agricultural news in marathi success story of womens self-help group from ratnagiri district | Agrowon

बचत गटांना पूरक उद्योगांची साथ

राजेश कळंबटे
रविवार, 11 एप्रिल 2021

माटवण-नवानगर (ता. दापोली) आणि हर्चे (ता. लांजा) येथील महिला बचत गटाने भात, कंद पिके, हळद लागवडीबरोबरच कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यावसायात आघाडी घेतली आहे.  

पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता उमेद अभियानाच्या चळवळीत सहभागी होत बचत गटांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील महिला गट स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहेत. माटवण-नवानगर (ता. दापोली) आणि हर्चे (ता. लांजा) येथील महिला बचत गटाने भात, कंद पिके, हळद लागवडीबरोबरच कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यावसायात आघाडी घेतली आहे. यातून महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होत आहेत.

दापोली तालुक्यातील माटवण-नवानगर या गावात भाग्यलक्ष्मी महिला स्वयंसाह्यता समूह गटाची स्थापना ऑक्टोबर २०१८ मध्ये झाली. या गटामध्ये उत्कर्षा उदय महाडिक (अध्यक्षा), अक्षता विराज महाडिक (सचिव), अपूर्वा अनिल महाडिक (उपाध्यक्षा) आणि स्मिता श्रीराम चव्हाण, मेघा महेश महाडिक, मेघा संतोष महाडिक, हर्षदा हरीश महाडिक, अनिता शंकर महाडिक, शकुंतला आत्माराम महाडिक, दीपिका दीपक महाडिक या सदस्या कार्यरत आहेत. सुरुवातीपासून उमेदच्या साह्याने विविध प्रशिक्षणे, क्षेत्रभेट आदी माध्यमांतून गटाला माहिती मिळाली. गटातील सदस्यांनी हळद उत्पादन व प्रक्रिया, अगरबत्ती, कुक्कुटपालन, मसाला पिकांचे उत्पादन, दुग्ध व्यवसाय सुरू केला. यामधून उत्पन्नाचे साधन तयार झाले. महिलांना दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये पूरक उद्योगांचे प्रशिक्षण मिळाले. 

कुक्कुटपालनाला चालना 
बचत गटाच्या माध्यमातून मिरची विक्री, मिरची पावडर आणि पापड निर्मिती हे  व्यवसाय सुरू होते. गटातील महिलांनी २०१८ मध्ये उमेद मध्ये सहभागी झाल्यानंतर कोंबडीपालनाचे प्रशिक्षण घेतले. गटातील चार जणींनी गावरान कोंबडीची प्रत्येकी १०० पिलांची बॅच घेतली. गेली दोन वर्षे या व्यवसायातून महिलांना चांगले उत्पन्न मिळत आहे. एका बॅचमधून महिलांना चार महिन्यांनी वीस हजारांचे उत्पन्न मिळते. राखण, शिमगोत्सव काळात गावरान कोंबडीला चांगली मागणी असते. या काळात एका कोंबडीला ५०० ते ५५० रुपये दर मिळतो. कोंबडी विक्रीच्या बरोबरीने दिवसाला २० ते २५ अंडी प्रति १० रुपयांना विकली जातात. कुक्कुटपालनामध्ये चार महिन्यांसाठी खाद्य आणि औषधांसाठी दहा हजार रुपये खर्च येतो. 

दुग्ध व्यवसायाची जोड
गटातील महिला शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांनी दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले आहे. चार महिलांनी पशुपालनाला सुरुवात केली आहे.  एका महिलेकडे सरासरी ५ ते ८ म्हशी आहेत. म्हशींच्या व्यवस्थापनामध्ये संपूर्ण कुटुंबाची मदत मिळते. म्हशींना खाद्यामध्ये भुस्सा, पेंड, गहू भरडा दिला जातो. या चार महिला प्रति दिन डेअरीला सरासरी १०० लिटर दूध जमा करतात. पशुपालनातून खर्च वजा जाता दरमहा १० हजार रुपये मिळतात, अशी माहिती उत्कर्षा महाडिक यांनी दिली.

हळद लागवडीला चालना
दापोली तालुक्यामध्ये गावठी हळदीला मागणी आहे. उमेदमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर गटातील दहा महिलांनी गेल्या दोन वर्षांपासून तीन एकरांवर सेलम जातीच्या हळद लागवडीला सुरुवात केली आहे. पिकाला सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. दरवर्षी सरासरी साडेतीनशे किलो हळद पावडरीची विक्री होते. गावी येणारे मुंबईकर चाकरमानी यांच्यासह दापोली तालुक्यात हळदीची ४०० रुपये किलो दराने विक्री होते.
- उत्कर्षा महाडिक  ९०२२५८२५१४

रोजगाराची मिळाली उमेद
उमेद अभियानांतर्गत जानेवारी २०१६ मध्ये हर्चे (ता. लांजा, जि. रत्नागिरी) गावातील दहा महिलांनी एकत्र येऊन समर्थकृपा स्वयंसाह्यता समूहाची स्थापना केली. उमेदमार्फत विविध प्रशिक्षणेही झाली. शेत मजुरीवर न राहता स्वतः शेतीपूरक व्यवसाय करण्याचा निर्णय या गटातील सदस्या चंद्रप्रभा शेलार यांनी घेतला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यांनी गटातून कमी व्याजदाराने पैसे घेतले. सुरुवातीला पंचायत समितीकडून मिळणाऱ्या अनुदानावर २० कोंबड्यांच्या दोन बॅच खरेदी केल्या. यातून कुक्कुटपालनाची मुहूर्तमेढ रोवली. गेली दोन वर्षे त्यांनी कुक्कुटपालनामध्ये चांगली गती घेतली आहे. या पूरक उद्योगात त्यांना मुलगा निखिल याची चांगली मदत होते.

असे आहे नियोजन 

  • कोंबड्यांसाठी घरातच एका खोली तयार केली. वीस कोंबड्यांसाठी लागणारे खाद्य विकत घेतले. पहिल्या बॅचमधून चार महिन्यांनी खर्च वजा जाता सहा हजार रुपये उत्पन्न मिळाले. 
  • सध्या कावेरी, गिरिराज जातींच्या चाळीस कोंबड्यांचे संगोपन. 
  • कोंबड्यांना गहू, ज्वारी, तांदूळ एकत्रभरडून दिले जाते. चांगली वाढ होण्यासाठी खाद्यामध्ये ॲझोलाचा वापर. चाळीस कोंबड्यांसाठी चार महिन्याला खाद्याचा खर्च अडीच ते तीन हजार रुपये. 
  • चार महिने संगोपन केल्यानंतर गावामध्ये कोंबडीची ३०० रुपये किलो दराने विक्री. 

हळद, काटे कणंग लागवडीतून उत्पन्नात वाढ 
चंद्रप्रभा शेलार यांनी बचत गटांमध्ये सहभागी झाल्यानंतर हळद लावगडीचा निर्णय घेतला. दहा गुंठे जमिनीवर जून महिन्यात हळद लागवड केली. पहिल्या वर्षी ५२ किलो हळद पावडर तयार झाली. हळदीचे व्यवस्थित पॅकिंग करुन गावामध्ये २५० रुपये किलो दराने विक्री केली. दुसऱ्या वर्षी ६१ किलो हळद पावडरीची निर्मिती झाली. हळदीबरोबरच त्यांनी तीन गुंठ्यांवर काटे कणंग या कंदपिकाची लागवड केली. याला औषधी उपचारासाठी चांगली मागणी आहे. हे कणंग रताळ्यासारखे उकडून खातात. या पिकासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. त्यामुळे कंद चांगले पोसतात. एका वेलापासून अर्धा किलो कणंग मिळते. गतवर्षी त्यांना १०० किलो कणंग मिळाले. खर्च वजा जाता कंद विक्रीतून पंधरा हजारांचे उत्पन्न शेलार यांना मिळाले.
- चंद्रप्रभा शेलार    ९४२२४६०३७०
 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
फळबागेतून शेती झाली फायद्याची..उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...