Rathi cows have been procured from Rajasthan and a well-equipped shed has been constructed for them.
Rathi cows have been procured from Rajasthan and a well-equipped shed has been constructed for them.

घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली झाले स्वयंपूर्ण

नागपूर जिल्ह्यातील अरोलीगावातील पंचेचाळीस शेतकरी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘विश्‍वास’ गटाने चारा उत्पादन, घरपोच चारा कुट्टी यांचे गणित बसवले आहे. त्यातून एकरी एक लाखापेक्षाही अधिक उत्पन्न मिळवत आहेत.

नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस शेतकरी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘विश्‍वास’ गटाने चारा उत्पादन, घरपोच चारा कुट्टी यांचे गणित बसवले आहे. त्यातून एकरी एक लाखापेक्षाही अधिक उत्पन्न मिळवत आहेत. गावातील एकूण चारा विक्रीची उलाढाल एक कोटी रुपयाची आहे. घरपोच चारा संकल्पनेसोबत दुग्धोत्पादनही सुरू केले आहे .    नागपूरपासून ६५ कि.मी. अंतरावरील अरोली (ता. मौदा) हे सहा हजार लोकसंख्येचे गाव. पूर्वी केळी, हळद लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात भात शेतीसोबत मिरची, वांगी, चवळी अशा भाजीपाला पिकांचा पर्याय शेतकऱ्यांनी निवडला होता. मात्र उत्पादन खर्च वाढत गेल्याने निव्वळ उत्पन्नात घट होत चालल्याचे जाणवत होते. या गावातील डॉ. उल्हास निमकर यांनी सात वर्षे पशुवैद्यक व पुढे विमा कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम केले. सेवानिवृत्तीनंतर गावाचा आर्थिक विकास करण्याचे ध्येय घेतले. पशुपालनाचे सारे गणित हे चाऱ्यावर अवलंबून असल्याचे जाणून पर्यायी पीक म्हणून चारा पिकावर लक्ष केंद्रित केले.  अशी केली तयारी  गावातील दूध उत्पादकांच्या भेटीगाठी घेत अडचणी समजून घेतल्या. हिरव्या चाऱ्याची नियमित उपलब्धता ही मोठी समस्या होती. त्यांच्यासमोर गावपोच चाऱ्याची संकल्पना मांडली. दूध उत्पादकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताच परस्परांच्या सोयीने पद्धती ठरवली. कोणता चारा किती प्रमाणात याचे गणित बसवले.

  •  झांसी हैदराबाद येथील चारा संशोधन केंद्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधला. त्यांनी शिफारस केलेल्या पोषक व अधिक उत्पादनक्षम हायब्रीड नेपियरच्या डी.एच.एन.-१० या प्रजातीची निवड केली. बहुवार्षिक, दर दीड ते दोन महिन्यांनी कापणीस येणारे प्रतिवर्ष पाच कापण्या आणि एकरी दीडशे ते दोनशे टन चारा उत्पादन देणारे पीक निश्‍चित केले.
  • डॉ. सतीश राजू, अनिरुद्ध पाठक यांच्या संकल्पनेतून आर्वी येथे पशुसंवर्धन विभागाने उभारलेले चारा बागेला (फॉडर कॅफेटेरिया) भेट देऊन संकल्पना समजून घेतली. 
  • चारा लागवडीपूर्वी नागपूर येथे शेतकरी व चारा खरेदीदार यांची संयुक्त बैठक घेतली. ४५ शेतकरी चारा लागवडीस तयार झाले. दुग्धोत्पादक आणि चारा खरेदीदारांसमोर घरपोच चारा पोचवण्याची योजना मांडली. २० किलोच्या बॅगमध्ये हिरव्या चाऱ्याची ताजी कुट्टी पाठविण्याचा विश्‍वास खरेदीदारांना दिला. सहायक पशुसंवर्धन आयुक्त जगदीश कुरळकर यांनीही सेवानिवृत्तीनंतर या प्रकल्पात योगदान दिले.  
  • जबाबादारीचे केले नियोजन

  • चारा शेती व्यवस्थापन, कापणी आणि पुरवठा व मार्केटिंग असे तीन व्यवस्थापन गट. प्रत्येक गटामध्ये १२ ते १७ सदस्य. अध्यक्ष म्हणून अनुक्रमे बंडोजी कोहदरे, अर्जुन डहारे, डॉ. उल्हास निमकर हे काम पाहतात. 
  • चारा उत्पादकांचा वैज्ञानिक सहकारी शेती विकास अरोली संघ (विश्‍वास) स्थापन केला. ‘आत्मा’अंतर्गत शेतकरी गटाची नोंदणी आहे. गटांमध्ये कार्य करणारे विविध पदाधिकारी व शेतकरी सर्वश्री बंडू कोहदारे, अर्जुन डहारे, सदानंद निमकर, सुनील अडघूळकर, लिलाधर उमप, प्रकाश आपतूरे, प्रशांत भुरे, शैलेश निमकर, अरविंद कडवे, माहतलाल शेख, सुरेश होले असे असून गटाचे प्रवर्तक म्हणून डॉ. निमकर काम पाहतात. शेतकरी कंपनीमध्ये रूपांतर करण्याचे नियोजन केले आहे. 
  • ...आणि झाली सुरुवात  जुलै २०१७ मध्ये ओडिशा राज्यातील संबलपूर येथून चारा बेणे खरेदी केले. मात्र ५.५ लाख बेणे खराब निघाले. न डगमगता पुन्हा पुरवठादारांशी चर्चा करून उरुळीकांचन येथील प्रकल्पातून बेणे खरेदीचा निर्णय घेतला. प्रति बेणे एक रुपये या प्रमाणे ५.५ लाख बेणे नव्याने खरेदी केले. पंचवीस हजार रुपये वाहतूक खर्च आला. 

  • पंचावन्न एकरांवर सामूहिकपणे लागवड. 
  • लागवडीनंतर पहिली कापणी ३० ऑक्टोबर २०१७ रोजी. पहिल्या टप्प्यात सात टन चाऱ्याचा पुरवठा.
  • मागणी आणि पुरवठा यांची सांगड घालत प्रतिदिन १० ते १२ टन चाऱ्याचा पुरवठा केला जातो. सुरुवातीला ५५ एकर लागवडीपासून वाढवत क्षेत्र २५० एकरपर्यंत पोहोचले. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व चारा वाहतुकीतील अडचणी येऊ लागल्या. चारा मागणीही कमी झाली. आता गावात सुमारे शंभर एकर चारा लागवड आहे. 
  • कापणी, कुट्टी व वाहतूक व्यवस्था शेतकऱ्यांच्या शेतातून कुशल मजुरांच्या साह्याने कापणी केली जाते. त्यानंतर चाफ कटरवर त्याची कुट्टी केली जाते. पशुसंवर्धन विभागाच्या योजनेतून ४५ पैकी ३६ शेतकऱ्यांनी चाफ कटर खरेदी केले. प्रत्येकी आठ हजार रुपयांचे अनुदान मिळाले. धांडा कापणीनंतर त्याची कुट्टी करतात. वजन करून २० किलोची पोती भरली जातात. प्रत्येक पोत्यावर संबंधित शेतकऱ्याच्या नावाची चिठ्ठी लावली जाते. प्रत्येक शेतकऱ्याचा पुरवठा त्वरित लक्षात येतो.  बेणे विक्री २०१८ मध्ये राज्यात दुष्काळ पडल्याने चारा बेण्याची मोठी टंचाई निर्माण झाली. अमरावती, चंद्रपूर, जालना, नागपूर, बुलडाणा या जिल्ह्यांतून चारा बेण्याची मागणी होती. आधी नोंदवलेल्या मागणीनुसार या शेतकऱ्यांना प्रति बेणे एक रुपये प्रमाणे बेण्याची विक्री केली. यातून गटातील शेतकऱ्यांना ७५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. असा आहे ताळेबंद (रुपये)

  • एकरी बियाणे.............८ ते ९ हजार
  • मशागत....................२ हजार
  • तणनियंत्रण.............,,३ हजार 
  • चाफ कटर...............२० हजार
  • सुपर फॉस्फेट (एक बॅग).............१४००  
  • कापणीसाठी मजुरी .............अडीच टनासाठी  अठराशे रुपये.
  • चारा भरण्यासाठी.............नेट बॅग २० किलोची    ९ रुपये
  • उत्पन्न.............एकरी एक ते एक लाख  ७० हजार रुपयांचे उत्पन्न  यातून होते.
  • वाहतूक खर्च पेंडी.............तीन हजार रुपये टन. कुट्टी.............साडेतीन हजार रुपये टन. 
  • नागपूरपर्यंत चारा नेण्यासाठी अडीच टन गाडीसाठी अडीच हजार रुपये वाहतूक खर्च येतो. अंतरानुसार हे दर कमी-जास्त होतात. गटाकडे वाहतुकीसाठी वाहने नाहीत. गावातील काही तरुणांना त्यातून स्वयंरोजगार मिळाला. - डॉ. उल्हास निमकर, ९९६०३४०९६९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com