अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी दिल्ल
यशोगाथा
जलसमृद्धीतून मिळवली संपन्नता
नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव (ता.चांदवड) गावाने पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मोल जाणले. प्रयोगशील वृत्तीने काटेकोर जलसंधारण- व्यवस्थापन करून निर्यातक्षम द्राशशेतीत नाव कमावले. द्राक्ष खरेदी-विक्रीचे जिल्ह्यातील मध्यवर्ती केंद्र अशी ओळख गावाने तयार केली.
नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव (ता.चांदवड) गावाने पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मोल जाणले. प्रयोगशील वृत्तीने काटेकोर जलसंधारण- व्यवस्थापन करून निर्यातक्षम द्राशशेतीत नाव कमावले. द्राक्ष खरेदी-विक्रीचे जिल्ह्यातील मध्यवर्ती केंद्र अशी ओळख गावाने तयार केली. जलसमृद्धीतून संपन्नता मिळवली.
नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव (ता.चांदवड) हे आज द्राक्षशेतीसाठी प्रसिद्ध असलेले गाव एकेकाळी नागवेलीच्या मळ्यासाठी (खाऊचे पान) प्रसिद्ध होते. मोठ्या प्रमाणावर पानाचे उत्पादन घेऊन जिल्ह्यासह मुंबई बाजारात पुरवठा व्हायचा. त्यातून गावात समृद्धी नांदायची. कालांतराने पर्जन्यमान कमी झाले. पाण्याचा तुटवडा निर्माण झाला. मग पानमळे कमी झाले.
द्राक्षशेतीला चालना
दरम्यान, गावातील प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय मोहिते, अशोक साळुंके, शंकर भालेराव, शशिकांत तारकुंडे, वसंतराव पाचोरकर, परसराम पाचोरकर आदींनी पश्चिम महाराष्ट्रात पर्यायी पिकासाठी अभ्यास दौरे सुरू केले. सुरुवातीला अल्प प्रमाणात १९७४ दरम्यान ‘भोकरी’ द्राक्षवाणाच्या लागवडी पांगाऱ्याच्या वेलींवर होत्या. प्रयोगशील परिवाराचे प्रवर्तक श्री. अ.दाभोळकर यांच्या संपर्कात येथील शेतकरी आल्यानंतर द्राक्ष शेतीचे अभ्यासवर्ग घडू लागले. द्राक्षशेतीचा विस्तार होऊ लागला. अनाबेशाही, सिलेक्शन-७ हे वाण आले. सन १९८२ दरम्यान डॉगरीज रूटस्टॉक, थॉम्प्सन, गणेश व सोनाका असे वाण रूजू लागले.
सिंचन समस्येवर मात
द्राक्षशेती विस्तारत असताना सिंचनक्षमता मर्यादित असल्याने अडचणी मात्र वाढत होत्या. मार्चच्या सुरुवातीस पाण्याची टंचाई भासू लागे. मग शेतकऱ्यांनी जलसंधारणाचे प्रयोग वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर राबवले. हळूहूळू त्यातून निर्यातक्षम द्राक्षशेती विकसित झाली. आज सफेद व रंगीत द्राक्षवाणांची वाणांची विविधता गावात पाहण्यास मिळते.
शेततळ्यांचे झाले गाव
गावाची भौगोलिक रचना डोंगराळ आहे. पावसाळ्यात डोंगरावरून वाहत जाणारे पाणी अडविण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतालगत चर खोदले. त्यात पाणी अडवून भूजलपुनर्भरण केले. त्यामुळे परिसरात भूजलपातळी वाढली आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी उचलून शेततळ्यात साठविले जाते. आज १० गुंठ्यांपासून दोन एकरांपर्यंतची एक हजारांहून अधिक शेततळी गावात पाहण्यास मिळतात.
ठिबक सिंचनात अग्रेसर
गावात चुनखडीयुक्त व मध्यम हलक्या जमिनी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी सिंचनक्षमता टिकून ठेवण्यासाठी प्रयोग केले. पूर्वीच्या पानमळ्यातील कुशल कामांचा अनुभव द्राक्षशेतीत उपयोगी ठरला. चिकाटी, जिद्दी व मेहनती अशा इथल्या शेतकऱ्यांनी १९८४ दरम्यान डहाणू येथील शेतांना भेटी देऊन ठिबक सिंचनाचे तंत्र अभ्यासले. त्यातून ठिबक संच उभारले. हा प्रयोग जिल्ह्यात सर्वप्रथम याच गावने केलेला असावा.
समृद्धी व संपन्नता
शेती व सिंचनात प्रयोगांद्वारे गावातील शेतकऱ्यांनी विशेषतः तरूणाईने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात नावलौकिक मिळविला आहे. त्यातून आर्थिक स्थैर्यता आली. कृषी संबंधित व्यवसाय बहरले. शैक्षणिक व आरोग्याच्या सुविधा निर्माण झाल्या. सामाजिक कार्यात गाव आज आघाडीवर आहे. शेतकऱ्यांचे टुमदार बंगले पाहण्यास मिळतात. जिल्ह्यातील द्राक्ष खरेदी-विक्रीचे मध्यवर्ती केंद्र म्हणून वडनेरभैरव पुढे आले आहे. हंगामात तीसहून अधिक व्यापारी खरेदी विक्रीसाठी येथे दाखल होतात. हंगामात दररोज तीस ट्रक व सुमारे ६०० टन द्राक्षे संकलित होऊन देशभर प्रमुख बाजारपेठेत द्राक्षे पाठवली जातात. टोमॅटो उत्पादनही यशस्वीरित्या होते.
राष्ट्रीय पातळीवर गौरव येथील युवा द्राक्ष उत्पादक बापू साळुंके यांनी शेतीलगत चर खोदून पावसाळ्यात वाहून जाणारे दोन कोटी लिटर पाणी अडविले. ते शेततळ्यात साठवून सिंचन कार्यक्षमतेत वाढ केली. केंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयातर्फे शेतकरी गटातील राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने २०१९ मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले.
झालेली प्रमुख कामे
- गावातील सामाजिक व धार्मिक संस्था, पाणी वापर संस्था व ग्रामपंचायत जलसंधारणकार्यात आघाडीवर श्री भैरवनाथ महाराज देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून नेत्रावती नदीवरील ब्रिटीशकालीन भैरव बंधाऱ्याचे रुंदी व खोलीकरण. गाळ उपसा करून देवस्थान ट्रस्टद्वारे पोट खराब्याची जमीन सुपीक
- सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातूनही गाळ काढण्यात आला.
- जाखमाख माता पाणी वापर सहकारी संस्थेचाही पुढाकार. नेत्रावती नदीतील पावसाचे वाहून जाणारे पाणी जुन्या गाव पाटाद्वारे दोन रस्त्यांलगत खोदलेल्या चरात सोडले. त्यातून भूजल पुनर्भरण करण्यास मोठी मदत. त्याद्वारे भूजलपातळी वाढून दोन वर्षांपर्यंत पाणीपातळी टिकविण्यास मदत.
- ग्रामपंचायतीकडून लेंडी नाल्यावर साखळी पद्धतीने सलग चर पद्धतीने नाला खोलीकरण
- ५० बाय १५ बाय १४ फूट खोल अशी सात ठिकाणी कामे. त्यातून वार्षिक दोन कोटी लिटर जलसाठा वाढण्यास मदत होईल असे ग्रामविकास अधिकारी रोशन सूर्यवंशी यांचे म्हणणे.
वडनेर भैरव : ठळक बाबी
वन क्षेत्र : ८५७.५७ हेक्टर
कृषीक क्षेत्र : : ३१५० हे.
द्राक्षे : १९१२ हे. टोमॅटो : २०३ हे.
अन्य पिके : कांदा, मका, सोयाबीन, मिरची
पाण्याचा काटेकोर वापर
शेतकऱ्यांनी आधुनिक सिंचन वितरण प्रणालीचा वापर करून पिकाच्या गरजेनुसार वेळापत्रक तयार करून पाणी देण्याचे सूत्र अंगीकारले. जमिनीची आर्द्रता टिकवून राहावी यासाठी बागेत बोदावर गवत, उसाचे पाचट, सोयाबीन, गहू यांचा भुसा टाकून सेंद्रिय मल्चिंग केले जाते.
आंतरराष्ट्रीय सल्लागारांची मदत
चिली देशातील द्राक्षतज्ञ व सल्लगार रॉड्रीगो ओलीवा यांच्या संपर्कात गावातील तरूण पिढी कायम असते. त्यांच्या सल्ल्यानुसार पाणी व्यवस्थापन होते. द्राक्ष बागेतील मुळांची स्थिती, विस्तार, वाढीच्या अवस्था, बाष्पीभवन यानुसार पाण्याच्या गरजेच्या नोंदी ठेवल्या जातात. क्षेत्रामध्ये पाणी देण्यापूर्वी खड्डे खोडून निरीक्षणे शेतकरी नोंदवतात. मातीचा प्रकार, भौतिक स्थिती, जलधारणक्षमता व मृदा परीक्षणाआधारे प्रत्येतक नियोजन होत असल्याचे द्राक्ष उत्पादक नितीन मोहिते सांगतात.
संपर्कः नितीन मोहिते ९३७११४८०४९
बापू साळुंके ९१३०१६६३५६
रोशन सूर्यवंशी (ग्रामसेवक) ८२७५५८६२६४
योगेश साळुंके ८६०५६४२७७७
फोटो गॅलरी
- 1 of 94
- ››