कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेती

औषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात. वाढती मागणी आणि दरातील सातत्य यामुळे कोरडवाहू व दुष्काळी भागात वनशेतीमध्ये चिंचेची लागवड फायदेशीर ठरते.
Intercropping of lemon grass in tamrind cultivation
Intercropping of lemon grass in tamrind cultivation

औषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात. वाढती मागणी आणि दरातील सातत्य यामुळे कोरडवाहू व दुष्काळी भागात वनशेतीमध्ये चिंचेची लागवड फायदेशीर ठरते.  चिंच विविध प्रकारच्या हवामानामध्ये योग्यरीत्या वाढू शकते. अर्ध शुष्क व उष्णकटिबंधीय भागांमध्ये चांगली वाढ होते.उच्च तापमान (४८ अंश से.) सहन करण्याची क्षमता असल्यामुळे कमी पावसाच्या दुष्काळी भागासाठी हे पीक फायदेशीर आहे. हे झाड ४०० ते १५०० मिमी पावसाच्या प्रदेशात वाढते. कोकणासारख्या जास्त पाऊस (४००० मिमी) पडणाऱ्या क्षेत्रामध्ये सुद्धा वाढते. परंतु जास्त पावसामध्ये व्यापारीदृष्ट्या फळधारणा होत नाही. कोकण तसेच नगर, सोलापूरसारख्या अतिशय कमी पाऊस पडणाऱ्या दुष्काळी भागातही झाडे वाढतात.  जमीन

  • विविध प्रकारच्या जमिनीमध्ये वाढू शकते. मध्यम ते हलकी व खोल, उताराची जमीन योग्य असते. त्याचबरोबर हलक्या, मुरमाड जमिनीत, माळरान, डोंगरउतारावर, मध्यम काळ्या, भारी काळ्या आणि पोयट्याच्या जमिनीत झाडे चांगली वाढून उत्पादन देतात, परंतु अत्यंत दलदलीच्या, पाणी साचून राहणाऱ्या भागात चिंचेच्या झाडाची वाढ होत नाही. अशा जमिनीत पाण्याच्या योग्य निचऱ्याची काळजी घ्यावी.
  • राष्ट्रीय अजैविक ताण संशोधन संस्था, बारामती येथे अतिशय कठीण व पाषाणयुक्त खडकाळ जमिनीमध्ये चिंचेची लागवड केली आहे.
  • अभिवृद्धी 

  • अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून किंवा गुटी कलमे, भेट कलमे तयार करून केली जाते. 
  • बियांपासून तयार केलेल्या रोपांचे खात्रीलायक उत्पादन मिळेल याची खात्री नसते. म्हणूनच चिंचेची व्यापारी तत्त्वावर कलमे वापरून लागवड करावी.  
  • रोपे तयार करण्यासाठी १० सेंटिमीटर रुंद आणि ३० सेंटिमीटर लांबीची ३०० गेज पॉलिथिनची पिशवी घ्यावी. पिशवीच्या खालच्या निम्म्या भागावर छिद्रे पाडावीत. त्यानंतर पिशव्या चांगले कुजलेले शेणखत आणि पोयटा मातीने (२:१) भरून घ्याव्यात.
  • ताजे चिंचोके कोमट किंवा थंड  पाण्यामध्ये १२ ते २४ तास भिजवून नंतर सावलीत सुकवून बीजरोपण केल्याने उगवण चांगली होते. मे - जून महिन्यात प्रत्येक पिशवीत असे चिंचोके पेरावेत.
  • झाडावर गुटी कलम बांधण्यासाठी एका वर्षाची फांदी निवडून साधारणपणे ३ ते ४ सेंटिमीटर लांबीचा गोलाकार काप घेऊन साल काढावी. त्यावरती ३,००० पी.पी.एम. तीव्रतेचे आयबीए संजीवक लावून ओलसर शेवाळ बांधून पॉलिथिनच्या कागदाने गुटी बांधावी. चांगली मुळे आल्यानंतर गुटी कलम मातृवृक्षापासून वेगळे करावे. 
  • भेट कलमाने रोपे तयार करण्यासाठी बियांपासून पॉलिथिनमध्ये तयार केलेली रोपे घ्यावीत. दरवर्षी नियमितपणे दर्जेदार आणि भरपूर फळे देणाऱ्या उत्कृष्ट जातीचे चिंचेचे झाड डोळ काडीसाठी निवडावे. ही रोपे सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत कलम करण्याजोगी होतात. या रोपांची जाडी पेन्सिलच्या जाडीपेक्षा किंचित कमी असावी व तितक्याच जाडीच्या फांद्या मातृवृक्षावरती निवडाव्यात. खुंटरोप आणि डोळाकाडीवर सारख्या आकाराचे ५ ते ६ सेंटिमीटर लांबीचे काप घेऊन ते एकमेकांवर बसवून कलमाचा हा जोड पॉलिथिन कागदाच्या पट्टीने घट्ट बांधावा ३ ते ४ महिन्यांनी कलमाचा जोड एकजीव झाल्यावर कलम मातृवृक्षापासून वेगळे करावे. 
  • प्रमुख जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये शिवाई एकूण विद्राव्य घटकाचे प्रमाण (४१.६ %), फळाची आम्लता (३१.२ %), नियमित फळधारणा, रोगास कमी बळी पडते. ५०-१५० किलो प्रती झाड उत्पादन. प्रतिष्ठान  आम्लतेचे प्रमाण १८ %, नियमित फळधारणा, फळाची सरासरी लांबी ७.५ सें.मी. रंग तांबूस तपकिरी, फळाचा आकार सरळ, गराचा रंग पिवळसर तांबडा, एक किलो कच्च्या चिंचेपासून ६०० ग्रॅम गर, १५६ ग्रॅम चिंचोके मिळतात. १५०-२०० किलो प्रति झाड उत्पादन. चिंच नं.२६३ आम्लतेचे प्रमाण १८ %, नियमित फलधारणा,  ६ ते १० क्विंटल प्रति झाड उत्पादन. अजिंठा    आम्लतेचे प्रमाण ५.१९ %, नियमित फलधारणा,१ ते ३ क्विंटल प्रति झाड उत्पादन. अकोला स्मृती (एकेटी-१०)     दरवर्षी उत्पादन, फळाचा आकार तिरपा, सरासरी वजन १८.५३ ग्रॅम, आम्लता १४.४३ %, १ ते २ क्विंटल प्रति झाड उत्पादन. योगेश्‍वरी (नं. २६३)    फळाची सरासरी लांबी ७ सें.मी. फळे दरवर्षी येतात. गर कमी आंबट व जादा गोड, एक किलो कच्च्या चिंचेमध्ये गराचे प्रमाण ६० ते ६१ टक्के, चिंचोक्याचे प्रमाण १३ ते १५ टक्के.  पीकेएम -१   लागवडीनंतर दुसऱ्या वर्षी फुले लागतात. मात्र  दुसऱ्या वर्षीचा मोहोर झाडावा. तिसऱ्या वर्षी  झाडाला फांद्या, उपफांद्या भरपूर फुटतात. झाडाचा विस्तार वाढतो. म्हणून तिसऱ्या वर्षापासून फळे घ्यावीत. गोमा प्रतीक    फळाची लांबी १६.७० सें.मी. आणि जाडी १.२५ सें.मी. एकूण विद्राव्य घटकाचे प्रमाण (७१ डिग्री ब्रिक्स), फळाची आम्लता (१४.०६ %), उत्पादन ०.५-०.६ क्विंटल प्रति झाड

    टीप :  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रतिष्ठान, अजंठा व शिवाई या जातींची कोरडवाहू भागामध्ये लागवडीची शिफारस केली आहे.  

    - विजयसिंह काकडे (उद्यान विद्या)   ७३८७३५९४२६ - संग्राम चव्हाण (वनशेती) ९८८९०३८८८७ (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com