गांडूळ खतासह सेंद्रिय मसाला गूळनिर्मिती

सातारा जिल्ह्यातील मालदन येथील कृषी पदवीधर विजय पतंगराव काळे या तरुणाने गांडूळ खतनिर्मिती व त्याचा रॉयल ब्रॅण्ड तयार केला. एक पाऊल पुढे जात सेंद्रिय मसाला गूळ या नावीन्यपूर्ण उत्पादनाची निर्मिती केली आहे. थेट ग्राहकांपर्यंत ‘प्रमोशन’ करीत त्यास बाजारपेठही मिळविली आहे.
Production of organic spice jaggery and vermicompost
Production of organic spice jaggery and vermicompost

सातारा जिल्ह्यातील मालदन येथील कृषी पदवीधर विजय पतंगराव काळे या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता शिक्षणातील तांत्रिक ज्ञानाचा उपयोग करून गांडूळ खतनिर्मिती व त्याचा रॉयल ब्रॅण्ड तयार केला. एक पाऊल पुढे जात सेंद्रिय मसाला गूळ या नावीन्यपूर्ण उत्पादनाची निर्मिती केली आहे. थेट ग्राहकांपर्यंत ‘प्रमोशन’ करीत त्यास बाजारपेठही मिळविण्यास सुरुवात केली आहे.  सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात डोंगरी भाग जास्त असल्याने तुलनेने शेतजमिनीचे क्षेत्र कमी आहे. या परिस्थितीतही अनेक शेतकरी प्रयोगशीलता शेती करताहेत. मालदन येथील विजय पतंगराव काळे हा त्यापैकीच वय वर्षे २८ असलेला कृषी पदवीधर तरुण शेतकरी आहे. वडिलांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. घरची अवघी दोन एकर शेती. त्याला पूरक म्हणून व्यवसायाच्या शोधात विजय होते.शिवाय कमी क्षेत्रातून अधिकाधिक चांगले उत्पादन मिळवायचे तर जमिनीचा पोत चांगला ठेवणे गरजेचे होते. सर्व विचार करून २०१२ मध्ये गांडूळ खतनिर्मितीचे युनिट सुरू केले.  शिक्षण घेताना शेतीचाही अनुभव  कृषी पदवीचे शिक्षण कऱ्हाड येथील महाविद्यालयात सुरू असल्याने मिळेल त्या वेळेत वडिलांना शेतीत मदत केली जायची. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करावी अशी आई-वडिलांची इच्छा होती. मात्र विजय यांनी व्यवसायाची वाट धरली. कुटुंबाचा विरोधही पत्करला. शिक्षणानंतर बारामती केव्हीके येथे ॲग्री क्लिनिक, ॲग्री बिझनेसचे तर कण्हेरी, ‘व्हीएसआय’ संस्थेतही सात प्रकारची प्रशिक्षणे घेतली. गांडूळ खत प्रकल्प सुरुवातीच्या एका युनिटमध्ये भर घालत २०१६ मध्ये सहा युनिट्स सुरू केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१८ मध्ये १६ युनिट्स उभारत ६० टन क्षमतेच्या प्रकल्प उभारला. खताचा रॅायल ब्रॅण्ड तयार केला. सुरुवातीच्या काळात परिसरात, त्यानंतर सातारा, कऱ्हाड व कोल्हापूर येथे ग्राहक तयार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात प्रतिसाद कमी मिळत असतानाही गाठीभेटी व आपल्या खताची गुणवत्ता शेतकऱ्यांना दाखवत बाजारपेठ वाढवण्यास सुरुवात केली. सध्या ७७ बाय ३५ फूट आकाराच्या शेडमध्ये एकूण २८ युनिट्स असून, वर्षाला एकूण उत्पादन क्षमता ११० टन आहे.   मदत व मार्गदर्शन विजय यांना व्यवसायात आई- वडिलांची मदत होते. चार मजुरांना कायम रोजगारही उपलब्ध झाला आहे. एक देशी गाय असून, व्यवसायाला उपयुक्त ठरत आहे. महाविद्यालयातील शिक्षक,  अजय चिंचकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. कृषी विभागाच्या वतीने विजय कृषी मित्र म्हणून कार्यरत आहेत.   सेंद्रिय मसाले गूळ  विजय यांचा सुरुवातीपासूनच सेंद्रिय शेतीकडे कल होता. घरी ऊस  होताच. सेंद्रिय गुळाची निर्मिती केल्यास चांगली बाजारपेठ मिळेल असा विचार त्यांनी केला. त्या दृष्टीने उसाची शेतीदेखील सेंद्रिय पद्धतीने करण्यास सुरुवात केली. त्या दृष्टीने रासायनिक खतांचा वापर बंद करून गांडूळ खत, व्हर्मिवॉश, दशपर्णी अर्क, जिवामृत, निंबोळी पेंड यांचा वापर सुरू केला. गूळनिर्मिती करताना त्यात नावीन्यपूर्ण संकल्पना वापरली. गूळ तयार होताना देशी गाईचे तूप, वेलची, सुंठ यांचा वापर केला. सन २०१९ मध्ये निर्मिती सुरू केली. पहिल्या वर्षी २२ गुंठे क्षेत्रातील उसापासून २२०० किलो गूळ, तर १०० किलो काकवीचे उत्पादन मिळाले. गेल्या वर्षी १२०० किलो निर्मिती केली. गुऱ्हाळ स्वतःचे नसल्याने दुसऱ्या ठिकाणाहून गूळ तयार केला जातो.  पॅकिंग व विक्री एक किलोची ढेप तर काकवी अर्धा व एक लिटर असे बॉटल पॅकिंग केले जाते. एक किलो गुळाच्या ढेपा या १८ किलोच्या बॉक्समध्ये पॅक केल्या जातात. बाजारपेठेत सुरुवातीस मसाला गुळाची विक्री करताना अडचणी आल्या. मात्र थेट ग्राहकांशी नेटवर्क जोडले. १०० ते ११० रुपये प्रति किलो दराने त्याची विक्री केली जात आहे. गुळासाठी बुकिंग होत असून, पुढील वर्षाचे ५० टक्के बुकिंग झाले आहे.    - विजय काळे  ८८०६७१७५७४    ८८०६०६१७११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com