गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला भाव

गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील सतीश पटवर्धन यांनी आंबा मोदक आणि शैलेश शिंदे-देसाई यांनी काजू पावडरपासून मोदकनिर्मिती करण्यास सुरुवात केली. मोदकांमध्ये विविधता आणत ग्राहकांना आकर्षित करण्याकडेविशेष भर दिला.
आंबा आणि काजूपासून बनविलेले मोदक.
आंबा आणि काजूपासून बनविलेले मोदक.

गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील सतीश पटवर्धन यांनी आंबा मोदक आणि शैलेश शिंदे-देसाई यांनी काजू पावडरपासून मोदकनिर्मिती करण्यास सुरुवात केली. मोदकांमध्ये विविधता आणत ग्राहकांना आकर्षित करण्याकडे विशेष भर दिला.  गणेशगुळे (ता.जि. रत्नागिरी) येथील सतीश दत्तात्रय पटवर्धन यांची वडिलोपार्जित आंबा लागवड आहे. आंबा फळांच्या विक्रीबरोबरच प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मितीे करतात. मागील १० वर्षांपासून पटवर्धन कुटुंबीय आंबा गरापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थांचा व्यवसाय करत आहेत. साधारणपणे मे महिन्याच्या अखेरीस या उद्योगाला सुरुवात होते.  आंबा गराचे मूल्यवर्धन सुरुवातीला कॅनिंगसाठी फळांतून गर (पल्प)  काढला जातो. गर बाटल्यामध्ये भरून साठवण केली जाते. त्यात उत्तम दर्जाचा मावा मिसळून आंबा मावा तयार करतात.आंबा माव्यापासून आंबा मोदक, आंबा वडी व विविध कोकणी पदार्थ बनविले जातात. गणेशोत्सव काळात आंबा मोदक बाजारात आणले जात असल्याने मागणीही चांगली असते.  ...असा करतात आंबा मोदक  आंबा मोदक तयार करण्यासाठी आटवलेल्या माव्याचा वापर केला जातो. माव्याच्या दर्जावर साखरेचे प्रमाण ठरलेले असते. साधारणपणे, मोदक बनविण्यासाठी १ किलो मावा असेल, तर १ किलो साखर असे नियोजन केले जाते. मोदक बनविण्यासाठी प्रथम साखरेचा पाक तयार करून त्यात मावा मिसळला जातो. पाक गरम असतानाच त्याचे छोटे गोळे केले जातात. हे गोळे मोदक बनविण्याच्या साच्यात टाकले जाते. साच्यामध्ये गोळे व्यवस्थित दाबून भरावे लागतात. गोळे चांगले घट्ट होण्याकरिता साच्यामध्ये साधारण १० ते १५ मिनिटे ठेवावे लागते. त्यानंतर तयार मोदक साच्यामधून बाहेर काढून इलेक्ट्रिक ड्रायरमध्ये ६५ ते ७० अंश सेल्सिअस तापमानाला सुकविले जातात. ही प्रक्रिया पावसाळ्यामध्ये अधिक उपयुक्त ठरते. सुकलेले मोदक ट्रेमध्ये काढून प्लॅस्टिक पिशवी पॅक केले जातात. मोदकांमध्ये विविधता आणण्यासाठी त्यात वेलची,  केशर यांचा वापर केला जातो.  विक्री नियोजन  साधारणपणे गणेशोत्सव सुरू होण्याच्या १५ दिवस आधी मोदक बनविण्याची तयार सुरू होते. जास्तीत जास्त ताजे मोदक बाजारात पोहोचतील असे नियोजन केले जाते. पटवर्धन कुटुंबीय आठ दिवसांमध्ये सुमारे ४०० किलो मोदक बाजारात विक्रीसाठी आणतात. त्यासाठी रत्नागिरी शहरातील विविध विक्रेत्यासोबत त्यांनी संपर्क ठेवला आहे.  आंबा मोदक निर्मिती दृष्टिक्षेपात  (प्रमाण ४०० किलो मोदकांसाठी)  

  • मावा २०० किलो  
  • साखर २०० किलो 
  • आंबा पल्प ७०० किलो  मोदक मऊ राहण्यासाठी प्रति किलो ५० ग्रॅम या प्रमाणात द्रवरूप ग्लुकोजचा वापर करतात.  
  • चवीसाठी वेलचीचा वापर 
  • आकर्षक बॉक्स पॅकिंग  
  • विक्रीसाठी ‘पॅट्‌स’ नावाचा ब्रॅण्ड तयार केला आहे.
  • आंबा मोदकांचे अर्थकारण  २१ मोदकांचे पॅकिंग ८० रुपये दराने विकले जाते. त्याचे वजन २०० ग्रॅम इतके आहे. एक किलो मोदक ४०० रुपये दराने विकले जातात. एका किलोमध्ये साधारण १२० रुपयांपर्यंत नफा त्यांना होतो. आंबा  मोदकांच्या विक्रीतून पटवर्धन यांना सुमारे १ लाख ६० हजार रुपये गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत मिळतात. पारंपरिक पद्धतीने आंबा व्यवसाय करताना प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा मानस होता. त्यामधून गणेशोत्सवात आंबा मोदकांची संकल्पना पुढे आली. मागील १० वर्षांपासून गणेशोत्सवात आंबा मोदकांची विक्री करत आहे. त्याला बाजारामध्ये चांगली मागणीही आहे. - सतीश दत्तात्रय पटवर्धन, गणेशगुळे, ०२३५-२२३७०८१ काजू पावडरपासून मोदक राजापूर तालुक्यातील ओणी (जि. रत्नागिरी) येथील शैलेश सुभाषचंद्र शिंदे-देसाई हे काजू उत्पादक आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित वेंगुर्ला ७, ४ या काजू जातींची २५ ते ३० वर्षांची सुमारे ७०० झाडे आहेत. यामधून त्यांना सुमारे २ टन काजू बी उत्पादन मिळते. जुन्या झाडांमुळे उत्पादन कमी झाले आहे. शैलेश यांचा ‘श्री कॅश्यू’ नावाने स्वतःचा प्रक्रिया उद्योग आहे. यामध्ये दरवर्षी सुमारे २० टन काजू बीवर प्रक्रिया केली जाते. गणेशोत्सवात नैवेद्यासाठी काजू मोदक वापरले जातात. या मोदकांना मुंबईसह स्थानिक बाजारामध्ये मोठी मागणीही असते. हे लक्षात घेऊन काजू तुकड्यांच्या पावडरपासून काजू मोदक, काजू कतली तयार करण्यास सुरुवात केली. काजू मोदकांना गणेशोत्सवाबरोबरच वर्षभर संकष्टी, अंगारकी चतुर्थीला मागणी असते.  काजू मोदक, कतली बनवण्याची पद्धत

  • काजू मोदक, कतली तयार करण्यासाठी गोकुळाष्टमीपासून सुरुवात केली जाते. यासाठी काजू तुकड्यांची पावडर आणि साखरेचा पाक बनविला जातो. एका किलो काजू पेस्ट सव्वा किलो साखरेच्या पाकात टाकली जाते. हे मिश्रण चांगले एकत्र करून काही वेळ तसेच ठेवले जाते. हे मिश्रण मोदकाच्या साच्यात टाकून मोदक तयार केले जातात.   या मिश्रणातून साधारणपणे पावणेदोन किलो मोदक तयार होतात. मोदक बॉक्समध्ये पॅक केले जातात. फक्त काजू पावडर वापरून व्हॅनिला, बटरस्कॉच, रोझ या स्वादाचे मोदक बनविले जातात. आकर्षकपणासाठी  केशरी, पिवळा, पांढरा अशा खाद्य रंगाचा वापर केला जातो.  
  • काजू कतली बनविण्यासाठी काजू पावडर आणि साखरेच्या पाकाच्या मिश्रणाच्या वड्या तयार करून त्या सुकविल्या जातात.
  • विक्री यंत्रणा 

  • गणेशोत्सवात सुमारे २५ किलो, तर वर्षभरात ५० किलोहून अधिक काजू मोदकांची विक्री होते. 
  • रत्नागिरी शहरासह मुंबई, पुण्याला विक्री होते. 
  • मुंबई-गोवा महामार्गावर स्वतःचे विक्री काउंटर सुरू केले आहे. यामधून वर्षभर ६ जणांना रोजगाराची उपलब्धता झाली आहे. 
  • यासोबतच काजू खारे, मसाला, काळी मिरी, चटपटा काजू या चार प्रकारच्या काजूगराची वर्षभरात ५०० किलो विक्री केली जाते.
  • ...असे आहे अर्थकारण

  • २५ किलो काजू मोदकांसाठी १५ किलो काजूगर आणि १० किलो साखर लागते. उत्पादन खर्च 
  • काजू मोदकांस प्रतिकिलो १८० ते २०० रुपये इतका दर मिळतो. म्हणजेच साधारण किलोला वीस टक्के नफा मिळतो.
  • गणेशोत्सवातील मागणी लक्षात घेऊन काजू मोदक बनविण्यात येतात. काजू प्रक्रिया उद्योगातील कच्च्या मालापासूनच हे मोदक बनविले जातात. तयार मोदकांची जिल्ह्यातच मोठी विक्री होते. - शैलेश सुभाषचंद्र शिंदे-देसाई, ओणी राजापूर  ८८०६२२४४४२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com