दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर’ची घोडदौड

वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली. मागील काही वर्षांमध्ये ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबविला जात आहे. त्यातून खरीप व उन्हाळी सोयाबीन, हरभऱ्याचे दर्जेदार बियाणे उपलब्ध होत आहे.
Packed Soybean seeds
Packed Soybean seeds

वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली. मागील काही वर्षांमध्ये ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबविला जात आहे. त्यातून खरीप व उन्हाळी सोयाबीन, हरभऱ्याचे दर्जेदार बियाणे उपलब्ध होत आहे. डाळनिर्मिती, थेट शेतीमाल विक्री, सेंद्रिय शेती आदी विविध उपक्रमांतूनही कंपनीची यशस्वी घोडदौड सुरू आहे. परभणी ते जिंतूर राज्य मार्गावर बोरी या प्रमुख बाजारपेठेच्या गावापासून पाच किलोमीटरवर वर्णा गाव आहे. श्री. वर्णेश्‍वर महादेव आणि श्री खंडोबा ग्रामदैवतांची मंदिरे आहेत. गाव शिवारात सुमारे दीड हजार एकर शेतजमीन आहे. उत्तरेकडून करपरा नदी वाहते. नदीच्या बाजूस काळी कसदार सुपीक, तर दक्षिण पश्‍चिम बाजूस माळरानाची जमीन आहे. सोयाबीन, तूर, मूग, कापूस, उडीद, हरभरा, ज्वारी, गहू, भुईमूग ही पिके हंगामानुसार घेतली जातात. करपरा मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी मिळते. गावातील बहुतांश शेती हंगामी बागायती आहे. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत गावातील तरुण शेतकरी गट एकत्र आले. त्यातून एक मे, २०१५ रोजी वर्णेश्‍वर ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीची स्थापना झाली. अध्यक्ष दिलीप अंभुरे, सचिव माणिक अंभुरे यांनी जबाबदारी स्वीकारली. कंपनीचा १८ लाख रुपयांचा व्यवसाय आराखडा आहे. पैकी साडेअकरा लाख रुपये अनुदान प्राप्त झाले. गावानजीक १० गुंठे जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली. धान्य स्वच्छ करून प्रतवारी करणे हा कंपनीचा मुख्य उद्देश होता. त्यासाठी क्लिनिंग, ग्रेडिंग करणारी यंत्रसामग्री बसविण्यात आली. सहा वर्षांत राबविलेल्या उपक्रमांमुळे कंपनीच्या सभासद संख्येत सुरुवातीच्या ३०० वरून ९०० पर्यंत वाढ झाली आहे. परिसरातील गावांमधील शेतकरी सभासद आहेत. तंत्रज्ञान प्रसारासाठी कंपनी प्रशिक्षण आयोजन करते. ग्रामबीजोत्पादन दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीतर्फे तीन- चार वर्षांपासून खरीप व रब्बीत ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबविला जातो. सन २०१७ मध्ये खासगी- सार्वजनिक भागीदारी आधारे ‘वर्णेश्‍वर’ने ५० एकरांत सोयाबीनच्या फुले अग्रणी वाणाचा बीजोत्पादन कार्यक्रम घेतला. काही ठळक बाबी

  • सभासदांकडील ३७ एकरांत सोयाबीनच्या एमएयूएस-१६२ वाणाचा २५ एकरांत,
  • फुले अग्रणी वाण ५ एकर, एमएयूएस १५८ (पैदासकार बियाणे) ४ एकर, उडीद टीयू-१ वाण- २ एकर, तूर- बीडीएन ७११ एक एकर असा बीजोत्पादन कार्यक्रम
  • सन २०१९-२० मध्ये सोयाबीन १०९ क्विं., तर हरभरा ९० क्विंटल बियाणे उत्पादन.
  • सन २०२०-२१- सोयाबीन- ३५ एकर, हरभरा- १४ एकर.
  • बियाण्याचे ‘महासीड’ ब्रॅंडिंगद्वारे पॅकिंग.
  • उन्हाळी सोयाबीन गेल्या वर्षी ऐन काढणीच्या हंगामात पाऊस आल्याने सोयाबीनचे दर्जेदार बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध झाले. यंदा कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार कंपनीतर्फे २५ एकरांत सोयाबीनच्या विविध वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला. त्यापासून १०० ते १२५ क्विंटल बियाणे उपलब्ध होऊ शकेल. धान्ये स्वच्छता, प्रतवारी

  • स्वच्छता, प्रतवारी यंत्राची प्रति दिन क्षमता- १ टन.
  • आजमितीस ज्वारी, गहू, कडधान्ये मिळून पाच हजार क्विं. धान्याची स्वच्छता व प्रतवारी.
  • प्रति क्विंटल ४० ते ५० रुपये नफा मिळाला. गावपरिसरातील शेतकरी या सुविधेचा लाभ घेत आहेत.
  • आधारभूत किंमत खरेदी केंद्र

  • किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडतर्फे ‘महाएफपीसी’ अंतर्गत चार वर्षांपासून कंपनीतर्फे हमीभाव केंद्र चालविले जात आहे.
  • त्याअंतर्गत २०१७-१८ मध्ये २२५० क्विंटल तूर, २०१९-२० मध्ये ५२२५ क्विं. हरभरा व ३१७० क्विं. तूर खरेदी.
  • सन २०२०-२१ मध्ये १२२५ क्विं. हरभरा खरेदी.
  • मागील वर्षी लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांना कंपनीच्या हमीभाव केंद्राचा चांगला फायदा झाला.
  • मिनी डाळ मिल

  • सन २०१८ मध्ये वर्णेश्‍वरने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या मिनी डाळ मिलची खरेदी केली.
  • आजवर मूग, तूर, हरभरा मिळून ३६२ क्विं. डाळनिर्मिती. त्यासाठी प्रति क्विंटल ५०० रुपये शुल्क घेतले जाते.
  • यंदा तुषार व ठिबक साधने विक्री केंद्र सुरू केले. २७ तुषार संच व सात एकरांसाठी ठिबक संच विक्री.
  • शेतकरी आठवडी बाजार संत शिरोमणी सावता माळी आठवडे बाजाराची आयोजक कंपनी म्हणून निवड झाल्यानंतर कंपनीतर्फे परभणी शहरात दर बुधवारी आठवडे बाजार भरविला जायचा. त्याचा शेतकऱ्यांचा फायदा झाला. मागील वर्षी लॉकडाउनमध्ये कृषी व पणन विभागाच्या मदतीने परभणी शहरातील नागरी वसाहतींमध्ये कंपनीने सहा हजार किलोहून अधिक भाजीपाला- फळांची विक्री केली. त्यातून दीड लाख रुपयाची उलाढाल झाली. बीबीएफ तंत्रज्ञानाचा अंगीकार

  • पूर्वी गावातील शेतकरी बैलचलित पेरणीयंत्राद्वारे सोयाबीनची पेरणी करायचे. एकरी ७ ते ८ क्विंटल उत्पादन मिळायचे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे कंपनीच्या सभासदांकडे ५० एकरांत रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्रज्ञान प्रात्यक्षिक घेण्यात आले.
  • त्यातून हरभरा घेण्यासही सुरवात केली. त्यातून मूलस्थानी जलसंधारण होऊन जमिनीची धूप कमी झाली. सुपीकता टिकून ठेवण्यास मदत झाली. उत्पादनात वाढ झाली.
  • सेंद्रिय शेती पद्धती...

  • 'आत्मा’चे तालुका समन्वयक सुनील अंभुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय शेती गटाची स्थापना
  • त्यात ५० शेतकऱ्यांचा समावेश. त्याअंतर्गत गहू, ज्वारी, मूग, उडीद, तूर आदींचे उत्पादन व विक्री
  • ॲग्रोवन प्रेरणादायी ‘ॲग्रोवन’मधील यशकथांच्या माध्यमातून गटशेतीची संकल्पना समजण्यास मदत झाली. त्यापासून प्रेरणा घेत गावातील तरुण शेतकरी एकत्र आले. त्यातून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाली. - दिलीप अंभुरे, ९६५७९६१६३५ (अध्यक्ष, वर्णेश्‍वर कंपनी) माणिक अंभुरे, ९६८९०७५८५९ (सचिव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com