Tamarind grading
Tamarind grading

नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वल

नगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी चिंचेची मोठी आवक होते. येथील चिंचेचा बाजार सर्वदूर अव्वल ठरला आहे. दरवर्षी फेब्रुवारी ते जून काळात चिंचेची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. त्यातून वार्षिक कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते.

नगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी चिंचेची मोठी आवक होते. येथील चिंचेचा बाजार सर्वदूर अव्वल ठरला आहे. दरवर्षी फेब्रुवारी ते जून काळात चिंचेची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. त्यातून वार्षिक कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. यंदाही हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत ४५ हजार क्विंटलहून अधिक चिंचेची तर पाच हजारांपेक्षा अधिक चिंचोक्याची आवक झाली आहे. नगर येथील बाजार समिती भाजीपाला, फळे, कांदा व गावरान ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. सोबतच महाराष्ट्रातील मोजक्या आणि मोठी उलाढाल होणाऱ्या चिंचेच्या बाजारपेठेत नगरचा समावेश झाला आहे. येथील बाजार समितीत जिल्ह्यासह पुण्याचा काही भाग, मराठवाडा, विदर्भातून चिंचेची आवक होत असते. बाजारभाव आणि व्यवहारांबाबत शेतकऱ्यांना बाजार समितीप्रति विश्‍वास वाटत असल्याने अलीकडील काळात चिंचेची आवक वाढतच आहे. अशी आहे चिंच बाजारपेठ नगर बाजार समितीत चिंचेचा हंगाम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतो. तो १५ जूनपर्यंत सुरू राहतो. मार्च, एप्रिल महिन्यांत सर्वाधिक आवक सुरू असते. बोटूक सिंगल, अख्खी चिंच, फोडलेली चिंच शेतकरी येथे विक्रीस आणतात. प्रतवारी आणि दर्जानुसार लिलावात योग्य दर ठरतो.

  • नगर जिल्ह्यासह सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, जळगाव, औरंगाबाद, अकोला, खामगाव, बुलडाणा भागांतून आवक होते. साधारण दहा अडत व्यापारी तर पाच खरेदीदार आहेत. दिवसाला एक हजार ते तीन हजार क्विंटलपर्यंत आवक, खरेदी-विक्री होते.
  • हंगाम सुरू झाल्यानंतर साडेचार-पाच महिन्यांत ३५ हजार ते चाळीस हजार क्विंटल चिंचेची, तर चिंचोक्याची चार हजार ते पाच हजार क्विंटल आवक होते.
  • यंदा उत्पादन चांगले आले. त्यामुळे साधारण दहा हजार क्विंटलने आवक वाढली आहे.
  • लिलाव सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू असतात. त्यामुळे सातत्याने आवक-जावक सुरू असते. लिलावास शेतकरी स्वतः उपस्थित असतात. खरेदीदार-विक्रेते यांच्या समोरच वजन होते. आतापर्यंत शेतकऱ्यांची कोणत्याही बाबतीत तक्रार आलेली नाही असे बाजार समितीचे कर्मचारी संतोष बेरड यांनी सांगितले.
  • नगरला बाजार समितीचे शीतगृह (कोल्ड स्टोअरेज) नाही. मात्र व्यापाऱ्यांनी स्वखर्चाने ते उभारले आहे. त्यात दोन वर्षे व विना शीतगृह चिंच सहा महिने चांगल्या स्थितीत राहू शकते.
  • बाजारात दरवर्षी साधारण ९० टक्के फोडलेली चिंच आणली जाते. यंदा चांगल्या उत्पादनामुळे फोडणीसाठी मजूरटंचाई जाणवली. त्यामुळे ५० टक्के फोडण्याऐवजी अख्खी चिंच विक्रीस आली.
  • अशी ठरते प्रतवारी (प्रतवारीचे चार प्रकार)

  • लांब सडक व आकाराने मोठी पत्ती, केशरी रंग.
  • फिक्कट रंग, कमी लांबी
  • सिंगल बोटूक, साधारण मिक्स रंग
  • काळसर रंग, बोटूक, कमी-जास्त आकाराची पत्ती
  • परदेशात निर्यात नगर येथून दुबई, सौदी अरेबिया, इजिप्त, सीरिया, अमेरिका, युरोप यांसह अन्य देशांमध्ये दरवर्षी साधारण २०० ते २५० क्विंटल निर्यात विशेष पॅकिंगद्वारे होते. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, मुंबई आदी भागांतही मागणी असते. चिंचोका पावडरीसाठी बार्शीला नगर बाजार समितीत चिंचेसोबत दरवर्षी ६००० क्विंटल चिंचोक्याचीही आवक होत असते. यंदा आतापर्यंत ४५०० क्विंटल आवक झाली आहे. यंदा चिंचोक्याला प्रती क्विंटल १३०० ते १६०० रुपये दर मिळाला आहे. बार्शी (जि. सोलापूर) ही चिंचोक्यासाठी मोठी बाजारपेठ असून तेथे चिंचोक्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे नगरचा चिंचोका बार्शीला जातो. कपडे कडक करण्यासाठी लागणारी पावडर, कुंकूनिर्मिती, कात, खळ व अन्य बाबींसाठी चिंचोक्याचा वापर होतो. त्यातून दरवर्षी मोठी उलाढाल होते. दोन हजार लोकांना रोजगार चिंच हंगाम प्रामुख्याने उन्हाळ्यात असतो. या काळात शेतीकामेही फारशी नसतात. मात्र नगर बाजार समितीत या काळात चिंचेमुळे सुमारे दोन हजार मजुरांना रोजगार मिळतो. चिंच फोडण्यापासून प्रतवारी, पॅकिंग, पोते भरण्यासाठीचे मजूर, हमाल, मापाडी, वाहन चालक, मालक, बैलगाडीचालक आदींना रोजगार मिळतो. अनेक महिलांनाही काम मिळते. आवक व दर- दृष्टीक्षेपात

    वर्ष आवक (क्विंटल) दर (रु.)
    कमाल किमान
    २०१९ ५४, ५४४ १६, ००० ५२००
    २०२० ७००० १९,५०० ८०००
    २०२१ ४५, ००० (२५ एप्रिलपर्यंत) २१,००० ५०००

    शेतकऱ्यांचा विश्‍वास असल्यामुळे व व्यवहार चोख असल्यानेच नगर बाजार समितीत चिंचेची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. फेब्रुवारीपासून सुरू झालेले व्यवहार जूनपर्यंत सुरू राहतात. अन्य बाजारांतील मागणीचा कल पाहून चिंचेचे दर ठरतात. दरवर्षीपेक्षा यंदा अधिक दर मिळाला. - योगेश चंगेडिया, ९८२२०९५८२८ ( चिंच खरेदीदार, नगर) येथे खरेदीदार शेतकऱ्यांना रोख पट्टी देतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी येत नाहीत. दरही चांगला मिळत असल्याने दूरवरून शेतकरी विक्रीसाठी येतात. - अभय भिसे, ७३५००१२३०५ (सचिव, दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com