जळगाव ः खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांगला उठाव
अॅग्रो विशेष
सैनिकाने केले बीजोत्पादनाचे तंत्र आत्मसात
भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्तीनंतर तांभेरे (ता. राहुरी. जि. नगर) येथील ताराचंद चंद्रभान गागरे पूर्णवेळ शेतीत रमले आहे. राहुरी येथील कृषी विद्यापीठात कार्यरत आपले बंधू कैलास यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी हरभरा बीजोत्पादन तंत्र आत्मसात केले आहे. त्यातून एकरी उत्पादन व उत्पन्न वाढवले आहे.
भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्तीनंतर तांभेरे (ता. राहुरी. जि. नगर) येथील ताराचंद चंद्रभान गागरे पूर्णवेळ शेतीत रमले आहे. राहुरी येथील कृषी विद्यापीठात कार्यरत आपले बंधू कैलास यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी हरभरा बीजोत्पादन तंत्र आत्मसात केले आहे. त्यातून एकरी उत्पादन व उत्पन्न वाढवले आहे. यंदा सोयाबीनचेही बीजोत्पादन त्यांनी अंगीकारले आहे.
नगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील ताराचंद चंद्रभान गागरे हे सैन्यदलातील सेवानिवृत्त सैनिक आहेत. भारतीय शांतीरक्षक दलात पंजाब, उत्तरप्रदेश, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, पश्चिम बंगाल यासह श्रीलंकेत अशी एकूण सतरा वर्षे त्यांनी नोकरी केली. गाजलेल्या कारगिल युद्धातही त्यांचा सहभाग होता. सन २००३ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर गावी त्यांनी शेती कसण्यास सुरवात केली. त्यांचे बंधू कैलास गागरे हे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बियाणे विभागात साहायक बीजोत्पादन अधिकारी आहेत. साहजिकच त्यांचे तांत्रिक मार्गदर्शन ताराचंद यांना होते.
बीजोत्पादनाचे शिकले तंत्र
तांभेरे परिसरात बहुतांश ठिकाणी पाण्याची टंचाई आहे. जमीनही हलकी व मुरमाड आहे. त्यामुळे कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांकडे गागरे वळले. कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांच्या मार्गदर्शनातून हरभरा शेतीला सुरुवात केली. अलीकडील वर्षांत बीजोत्पादनाची पद्धती त्यांनी अंगीकारली आहे. सुमारे चार एकरांपासून ते सहा एकरांपर्यंत त्याचे क्षेत्र असते.
सोयाबीनचे बीजोत्पादन
दरवर्षी सोयाबीनच्या जेएस ३३५ व जेएस ९३०५ या वाणांची लावण असते. यंदाच्या वर्षापासून फुले संगम वाणाचे बीजोत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. या पिकातही तंत्रज्ञान वापराचा प्रयत्न केला आहे. जमीन हलकी ते मध्यम आहे. दरवर्षी एकरी ६ ते ७ क्विंटल उत्पादन मिळते. यंदा ते १० क्विंटलपर्यंत मिळाले आहे. याबाबत बोलताना कैलास म्हणाले की फुले संगम हा एकरी अधिक उत्पादकता असलेला वाण आहे. त्याचा पक्व कालावधी १०० ते १०५ दिवसांचा आहे. यंदा एक एकरांत तुरीचे बीजोत्पादनही घेतले असून ११ क्विंटल उत्पादन निघाले आहे. गेल्या वर्षापासून गव्हाचेही बीजोत्पादन घेण्यास सुरवात केली आहे.
असे आहे बीजोत्पादन तंत्र
- कैलास सांगतात की हरभरा किंवा सोयाबीन बीजोत्पादनासाठी लागवडीचे अंतर ३० बाय १० सेंमी ठेवले आहे. जमीन हलकी असल्याने कमी अंतर व झाडांची संख्या अधिक ठेवली जाते. अर्थात विद्यापीठाची शिफारस वापरतो.
- पूर्वी हरभऱ्याचा दिग्विजय वाण वापरायचो. आता फुले विक्रम वाणाचा वापर होतो. यांत्रिकीकरणाला म्हणजे कंबाईन हार्वेस्टर वापरण्यासाठी हे वाण अनुकूल आहे.
- विलगीकरण अंतर तीन ते पाच मीटर ठेवण्यात येते.
- हरभऱ्याला एकरी एक बॅग डीएपी चा बेसल डोस देतो. तर सोयाबीनला यंदा २०-२०-० किंवा १०-२६-२६ या खताचा एकरी एक बॅगनुसार डोस दिला.
- हरभऱ्याला एकूण सुमारे पाच पाणी दिले जातात. त्यातील शेवटचे दोन पाणी स्प्रिंकलरद्वारे देण्यात येतात.
- रायझोबियम, पीएसबी या जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी १० किलोस २५० ग्रॅम यानुसार बीजप्रक्रिया होते.
- विहीर व विंधनविहीर आहे. गहू, सोयाबीन, तूर, हरभरा पेरणी व काढणीसाठी यंत्राचा वापर होतो. त्यामुळे खर्चात आणि मजुरीतही आर्थिक बचत होत आहे.
शेतकऱ्यांचा सहभाग वाढवला
ताराचंद यांनी स्वतः बीजोत्पादन घेण्यासोबतच विद्यापीठाच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचा अंतर्गत गावांतील शेतकऱ्यांचाही सहभाग वाढवला आहे. सुरुवातीला १२ शेतकऱ्यांनी त्यात भाग घेतला. आता ही संख्या वीसहून अधिकवर पोचली आहे.
सामाजिक कार्यात सहभाग
पाच हजार लोकसंख्येच्या तांभेरे गावांत पूर्वी ताराचंद व त्यांना दोन वर्षांनी वरिष्ठ असलेले निवृत्ती जबाजी शेलार असे दोन सैनिक होते. सध्या गावांत बारा तरुण सैन्यात कार्यरत आहेत. गावाला या सर्वांचा मोठा अभिमान आहे. सेवानिवृत्तीनंतर ताराचंद यांनी शेतीसाठी वाहून घेतलेच, पण गावांतील सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतला. सन २०११ मध्ये त्यांना गावाने बिनविरोध उपसरपंच केले. त्यातून त्यांनी सामाजिक जाणिवेतून आणि लोकसहभागातून गाव विकासाला प्राधान्य दिले. लोकसहभागही मिळाला. त्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यावरण समृद्ध ग्राम योजना, तंटामुक्त गाव अभियान, संपूर्ण स्वच्छता अभियानाचे पुरस्कार गावाला मिळाले. ताराचंद यांचा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मानाने गौरव झाला आहे.
वीस टक्के रक्कम अधिक
बीजोत्पादन घेण्यासाठी महात्मा फुले विद्यापीठाने संशोधित केलेल्या वाणांचाच वापर होतो. मागील दोन वर्षे कृषी विद्यापीठाने हरभरा बियाणे घेतले. त्यास बियाणे व बोनस असा एकूण मिळून प्रति क्विंटल ७५०० रुपये दर मिळाला. यंदा शेतकरी उत्पादक कंपनीला बियाणे पुरवले जाणार आहे. बियाण्याचा दर्जा तपासून बाजारभावापेक्षा वीस टक्के रक्कम अधिक मिळण्याची अपेक्षा आहे.
ताराचंद गागरे , ९८९०२९४२४५
फोटो गॅलरी
- 1 of 691
- ››