सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा सर्वोदय

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत सर्वोदय लोकसंचलित साधन केंद्र कार्यरत आहे. त्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासह कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार केला जात आहे.
Allocation of ‘Spiral Separator’ for soybean cleaning.
Allocation of ‘Spiral Separator’ for soybean cleaning.

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत सर्वोदय लोकसंचलित साधन केंद्र कार्यरत आहे. त्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासह कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार केला जात आहे. त्याद्वारे अल्प उत्पन्न गटातील महिलांच्या प्रगतीला दिशा मिळण्याबरोबर अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत महिला स्वयंसाह्यता बचत स्थापन करण्याची चळवळ सुरू झाली. त्यानंतर २००७ पासून सोनपेठ तालुक्यात ग्रामीण भागात तेजस्विनी अभियान तर शहरी भागात दीनदयाळ अंत्योदय योजना कार्यान्वित झाली. त्याअंतर्गत एकूण ३६५ गट स्थापन करण्यात आले. गटांच्या तीन हजार ८६७ महिला सदस्य आहेत. ग्रामीणबहुल तालुक्यांत शेतकरी, तसेच भूमिहीन मजूर कुटुंबातील महिलांचे २८२ गट असून, त्याद्वारे दोन हजार ९९६ महिला एकत्र आल्या. शहरी भागातील ८३ गटांच्या माध्यमातून ८७१ महिला सदस्य झाल्या आहेत. विविध बॅंकांमध्ये बचत गटांच्या नावे खाते उघडण्यात आले आहे. दर महिन्याला १०० ते २०० रुपये बचत केली जाते. कर्ज देवाणघेवाण होते. ७० ते ८० टक्के गटांनी शेतीपूरक तसेच घरगुती उद्योग सुरू केले आहेत. त्यांना उद्योगासाठी ‘आयसीआयसीआय’ बँकेने २०२०-२१ पर्यंत सुमारे १२ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. ‘सर्वोदय’मुळे प्रगतीला दिशा सन २००९ मध्ये ‘तेजस्विनी’ अभियानांतर्गत सोनपेठ तालुक्यातील महिला बचत गटांना एकत्र करण्यात आले. सोनपेठ येथे सर्वोदय लोकसंचिलत साधन केंद्र कार्यान्वित करण्यात आले. त्यासाठी सुरुवातीला महिला आर्थिक विकास महामंडळाकडून निधी मिळाला. सन २०१६ पासून स्वबळावर कामकाज सुरू आहे. व्यवस्थापकासह सहा कर्मचारी व गाव पातळीवर सात प्रेरकांची नियुक्ती करण्यात आली. केंद्र कार्यकारिणीत तालुक्यातील महिला बचत गटांच्या प्रतिनिधींतून अध्यक्ष, सचिव यांची निवड करण्यात आली. विविध २९ गावांतून प्रत्येकी एक या प्रमाणे गटांच्या सदस्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले. सध्या अध्यक्ष नीता धाकपाडे, सचिव सुशीला कसबे तर व्यवस्थापक नसीमा सय्यद आहेत. नसीमा यांनी समाज कार्य विषयातील पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब झिंजार्डे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रशिक्षणांचे आयोजन केले जाते. यात उद्योजकता, नेतृत्व विकास, आर्थिक साक्षरता, बँकिंग लिंकेज, उद्योग व्यवसाय उभारणी आदी विषयांचा समावेश आहे. पूरक उद्योग, तंत्रज्ञान प्रसार ग्रामीण भागात अल्प उत्पन्न, अल्पभूधारक कुटुंबातील महिला गटांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय, कृषी तंत्रज्ञानाचा प्रसारावर केंद्राने लक्ष केंद्रित केले. शेळीपालन, दुग्ध, कुक्कुटपालन, पीठ गिरणी, मिरची कांडप, मसाले, पापड, शेवया निर्मिती उद्योग, किराणा दुकान तर शहरी भागात कापड, ज्वेलरी आदी व्यवसाय सुरू केले. कर्जाची परतफेड नियमित केली जाते. ठळक बाबी

  • महिला शेतकरी गटांना ट्रॅक्टर व त्यावर आधारित अवजारे, ठिबक, तुषार संच आदींचे वितरण.
  • ‘आत्मा’अंतर्गत योजनेद्वारे १०० गटांना ९० टक्के अनुदानावर ‘स्पायरल सेपरेटेर’. त्यामुळे स्वघरच्या सोयाबीनची स्वच्छता व प्रतवारी करणे शक्य. अन्य शेतकऱ्यांकडील सोयाबीन स्वच्छताही करून दिली जात आहे. त्यातून उत्पन्न मिळत आहे.
  • सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती घरच्या घरी तपासणीचे प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्याचा अंगीकार गटांच्या महिलांसह अन्य शेतकऱ्यांनी केला.
  • डिघोळ येथे अल्प उत्पन्न गटातील महिलांकडून साडेतीन एकरांवर सामूहिक शेती.
  • तालुक्यातील काही गावांत १० ग्रामसंघ स्थापन. त्यामार्फत अल्प उत्पन्न गटातील १३४ महिलांना ८० पैसे शेकडा दराने कर्जपुरवठा.
  • कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या कुटुंबातील महिलांना एक टक्का दराने कर्ज. त्यातून पूरक व्यवसाय सुरु झाले. काही महिलांनी कृषी अवजारे खरेदी केली.
  • शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, भाजीपाला उत्पादनातील महिलांचे २० संघ स्थापन. त्यांच्यासाठी प्रशिक्षणे.
  • तालुक्यातील १४० महिलांना पेरू १ हजार ९७५, आंबा १ हजार ९१० रोपे वाटप.
  • पोषणमूल्ययुक्त आहारासाठी पालक, गवार, भेंडी, मेथी, कारले, मिरची, वांगी आदींच्या बियाण्याचे दोन हजार १०० कीट. सोनपेठ तालुक्यासह परभणी जिल्ह्यातील महिला गटांना वितरण.
  • निविष्ठांचा पुरवठा अल्पभूधारक, कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वोदय लोकसंचिलत केंद्राद्वारे २०१६-१७ पासून ना नफा तत्त्वावर कृषी निविष्ठा केंद्र चालविले जात आहे. गरजूंना प्रत्येकी ५० टक्के नगदी व उधार पद्धतीने बियाणे, खते, कीडनाशके वितरित करण्यात येतात. खताची पॉस मशिनद्वारे विक्री होते. आजवर तालुक्यातील ८५० शेतकरी कुटुंबांना ७८ लाख १० हजार ८३१ रुपये किमतीच्या निविष्ठांची विक्री करण्यात आली. कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी काही गावांतील शेतकऱ्यांना निविष्ठांचा थेट बांधावर पुरवठा झाला. कोरोना संकटात आर्थिक अडचणीत आलेल्या कुटुंबांना सवलतीच्या दरात निविष्ठा उपलब्ध केल्या. पाच वर्षात दहा लाख रुपयांच्या निविष्ठांची उधारीवर विक्री व वसुलीही झाली. कोरोना काळात मदतीचा हात कोरोना लॉकडाउन काळात रोजगार हिरावलेले मजूर, ऊस तोड कामगार यांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी लोकसहभागातून धान्यबॅंक संकल्पना राबविली. धान्यासह हॅण्ड वॉश, मास्क आदींचे वाटप केले. जर्मनी येथील संस्थेमार्फत परसबागेतील बियाणे व अन्य निविष्ठा देण्यात आल्या. कृषी विभागातर्फे आयोजित रानभाज्या महोत्सवात सर्वोदयचा महत्त्वाचा सहभाग राहिला. गावातील अल्प उत्पन्न गटातील मजुरी करणाऱ्या महिला यंदाच्या गुढीपाडव्यापासून भाडेतत्त्वावर जमीन घेऊन सामूहिक शेती करत आहेत. साडेतीन एकरांत कापूस घेतला आहे. अन्य शेतकरी महिलांनी फळबाग लागवड केली आहे. घरगुती उद्योग सुरू केले आहेत. त्या आत्मनिर्भर झाल्या आहेत. - आशा धाकपाडे,  अध्यक्ष, ‘सर्वोदय’, सोनपेठ संपर्क : नसीमा सय्यद, ७०२०४४८१५५, ९८२२५३९५०२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com