agricultural news in marathi success story of shivkumar mamde from nanded district doing profitable orchard farming | Page 2 ||| Agrowon

उत्पन्नच नव्हे, फळबाग शेती देतेय समाधानही

रमेश देशमुख
गुरुवार, 3 जून 2021

कंधार (जि. नांदेड) येथील शिवकुमार मामडे यांचा ज्वेलरी हा मुख्य व्यवसाय. शेती नसली तरी त्याच्या आवडीतून सहा एकर जमीन घेऊन प्रयत्नपूर्वक ती विकसित करण्यास सुरुवात केली. आंब्याच्या २३०० झाडांसह करवंद, नारळ, आवळा, लिंबू, चिंच आदींची समृद्धी जपली. 
 

कंधार (जि. नांदेड) येथील शिवकुमार मामडे यांचा ज्वेलरी हा मुख्य व्यवसाय. शेती नसली तरी त्याच्या आवडीतून सहा एकर जमीन घेऊन प्रयत्नपूर्वक ती विकसित करण्यास सुरुवात केली. आंब्याच्या २३०० झाडांसह करवंद, नारळ, आवळा, लिंबू, चिंच आदींची समृद्धी जपली. आंब्याची पाच टन थेट विक्रीही केली. व्यवसायातून पैसा मिळतो पण समाधान शेतीतून मिळते ही भावना ठेवून त्यांची वाटचाल सुरू आहे.

नांदेड जिल्ह्यात मन्याड खोऱ्यातील कंधार तालुका विविध जाती व चवीच्या आंब्यासाठी परिसरात प्रसिद्ध आहे. येथील गावरान आंब्याला एकेकाळी विविध भागांतून मोठी मागणी असायची.

बाचोटीचा आंबा या नावाखाली व्यापारी आजही आंब्याचा व्यवसाय करतात. कंधार येथील
शिवकुमार मामडे यांचा ज्वेलरीचा व्यवसाय आहे. त्यातून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. त्यांची वडिलोपार्जित शेती नाही. पण आवड होती. व्यवसायातून पैसा मिळतो, पण समाधान शेतीतून मिळते ही श्रद्धा होती. त्यातूनच २०१८ मध्ये कंधारपासून सहा किलोमीटरवरील मौजे संगुचीवाडी येथे सहा एकर जमीन मुख्य रस्त्यालगत खरेदी केली. आता या रस्त्याचे महामार्गात रूपांतर होऊन तो एनएच ५० नावाने ओळखला जातो.

फळबाग विकासाला प्राधान्य
शिवकुमार यांना शेतीचा पूर्वानुभव काहीच नव्हता. मात्र व्यापारी दृष्टिकोन असल्याने त्याचा उपयोग शेती नियोजनात केला. संपूर्ण क्षेत्रात फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. जमीन पडीक होती. बाभळीची झाडे वाढली होती. यंत्राच्या साह्याने स्वच्छ करून जमीन लागवडयोग्य केली. आंबा पिकाचा अभ्यास केला. कृषी विभागासह निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. बी. एम. कापसे, विनय वाघदरे यांचे मार्गदर्शन मिळाले. ५० फूट व्यास व ६५ फूट खोलीची विहीर घेतली. एक विंधन विहीर घेतली. पाण्याचा स्रोत बळकट केला. लागवडीसाठी खड्डे खोदण्याऐवजी दक्षिणोत्तर पंधरा फूट अंतरावर एक बाय एक मीटर खोली- रुंदीचे चर घेतले. कीटकनाशक, निंबोळी पेंड, माती, काडीकचऱ्याचा थर, शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट, १०:२६:२६, सूक्ष्ममूलद्रव्यांचा वापर केला. त्यावर मातीने चर भरून घेतले. आंबा उत्पादक व तज्ज्ञांशी चर्चा करून सोलापूर येथील नर्सरीतून केसरची, तर लखनौ येथून दशहरी आंब्याची कलमे आणली. खते, डी-कंपोजर, कीडनाशके यांचा गरजेनुसार वापर केला. ठिबक सिंचन व दुहेरी लॅटरल वापरले.

विविध वाण व काढणीचे नियोजन
आंब्याच्या एकूण २३०० झाडांची लागवड केली. त्यात केसरची १३००, दशहरी एक हजार, मल्लिका २५, आम्रपाली १० असा समावेश होता. योग्य व्यवस्थापनातून तीन वर्षांत बाग फळांवर आली. झाडाची उंची कमी असूनही बाग फळांनी लगडली. चारही बाजूंनी बांबूच्या साह्याने चौकट करून सर्व फांद्यांना आधार दिला. यंदा अक्षय तृतीयेपूर्वी १० दिवस आधी काढणीस सुरुवात केली. संपूर्ण बागेतील काढणी टप्प्याटप्प्याने सुरू केली. दररोज सकाळी चार मजूरांसह शिवकुमार बागेतील प्रत्येक झाडाची पाहणी करायचे. झाडावरच पक्व झालेले पाडाचे व पूर्णतः वाढलेले मोठ्या आकाराचे आंबे तोडायचे. त्यामुळे अन्य फळांची वाढही चांगली होत गेली. प्रतवारीनुसार आंबे वेगवेगळ्या क्रेटमध्ये वर्तमानपत्राचे आच्छादन करून भरले.

दशहरीने वाढवली गोडी
तजेलदार, रसरशीत, पिवळसर आंबे विक्रीसाठी तयार झाले. ज्वेलरी व्यवसायामुळे ग्राहकांचे नेटवर्क तयार होतेच. व्हॉट्‌सॲप, फेसबुकच्या माध्यमातूनही ग्राहक थेट बागेतून खरेदी करू लागले.

सुरुवातीला प्रति किलो २०० रुपये व त्यानंतर १३५, व १०० रुपये प्रति किलो या दराने एकूण पाच टनांपर्यंत थेट विक्री केली. अजून काही विक्री बाकी आहे. पहिल्यांदाच आलेला आंबा मित्र, पाहुणे, अधिकारी, कर्मचारी यांनाही भेट म्हणून वितरित केला. शिवकुमार म्हणाले, की केसर आंबा तर स्वादाला चांगला आहेच. पण दशहरी देखील कमी पिकलेला असतानाही गोड असतो. त्याचा गर घट्ट व कोय छोटी असते. वरून त्याला चकाकीही असते. त्याचा रसासाठीही चांगला फायदा होतो.

फळझाडांची समृद्धी

 • आंब्याच्या बागेभोवती नारळाची सुमारे १०० झाडे. ती पुढील वर्षी फळाला येतील.
 • संपूर्ण बागेला करवंदाचे सजीव सक्षम कुंपण.
 • कागदी लिंबाची १३० झाडे लावली असून, वाढ निरोगी आहे. लिंबे लगडली आहेत.
 • आवळ्याची ६० झाडे कृष्णा जातीची आहेत.
 • बांधावर जांभळाची बहाडोली वाणाची पाच, पेरूची विविध जातींची १० झाडे, साध्या व गोड चिंचेची तीन, कालीपत्ती चिकूची पाच झाडे आहेत.

ठळक बाबी

 • मजुरांसाठी पक्के बांधकाम. फळपॅकिंगसाठी स्वतंत्र शेड.
 • आंतरमशागतीच्या कामांसाठी पॉवर टिलर.
 • दोन हजार लिटरची टाकी उभारली असून त्याद्वारे पाणी व खते दिली जातात.
 • परागीकरण व फळधारणा होण्यासाठी चार मधुमक्षिका पेट्या.
 • बागेचे वन्यप्राणी, वानरांपासून संरक्षण होण्यासाठी श्‍वान पाळले आहेत.
 • लाल कंधारी या जातिवंत पशुधनामुळे तालुक्याची ओळख होते. शिवकुमारही जातिवंत लाल कंधारी कालवडीचा सांभाळ करीत आहेत. गोऱ्हाही आहे.
 • जनावरांसाठी चारा व कुत्र्यांना भाकरी मिळावी यासाठी बागेतील दोन ओळींत मालदांडी ज्वारी
 • सामाजिक बांधिलकी जपत शिवकुमार यांनी कंधार शहरात रस्त्यांच्या मधोमध व दुतर्फा ५०० झाडे संरक्षण जाळीसह लावण्यासाठी व जगवण्यासाठी पुढाकार घेतला. स्मशानभूमीत बाकडी व झाडेही लावली. शहरात सहा वर्षांपासून ‘फिल्टर’युक्त पाणपोई सुरू आहे.

- शिवकुमार मामडे, ८६६८२६८६७६
(लेखक कंधारचे तालुका कृषी अधिकारी आहेत.)


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
गुलाब, लिली, शेवंतींनं अर्थकारण केलं...शिरसोली (ता.जि.जळगाव) येथील रामकृष्ण, श्रीराम व...
शेतीला मिळाली बचत गटाची साथ शेणे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सुनंदा उदयसिंह...
ग्राम, आरोग्य अन् शेती विकासामधील ‘...सातारा जिल्ह्यातील अन्नपूर्णा सेवाभावी संस्था...
एकात्मिक शेतीतून अर्थकारण केले सक्षमरेवगाव (ता. जि. जालना) येथील आनंदराव कदम यांनी...
गुऱ्हाळघरातून मिळविला उत्पन्नाचा हुकमी...खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर तुळशीराम...
पडसाळी झाले ढोबळी मिरचीचे ‘हब’बोर, कांद्यासाठी प्रसिद्ध पडसाळी (जि. सोलापूर)...
गांडूळ खतासह सेंद्रिय मसाला गूळनिर्मितीसातारा जिल्ह्यातील मालदन येथील कृषी पदवीधर विजय...
साहिवाल गोसंगोपनासह शेण, गोमूत्राचे...सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील निकम कुटुंबाने...
आदिवासी पाड्यात रुजले भातशेतीत...नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग आदिवासीबहुल असून भात...
नांदेडचे कापूस संशोधन केंद्र कोरडवाहू...नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात बीटी, नॉन बीटी...
प्रयोगशीलतेतून एकात्मिक शेतीचा आदर्शमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटकातील बुदिहाळ (ता...
पीक नियोजन, थेट विक्रीतून वाढविला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता. वेंगुर्ला)...
कुक्कुटपालन, भाजीपाला लागवडीतून तयार...लखमापूर (ता. सटाणा, जि. नाशिक) येथील आश्‍विनी...
तुरीच्या बीडीएन ७११ वाणाने दिली...बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राद्वारे प्रसारित...
डाळी, बेसनपीठ निर्मितीतून ७०...हिंगोली येथील रमेश पंडित यांनी डाळनिर्मितीसह बेसन...
गोरव्हाच्या ग्रामस्थांनी घडवली...अकोला जिल्ह्यातील गोरव्हा (ता.. बार्शीटाकळी) या...
कांकरेड गोपालनासह मूल्यवर्धित उत्पादनेहीनाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद येथील संजय ताडगे यांनी...
बारमाही उत्पन्न देणारी व्यावसायिक शेतीवनोली (जि..जळगाव) येथील युवराज चौधरी यांनी...
डाळिंब, भाजीपाला पिकात केले यांत्रिकीकरणआटपाडी (जि.. सांगली) येथील किशोरकुमार देशमुख...
राहुरीच्या कृषी विद्यापीठात कडधान्य...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...