ट्रॅक्टरचलित विविध यंत्रांद्वारे वेळ, मजुरी, खर्चात बचत

ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने पेरणी वा कोळपणी व त्याच्या जोडीला फवारणी. त्याचबरोबर एकाच वेळी पाच ते सोळा ओळीपर्यंत फवारणी करणारा बूम स्प्रे, खतपेरणी अशा विविध अवजारांची निर्मिती. वडगाव (देव) (ता.. तुळजापूर, जि.. उस्मानाबाद) येथील उमाकांत पाटील यांनी केली आहे.
Sprayer installed in the same manner as tractor driven sowing machine.
Sprayer installed in the same manner as tractor driven sowing machine.

ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने पेरणी वा कोळपणी व त्याच्या जोडीला फवारणी. त्याचबरोबर एकाच वेळी पाच ते सोळा ओळीपर्यंत फवारणी करणारा बूम स्प्रे, खतपेरणी अशी विविध अवजारेनिर्मिती. वडगाव (देव) (ता.. तुळजापूर, जि.. उस्मानाबाद) येथील उमाकांत पाटील यांनी या माध्यमातून उत्पादन खर्चासह वेळ, मजुरीत बचत केली आहे. अन्य शेतकऱ्यांनाही ते आपल्या तंत्रत्रानाची सेवा देत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर-नळदुर्ग महामार्गावर वडगाव (देव) गाव आहे. येथील उमाकांत पाटील यांची १२ एकर शेती आहे. ते वनस्पतिशास्त्र विषयातील पदवीधर आहेत. नाशिक येथे खासगी कंपनीत दोन वर्षे नोकरी केली. तेथील शेतीतील प्रयोग व शेतकऱ्यांचे प्रयत्न पाहून ते प्रभावित झाले. सोलापूर जिल्ह्यात कारंबा येथील स्वयंसेवी संस्थेत दोन वर्षे अनुभव घेतला. त्यानंतर आपल्याच शेतीत करिअर करण्याचे पक्के केले. पत्नी सौ. मायादेवी, कृषी पदवीला असलेला मुलगा ऋषिकेश व मुलगी श्रुती यांची मोठी साथ मिळाली. त्या जोरावर उमाकांत यांची वाटचाल सुरू आहे. यांत्रिक शेतीवर भर सुरुवातीला पाण्याचा कायमचा स्रोत नव्हता. सन २००१ मध्ये शेताशेजारी साठवणतलाव झाला. सन २००३ मध्ये खऱ्या अर्थाने शेतीला सुरवात केली. बोअरला अवघ्या दीडशे फुटांवर साडेचार इंच पाणी लागले. त्या वर्षी हिरवी मिरची, आले घेतले. आले यशस्वी झाल्याने उत्साह वाढला. मग सोयाबीन, उडीद, तूर, ऊस अशी पिके घेण्यास सुरुवात केली. मजुरांची कमतरता व वाढते दर यामुळे २०१८ मध्ये ट्रॅक्टर घेतला. शेतात उद्‍भवत असलेल्या समस्या लक्षात घेऊन त्यानुसार सुधारित यंत्रे तयार करण्याचे उमाकांत यांच्या मनात आले. अनुभव व बुद्धिकौशल्य यांची सांगड घालून वेल्डिंगद्वारे त्यांनी ती तयारही केली. शेतात त्यांचे प्रयोगही केले. तुळजापूर कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक सचिन सूर्यवंशी, कृषिविद्या विषयातील तज्ज्ञ अपेक्षा कसबे, उद्यानविद्या तज्ज्ञ गणेश मंडलिक, मृद्‍ विज्ञान विषय तज्ज्ञ भगवान अरबाड यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यातून यंत्रातील बदलांना दिशा मिळाली. उमाकांत यांनी तयार केलेली यंत्रे पुढीलप्रमाणे. पेरणीसह फवारणी यंत्र

  • ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राला पुढे कीडनाशक द्रावण टाकी (१०० लिटर क्षमतेची) बसविली. त्यास बारा व्होल्ट क्षमतेची मोटर जोडली. यंत्रावर मागे छोट्या लोखंडी पाइपला नोझल वापरून फवारणी पंप तयार केला. याद्वारे एकाचवेळी पेरणी आणि तणनाशक फवारणी करता येते. त्यातून वेळ व खर्चात बचत.
  • तूर, सोयाबीन, हरभरा, ज्वारी आदी पिकांत वापर करता येतो.
  • फवारणी यंत्र मागे असल्याने चालकाच्या चेहऱ्यापर्यंत द्रावण पोहोचत नसल्याने धोका उद्‍भवत नाही. आतापर्यंत दीडशे शेतकऱ्यांना फवारणी पंप बसवून दिले.
  • यंत्राची एकूण किंमत ५४ हजार रुपयांपर्यंत.
  • कोळपणी व फवारणी

  • या ट्रॅक्टरचलित कोळपणी यंत्रामध्ये दहा इंचांपासून ते २४ इंचांपर्यंत अंतर कमी-जास्त करता येते.
  • मागील बाजूने फवारणी होते.
  • तूर आणि सोयाबीन या दोन पिकांत कोळपणी वेळी पिकाच्या उंचीनुसार ट्रॅक्टरला मागील बाजूला लावलेला नोझल खाली- वर करता येतो. हरभरा, ज्वारी, उन्हाळी भुईमूग, मका आदी पिकात वापर शक्य असल्याचे उमाकांत सांगतात.
  • कमी अंतर असलेल्या पिकांत कोळपणी, तर पाच फुटांपेक्षा अंतर जास्त जास्त असलेल्या पिकांत रोटरचा वापर करता येतो. कीडनाशकाच्या फवारणीचे कव्हरेजही चांगले मिळते.
  • बूम स्प्रे, खत पेरणी यंत्र

  • तूर, सोयाबीन, हरभरा आदी पिकांत पाच ते सोळा ओळींपर्यंत बूमस्प्रेद्वारे फवारणी. टाकी २५० ते ५०० लिटरपर्यंत ठेवता येते.
  • एका दिवसात १५ ते २० एकरांवर फवारणी शक्य.
  • पारंपरिक पद्धतीत किमान ३० मजुरांची आवश्यकता असते. मात्र यांत्रिक पद्धतीत केवळ ट्रॅक्टरचालकाआधारे काम होते. वेळ व आर्थिक बचतही होते.
  • उसासाठी यंत्र

  • ट्रॅक्टरचलित बाळबांधणी व खतपेरणी एकाचवेळी करता येईल असे यंत्र. खताची मात्रा एकसारखी पडते. खर्च, वेळ आणि पैशांची बचत होते.
  • २७ एचपी ते ५० एचपी क्षमतेपर्यंत ट्रॅक्टरला यंत्रे जोडता येतात.
  • यांत्रिक पद्धतीने सोयाबीन शेती

  • दरवर्षी सहा जूनच्या दरम्यान पेरणी.
  • कृषी विद्यापीठाचे सुधारित बियाणे वापरले जाते.
  • ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे पेरणी होते. एकरी वीस किलो बियाणे लागते.
  • त्याच वेळी यंत्राद्वारे तणनाशकाचीही फवारणी.
  • पेरणीनंतर २१ व्या दिवशी ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे कोळपणी.
  • ४२ व्या दिवशी याच यंत्राद्वारे दुसरी कोळपणी व त्या वेळीच कीडनाशकांची फवारणी.
  • यांत्रिक शेतीचे झालेले फायदे सोयाबीनचे उदाहरण घेतल्यास बियाणे, खुरपणी, बैलचलित कोळपणी, संपूर्ण कालावधीत दोनदा कोळपणी असा पारंपरिक पद्धतीतील हिशेब पकडला तर उमाकांत यांच्याकडील यंत्रांच्या वापराने खर्चात सुमारे ४० ते ५० टक्के बचत होते. व्यवस्थापन कार्यक्षमता वाढल्याने एकरी उत्पादनातही वाढ झाली आहे. सोयाबीनचे एकरी १३ ते १४ क्विंटलपर्यंत, तुरीचे सहा क्विंटल, हरभऱ्याचे सात क्विंटल, तर उसाचे ७० टनांपर्यंत उत्पादन मिळते. अन्य शेतकऱ्यांना सेवा खरिपात १०० एकरांपर्यंत पेरणी, २०० एकरांवर फवारणी तर रब्बीत ६० ते ७० एकरांवर पेरणी आणि शंभर एकरांवर फवारणी ते करून देतात. पेरणीसाठी एकरी एक हजार रुपये, कोळपणीसाठी ७०० रुपये तर पवारणीसाठी २५० रुपये शुल्क आकारतात. वर्षाला या व्यवसायातून पूरक उत्पन्नही जोडले आहे. संपर्क ः उमाकांत पाटील, ९८८१७०१८३९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com