एकीचे बळ, मिळते फळ

एकीचे बळ मिळते फळ ही उक्ती रत्नागिरी तालुक्यातील साठरे-ठोंबरेवाडीवासीयांनी खरी करुन दाखवली आहे. परंपरेप्रमाणे भातशेती आणि भाजीपाला शेती करणार्‍या सुमारे १८ तकर्‍यांनी एकत्रित येत सुमारे सोळा एकर क्षेत्र दुबार ओलीताखाली आणले. कलिंगड, कुळीथ, भुईमूग, चवळी, पालेभाज्या, वाल आदी पिकांची विविधता ठेवत भातशेतीसह आर्थिक उत्पन्नाचा पर्याय निर्माण केला. गेली चार ते पाच वर्षे गुंजावळ शेतकरी समुहाच्या माध्यमातून हे शेतकरी एकवटलेले आहेत.
 sathare village farmers gathered in watermelon plot
sathare village farmers gathered in watermelon plot

एकीचे बळ मिळते फळ ही उक्ती रत्नागिरी तालुक्यातील साठरे-ठोंबरेवाडीवासीयांनी खरी करुन दाखवली आहे. परंपरेप्रमाणे भातशेती आणि भाजीपाला शेती करणार्‍या सुमारे १८ तकर्‍यांनी एकत्रित येत सुमारे सोळा एकर क्षेत्र दुबार ओलीताखाली आणले. कलिंगड, कुळीथ, भुईमूग, चवळी, पालेभाज्या, वाल आदी पिकांची विविधता ठेवत भातशेतीसह आर्थिक उत्पन्नाचा पर्याय निर्माण केला. गेली चार ते पाच वर्षे गुंजावळ शेतकरी समुहाच्या माध्यमातून हे शेतकरी एकवटलेले आहेत. मुंबई-गोवा आणि रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गापासून काही अंतरावर रत्नागिरी जिल्ह्यात साठरे-ठोंबरेवाडी गाव वसले आहे. गावाची लोकसंख्या सुमारे साडेचारशेच्या दरम्यान आहे. पारपंरिक पध्दतीने भातशेती आणि मोलमजुरी करत ग्रामस्थांची गुजराण चालते. शक्य असलेले शेतकरी भाजीपाला शेती करतात. साठरेबांबर गावात २०१२-१३ या वर्षी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातंर्गत वळण बंधारे बांधण्यात आले आहेत. पाणी अडवा पाणी जिरवा’ या उद्देशाने बंधारे बांधून पाणी जिरविण्याचा प्रयत्न येथील ग्रामस्थांनी केला. त्याचा त्यांना चांगला फायदा होऊ लागला आहे. गावातील विहीरीच्या पाण्याची पातळी वाढली असून पाटाच्या पाण्याचा खळखळाट मार्च किंवा काहीवेळा तर एप्रिलपर्यंत देखील पाहण्यास मिळतो. यामुळे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. त्यामुळे दुबार शेतीची संकल्पना मोठ्या प्रमाणात राबविण्यास सुरवात झाली. एकमेकांच्या शेतात काम करुन मजुरीचा प्रश्‍न सोडवणे आणि वानरांसह जंगली प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी ठोंबरेवाडीतील शेतकरी एकवटले. त्यांनी गुंजावळ शेतकरी समुहाची स्थापना केली.

सोळा एकर क्षेत्रावर लागवड

  • प्रत्येकजण आपापली दुबार शेती करीत होताच. पण गटाने एकत्रित येऊन त्यांनी पहिल्यांदा शिरगाव येथील भात संशोधन केंद्रातून दोनशे किलो भुईमुगाचे कोकण टपोरा जातीचे बियाणे आणले. सुरूवातील गटात चौदा शेतकरी होते. त्यांनी भुईमुगाचे उत्पादन घेतले आणि त्यातून तेलनिर्मिती केली. सुमारे ८० ते १०० किलो तेल त्यातून उपलब्ध झाले.
  • पुढील वर्षापासून बारा एकर क्षेत्रावर शेतकर्‍यांनी कलिंगड, कुळीथ, चवळी, भुईमूग, वाल, मूळा, माठ आदींची लागवड सुरू केली. वाल आणि कलिंगड या पिकांतून शेतकर्‍यांना चांगलाच फायदा होत आहे. यंदा सुमारे सोळा एकर क्षेत्र लागवडीखाली आणले असून भातशेती झाल्यानंतर कुळीथ पेरला होता. हळदीचे पिक घेतल्यानंतर विविध पिकांची लागवड येथील शेतकरी करीत आहेत. यंदा ४०० ते ५०० किलो हळदीचे उत्पादन शेतकरी घेत आहेत.
  • वन्यप्राण्यांचे आव्हान

  • सामूदायिक पध्दतीने शेती सुरू केल्याने श्रमांची विभागणी झाली. वेळेतही बचत होऊ लागली. शेती म्हटली की, वन्य प्राण्यांचा उपद्रव आला. परंतु सामूदायिक शेतीमुळे शेताची राखण करण्यासाठी आळीपाळीने जबाबदारी वाटून घेतली आहे. यात पदवीधर झालेले युवा शेतकरीही मदत करीत आहेत.
  • सर्वाधिक त्रास वानरांचा होतो. शिवाय वराहांचाही उच्छाद असल्याने शेतकऱ्यांनी घरातील जुन्या साड्या एकत्रित करून शेताभोवती कुंपण म्हणून बांधल्या. शेतात मचाण बांधून रात्रंदिवस शेतकरी जागता पहारा ठेवत आहेत.
  • कलिंगडाकडे ओढ अधिक

  • कलिंगडामधून चांगला फायदा मिळत असल्यामुळे गटातील आठ ते दहा शेतकर्‍यांनी त्याला प्राधान्य दिले. गटाचे सर्वेसर्वा विजय बारगुडे यांनी सुमारे सव्वा एकर क्षेत्रावर कलिंगड घेतले. त्यामधून त्यांनी सुमारे चाळीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले.
  • कलिंगडाची लागवड करतानाही काटेकोर नियोजन पाळले आहे. नोव्हेंबर महिन्यात केलेल्या कलिंगडाला फेब्रुवारी, मार्चमध्ये चांगला उठाव मिळतो. पाली बाजारपेठेसह याच कालावधीत सर्वाधिक गर्दीची नाणीज वारी, महाशिवरात्री उत्सव, होळी व शिमगोत्सवात कलिंगडाला मागणी असते. चरवेली, कापडगांव परिसरातही कलिंगडाची विक्री केली जाते. बाजारपेठेत मागणी असलेल्या जातीची निवड करण्याला प्राधान्य दिले जाते.
  • सुमारे साडेतीन महिन्यांत उत्पन्न हाती येते. यंदा गटातील शेतकर्‍यांनी सुमारे साडेपाच हजार रोपे विकत आणली. त्यांना तीन-चार किलोपासून ते पुढील वजनाची कलिंगडे मिळाली. घाऊक दर किलोला १२ ते १५ रुपये तर किरकोळ दर २० ते २२ रुपये मिळाला.
  • कृषी विभाग- आत्माचे मार्गदर्शन

  • शेणखत, निमपेंड, गांडूळ खत, मिश्रखते तसेच ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाचा वापर हे शेतकरी करतात. फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी रक्षक सापळे कृषी विभागाकडून या गटाला मिळाले. याशिवाय पिवळ्या व निळ्या रंगाचे चिकट सापळे कीड नियंत्रणासाठी शेतात जागोजागी लावण्यात आले आहेत. कमी खर्चात पिकाचे संरक्षण करण्याचा या  शेतकऱ्यांचा प्रयत्न होत आहे.
  • कृषी विभागातर्फे शेतकर्‍यांना भुईमूगाचे बियाणे, रक्षक सापळे देण्यात आले आहेत. कीडनाशक फवारणीबाबत वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन लाभते. गटाला साठरेचे सरपंच वामन कांबळे यांचे महत्वाचे पाठबळ मिळत आले आहे.
  • दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेले रक्षक सापळे कलिंगडाच्या शेतीसाठी फायदेशीर ठरत आहेत. आत्माचे प्रकल्प उपसंचालक गुरूदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, मंडल कृषी अधिकारी जयेश काळोखे, कृषी अधिकारी के. व्ही. बापट यांचे मार्गदर्शन गटाला लाभते. गटात सुशील शिंदे सारखे पदवीधर युवकही सहभागी आहेत.
  • दृष्टीक्षेपात साठरे गाव

  • लोकसंख्या सुमारे साडेचारशे
  • समुह शेतीतून १८ एकरांवर दुबार लागवड
  • मुख्य पीक भात
  • कलिंगड, वाल, पालेभाज्यांची लागवड
  • पाली बाजारेपेठेसह नाणीज येथे विक्री
  • शेतकरी प्रतिक्रिया

    गावातील शेतकऱ्यांना एकत्र आणून गटामार्फत भाजीपाला लागवड करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. एकत्र आल्यामुळे मजुरांचा प्रश्‍न कमी होतो. शासकीय योजनांचाही लाभ घेता येऊ शकतो. - विजय बारगोडे ९९७०५६७२८७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com