Baswant 780 and Phule Samarth variety onions
Baswant 780 and Phule Samarth variety onions

कांदा बीजोत्पादनाचे शास्त्रीय तंत्र

कांदा बीजोत्पादनासाठी मातृकांद्याची निवड काळजीपूर्वक करावी. कांदे गोल, मध्यम किंवा मोठ्या आकाराचे, आकर्षक आणि एकसारख्या रंगाचे असावेत. शक्यतो एका डोळ्याचे कांदे निवडावेत. कांदे चांगले सुकलेले असावेत.

कांदा बीजोत्पादनासाठी मातृकांद्याची निवड काळजीपूर्वक करावी. कांदे गोल, मध्यम किंवा मोठ्या आकाराचे, आकर्षक आणि एकसारख्या रंगाचे असावेत.  शक्यतो एका डोळ्याचे कांदे निवडावेत. कांदे चांगले सुकलेले असावेत. मागील वर्षी भारतात सरासरी १२.७ लाख हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली. म्हणजेच सुमारे ९ ते १० हजार टन बियाण्याची पेरणी झाली. यातील केवळ एक हजार टन बियाणे हे प्रमाणित आणि शिफारशीत जातींचे होते. उर्वरित बियाणे शेतकऱ्यांनी स्वतः तयार केले. कांदा बीजोत्पादन करताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केलेला नसल्यास बियाण्यांचा दर्जा व प्रत चांगली राहत नाही. त्याचा फटका पुढील पिकाला बसू शकतो. जमीन व हवामान 

  • पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी.
  • जमिनीच्या सामू ६.५ ते ७ च्या दरम्यान असावा.
  • चोपण किंवा क्षारयुक्त जमिनीत कांदा बी उत्पादकता ही कमी होते.
  • हलक्या, मुरमाड जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर अधिक करावा, चांगले उत्पादन मिळते.
  • भारी चिकणमाती असलेल्या, पाण्याचा निचरा न होणाऱ्या तसेच चोपण किंवा खारवट जमिनीत वाढ खुंटते. पीक चांगले पोसत नाही. अशा जमिनीत लागवड टाळावी.
  • हवामान

  • बीजोत्पादनासाठी कांदा लागवड केल्यानंतर फुलोरा येतेवेळी थंड हवामान आवश्यक असते. थंड तापमानाबरोबर लहान दिवसही बीजधारणेला पोषक असतात.
  • प्रजनन काळात जास्त सूर्यप्रकाश व कोरडी हवा अधिक फायदेशीर ठरते.
  • स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान यामुळे फलधारणा चांगली होते.
  • ढगाळ हवामान किंवा पावसामुळे रोगांचे प्रमाण वाढते.
  • बीज प्रमाणीकरण संबंधित बाबी  बीजोत्पादनामध्ये जातीची शुद्धता, मानक प्रमाण आणि तंत्र या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. अन्यथा, जातींची शुद्धता खालावून कांद्याचा आकार, रंग आणि तयार होण्याचा काळ यात एकसारखेपणा राहत नाही. परिणामी, जोड कांदे व डेंगळे यांचे प्रमाण वाढते. प्रक्षेत्र मानके अ) विलगीकरण अंतर : कांद्यामध्ये परपरागीभवनाद्वारे फलधारणा होते. दोन भिन्न जातीच्या बीजोत्पादन क्षेत्रामध्ये कांदा उत्पादनाकरिता ५ मीटर, तर पायाभूत व प्रमाणित बियाणे उत्पादन करताना अनुक्रमे १००० मीटर व ५०० मीटर अंतर असावे. ब) क्षेत्रीय तपासणी टप्पे व संख्या : कांदा पिकांमध्ये खालील प्रमाणे क्षेत्रीय तपासणी करणे शास्त्रीयदृष्ट्या आवश्यक आहे.

  • बी लावून कांदा तयार करणे : या पद्धतीत दोन क्षेत्रीय तपासण्या आवश्यक. पहिली तपासणी रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर आणि दुसरी तपासणी कांदे काढणी वेळी.
  • कांदा लावून बी तयार करणे : या पद्धतीमध्ये चार क्षेत्रीय तपासण्या आवश्यक. पहिली तपासणी फुले येण्याआधी, दुसरी व तिसरी तपासणी पीक फुलोऱ्यावर असताना आणि चौथी तपासणी बियाणे परिपक्व होताना आवश्यक.
  • क) अन्य आवश्यक बाबी : जातीच्या गुणधर्मांशी न जुळणारे कांदे पायाभूत कांद्यामध्ये ०.१० टक्क्यापेक्षा (संख्येने) जास्त नसावेत, तर प्रमाणित कांद्यामध्ये ०.२० टक्क्यापेक्षा (संख्येने) जास्त नसावे. बियाण्याची निर्धारित मानके 

      मानके प्रमाण 
    पायाभूत प्रमाणित
      बियाण्याची शुद्धता (कमीत कमी)   ९८% ९८%
     काडीकचरा (जास्तीत जास्त)
     इतर पिकाचे बियाणे (जास्तीत जास्त) ५ प्रति किलो (संख्या) १० प्रति किलो (संख्या)
     तणांचे बियाणे (जास्तीत जास्त) ५ प्रति किलो (संख्या) १० प्रति किलो (संख्या)
     उगवण शक्ती (कमीत कमी) ७०% ७०%
     बियाण्यातील ओलावा (जास्तीत जास्त) ८% ८%
     आर्द्रता (हवाबंद पॅकिंगसाठी) ६% ६%

      बीजोत्पादनाच्या दोन पद्धती पद्धत १: रोपे लावून कांदे न काढता शेतात तसेच ठेवून त्यांना फुले येऊ दिली जातात. या पद्धतीमध्ये खर्च कमी येत असला तीर उत्पादन कमी येते. कांदा जमिनीतून काढला जात नसल्याने निवड करता येत नाही. दुर्गुणयुक्त कांदे व त्यांची पुढील पिढी वाढत जाते. रोगाचे व तणांचे प्रमाण वाढते. या पद्धतीमध्ये केवळ खरीप जातीचेच बी तयार करता येऊ शकते. अशा अनेक अडचणी व त्रुटींमुळे ही पद्धत अलीकडे फारशी वापरली जात नाही. पद्धत २: या पद्धतीत एका हंगामात कांदा काढून तो साठवून, निवड करून दुसऱ्या हंगामात लावून बीजोत्पादन केले जाते. या पद्धतीमध्ये बियांचे उत्पादन जास्त येते, कांद्याची निवड करता येते. निवड केलेले कांदे लावल्यामुळे दरवर्षी नवीन पिढी सुधारत जाते. रब्बी हंगामाचे कांदे साठवून ठेवावे लागतात, त्यामुळे साठवण खर्च वाढतो. मात्र अन्य फायदे लक्षात घेता हा खर्च अपरिहार्य, परंतु नगण्य वाटतो. मातृकांद्यांची निवड 

  • लागवडीसाठी मातृकांद्याची निवड काळजीपूर्वक करावी. कांदे गोल, मध्यम किंवा मोठ्या आकाराचे, आकर्षक आणि एकसारख्या रंगाचे असावेत.
  • लागवडीसाठी मध्यम आकाराचे कांदे निवडल्यास हेक्टरी २५ ते ३० क्विंटल कांदे बियाणे आवश्यक. कांद्याचे वजन ७० ते ८० ग्रॅम, तर व्यास ४.५ ते ६ सें. मी. इतका असावा.
  • प्रत्येक कांद्याचा वरचा एकतृतीयांश भाग कापून काढावा.
  • शक्यतो एका डोळ्याचे कांदे निवडावेत.
  • कांदे निवडण्यापूर्वी ते चांगले सुकलेले असावेत.
  • सालपट निघालेले, काजळी आलेले, कोंब आलेले किंवा सडलेले कांदे बीजोत्पादनासाठी वापरू नयेत.
  • कार्बोसल्फान २ मि. लि. अधिक कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात कापलेले कांदे अर्धा तास बुडवून नंतर लावावेत.
  • लागवड  लागवड डिसेबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी ४५ से.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. सरीच्या एका बाजूवर ३० सें.मी. अंतरावर प्रक्रिया केलेले कांदे लावावेत. कांदे मातीमध्ये पूर्ण झाकले जातील, याची काळजी घ्यावी. ठिबक सिंचनावरील लागवडीसाठी ५० सें. मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. दोन सरींच्या तळाशी २० सें. मी. अंतरावर कांदे ठेवावेत. एक सरी मोकळी सोडावी. कांदे ठेवलेल्या सरीचा माथा सपाट करावा. त्यामुळे सरीच्या तळाशी ठेवलेले कांदे मातीने चांगले झाकून जातात. शिवाय ठिबक सिंचनाच्या नळ्या पसरविण्यासाठी सपाट जागा तयार होते. एका जोड ओळीसाठी एक ठिबक सिंचनाची नळी वापरता येते. जातींची निवड  आवश्यकतेनुसार, मागणीनुसार योग्य ती जात निवडून बीज उत्पादन घेता येते. खरीप : फुले समर्थ, बसवंत ७८०, अग्रीफाउंड डार्क रेड रांगडा : बसवंत ७८०, फुले समर्थ, एन-२-४-१ उन्हाळी : एन-२-४-१, अग्रीफाऊंड डार्क रेड, अर्का निकेतन - डॉ. मयूर गाडेकर (सहायक प्राध्यापक), ७५८८६१७९६३ - योगेश भगुरे (सहायक प्राध्यापक), ०९९२२४१४८७३ (कर्मयोगी दु. सी. पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com