तंत्र भुईमूग लागवडीचे...

भुईमूग उत्पादन वाढीसाठी गादी वाफ्याचा वापर करून त्यावर प्लॅस्टिक आच्छादन तंत्राचा वापर करावा. कोकण विभागात रब्बी हंगामात २० ऑक्टोबर ते नोव्हेंबर शेवट आणि उशिरा रब्बी लागवड १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरच्या दरम्यान करावी.
गादीवाफ्यावर प्लॅस्टिक आच्छादनकरून भूईमूग लागवड
गादीवाफ्यावर प्लॅस्टिक आच्छादनकरून भूईमूग लागवड

भुईमूग उत्पादन वाढीसाठी गादी वाफ्याचा वापर करून त्यावर प्लॅस्टिक आच्छादन तंत्राचा वापर करावा. कोकण विभागात रब्बी हंगामात २० ऑक्टोबर ते नोव्हेंबर शेवट आणि उशिरा रब्बी लागवड १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरच्या दरम्यान करावी. भुईमूग पिकासाठी मध्यम, सेंद्रिय पदार्थांनी युक्त आणि चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. भाताची कापणी झाल्याबरोबर जमीन वापसा अवस्थेत असताना १५ ते २० सेंमी खोलीपर्यंत नांगरून भुसभुशीत करावी. चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी ७.५ टन किंवा गांडूळ खत हेक्टरी ५ टन मातीत चांगले मिसळावे. पेरणीसाठी जमीन तयार करावी. सुधारित जाती  कोकणात लागवडीसाठी सुधारित उपट्या जातींचा वापर करावा. जात---------------------------- कालावधी(दिवस)  कोकण गौरव-------------------१२५-१३०- ट्रॉबे कोकण टपोरा-------------११५-१२० टी.ए.जी.२४--------------------११०-१२० कोकण भूरत्न ------------------११५-१२० टी.जी.२६ ---------------------११५-१२० टी.जी.३७ ए ------------------११५-१२० टी.पी.जी.४१------------------१२०-१२५ बियाणे आणि बीजप्रक्रिया

  • हेक्टरी १०० ते १२५ किलो प्रमाणित बियाणे वापरावे. बियाण्याची उगवण शक्ती ८० टक्के पेक्षा जास्त असावी.
  • मूळकूज तसेच खोडकूज रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बियाण्यास प्रति किलो बियाणास २.५ ग्रॅम कार्बेन्डाझीम किंवा ५ ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी एक दिवस आधी रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी.त्यानंतर प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम यझोबियम, २५० ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक आणि २५० ग्रॅम पालाश उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. यामुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते. प्रक्रियेनंतर बियाणे सावलीत वाळवावे आणि वाळल्यानंतर लगेचच पेरणी करावी. बुरशीनाशकाची प्रक्रिया प्रथम करून नंतरच लगेचच जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
  • लागवड तंत्र 

  • रब्बी हंगामात २० ऑक्टोबर ते नोव्हेंबर शेवट आणि उशिरा रब्बी लागवड १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरच्या दरम्यान करावी.
  • लागवड सपाट वाफ्यावर, गादी वाफ्यावर किंवा सरी वरंबा करून ३० बाय १५ किंवा ४५ बाय १० सें.मी.अंतरावर टोकण पद्धतीने करावी. बियाणे ३ ते ४ सें.मी. खोलीवर पेरावे.
  • लागवडीस उशीर झाल्यास फुलोरा ते शेंगा तयार होण्याच्या कालावधीमध्ये जास्त तापमान राहिल्यास उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. तसेच पीक उशिरा काढणीस आल्यास कोकणात पूर्व हंगामी पावसामध्ये सापडण्याची शक्यता असते.
  • प्लॅस्टिक आच्छादन तंत्र 

  • गादी वाफ्याचा वापर करून त्यावर प्लॅस्टिक आच्छादन वापरल्यास उत्पादनात वाढ होते. प्लॅस्टिक फिल्म आच्छादन केल्यामुळे जमिनीचे तापमान २ ते ५ अंश सेल्सिअसने वाढते. त्यामुळे बियाण्याची उगवण आणि सुरवातीची वाढ जोमाने होते. थंडीच्या कालावधीतही पेरणी करणे शक्य होते.
  • पाण्याचे बाष्पीभवन कमी होत असल्यामुळे जमिनीत पाणी साठवून ठेवण्यास मदत होते. पाण्याची बचत होते.
  • तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. जमिनीतील सूक्ष्म जिवांणूची कार्यक्षमता वाढते. रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. जमीन भुसभुसीत राहते आणि पिकाचा पक्वता कालावधी ७ ते १० दिवसांनी कमी होतो.
  • प्लॅस्टिक फिल्म आच्छादन वापरण्यासाठी गादी वाफे हे ८ ते १० सें.मी. उंच, वरच्या पृष्ठभागाला ६० सें.मी. रुंदीचे करावेत.दोन गादी वाफ्यातील अंतर १ मीटर ठेवावे. गादी वाफ्याची लांबी जमिनीच्या उतारानुसार आणि शेताच्या आकारमानानुसार ठेवावी.
  • वरचा पृष्ठभाग खडे, ढेकळे विरहित आणि मऊ असावा. त्यामुळे प्लॅस्टिक फिल्म गादी वाफ्यावर घट्ट बसून राहते. प्लॅस्टिक फिल्म आणि जमीन यामध्ये हवेची पोकळी राहत नाही. हवेची पोकळी राहिली तर जमिनीचे अपेक्षित तापमान वाढत राहत नाही.
  • आच्छादनासाठी ५ ते ७ मायक्रॉन जाडीची पांढऱ्या रंगाची ९० सें.मी. रुंदीची आणि आवश्यक त्या लांबीची प्लॅस्टिक फिल्म वापरावी. त्यासाठी हेक्टरी ४४ किलो प्लॅस्टिक फिल्म लागते.
  • आच्छादनापूर्वी प्लॅस्टिक फिल्मला २० सें.मी. अंतरावर तीन ओळीमध्ये १० सें.मी. वर ३ ते ४ सें.मी. व्यासाची छिद्रे पाडून घ्यावीत.
  •  शिफारशीनुसार खतांच्या संपूर्ण मात्रा प्लॅस्टिक फिल्म आच्छादन करण्यापूर्वी देणे आवश्यक आहे.
  • गादी वाफ्यावर पुरेसे पाणी देवून वापसा येताच शिफारशीत तणनाशकाची फवारणी करून घ्यावी. तणनाशकाच्या फवारणीनंतर प्लॅस्टिक आच्छादन गादी वाफ्यावर पसरून घ्यावे. आच्छादन वाऱ्याने उडू नये आणि जमिनीला घट्ट धरुन राहावे यासाठी प्लॅस्टिक फिल्मच्या कडा ताणून त्यावर माती टाकून घट्ट कराव्यात.
  • प्रक्रिया केलेले बियाणे आच्छादनास पाडलेल्या छिद्रामध्ये ३-४ सें.मी. खोल पेरावे. प्रत्येक ठिकाणी दोन बिया टोकाव्यात.
  • खत व्यवस्थापन 

  •  जस्ताच्या कमतरतेमुळे पाने लहान राहतात, पानाच्या शिरामधील भाग पिवळा दिसतो. नंतर पाने वाळल्यासारखी दिसतात. जमिनीत जस्ताचे प्रमाण कमी असल्यास हेक्टरी २० किलो झिंक सल्फेट पेरणीच्या वेळेस जमिनीत मिसळून घ्यावे. उभ्या पिकामध्ये कमतरता आढळल्यास ५ ग्रॅम झिंक सल्फेट प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  • पेरणीनंतर ३० ते ५० दिवसाचे पीक असताना ६ ग्रॅम बोरीक आम्ल १० लिटर पाण्यात विरघळून फवारावे. पेरणीपूर्वी हेक्टरी ५ किलो ग्रॅम बोरॅक्स जमिनीत मिसळले तर बोरॉनची कमतरता भासत नाही.
  • ज्या जमिनीत कॅल्शिअमचे प्रमाण कमी आहे. अशा जमिनीत प्रती हेक्टरी ५०० किलो जिप्सम सम प्रमाणात विभागून पेरणीच्या वेळी आणि पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी २ हप्त्यांत झाडालगत ५ सें.मी. अंतरावर ज्या भागात आऱ्यांची वाढ होते तेथे पेरून दिल्यास उत्पादनात वाढ होते. जिप्सममधून कॅल्शिअम आणि गंधक मिळत असल्यामुळे आऱ्या जमिनीत जाण्यास आणि शेंगा पोसण्यास मदत होते.
  • आंतरमशागत 

  • पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘स्वस्तिक’ अवजाराच्या सहाय्याने किंवा प्रचलित पद्धतीने (कुदळ, नांगर यांचा वापर करून) मातीची भर द्यावी. त्यामुळे आऱ्या जमिनीत जाण्यास आणि शेंगा पोसण्यास मदत होते.
  •  भर दिल्यानंतर १५ दिवसांनी रिकामे पिंप फिरवावे. त्यामुळे जमिनीत घुसणाऱ्या आऱ्या आणि परिणामी शेंगाची संख्या वाढल्याने उत्पादनात वाढ होते.
  • पाणी व्यवस्थापन 

  • पेरणीपूर्वी पाण्याची पहिली पाळी देवून वापसा आल्यावर पेरणी करावी आणि लगेच दुसरे हलके पाणी द्यावे. त्यानंतर उगवण होईपर्यंत पाणी देण्याची गरज नाही.
  • पीक फुलोऱ्यावर असताना, आऱ्या येण्याच्या वेळेस आणि शेंगा भरण्याच्या काळात पाण्याचा नियमित पुरवठा होईल याची काळजी घ्यावी.
  • संपर्क - डॉ. विजय सागवेकर ९४२३३०३२३२ डॉ. प्रशांत बोडके ९४२०४१३२५५ डॉ. विजय शेटे ९४२१३४३५६२ (कृषि विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली जि.रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com