केळी निर्यातीत ‘सुरचिता’चे पदार्पण

करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुरचिता ॲग्रो फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने आपल्या भागातील केळी पिकाखालील क्षेत्राची क्षमता पाहून केळी निर्यातीत पदार्पण केले आहे. यंदा प्रथमच अवघ्या सहा महिन्यात इराक, इराण, मलेशिया, सौदी आदी देशांत सुमारे १५०० टनांपर्यंत निर्यात करण्यात कंपनी यशस्वी झाली आहे.
Ongoing process for exporting bananas.
Ongoing process for exporting bananas.

करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुरचिता ॲग्रो फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने आपल्या भागातील केळी पिकाखालील क्षेत्राची क्षमता पाहून केळी निर्यातीत पदार्पण केले आहे. त्यासाठी खासगी निर्यात कंपनीशी करार केला आहे. यंदा प्रथमच अवघ्या सहा महिन्यात इराक, इराण, मलेशिया, सौदी आदी देशांत सुमारे १५०० टनांपर्यंत निर्यात करण्यात कंपनी यशस्वी झाली आहे.  सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर-टेंभुर्णी महामार्गावर करकंब येथे रस्त्यालगतच ‘सुरचिता ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी’ चा मॅाल आणि पॅकहाउस सर्वांचे लक्ष वेधून घेतो. सन २०१९ मध्ये कंपनीची स्थापना झाली. परिसंवाद, प्रदर्शने, चर्चासत्रांना एकत्र जाणे, तंत्रज्ञान देवाण-घेवाण अशी वाटचाल सुरू झाली. एकेक शेतकरी जोडत तब्बल ३४५ शेतकरी सभासद जोडले गेले. अध्यक्षपदी करकंबचे दिनकर मोरे तर सचिवपदी बार्डीचे सचिन कवडे आहेत. रत्नदीप मोरे मुख्य कार्यकारी अधिकारी तर मोहन मोरे, भाऊसाहेब कवडे, सौ. सरस्वती मोरे, सौ. शकुंतला नाईकनवरे, शीतल कवडे, अंजिक्य पवार, जगन्नाथ चव्हाण, संगीता मोरे, जयदीप मोरे आदी संचालकपदी कार्यरत आहेत.   चारा छावणीचे व्यवस्थापन कंपनी स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात कामांची दिशा पक्की होऊ लागली. सन २०१९ मध्ये दुष्काळ पडला. शासन जनावरांसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत छावण्या उभारत घडत होते. ‘सुरचिता’ कंपनीला पहिल्यांदाच मान्यता मिळून बार्डीत ९०० जनावरांची छावणी सुरू देखील झाली. कंपनीने चारा-पाण्याच्या व्यवस्थेसह उत्कृष्ट व्यवस्थापन केले. प्रशासनानेही कंपनीच्या कामाचे कौतुक केले. शाब्बासकीची थाप आणि मिळालेल्या नफ्याने कंपनीचा उत्साह चांगलाच वाढला.  मॅाल ते केळी निर्यात सन २०२० मध्ये कोरोनामुळे कामात थोडी संथगती आली. या भागात ऊस, द्राक्ष, केळी अशी पिके होतात. त्यातही करकंब हा द्राक्षपट्टा मानला जातो. अलीकडील वर्षात भागात केळीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. एकट्या करकंब भागात दोन हजार एकरांवर केळी आहे. त्यामुळे कंपनीने केळीची निर्यात करण्याचे ठरवले. ‘आत्मा’ चे प्रकल्प संचालक मदन मुकणे यांनीही त्यासाठी प्रोत्साहन दिले. कामास सुरवात करण्यापूर्वी औरंगाबाद येथील बटाटा प्रक्रियेत कार्यरत शेतकरी कंपनी आणि बोरामणी येथील यशस्विनी ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या कामकाजाची पाहणी संचालकांनी केली. परवाना घेऊन खते, कीडनाशके, बियाणे, ठिबकसंच, पाइपलाइन, हार्डवेअरसह शेतीविषयक साहित्याच्या विक्रीसाठी शेतकरी मॅाल सुरू केला.  निर्यात कंपनीशी करार केळी लागवड क्षेत्राचे सर्वेक्षण ‘सुरचिता’ने केले. खासगी व्यापाऱ्यांकडून अडवणूक व्हायची. किलोला ९ ते १० रुपयांखाली व्यापारी दर पाडून खरेदी करायचे. पाच ते आठ टनांच्या पुढे असेल  तरच खरेदी करु अशा अटींमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते. या समस्या दूर करायचे ठरवले. करकंब येथे भाडेतत्त्वावर पॅकहाउस व आवश्यक यंत्रसामग्री घेतली. गुजरात येथील खासगी निर्यात कंपनीसोबत करार केला. शेतकऱ्यांकडून प्रतिकिलो १५ रुपये दराने खरेदी सुरु झाली. लागवडीपासून ते काढणी, पॅकिंग, निर्यात आदी व्यवस्थापनामध्ये संबंधित निर्यातदार कंपनी ‘फ्रूट केअर’ तंत्रानुसार मार्गदर्शन करीत आहे. यासाठी शेतकरी कंपनीकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही.  निर्यातदार कंपनीने ३५ कुशल मजूर, ‘बीएस्सी ॲग्री’ झालेले तसेच अनुभवी पाच पर्यवेक्षक व कामांच्या सुसुत्रतेसाठी दोन व्यक्ती आदींची नेमणूक केली आहे. सुरवातीच्या टप्प्यात २०० हून अधिक शेतकऱ्यांनी ‘सुरचिता’कडे नोंद केली. आजघडीला सुमारे २५० एकरांसाठी नोंदणी झाली आहे.  यंदा पहिल्या वर्षी सहा महिन्यांच्या कालावधीतच इराक, इराण, मलेशिया, सौदी आदी देशांत सुमारे १५०० टनांपर्यंत निर्यात कंपनीने केली आहे. काढणी ते निर्यात महत्त्वाचे टप्पे

  • शेतातून परिपक्व केळींची कुशल मजुरांकडून काढणी.  
  • पॅकहाऊसमध्ये आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने केळी धुतली जातात. 
  • योग्य घटकांद्वारे निर्जंतुकीकरण. 
  •  गुणवत्ता, आकारानुसार घडांचे ग्रेडिंग.  
  • निर्यात होणाऱ्या संबंधित कंपनीचे स्टिकर त्यावर चिकटवले जाते.
  • प्लॅस्टिक बॅग व बॅाक्समध्ये पॅकिंग व वजन.  पॅकिंग केलेल्या बॅगमधून ‘व्हॅक्युम’द्वारे हवा काढून बॅाक्सचे पक्के पॅकिंग.  
  • बॅाक्स निर्यातदार कंपनीच्या शीतगृहाकडे रवाना. 
  • मागणीप्रमाणे ठरलेल्या देशात निर्यात. 
  • माझी दोन एकर केळी आहे. मी ‘सुरचिता’ कंपनीला विक्रीसाठी दिली आहेत. केळीचा दर्जा चांगला आहे. दरही चांगला मिळतो आहे. -विशाल नाईकनवरे,  पटवर्धन कुरोली, ता.. पंढरपूर     यंदा पहिलेच वर्ष असून आमच्यापरीने उत्तम कार्य करण्याचा प्रयत्न आहे. भविष्यात केळीची रोपे पुरवायची असून शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा उद्देश आहे.  -दिनकर मोरे, अध्यक्ष, ‘सुरचिता’ कंपनी.  सध्या केळीची निर्यात होते आहे. यापुढे केळी प्रक्रिया उद्योगात उतरायचे आहे. पावडर, चिप्स, पल्प  आदी उत्पादने तयार करायची आहेत.  - रत्नदीप मोरे  ९४२३५९४४०७ (मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘सुरचिता’) - सचिन कवडे  ९२८४२०७५८५ (सचिव, ‘सुरचिता’)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com