सौरऊर्जा पार्क निर्मितीमध्ये व्हावा पर्यावरणाचाही विचार

भविष्यामध्ये सौरऊर्जेचा वापर वाढत जाणार आहे. मात्र या वाढीचे विपरीत परिणाम पर्यावरणातील विविध घटकांवर विशेषतः परागवहक कीटकांवर होणार नाहीत, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
Ten ways to ensure bees benefit from the solar power boom
Ten ways to ensure bees benefit from the solar power boom

भविष्यामध्ये सौरऊर्जेचा वापर वाढत जाणार आहे. मात्र या वाढीचे विपरीत परिणाम पर्यावरणातील विविध घटकांवर विशेषतः परागवहक कीटकांवर होणार नाहीत, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. लँकेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी युरोपातील सौरऊर्जा विकासाचे नेमक्या परिणामांचे विश्‍लेषण केले आहे. त्यावर आधारित परागवाहकांसाठी फायदेशीर ठरेल अशा प्रकारचा सौरऊर्जा विस्ताराचा आराखडा मांडला आहे. जागतिक पातळीवर विद्युत ऊर्जेच्या पुरवठ्यासाठी सौर फोटो व्होल्टाइक पॅनेलचा वापर वेगाने वाढत आहे. मात्र यासाठी मोठ्या प्रमाणात जागा लागते. ही स्वच्छ ऊर्जा मानली जात असली तरी भविष्यात वाढत्या सोलर पॅनेलटा फटका परागवाहकांना उदा. मधमाश्या, होव्हर फ्लाइज, वास्प, भुंगेरे, फुलपाखरे, पतंग यांना बसू शकतो. हे सर्व घटक जागतिक पातळीवरील अन्न उत्पादनामध्ये अत्यंत महत्त्वाचे असून, सुमारे ३५ टक्के अन्नधान्य उत्पादन हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या त्यांच्यावर अवलंबून आहे. लँकेस्टर विद्यापीठातील पर्यावरण शास्त्रज्ञांच्या गटाने उत्तर पश्‍चिम युरोप येथील सौर पार्कमधील जमिनींचे व्यवस्थापन आणि परागवाहकांची जैवविविधता यांचा सुव्यवस्थित अभ्यास केला आहे. त्यांच्या या अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल रिन्युएबल अॅण्ड सस्टेनेबल एनर्जी रिव्ह्यूजमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. इकडे लक्ष देण्याची गरज लँकेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी रीडिंग विद्यापीठातील आपल्या सहकाऱ्यांसह मिळवलेल्या पुराव्यावर आधारित परागवाहकांची जैवविविधता वाढवण्यासाठी, त्यांचे संरक्षण करण्यासाठी पुढील गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे.

  • सौर पार्कच्या परिसरामध्ये जंगली फुलांची वाढीला चालना देणे. यातून अर्ध नैसर्गिक असा अधिवास तयार होण्यास मदत होईल.
  • सौर पार्कमुळे हरित ऊर्जेची उपलब्धता होण्यास मदत होते. त्याचा फायदा हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होण्यात होईल. २०२० च्या सुरुवातीच्या ग्रेट ब्रिटनमधील एकूण विद्युत ऊर्जेपैकी सुमारे ४७ टक्के ऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतांतून (पवन ऊर्जा, सौरऊर्जा, हायड्रोपॉवर, लाटांची ऊर्जा आणि बायोमास) उपलब्ध होत आहे. युकेमधील मोठ्या सौर पार्कमधून एकाच वेळी ९१ हजार घरांना वीज पुरवली जाते.
  • सौर पार्कसाठी वापरली जाणारी जागा हा भविष्यातील पर्यावरणावर परिणाम करणारा मुख्य घटक ठरू शकतो. सध्या अर्ध्यापेक्षा जास्त सौर पार्क हे जमिनीवर सोलर पॅनेल उभारून तयार करण्यात आले आहेत. त्यांचे क्षेत्रफळ १ ते ४० हेक्टरपर्यंत विस्तारलेले आहे. या सोलर पॅनेलच्या दूरपर्यंत पसरलेल्या ओळी व त्यातील सावली यामुळे हवेचे तापमान, पाऊस आणि बाष्पीभवन अशा अनेक घटकांवर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. जमीन, त्यावरील गवते, झुडपे आणि त्यावर आधारित सर्व जैवविविधता यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता तपासली गेली पाहिजे.
  • सौर पार्कच्या उभारणीसाठी वापरली जाणारी शेतीयोग्य जमीन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ग्रेट ब्रिटनमधील बहुतांश सौर पार्क हे कृषी क्षेत्रावर उभारलेले आहे. एकसलग होणाऱ्या शेतीमुळे मुळातच येथील जैवविविधता तुलनेने कमी आहे. या पट्ट्यामध्ये परागवाहकांची जैवविविधता वाढवण्यास वाव आहे. यातून परिसरातील तेलबिया पिके, स्ट्रॉबेरीज आणि सफरचंद यांच्या बागांना नक्कीच फायदा होऊ शकतो.
  • केवळ इंग्लंडच नव्हे, तर जगभरातील परागवाहकांची घटती संख्या हे अन्नधान्य उत्पादनापुढील आव्हान असणार आहे. सध्या शेतीखाली असलेल्या जमिनीमध्ये परागवाहकांच्या जैवविविधतेच्या वाढीवर अनेक मर्यादा आहेत. मात्र सौर पार्क आणि परिसरामध्ये त्यांचे नैसर्गिक रहिवास नक्कीच उभारता येतील. यातून सौर पार्क आणि शेती या दोन्हींचाही फायदा होईल. - हॉली ब्लायडेस, लँकेस्टर विद्यापीठ. जमिनीच्या सोलर पार्कसाठी वापरातील बदलामुळे मातीचा व जैवविविधतेचा ऱ्हास होऊ शकतो. हा बदल जितक्या पर्यावरणपूरक पद्धतीने होईल, तितके ते जैवविविधता आणि परागवाहकांसाठी फायदेशीर ठरेल. अशा सौर पार्कना चालना दिल्यास त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्येही लक्षणीय वाढ होईल. - डॉ. अलोना आर्मस्ट्राँग

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com