नवी दिल्ली : नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण दे
अॅग्रो विशेष
शेती, पूरक व प्रक्रियेतून आर्थिक सक्षमता
पालघर जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी तालुक्यातील बोरीचापाडा देहरे येथील मीरा परशुराम महाले यांनी कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन व प्रशिक्षण घेतले. त्यातून आधुनिक शेती करण्याबरोबर पूरक व्यवसाय व प्रक्रियायुक्त उद्योग यांतून कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सांभाळली आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी तालुक्यातील बोरीचापाडा देहरे येथील मीरा परशुराम महाले यांनी कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन व प्रशिक्षण घेतले. त्यातून आधुनिक शेती करण्याबरोबर पूरक व्यवसाय व प्रक्रियायुक्त उद्योग यांतून कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सांभाळली आहे. परिसरातील आदिवासी महिलांना सोबत घेत त्यांचाही विकास साधताना नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार हा आदिवासी भाग आहे. याच तालुक्यातील बोरीचापाडा देहरे ( जि. पालघर) येथील मीरा परशुराम महाले यांनी प्रयोगशील शेती, पूरक व प्रक्रिया उद्योग व महिला नेतृत्वात ओळख तयार केली आहे. जिल्ह्यातील समाजसेविका लक्ष्मीताई भोये, विमलताई पटेकर यांची प्रेरणा त्यांना मिळाली आहे. मीराताईंचे माहेर नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात आहे. शिक्षणवयात मैदानी खेळांत त्यांनी पुरस्कार मिळवले आहेत. त्यांचे पती पदवीधर असून ते रेशन दुकान चालवितात. दोन मुलांपैकी नीलेश अभियांत्रिकी पदविका प्राप्त तर अंकुश स्थापत्य अभियंता आहे. मुलगी योगिता बीएस्सी झाली आहे. मीराताईंचे वय आज ४७ वर्षे असले तरी कृषी आणि सामाजिक कार्यात त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे. सासरे कै.. मावजी गोविंद महाले हे माजी सैनिक होते. कष्टाळू वृत्ती, स्वाभिमानी ,ध्येयवादी जीवन जगण्याचा संदेश घरातूनच मिळाला.
सन २००८ पासून कोसबाड हील, पालघर येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके)
कार्यक्रम समन्वयक विलास जाधव व विषय विशेषज्ज्ञ भरत कुशारे यांच्या पुढाकारातून गाव दत्तक घेतले. त्यातून येथील मुख्य पिकांची आधुनिक शेती, पूरक व प्रक्रिया उद्योग यांचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिके राबविण्यास सुरवात झाली. त्याचा फायदा मीराताईंनी घेतला.
शेतीला चालना
- मीराताईंची चार एकर शेती व तीही डोंगराळ माथ्यावर आहे. पण त्यांना विश्वास होता की कष्ट केले तर त्यातूनही चांगले उत्पादन घेता येते. प्रथम शेतीची बांधबंदिस्ती व भातासाठी खाचरे तयार केली.
- दीड एकर भात, नागली व खुरासणी प्रत्येकी अर्धा एकर, वरई १० गुंठे, एक एकर तुती लागवड तर ४० काजूची, पाच आंबा व पेरू झाडे आहेत. भाताची गादीवाफा पद्धतीने रोपवाटिका तयार करून २० बाय १५ सेंमी. वर पुनर्लागवड होते. मजुरांची कमतरता असल्याने अर्धा एकरांत ‘ड्रमसीडर’ वापरातून शेती होते. यात उत्पादन खर्च कमी होतो.
- रोपवाटिका, चिखलणी करण्याची गरज भासत नाही. अर्धा एकरात चारसूत्री पद्धतीने लागवड होते. भात तुसाची राख, पेंडा व गिरीपुष्प या हिरवळीच्या खताचा वापर होतो. भाताचे एकरी १४ ते १६ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
महिला बचत गटातून कार्यरत
सन १९९४ मध्ये मीराताईंनी ११ महिलांना घेऊन बचत गट स्थापन केला. अधिकृत नोंदणी २००३ मध्ये राधाकृष्ण स्वयंसहायता महिला बचत गट नावाने झाली. आदिवासी भागात भात, नागली, वरई, खुरासणी आणि उडीद ही मुख्य पिके आहेत. त्यांच्यापासून शेव, इडली पीठ, चकली, बिस्कीट, उपमा, ढोकळा, पापड, भुजा, वडे, चटणी, भगर, उपवासाचे लाडू आदींची निर्मिती होते. मीराताईंनी मोहाच्या फुलांपासून लाडूसुद्धा बनविले आहेत. सहाशे रुपये प्रति किलो दराने विक्री होते.
मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, कोसबाड येथील विविध प्रदर्शने आणि मेळाव्यांत गटातील महिला उत्पादनांची विक्री करतात. त्यातून संसाराला आर्थिक हातभार लागण्यास व जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. व्यसनमुक्ती अभियान, शिक्षणाचे महत्त्व तसेच कृषी योजनांविषयी मीराताई विविध कार्यक्रमांमधून जनजागृती करतात.
रेशीम उद्योग
‘राधाकृष्ण’ बचत गटाच्या माध्यमातून मीराताईंनी रेशीम उद्योग सुरू केला. सन २०१२ मध्ये त्यांनी शेड उभारले. बांबूपासून रेशीम कीटक संगोपनासाठी संच बनविला. सुमारे एक लाख ३५ हजार रुपये खर्च आला. हिमतीने आणि कष्टाने तो पेलला. तुती लागवड ३० गुंठ्यात केली. शंभर अंडीपुंज आणून २०१३ मध्ये रेशीम उत्पादनास सुरवात केली. अन्य महिलांना प्रोत्साहित केले. प्रति बॅचमधून ९५ ते १०० किलोपर्यंत कोष उत्पादनापर्यंत क्षमता तयार केली. ‘ग्रेड’नुसार किलोला ३०० रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंत दर मिळतात. प्रति बॅच सुमारे २५ हजार ते ३० हजार रुपये उत्पन्न मिळते. वर्षात सुमारे पाच बॅचेस घेणे शक्य होते. काही अडचणींमुळे सुमारे दोन वर्षे उत्पादन घेता आले नाही. मागील वर्षी लॉकडाऊनचेही संकट होते.
अळिंबी उत्पादन
- गटाच्या माध्यमातून २०२८ पासून अळिंबी उत्पादन घेण्यास सुरवात केली. तांत्रिक मार्गदर्शन ‘केव्हीके’ ने दिले. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे उत्पादन शक्य झाले नाही. यावर्षी पुन्हा सुरवात केली आहे. बियाणे नाशिक येथून आणले जाते. वर्षाला सुमारे पाच वेळा उत्पादन घेण्यात येते.
- पहिली काढणी २१ ते २२ दिवसांनी मिळते. त्यानंतर साधारण नऊ दिवसाच्या अंतराने दोन पिके मिळतात. प्रत्येक बॅचला ६० किलोपर्यंत अळिंबी मिळते. आसपासच्या आठवडी बाजारांत बचत गटांमार्फत २०० रुपये प्रति किलो दराने विक्री होते.
मीराताईंना मिळालेले पुरस्कार
- आदिवासी समाज सेविका, ९ ऑगस्ट २०१९
- प्रगतिशील आदिवासी महिला शेतकरी, केव्हीके पुरस्कार महिला आपले घर सांभाळतात. त्याच क्षमतेने त्या शेती देखील आधुनिक पद्धतीने करू शकतात. शेतीला रेशीम, अळिंबी या सारख्या व्यवसायांची जोड द्यायला हवी.
- प्रक्रिया करून आर्थिक सक्षमता मिळवायला हवी. त्याच आधारे तीनही मुलांना उच्च शिक्षण देणे शक्य झाले.
- मीरा महाले, ९२२५५५९९०३,९२६०३५५५९४
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हील येथे विषय विशेषज्ज्ञ आहेत.)