हे मास्क योग्य दरात उपलब्ध करून दिले. 

गावातील अनेक गरजू महिलांना शिवणयंत्र चालविता येत असले तरी पैशाअभावी यंत्राची खरेदी करता येत नाही. त्यांना छोट्यामोठ्या शिवण कामासाठी पैसे मोजावे लागतात, ही अडचण लक्षात घेता समूहाने त्यांना मिळालेले शिवणयंत्र गावातील मंदिरात ठेवले आहेत. सुई,दोरा आणून या यंत्रावर महिलांना शिलाई करण्याची मुभा समूहाने दिली आहे. 

   बीजोत्पादनावर भर 
 परिसरातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन समूहाने बारामती येथून सोयाबीनच्या फुले संगम जातीचे बियाणे आणले. या जातीचे बीजोत्पादन करून शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दरवर्षी १० क्‍विंटल बियाणे उत्पादन केले जाते. याचबरोबरीने तूर, हरभरा, गहू, कांदा, लसूण बीजोत्पादनावरही समूहाने भर दिला आहे. पांढर कवडा (जि.यवतमाळ) येथील एका समूहाला हरभरा, गहू बियाणे विकण्यात आले होते. त्यांना यापासून चांगले पीक उत्पादन मिळाल्याने त्यांच्याकडून आता दरवर्षी बियाणे मागणी नोंदविली जाते. 

शेतकऱ्यांसाठी अवजारे बॅंक 
परिसरातील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन सरस्वती स्वयंसाह्यता महिला समूहाने अवजारे बॅंक तयार करण्याचा निर्णय घेतला. दिलासा संस्थेने आयटीसी कंपनीच्या सीएसआर फंडातून ऑक्‍टोबर, २०१६ मध्ये या गटाला तुषार सिंचन संच, बियाणे सेपरेटर, बीबीएफ पेरणी यंत्र, सायकल डवरणी यंत्र, ऑइल इंजिन, पॉवर स्प्रे, रोटाव्हेटर, निंबोळी अर्क तयार करण्यासाठी पाण्याची टाकी असे साहित्य उपलब्ध करून दिले. 

महिला समूहातर्फे शेती उपयुक्त साहित्य आणि अवजारे गावशिवारातील गरजू शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर दिले जाते. यातून समूहाला उत्पन्नाचा नवा पर्याय उपलब्ध झाला. पाच रुपये पाइप याप्रमाणे तुषार सिंचन संच भाडेतत्त्वावर दिला जातो. सेपरेटरकरिता ५० रुपये प्रति क्‍विंटल, ऑइल इंजिनसाठी ३५० रुपये प्रति दिवस आणि बीबीएफ पेरणी यंत्राकरीता १०० रुपये प्रति एकर अशी दर आकारणी केली जाते. 

गावशिवारातील शेतकऱ्यांना योग्य दरात शेती उपयोगी साहित्य आणि अवजारे मिळावीत हा महिला समूहाच्या अवजारे बॅंकेचा उद्देश आहे. भाडेतत्त्वावर शेतीपयोगी साहित्य घेण्यासाठी गावातील शेतकऱ्यांची हंगामात एकाचवेळी गर्दी होते. परंतु नोंदणी क्रमानुसार शेतकऱ्यांना साहित्याचा पुरवठा केला जातो. त्याकरिता समूहाने रजिस्टर ठेवले आहे. त्यामध्ये शेतकरी अगाऊ नोंदणी करतात. वर्षाकाठी अवजारांच्या देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च वगळता अवजारे बॅंकेतून ४० हजार रुपयांचे उत्पन्न होते, असे महिला समूहाच्या अध्यक्षा शोभाताई डवरे यांनी सांगितले. 

- शोभा डवरे, ८८८८१९६९४५


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
वन्यप्राणी, संवर्धन, जनजागृतीसाठी ‘...मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वर्धा...
बटण मशरूमचा ‘कॅम्बीअम गोल्ड’ ब्रँडमूळचे जमालपूर (बिहार) येथील नीलकमल झा यांनी...
सेंद्रिय गुळाचा ‘यादवबाग’ ब्रॅण्ड !घरची वर्षानुवर्षांची ऊसशेती. मात्र मिळणाऱ्या कमी...
केळी, कापूस, जलसंधारणात झाली जळके...जळके (ता.जि. जळगाव) गावाने जलसंधारणात भरीव काम...
नागपूरला फुलला सीताफळाचा बाजारनागपूर येथील महात्मा फुले मार्केट सीताफळाने फुलले...
‘मार्केट डिमांड’नुसार देशी वांग्यांची...देशी वांग्याला अस्सल चव असल्याने...
पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला...ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन...
शेळी, कोंबडीपालनात युवा शेतकऱ्याची...बुलडाणा जिल्ह्यातील आडविहिर येथील युवा शेतकरी...
राधानगरीच्या दुर्गम भागात रेशीम शेतीचे...पारंपरिक ऊस, भात य पारंपरिक शेतीपेक्षा थोड्या...
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...
उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...