ट्रॅक्टरचलित पाच ओळींचे बीबीएफ, रासणी, फवारणी यंत्र

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी पाच फणी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामध्ये बियाणे, खत पेरणीसह फवारणी आणि रासणी करता येते. या यंत्रामुळे मजूर आणि वेळेची बचत होते.
Tractor driven five rows BBF, Rasani, sprayer
Tractor driven five rows BBF, Rasani, sprayer

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी पाच फणी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामध्ये बियाणे, खत पेरणीसह फवारणी आणि रासणी करता येते. या यंत्रामुळे मजूर आणि वेळेची बचत होते. पावसाचे जास्तीत जास्त मूलस्थानी जलसंधारण करून त्याचा पावसाच्या खंड काळात उपयोग करणे तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे. पावसाचे प्रमाण, तीव्रता आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन पिकांची लागवड रुंद वरंबा सरी पद्धतीने (बीबीएफ) केल्यास फायदेशीर ठरते. कोरडवाहू शेतीसाठी उपयोगी तंत्रज्ञानामध्ये रुंद वरंबा सरी पद्धत एक अत्यंत उपयोगी व हवामान बदलानुरूप तंत्रज्ञान ठरले आहे. तण नियंत्रणाच्या दृष्टीने उगवणीपूर्व तणनाशकांचा वापर करणे फायदेशीर ठरते. त्याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी केंद्रीय कृषी कोरडवाहू संशोधन केंद्राने विकसित केलेल्या चार फणी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पेरणी यंत्रामध्ये सुधारणा करून पाच फणी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामध्ये बियाणे, खत पेरणीसह फवारणी आणि रासणी करता येते. ट्रॅक्टरच्या थ्री पॉइंट लींकेजला पेरणी यंत्र लावून पेरणी करत असताना पीटीओ रिकामा असतो, त्याचा वापर करून फवारणी संच पेरणीसह सुलभतेने वापरता येतो, अशी संरचना करण्यात आली आहे.  असे आहे यंत्र ट्रॅक्टरचलित पाच फणी (बीबीएफ) पेरणी यंत्राद्वारे थोडा बदल करीत व कमी रुंदीचे टायर लावून, तीन टप्प्यांत सोयाबीन व इतर पिकामध्ये पेरणी ते फवारणीपर्यंतची संपूर्ण कामे यांत्रिक पद्धतीने करता येतात.  बीबीएफ पद्धतीने पेरणी, रासणी, तणनाशक फवारणी   

  •   पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकरी बी, खत, पेरणी, तणनाशक फवारणी व रासणी तसेच कीडनाशक फवारणीचे कामे ट्रॅक्टर किंवा बैलचलित यंत्राच्या साह्याने करतात. त्यासाठी हेक्टरी ३० ते ३२ तास लागतात. मजूर आणि यंत्राचा खर्च जास्त होतो.
  •   त्यादृष्टीने ट्रॅक्टरचलित एकाच फ्रेमवर पाच ओळीचे बीबीएफ (रुंद वरंबा व सरी) पेरणी यंत्र, रासणी व फवारणी यंत्र विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रुंद वरंब्यावर पेरणी करणे, खत देणे, रासणी करणे व तणनाशक फवारणी ही कामे एकाच वेळी करता येतात. त्यामुळे होणारा खर्च कमी होतो. वेळेची बचत होते. शेतात ट्रॅक्टर एकाच वेळी गेल्याने मातीवर दाब कमी पडतो. 
  •   यामध्ये असलेल्या सरी यंत्रामुळे (रिजरमुळे) योग्य प्रकारे वाफे तयार होऊन त्यावर शास्त्रीय पद्धतीने पेरणी होते. तसेच तणनाशक फवारणीमुळे तणाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी होतो. योग्य प्रकारे वाफ्याची निर्मिती होते.
  •   जर पावसाचे पाणी अधिक पडले ते वाफ्याद्वारे वाहून जाते. कमी पाऊस झाला तर असलेला ओलावा टिकून ठेवण्यास मदत होते. पाणी सऱ्यांमध्ये मुरते, त्यामुळे मूलस्थानी जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकास, तसेच पुढील हंगामातील पिकांस लाभ होतो. विशेषतः पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात याचा लाभ होतो. गादी वाफे किंवा वरंब्यामध्ये हवा खेळती राहून पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. त्यामुळे बियाण्याची उगवण चांगली होते. पिकाची पुढील वाढ जोमदारपणे होते.
  •  या यंत्राने चार कामे एकाच वेळेस होत असल्याने ट्रॅक्टर सतत शेतामध्ये जाण्यामुळे होणारे माती दबण्याचे प्रमाण कमीत कमी होते. 
  • ट्रॅक्टरचलित कोळपणी व सरी यंत्र 

  •   ४ इन १ यंत्रामधील पेरणीचा डबा काढून याच यंत्राद्वारे एकाच वेळी कोळपणी गरज असेल तर फवारणी, तसेच सऱ्या मोकळ्या करणे अशी कामे करता येतात. त्याकरिता ट्रॅक्टरला कमी रुंदीचे टायर बसवणे गरजेचे आहे. 
  •   ट्रॅक्टर खरेदी करताना टायर मोठे व रुंद असतात. परंतु ज्या वेळी पेरणी किंवा मुख्यत्वे कोळपणी, फवारणी अशी कामे करताना जर मोठे टायर वापरले तर पिकाचे नुकसान होते. रान देखील जास्त दबले जाते. त्यामुळे त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी, ट्रॅक्टर असूनही, कोळपणी, फवारणीचे काम मजूर लावून करतात. या कामासाठी जास्तीचा खर्च होतो.
  •   कोळपणी, फवारणीसारखी कामे वेळेवर होणे अत्यंत गरजेचे असते. हे लक्षात घेऊन आपल्याकडे जो ट्रॅक्टर आहे, त्या ट्रॅक्टरला 
  • कमी रुंदीचे टायर बसवावेत. ज्यामुळे 
  • कोळपणी, फवारणी ही कामे यांत्रिक पद्धतीने वेळेवर होतात. कमी रुंदीचे टायर खरेदी    करताना ट्रॅक्टरला बसेल असेच टायर रीमसह खरेदी करावेत. 
  • कमी रुंदीचे टायर बसून कोळपणी, फवारणी सारखी कामे ट्रॅक्टरद्वारे सहज करता येतात. 
  • यंत्राचे फायदे 

  • फणातील अंतर बदलणे शक्य.
  • वाफे पद्धतीचा वापर.
  • पेरणीसह रासणी व तणनाशक फवारणी.
  • खर्च आणि वेळेत ३०- ४० टक्के बचत.
  • कार्यक्षमता १.५ एकर प्रति तास. 
  • गादी वाफा तयार करणे, खत, बी पेरणीसह रासणी तसेच फवारणी एकाच वेळेस केल्यामुळे शेतातील माती दाबण्याचे प्रमाण कमी होते. माती मोकळी राहण्यास मदत होते.
  • उत्पादनात २० ते ३० टक्के वाढ. 
  • बियाणे, खतामध्ये १५ ते २० टक्के बचत.
  • तण काढणी खर्चात २० टक्के बचत.
  • कोळपणी, फवारणी आणि सऱ्या मोकळ्या करण्याचे दुसऱ्या टप्प्यातील काम एकाच वेळेत करता येते.
  •  यंत्र फक्त फवारणीसाठी देखील वापरता येते (६ मीटर बूम)
  • ट्रॅक्टरचलित फवारणी   

  • या यंत्राद्वारे कीटकनाशक तसेच उगवणीपूर्व आणि नंतर तणनाशकाची फवारणी करता येते. फवारणी करतेवेळी पेरणी यंत्र बाजूला काढून ठेवता येते.
  • या यंत्राने एकसारखी फवारणी करता येते. फवारणी यंत्राच्या ६ मीटर बूमवर १२ नोझल असून ते पिकातील दोन ओळींतील अंतरानुसार कमी अधिक अंतरावर बसविता येतात. या यंत्राच्या साह्याने तासाला एक हेक्टर क्षेत्रावर फवारणी होते. 
  • - डॉ. एस. एन. सोलंकी,  ८००७७५२५२६     (कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com