पेठमधील मोगऱ्याचा नाशिकमध्ये दरवळ

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात आदिवासी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली एक गुंठा ते अर्धा एकरांपर्यंत मोगरा लागवड केली आहे. नाशिक बाजारपेठेत गणेशोत्सव ते लग्नसराईपर्यंत मोगरा भाव खातो.
Farmers harvesting mogara buds ..
Farmers harvesting mogara buds ..

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात आदिवासी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली एक गुंठा ते अर्धा एकरांपर्यंत मोगरा लागवड केली आहे. नाशिक बाजारपेठेत गणेशोत्सव ते लग्नसराईपर्यंत मोगरा भाव खातो. फुलशेतीमुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थकारणाचा सुगंध दरवळत आहे. पेठ तालुक्यातील (जि. नाशिक) आदिवासी शेतकरी भात, नागली, वरई, मधुमका, तसेच भाजीपाला उत्पादन घेतात. मात्र या पिकांच्या दरात चढ उतार कायम असतात. दरम्यान २०१६ मध्ये श्रीमंत आदिवासी सेंद्रिय शेतकरी गटातील सदस्यांनी पारंपरिक पिकांना पर्याय जाणून घेण्यासाठी जव्हार येथील मोगरा फुलशेतीचा अभ्यास केला. इतर पिकांच्या तुलनेत ती फायदेशीर ठरते, हे लक्षात घेत मोगरा लागवडीचा मार्ग स्वीकारला. गटाने इच्छुक शेतकऱ्यांची नोंदणी करून मोगऱ्याच्या ‘बेंगलोर’ जातीची रोपे उपलब्ध करून दिली. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असल्याने किमान एक गुंठ्यापासून ते जास्तीत जास्त २० गुंठ्यांपर्यंत मोगरा लागवड शेतकऱ्यांनी केली. मोगरा शेतीचा प्रयोग गटाच्या कार्यक्षेत्रातील २० गावांत करण्यात आला असून, सुमारे १०० शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. मोगरा फुलशेती आदिवासी शेतकऱ्यांना ‘श्रीमंत’ करण्याच्या मार्गावर आहे. कृषी विभागाचे पाठबळ कृषी विभागाच्या मदतीने श्रीमंत आदिवासी सेंद्रिय शेतकरी गटाने मोगरा लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. तालुक्यामध्ये सिंचन सुविधेमध्ये वाढ होत असल्याने उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करून शेतकरी नगदी पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत. गटशेतीअंतर्गत नोंदणी केलेल्या मोगरा उत्पादकांना कृषी विभागामार्फत लागवड, खत, कीड-रोग व्यवस्थापन, उत्पादन आणि विक्रीबाबत सातत्याने मार्गदर्शन करण्यात येते.  मोगरा उत्पादक गावे  शिंगदरी, गायधोंड, गावंधपाडा, आड, शिंदे, पातळी, उभी धोंड, करंजाळी, गांगुडबारी, गडदुणे, उस्थळे, जांबविहीर, हरणगाव, निरगुडे, खरपडी, देवगाव, कोहोर, गोंदे, जळीतहोड. विक्रीचे आदर्श नियोजन  प्रत्येकाचे क्षेत्र कमी असल्याने दररोज निघणाऱ्या मोगरा कळ्या अधिक प्रमाणात नसतात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला या कळ्या विक्रीसाठी शहरात नेणे परवडणारे नाही. यावर गटाने सामूहिक विक्रीचा तोडगा शोधला. मोगरा उत्पादक शेतकरी तोडलेल्या कळ्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या करंजाळी गावात आणतात. प्रत्येक जण आपला माल मोजून गटाकडे जमा करतो. सर्वांकडून संकलित झालेल्या मोगऱ्याच्या कळ्या गटातील एक शेतकरी नाशिक शहरातील फुलबाजारात विक्रीसाठी नेतो. बाजारात जो दर मिळेल, त्याआधारे प्रत्येकाला वजनाप्रमाणे पैसे दिले जातात. ...अशी आहे बाजारपेठ दादर, मुंबई बाजारावर नाशिकमध्ये दर निघतो. दुपारी बाराच्या आत नाशिक बाजारात मोगरा कळी पोहोचविल्यास दर अधिक मिळत असल्याने शेतकरी तसे नियोजन करतात. दिवसाला दर बदलत असतात, मात्र मागणी वाढल्यास दर टिकून राहतो. सर्व बाजारपेठ मागणी पुरवठ्यावर अवलंबून असते. पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना मोगरा विकण्यासाठी नाशिक, मुंबईसह गुजरातमधील सुरत मार्केट जवळ आहे. मात्र नाशिक बाजारात विक्रीला शेतकऱ्यांची पसंती आहे. सध्या मोगरा कळ्यांना बाजारात चांगली मागणी आहे. गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी लग्नसराई हा मुख्य बाजाराचा काळ असतो.  मोगरा फुलशेतीचे अर्थकारण मोगरा शेतीबाबत यशवंत गावंडे म्हणाले, की रोपाची लागवड केल्यानंतर ८ ते १० वर्षे उत्पादन मिळते. वर्षभरात सलग आठ महिने मोगऱ्याचा हंगाम असतो. चांगले पीक व्यवस्थापन केल्यास मोगऱ्याच्या एका झाडापासून दररोज १०० ते १५० ग्रॅम कळ्या मिळतात. झाडे सशक्त करण्यासाठी अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा ठेवणे महत्त्वाचे असते. ५०० रोपांची लागवड असणाऱ्या शेतकऱ्याला दररोज १० किलो कळ्यांचे उत्पादन मिळते. किमान दर मिळाला तरी भाजीपाला, इतर पिकांच्या तुलनेत मोगरा शेती फायदेशीर ठरली आहे. छाटणीवर आगामी उत्पादन अवलंबून असते. बहर चांगला असल्यास प्रति झाड १०० ग्रॅमपर्यंत कळ्या मिळतात. एकरी दररोज सरासरी  २० किलो उत्पादन अपेक्षित असते. मात्र त्यासाठी फुले तोडणी व संबंधित कामांसाठी किमान दहा जण लागतात. ऑगस्ट ते जूनपर्यंत मागणीनुसार प्रति किलोस सरासरी २०० ते १२०० रुपयांपर्यंत दर मिळतो.    दैनंदिन नियोजन  तोडणी...दररोज सकाळी ७  ते ९ पर्यंत फुले संकलन...सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत बाजारात पुरवठा ...१२ वाजेपर्यंत

असे मिळते उत्पादन आणि उत्पन्न प्रति झाड उत्पादन..५० ते १५० ग्रॅम कळ्या प्रति किलो सरासरी दर...२०० ते १२०० रुपये एक झाडाचा उत्पादन कालावधी...१० ते १२ वर्षे हंगाम...वर्षभरात सलग ८ महिने सण-उत्सवाला मागणीत वाढ  साधारण गणेशोत्सवापासून मोगऱ्याची मागणी वाढत जाते. सध्या पाऊस असल्याने उत्पादन कमी आहे. ढगाळ वातावरणात उत्पादन कमी, तर मोकळ्या सूर्यप्रकाशात उत्पादन वाढत जाते. मोगऱ्याचा उपयोग गजरे, माळनिर्मितीसाठी होतो. त्यानुसार श्रावण महिना, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, लग्नसराई यांसह इतर सण-उत्सवाच्या काळात अधिक उठाव असतो. एकेरी पाकळी, सुगंध, टिकवणक्षमता, गजरा तयार करण्यायोग्य कळ्यांची मागणी कायम असते. त्यानुसार छाटणीचे नियोजन करून शेतकरी उत्पादन घेतात. अनेक व्यापारी तसेच ग्राहक शेतकऱ्यांना फोनवर मागणी नोंदवितात. अलीकडे थेट गजरे बनवून देण्याची मागणी होत असल्याने ऑर्डर घेतल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळून संधी वाढू लागल्या आहेत. - यशवंत गावंडे  ९३०९५२२६६१  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com