agricultural news in marathi success story Yadavbagh brand of organic jaggery | Page 2 ||| Agrowon

सेंद्रिय गुळाचा ‘यादवबाग’ ब्रॅण्ड !

सुदर्शन सुतार
शनिवार, 2 ऑक्टोबर 2021

मारापूर (जि. सोलापूर) येथील हरिभाऊ यादव यांनी गूळनिर्मिती उद्योगात उतरण्याचं धाडस केलं. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी सेंद्रिय पद्धतीने गूळ आणि त्याच पद्धतीने ऊस उत्पादनही सुरू केले. आज महिन्याला ‘यादवबाग’ ब्रॅण्डखाली दोन टनांपर्यंत विक्रीचे उद्दिष्ट ठेवून त्यांनी बाजारपेठ तयार करण्यास सुरुवात केली आहे.
 

घरची वर्षानुवर्षांची ऊसशेती. मात्र मिळणाऱ्या कमी दरामुळे मारापूर (जि. सोलापूर) येथील हरिभाऊ यादव यांनी गूळनिर्मिती उद्योगात उतरण्याचं धाडस केलं. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी सेंद्रिय पद्धतीने गूळ आणि त्याच पद्धतीने ऊस उत्पादनही सुरू केले. आज महिन्याला ‘यादवबाग’ ब्रॅण्डखाली दोन टनांपर्यंत विक्रीचे उद्दिष्ट ठेवून त्यांनी बाजारपेठ तयार करण्यास सुरुवात केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा शहरापासून आठ किलोमीटरवर मारापूर हे माण नदीच्या काठावर वसलेलं आणि निसर्गदत्त देणगी लाभलेलं गाव आहे. पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे या भागात उसाची शेती सर्वाधिक होते. गावात हरिभाऊ यादव यांची २१ एकर शेती आहे. आई-वडील, पत्नी, छोटा भाऊ, भावजय असे त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. वडील मारुती सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत.

सुरुवातीचा संघर्ष
हरिभाऊ घरात मोठे. सन १९९५ मध्ये त्यांनी बीएची पदवी घेतली. त्यानंतर ते राजकारणात उतरले. जवळपास २००४ पर्यंत ते त्यात सक्रिय होते. पण त्यातून हाती काहीच लागलं नाही. उलट आर्थिक नुकसानच झालं. मग घरच्या शेतीवर लक्ष केंद्रित केलं. ऊसशेती केली. पण आर्थिकदृष्ट्या परवडेना. त्यात भर म्हणून दुष्काळ पडला. मग २०११२-१३ च्या दरम्यान ते मुंबईला गेले. तिथे बांधकाम व्यवसायाची छोटी-मोठी कंत्राटं घेतली. त्यात पुरेसं यश मिळालं नाही. अखेर २०१५ मध्ये पुन्हा गाव गाठलं. या वेळी मात्र शेतीत भरीव व नियोजनबद्ध काहीतरी करायचं असं ठरवलं.

गटाद्वारे मिळाला मार्ग
नव्यानं सुरुवात केली. त्या वेळी मंगळवेढा येथे कृषीक्रांती फार्मर्स क्लबच्या माध्यमातून काही तरुण शेतकरी एकत्र आले होते. त्यात हरिभाऊही सहभागी झाले. मोठ्या धाडसानं सर्वांनी मिळून शेडनेटमध्ये ढोबळी मिरची घेतली. अनेकांनी चांगलं उत्पन्नही घेतलं. हरिभाऊंनाही आर्थिक प्राप्ती चांगली झाली. उत्साह वाढला.

गूळनिर्मितीचा पर्याय
ढोबळी मिरची घेताना रासायनिक कीडनाशकांच्या फवारण्या कराव्या लागत. हा वापर कुठेतरी थांबवला पाहिजे असं त्यांचं मन सांगत होतं. त्यातून सेंद्रिय शेती करायचं ठरवलं. ऊस कारखान्याला देणं परवडत नव्हतं. मग सेंद्रिय पद्धतीने पिकवून गूळनिर्मिती करावी व उद्योजक व्हावं असा विचार मनात आला. सन २०१७ मध्ये श्रीगणेशा केला.

प्रकल्प उभारणी
पंढरपूर भागातील पटवर्धन कुरोली येथून ८० हजार रुपयांचे इंजिनवरील क्रशर खरेदी केले. दिवसभरात दहा टनांपर्यंत गाळप करण्याची त्याची क्षमता आहे. शेतातच शेड उभारले. रस उकळण्यासाठी साडेतीनशे लिटर क्षमतेच्या दोन कढया बसतील अशा दोन चुलवण तयार केल्या. बाजूला गुळासाठी वाफे तयार केले. सर्व साहित्य, शेडसाठी एकूण दोन लाख रुपये खर्च आला. कल्पतरू बचत गटातून कर्ज काढले.

सेंद्रिय गूळनिर्मिती प्रक्रिया
ऊस उत्पादन

 • यामध्ये सर्वप्रथम ऊस सेंद्रिय पद्धतीने पिकवला जातो. सुमारे नऊ एकर त्याचे क्षेत्र आहे.
 • सुरुवातीला एक-दोन वर्षे अडचण आली. पण आता पूर्णपणे रसायनमुक्त पिकवला जातो.
 • प्रामुख्याने ८००५ या वाणाची व आडसाली हंगामाची निवड केली आहे.
 • लागवडीआधी एकरी पाच ट्रॉली शेणखत आणि एक ट्रॉली गांडूळ खत वापरले जाते.
 • लागवडीनंतर जिवामृत, वेस्ट डीकंपोजर आदी सेंद्रिय घटकांचा वापर एकरी एक बॅरल प्रमाणे होतो.
 • साधारण बारा महिन्यांपर्यंत प्रत्येकी ठरावीक काळानंतर त्याचा वापर होतो.
 • नोव्हेंबरमध्ये गूळहंगाम सुरू होतो. तो मेपर्यंत चालतो. या हंगामाच्या हिशेबाने उसाची उपलब्धता व्हावी यासाठी आडसाली लागवडीनंतर दर महिन्याला आलटून-पालटून प्रत्येकी दोन-दोन एकरांचे प्लॅाट पाडले जातात. त्यामुळे गाळपासाठी टप्प्याटप्प्याने ऊस उपलब्ध होतो.
 • एकरी साधारण २५ ते ३० टनांपर्यंत उत्पादन मिळते.

गूळ उत्पादन

 • क्रशरवर उसाचे गाळप करून घेतले जाते. त्याचा रस कढईत ओतला जातो.
 • रसाला चांगली उकळी दिली जाते. त्यानंतर मळी काढली जाते.
 • रसात औषधी गुणधर्म असणारी रानभेंडी आणि घट्टपणा येण्यासाठी चुना टाकला जातो.
 • बाकी कोणतेही रसायन त्यात वापरले जात नाही.
 • थेट वाफ्यामध्ये मिश्रण थंड करायला ठेवले जाते.
 • त्यानंतर पाव, अर्धा, एक आणि पाच किलो या वजनानुसार गुळाच्या ढेपा तयार केल्या जातात.
 • हंगामात मागणीनुसार काकवीही तयार केली जाते.

यादवबाग नावाने ब्रॅण्डिंग
गुळाचं विपणन, ‘ब्रॅण्डिंग’ महत्त्वाचं होतं. गटाच्या माध्यमातून पीजीएस प्रमाणपत्र घेतलं. ‘यादवबाग’ ब्रॅण्ड तयार केला. आवश्‍यक परवाने घेऊन पॅकिंग तयार केलं. सुरवातीला नातेवाईक, मित्र-मंडळी व त्यानंतर छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना गूळ देण्यात येऊ लागला. सेंद्रिय व गुणवत्ता या बळावर ग्राहकांकडून पसंती येऊ लागली. ग्राहकांसाठी किलोला १०० ते १२५ रुपये, तर घाऊक दर ९० रुपये ठेवला आहे. सध्याची व्यवसायाची एकूण गुंतवणूक १० लाखांपर्यंत आहे.

मंगळवेढा, सोलापूर, पुणे, ठाणे या शहरांतही काही मॉल्स आणि दुकानदारांकडून गूळ विक्रीस ठेवण्यात आला आहे. महिन्याला सुमारे दोन टनांपर्यंत विक्रीचे उद्दिष्ट ठेवून तसा प्रयत्न होत आहे. वार्षिक ३० लाख रुपयांपर्यंत उलाढालीपर्यंत पोचल्याचे यादव सांगतात. कृषी विभाग- आत्माचे विक्रम सावंजी, शैलेंद्र पाटील यांनीही मार्गदर्शन केले आहे. सध्या स्वतःकडील ऊस पुरतो आहे. मात्र भविष्यात गटातील शेतकऱ्यांकडून घेऊन उद्योग वाढवण्याचा विचार आहे.

संपर्क ः हरिभाऊ यादव, ७५८८०१९७३०


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
राज्याला आदर्श ठरणारी जाधवांची अंजीर...पुरंदर तालुक्यातील गुरोळी (जि. पुणे) येथील...
व्यावसायिक दृष्टिकोनातून पोल्ट्री अन...पवनी (जि. अमरावती) येथे शेती असलेल्या संदीप राऊत...
केळी प्रक्रियेतून गटाची आर्थिक प्रगतीशिंदखेडा (ता. रावेर, जि. जळगाव) येथील ‘सरस्वती...
दर्जेदार, शास्त्रीय पद्धतीने गांडूळ...माळीवाडगाव (जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी...
राइसमिल’द्वारे शोधला स्वयंरोजगार,...सांगली जिल्ह्यातील मोरेवाडी (शेडगेवाडी) येथील...
एकट्याने नव्हे, इतरांना घेऊन पुढे जाऊ;...एकटा नाही तर इतरांना घेऊन पुढे जाऊ हा विचार टेंभे...
आंब्यासाठी उभारले स्वतःचे रायपनिंग चेंबररत्नागिरी येथील संयुक्त झापडेकर कुटुंब आंबा...
घोळवा परिसर झाला कांद्याचे ‘क्लस्टर’हिंगोली जिल्ह्यातील डोंगराळ भागातील घोळवा (ता....
अन्नप्रक्रिया यंत्रनिर्मितीतील सावंत...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रकाश सावंत...
अधिक ‘कुरकुमीन’ युक्त हळदीचा यशस्वी...पास्टुल (जि. अकोला) येथील संतोष घुगे यांनी आपल्या...
मुक्तसंचार व तंत्रशुध्द पद्धतीने...सातारा जिल्ह्यातील चौधरवाडी येथील हाफीज काझी...
शेतीला मिळाली दुग्ध व्यवसायाची जोडपुण्याच्या पश्‍चिम भागातील मुळशी तालुक्याच्या...
सीताफळाचा ‘कांचन’ ब्रॅण्ड अन्...पंधरा वर्षांपासून सीताफळ लागवडीत हातखंडा, फळाचा...
लाकडी घाण्यावरील तेलाची युवा...कापसेवाडी (जि. सोलापूर) येथील युवा अभियंता संदीप...
नरवाडने जोपासली पानमळ्याची परंपरासांगली जिल्ह्यातील नरवाड हे गाव खाऊच्या पानांसाठी...
एकरी ४० टन सातत्यपूर्ण दर्जेदार केळी...नेवासे (जि. नगर) येथील पठाण कुटुंबाने ऊस पट्ट्यात...
मधमाशीपालनातून मिळाली स्वयंरोजगाराची...उत्तर प्रदेशातील मदारपूर केवली (ता. गोसाईगंज, जि...
प्रयोगशीलतेला दिली तंत्रज्ञानाची जोडप्रयोगशीलता आणि तंत्रज्ञान वापर या दोन बाबी शेतीत...
वडजीत फुलतात वर्षभर गुलाबाचे मळेसोलापूर जिल्ह्यातील वडजी गावशिवारात वर्षभर देशी...
रोपनिर्मिती व्यवसायाने दिला हातभारगळवेवाडी (जि. सांगली) येथील राजाराम गळवे अनेक...