ऊस पीक सल्ला

जोड ओळ पद्धतीने ऊस लागवड
जोड ओळ पद्धतीने ऊस लागवड

सुरू ऊस

  • लागवडीसाठी जमिनीची मशागत करून एकरी आठ टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत  मिसळावे. सलग ऊस लागवडीसाठी दोन सऱ्यांमधील अंतर १.२० मीटर (४ फूट) ठेवावे. जोड ओळ पद्धतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीत २.५ फूट व भारी जमिनीत तीन फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात. त्यानंतर प्रत्येक दोन ओळीत ऊस लागवड करून तिसरी ओळ मोकळी ठेवावी. यामुळे मध्यभागी ५ ते ६ फुटांचा मोकळा पट्टा राहील.
  • लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करावी. लागवडीसाठी को. ८६०३२, को. ९४०१२, को सी ६७१, फुले ०२६५, को. ९२००५ किंवा एमएस १०००१ यापैकी एका जातीची निवड करावी.  
  • लागवडीसाठी बेणे मळ्यातील १० ते ११ महिन्यांचे शुद्ध, निरोगी व रसरशीत बेणे निवडावे. खोडवा-निडव्याचा ऊस लागणीसाठी वापरू नका.
  • बेणे प्रक्रिया ः १०० लिटर पाण्यात ३०० मि.लि. मॅलॅथिऑन (५० टक्के प्रवाही) आणि १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम चांगले मिसळावे. त्यामध्ये टिपऱ्या १० मिनिटे बुडवाव्यात. त्यानंतर स्वतंत्रपणे १०० लिटर पाण्यात ॲसेटोबॅक्टर जिवाणू संवर्धक एकरी ४ किलो आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक ५०० ग्रॅम मिसळून या द्रावणात टिपऱ्या ३० मिनिटे बुडवाव्यात. त्यानंतर लगेच लागवड करावी. यामुळे नत्र खताच्या मात्रेत ५० टक्के व स्फुरद खताच्या मात्रेत २५ टक्के बचत होते.
  • मध्यम जमिनीत पाण्याबरोबर ओली लागण करावी. भारी व चोपण जमिनीत कोरडी लागण करून लगेच पाणी द्यावे. दोन टिपऱ्यामधील अंतर १५ ते २० सें.मी. ठेवावे. एक डोळ्याच्या टिपऱ्या असल्यास दोन टिपऱ्यांमध्ये एक फूट अंतर ठेवावे. रोप लागवड करावयाची असल्यास दोन रोपांमध्ये दोन फूट अंतर ठेवावे.
  • खतमात्रा ः

  • लागवडीच्या वेळी एकरी १० किलो नत्र (२२ किलो युरिया), २३ किलो स्फुरद (१४४ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि २३ किलो पालाश (३८ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) सरीमध्ये पेरून द्यावे. युरियाबरोबर ६ : १ या प्रमाणात निंबोळी पेंड (४ किलो) मिसळून द्यावी. माती परीक्षण करून सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास एकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मँगेनीज सल्फेट आणि २ किलो बोरॅक्स शेणखतात मिसळून रांगोळी पद्धतीने ४ ते ५ सें.मी. खोलीवर मिसळावे. को ८६०३२ ही जात रासायनिक खताला जास्त प्रतिसाद देते. त्यामुळे या जातींसाठी २५ टक्के रासायनिक खतांची मात्रा जास्त वापरावी. ॲसेटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची बेणे प्रक्रिया केली असल्यास नत्र खत (युरिया) शिफारशीच्या ५० टक्के आणि  स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट) शिफारशीच्या ७५ टक्के वापरावे. लागणीनंतर १०-१२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.    
  • लागवड झालेल्या क्षेत्रामध्ये उगवणीनंतर नांगे भरण्यासाठी प्लॅस्टिक पिशवी किंवा प्लॅस्टिक ट्रे मध्ये किंवा गादी वाफ्यावर एक डोळा वापरून रोपे तयार करावी.
  • तण नियंत्रण ः

  • उगवणीपूर्वी नियंत्रण करण्यासाठी लागवडीनंतर ४-५ दिवसांनी (जमीन वाफशावर असताना) एकरी २ किलो ॲट्राझीन किंवा ६०० ग्रॅम मेट्रीब्युझीन हे तणनाशक प्रति ४०० लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण जमिनीवर सकाळी किंवा सायंकाळी फवारावे. फवारलेली जमीन तुडवू नये. यासाठी फवारणी करत पाठीमागे जावे.
  • आडसाली ऊस
  • बांधणीच्या अवस्थेत असलेल्या उसामध्ये नांगरीच्या साहाय्याने वरंबे फोडून एकरी ६४ किलो नत्र (१३९ किलो युरिया), ३४ किलो स्फुरद (२१३ किलो सिंगल सुपर फास्फेट) आणि ३४ किलो पालाश (५६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) खतमात्रा एकत्र मिसळून एकूण सऱ्यांच्या संख्येत विभागून द्यावी.
  • लागवड करताना सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला नसल्यास तसेच माती परीक्षण करून सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास एकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मँगेनीज सल्फेट आणि २ किलो बोरॅक्स शेणखतात मिसळून रांगोळी पद्धतीने सरीत द्यावे.
  • रिजरच्या साहाय्याने बांधणी करावी. रान बांधून लगेच पाणी द्यावे. को ८६०३२ या जातीसाठी रासायनिक खतांची मात्रा २५ टक्के वाढवून द्यावी.  युरीया बरोबर ६:१ या प्रमाणात निंबोळी पेंड (२३ किलो) मिसळून द्यावी.
  • पिठ्या ढेकूण ः जैविक नियंत्रण

  • व्हर्टिसिलियम लेकॅनी भुकटी व द्रव अशा स्वरुपात उपलब्ध असते.
  • प्रमाण : व्हर्टिसिलियम लेकॅनी १ मि.लि. किंवा १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणात १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात.   किंवा क्रिप्टोलेमस मॉंन्ट्रॉझेरी या मित्र कीटकाचे प्रति हेक्टरी १५०० प्रौढ संध्याकाळी उसाच्या पानावर सोडावेत.
  • रासायनिक नियंत्रण : (फवारणी प्रतिलिटर पाणी)
  • मॅलॅथिऑन - ३ मि.लि.    किंवा  डायमेथोएट  - २.६ मि.लि.  
  • संपर्क : ०२१६९-२६५३३४ (मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com