Chiku and Amla garden.
Chiku and Amla garden.

तिसऱ्या पिढीने जपला प्रयोगशिलतेचा वारसा

गोलटगाव (जि. औरंगाबाद) येथील कृषिभूषण सुदामअप्पा साळुंके यांची मुले अनिल व अजय, अर्थात पुढील पिढी आजोबा व वडिलांचा वारसा जपत प्रयोगशील शेतीच्या वाटेवरून मार्गक्रमण करीत आहे. विविध फळबागांसह जातिवंत उस्मानाबादी शेळीचे संवर्धन व संगोपन व अलीकडे बायोफ्लॉक तंत्राने मत्स्यपालन करून त्यांनी शेती शाश्‍वतीकडे नेताना अर्थकारणही बळकट केले आहे.

गोलटगाव (जि. औरंगाबाद) येथील कृषिभूषण सुदामअप्पा साळुंके यांची मुले अनिल व अजय, अर्थात पुढील पिढी आजोबा व वडिलांचा वारसा जपत प्रयोगशील शेतीच्या वाटेवरून मार्गक्रमण करीत आहे. विविध फळबागांसह जातिवंत उस्मानाबादी शेळीचे संवर्धन व संगोपन व अलीकडे बायोफ्लॉक तंत्राने मत्स्यपालन करून त्यांनी शेती शाश्‍वतीकडे नेताना अर्थकारणही बळकट केले आहे.  गोलटगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. गावातील कै. निवृत्ती पाटील साळुंके हे बीजोत्पादनात हातखंडा असलेले त्या वेळचे शेतीनिष्ठ शेतकरी. त्यांचे पुत्र सुदामअप्पा साळुंके यांनीही शेतीनिष्ठ व कृषिभूषण असे दुहेरी सन्मान मिळवलेले. त्यांची मुले (कुटुंबातील तिसरी पिढी) अनिल व अजय घरचा प्रयोगशील शेतीचा वारसा पुढे चालवीत आहेत. त्याद्वारे शेती अधिक शाश्‍वततेकडे नेत त्यातील अर्थकारण मजबूत करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. वारसा जपला  घरची ९० एकर शेती आहे. पूर्वीच्या पिढीने १९६०- ७० च्या दशकात खासगी कंपन्यांच्या बीजोत्पादन कार्यक्रमात (मका, बाजरी आदी) सहभाग घेतला होता. काळानुरूप बदल स्वीकारत सुदामअप्पांनी फलोत्पादनावर लक्ष केंद्रित केले. आजोबांच्या काळात केळी, ऊस, भोकरी अंगूर, पानमळे होते. सुदामअप्पांच्या काळात मोसंबी, आंबा, डाळिंब, चिकू, आवळा, पेरू बागा शेतीत उभ्या राहिल्या. पैकी डाळिंब, पेरू, मोसंबी, आंबा दुष्काळाच्या चटक्‍यात गेल्या. त्यानंतर कुटुंब कमी पाण्याच्या फळपिकांकडे वळले. अनिल यांनी सुमारे २८ वर्षे औरंगाबाद येथे महात्मा गांधी मिशनच्या कृषी विज्ञान केंद्रात सेवा बजावली. आज ते पूर्णवेळ शेतीत आहेत. सध्या चिकूची ३५०, आवळ्याची २५०, तर बांधावर चिंचेची सुमारे ७८० झाडे आहे. सर्व झाडे व्यापाऱ्यांना दिली जातात. आठ एकरांत दोन वर्षांपूर्वी बांबू लागवड केली आहे. दीड हजार उत्पादनक्षम बांबू ४० वर्षांपासून बांधावर आहे. जतन केलेल्या बागा  यापूर्वी आंबा तसेच २०११-१२ मध्ये डाळिंब दुबईला निर्यात करण्याचा प्रयत्नही कुटुंबाने केला आहे. चिंचेसारख्या अत्यंत कमी खर्चिक बांधावरील झाड प्रत्येकी किमान २० ते २५ हजार रुपये मिळवून देते. सुमारे २५ वर्षे सांभाळलेली डाळिंब बाग अलीकडे काढली. अलीकडील वर्षांत पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी झाल्याने नव्याने मोसंबी, डाळिंब व पेरू प्रत्येकी एक हजार झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठीची रोपे, कलमे तयार करण्याचेही काम हाती घेतले आहे. रंगपूर मातृवृक्षाची सुमारे ५०० झाडे उभी करण्याचेही नियोजन आहे. तूर, कपाशी, ज्वारी, सोयाबीन आदी पिकेही असतात. बायोफ्लॉक तंत्राने मासेपालन  कोरोना काळातच नोकरीचा राजीनामा देणाऱ्या अनिल यांनी कोलकता येथील मत्स्यविज्ञान संस्थेकडून शास्त्रोक्‍त पद्धतीचे म्हणजे बायोफ्लॉक मत्स्यपालनाचे ऑनलाइन प्रशिक्षण घेतले. सुमारे एक आठवड्याच्या या प्रशिक्षणात संस्थेकडून साहित्याचे कीटही मिळाले. कमी क्षेत्रात, कमी पाण्यात अधिक मासेपालन (सघन शेतीप्रमाणे) करण्याचे हे तंत्र आहे. या पद्धतीत पोषणद्रव्यांचे साखळीकरण करून पुनर्वापर केला जातो. यात जिवाणू वा सजीव तसेच सजीव व मृत सेंद्रिय घटक आदींचा समावेश असतो.   ...अशी आहे टॅंकची रचना

  • २९ फूट व्यासाची, चार फूट खोलीची गोलाकार टाकी. ८०० जीएसएम जाडीच्या पत्र्याला ८ एमएमचे गज. आतून एक हजार मायक्रॉनचे प्लॅस्टिक. दोन विटांचा बेडरूपी थर.
  • टाक्‍यांच्या मधोमध तीन इंच पाइपला बुडालगत एक फुटापर्यंत छिद्र निचऱ्यासाठी. 
  • सुमारे ४७ हजार रुपयांचा खर्च. 
  • पाण्याचा टीडीएस, अमोनिया, ऑक्सिजन, पीएच आदी बाबी शास्त्रीय पद्धतीने तपासून व्यवस्थापन.
  • उस्मानाबादी शेळीपालन प्रयोगशीलतेसोबत काळानुरूप बदल स्वीकारण्याची तयारी कुटुंबातील प्रत्येक पिढीने दाखविली आहे. त्यानुसार सन २०१६-१७ पासून अनिल यांनी उस्मानाबादी जातिवंत शेळ्यांचे संवर्धन व संगोपन करण्यावर विशेष भर दिला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथून जातिवंत १० शेळ्या व एक बोकड त्यांनी खरेदी केला. दोन किंवा तीन पिले देण्याची क्षमता असलेल्या या शेळ्यांचा विस्तार झाला. चार वर्षांनंतर संख्या १५८ वर पोहोचली. सुमारे ७० बोकड आजवर विकले. गेल्या वर्षी दिवाळीत २० शेळ्या व दोन बोकडांची विक्री केली. त्यातून सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. सुमारे३७५ रुपये प्रति किलो असा दर राहिला. चाऱ्याचे नियोजन करण्यासाठी दीड एकर क्षेत्र राखीव ठेवले आहे. तर शिवारातही त्या चरण्यासाठी नेल्या जातात. सुमारे ७० बोकडांची चार वर्षांत सरासरी आठ हजार रुपये प्रति नगाप्रमाणे विक्री केली आहे. वर्षाला त्यातून सरासरी सव्वा लाखाचे उत्पन्न मिळते.  मत्स्यपालनात महत्त्वाचे 

  • रोहू, कटला व मृगल असे तीन प्रकारचे १५०० मत्स्यबीज टाकीत सोडले आहे. टाकीत तीस हजार लिटर पाण्याची क्षमता.
  • सुमारे ९ महिन्यांत तयार होतात विक्रीयोग्य मासे. (एक किलो वजनाचे)
  • एकूण एक टनांपर्यंत उत्पादनाची अपेक्षा. सद्यःस्थितीत  माशांचे वजन सव्वाचारशे ग्रॅम.
  • - अनिल साळुंके  ९८२२७९०३३५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com