नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची का
यशोगाथा
व्यावसायिक पिकांचा वारसा जपणारे विडूळ
यवतमाळ जिल्ह्यातील विडूळ गावाने हळद, पानवेल यांसारख्या व्यावसायिक पिकांतून समृद्धीची वाट चोखाळली आहे. गेल्या दशकांपासून या नगदी पिकांत गावकऱ्यांनी सातत्य राखले आहे. गरजेनुरूप यांत्रिकीकरणाचा पर्यायही अवलंबिला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील विडूळ गावाने हळद, पानवेल यांसारख्या व्यावसायिक पिकांतून समृद्धीची वाट चोखाळली आहे. गेल्या दशकांपासून या नगदी पिकांत गावकऱ्यांनी सातत्य राखले आहे. गरजेनुरूप यांत्रिकीकरणाचा पर्यायही अवलंबिला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात विडूळ हे उमरखेड- ढाणकी मार्गावर गाव आहे. सुमारे अकरा हजार लोकसंख्येच्या गावातील मुख्य व्यवसाय शेती आहे. पारंपरिक पिकांपेक्षा व्यावसायिक पीक पध्दतीचा आदर्श गावाने जोपासला आहे. अनेक वर्षांपासून गावातील शेतकऱ्यांचे हळद लागवडीत सातत्य आहे.
तंत्रज्ञानात बदल
विडूळच्या गावकऱ्यांनी हळद पीक लागवड तंत्रज्ञानात काळानुरूप बदल केले आहेत. गादीवाफ्यावर (बेड) व दोन बेडसमध्ये पाच फुटांचे अशी पध्दत असते. कमी श्रमात, कमी वेळेत बेड तयार व्हावा, त्याचा आकार तांत्रिक दृष्ट्या एकसारखा राहावा यासाठी खास अवजारे शेतकऱ्यांनी गरजेनुरूप तयार केली आहेत. गावातील संतोष मोरे हे त्यापैकी प्रयोगशील शेतकऱ्याचे उदाहरण आहे. त्यांनी एक लाख तीस हजार रुपये खर्चून त्यासंबंधीचे स्वयंचलित यंत्र खरेदी केले आहे. गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे सुमारे एक एकरावर तरी हळदीची लागवड दिसते. वाळवलेल्या हळदीचे एकरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
रोजगार निर्मिती
लागवड ते काढणी अशा प्रत्येक टप्प्यावर मजुरांची गरज भासते. गावात चार ते पाच हळद उकळणी यंत्र आहेत. अर्ध स्वयंचलित पद्धतीची चार यंत्रे गावात आहेत. किंमत ७० हजार रुपयांपर्यंत आहे. त्याद्वारे गावातील युवकांसाठी रोजगार निर्मिती शक्य झाली आहे.
बाजारपेठ
हळद उत्पादकांचे गाव अशी ओळख झाल्याने थेट गावातूनच खरेदीवर व्यापाऱ्यांचा भर राहतो. त्यासोबतच काही शेतकरी दरांची चाचपणी करून हिंगोली, परभणी, वसमत या भागांतील बाजारपेठांमध्ये ही हळद विक्रीला नेतात.
पानमळ्यचे गाव
गावात हळदीसोबतच घेतले जाणारे दुसरे व्यावसायिक पीक म्हणजे खाऊचे अर्थात कपुरी पान. गावात पानमळ्यांची संख्या २५ ते ३० च्या घरात असावी. या पिकात देखील शेतकऱ्यांचे काही दशकांपासून सातत्य राहिले आहे. आमच्या पणजोबांपासून कपुरी पानाचे उत्पादन घेतले जात असल्याचे संतोष मोरे सांगतात. पानाची गुणवत्ता चांगली हवी असल्यास जमिनीत सेंद्रिय घटकांची गरज सर्वाधिक राहते. त्यामुळे दरवर्षी शेतात शेणखत व तलावातील गाळ पसरविण्याचा प्रयत्न असतो. लागवडीपासून पहिले उत्पादन सुमारे आठ महिन्यांत घेता येते. लागवड केल्यानंतर चार वर्षे उत्पादन मिळत राहते. त्यानंतर पीक फेरपालट होते.
बाजारपेठ
यवतमाळ, उमरखेड व पुसद यासोबतच नागपूर येथे पानांची विक्री होते. प्रती हजार पानांसाठी शंभर रुपयांपासून ते कमाल ८०० रुपयांपर्यंतचा दर मिळतो. आठवड्यातून एक-दोन तोडे होतात.
हळद प्रक्रियेसाठी प्रोत्साहन
जिल्ह्यात सहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हळद लागवड होते. विदर्भात सर्वाधिक हळद लागवड क्षेत्र असल्याने केंद्र सरकारने प्रक्रिया क्लस्टर योजनेत या पिकाचा जिल्ह्यासाठी समावेश केला. उमरखेड, पुसद, आर्णी, महागाव, दिग्रस हे तालुके हळदीसाठी प्रसिद्ध आहेत. केंद्र सरकारने पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेद्वारे हळद प्रक्रियेला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्योग उभारणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्प आराखड्याच्या पस्तीस टक्के किंवा कमाल दहा लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. हळद उकळणे, पॉलिश करणे त्यासोबतच पावडर निर्मितीसाठी त्याचा लाभ घेणे शक्य आहे असे यवतमाळचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
माझ्याकडे सुरुवातीला चार एकरांवर हळदीची लागवड होत होती. आता क्षेत्र दहा एकरांपर्यंत नेले आहे. एकरी ३० क्विंटलच्या पुढे उत्पादन मिळते. खर्च ७५ हजार रुपयांपर्यंत होतो. दोन वर्षांपासून पाच हजार रुपयांच्या आसपास प्रतिक्विंटल दर आहेत. या वर्षी दरात तेजी आली आहे. आठ ते नऊ हजार रुपये क्विंटल असा दर आहे.
- तुकाराम हिंगमिरे ९४२३६६५३२१
हळद पिकातून शेतीचे अर्थकारण सुधारले असल्याने त्यात इतरांरांप्रमाणे सातत्य ठेवले आहे. पुढील हंगामासाठी बेणे राखून ठेवून उर्वरित विक्री होते.
- कृष्णा देशमुख
संपर्कः संतोष मोरे, ९१५८५३६५११
फोटो गॅलरी
- 1 of 94
- ››