agricultural news in marathi Turnover of up to Rs. 70 lakhs from production of pulses and gram flour | Agrowon

डाळी, बेसनपीठ निर्मितीतून ७० लाखांपर्यंत उलाढाल

माणिक रासवे
शनिवार, 10 जुलै 2021

हिंगोली येथील रमेश पंडित यांनी डाळनिर्मितीसह बेसन पीठ व धान्यस्वच्छता अशी टप्प्याटप्प्याने व्यवसायवृद्धी केली आहे. उत्पादनांचा पंडित- जी ब्रॅंड लोकप्रिय केला आहे. ‘यशश्री ॲग्रो इंडस्ट्रीज’ या आपल्या उद्योगाची वार्षिक उलाढाल पंधरा वर्षांच्या काळात ७० ते ८० लाख रुपयांपर्यंत पोहोचवली आहे.
 

हिंगोली येथील रमेश पंडित यांनी डाळनिर्मितीसह बेसन पीठ व धान्यस्वच्छता अशी टप्प्याटप्प्याने व्यवसायवृद्धी केली आहे. उत्पादनांचा पंडित- जी ब्रॅंड लोकप्रिय केला आहे. ‘यशश्री ॲग्रो इंडस्ट्रीज’ या आपल्या उद्योगाची वार्षिक उलाढाल पंधरा वर्षांच्या काळात ७० ते ८० लाख रुपयांपर्यंत पोहोचवली आहे.

हिंगोली येथे ‘यशश्री ॲग्रो इंडस्ट्रीज’ या नावाने रमेश पंडित यांनी आपला शेतीमाल प्रक्रिया व्यवसाय नावारूपाला आणला आहे. त्यांचे मूळगाव आखाडा बाळापूर (ता. कळमनुरी) आहे. वाणिज्य शाखेतील पदवीनंतर वृत्तपत्रविद्या व जनसंवाद पदवी अभासक्रम त्यांनी पूर्ण केला. औरंगाबाद व आखाडा-बाळापूर येथे पत्रकारिता केली. परंतु मन रमले नाही. गावी दोन एकर शेती व पीठगिरणी व्यवसाय होता. तेथे डाळनिर्मिती व्हायची. मात्र आठ सदस्य असल्याने कुटुंबाची उपजीविका तेवढ्यावर होणे शक्य नव्हते.

मिनी डाळ गिरणीची उभारणी
दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने (अकोला) विकसित केलेल्या मिनी डाळमिलविषयी वाचनात आले. त्याद्वारे डाळीचे प्रमाण सर्वाधिक व कोंड्याचे प्रमाण कमी मिळायचे. पंडित यांनी त्याचा वापर करायचे ठरवले. गावी वीज, पाणी या समस्या होत्या. मग हिंगोली येथील महाराष्ट्र राज्य उद्योग विकास महामंडळाच्या वसाहतीत उद्योग सुरू करण्याचे ठरवले. सन २००५ मध्ये पुणे येथील ‘यशदा’ संस्थेत प्रशिक्षण पूर्ण केले. जिल्हा उद्योग केंद्राकडे २००६ मध्ये ‘यशश्री ॲग्रो इंडस्ट्रीज’ नावाने नोंदणी केली. अर्ज केल्यानंतर २००७ मध्ये जवळच्याच लिंबाळा (हिंगोली) येथे १०० बाय ६० चौरस फूट आकाराचा भूखंड मिळाला.

आर्थिक नियोजन
प्रकल्प अहवालाअंती युनियन बॅंक शाखेने साडेसात लाख रुपये, बीजभांडवल योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राने दीड लाख व स्वतःकडील एक लाख असे १० लाख रुपये भांडवल जमा झाले. अकोला येथून मिनी डाळ मिल खरेदी केली. फेब्रुवारी २००८ मध्ये आई- वडिलांच्या हस्ते उद्‌घाटन केले. तूर, हरभरा प्रत्येकी १०० क्विंटल डाळ तयार केली. परंतु ‘अनपॉलिश्ड’ डाळीस ग्राहकांची पसंती नव्हती. विक्रीअभावी गोदामात साठा करावा लागला.

बेसन पिठाचा पर्याय
डाळनिर्मिती सुमारे तीन-चार महिन्यांचाच व्यवसाय होता. वर्षभर व्यवसाय सुरू ठेवण्याच्या दृष्टीने बेसन पीठनिर्मितीचा पर्याय पुढे आला. हॉटेल, खाणावळी आदी ठिकाणी भजी, जिलेबी, विविध पदार्थांसाठी त्यास मागणी असते. हे लक्षात घेऊन हरभराडाळीपासून पीठनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला. दर्जेदार पिठास व्यावसायिकांकडून मागणी वाढल्यानंतर स्वतंत्र गिरणी घेतली. सुरुवातीला प्रति दिन ३ ते ४ क्विंटल निर्मिती टप्प्याटप्प्याने १० क्विंटलपर्यंत पोहोचली. कोरोना संकटात ती ६ ते ७ क्विंटलपर्यंत आली आहे.

व्यवसायातील ठळक बाबी
डाळनिर्मिती

 •  प्रति दिन २० क्विंटल निर्मितीची मिनी डाळ मिलची क्षमता. जानेवारी ते मे काळात
 • तूर, हरभराडाळ तर सप्टेंबरनंतर मूग, उडीद डाळ हंगाम.
 • प्रतिकिलो ६ रुपये दराने शेतकऱ्यांसाठी डाळनिर्मिती.
 • अनपॅालिश्‍ड डाळीला ग्राहकांमधून मागणी. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील व्यापारी खरेदी करतात. प्रति किलो तूरडाळ ११० रुपये, हरभराडाळ ७० रुपये, मूग- उडीदडाळ १०० रुपये दर.
 • पंडित-जी हा ब्रॅंड.

बेसन पीठ

 • स्थानिक मार्केटमधून हरभरा खरेदी. उन्हाळ्यात ५०० क्विंटल डाळनिर्मिती. पावसाळ्यात पीठनिर्मिती.
 • पोषणमूल्य वाढविण्यासाठी जवस, अंबाडी, जिरे मिश्रित बेसन पिठाची मागणीनुसार निर्मिती.
 • प्रतिकिलो १०० रुपये दराने विक्री. साध्या बेसन पिठाचा दर ७० ते ७५ रुपये.
 • ५०० ग्रॅम पॉलिथिन पिशवीचे यंत्रावर पॅकिग. मोठ्या ग्राहकांसाठी २० किलो पॅकिंग.

धान्य स्वच्छता, प्रतवारी

 • व्यवसायवृद्धी करताना गहू, ज्वारी आदींचे ‘ग्रेडिंग- क्लिनिंग’ करून देण्यास यंदा सुरुवात.
 • धान्यातील खडे वेगळे करण्यासाठी ‘डिस्टोनर’ यंत्र घेतले आहे.
 • प्रति क्विंटल १०० रुपये दराने धान्य स्वच्छ करून दिले जाते. त्याद्वारे शेतकऱ्यांनाही चांगले दर मिळत आहेत.

विक्री व्यवस्था

 • सुरुवातीला दुचाकीवरून ५० किलोमीटर परिसरात दीड क्विंटलपर्यंत विक्री पंडित स्वतः करायचे.
 • जून २०१६ मध्ये छोटे चारचाकी वाहन खरेदी केले. आता हिंगोली जिल्ह्यासह नांदेड, परभणी जिल्ह्यात हॉटेल्ससह किराणा दुकानदारांना विक्री होते. लग्नसमारंभासाठी बेसन पिठास मागणी असते.
 • औंढा नागनाथ, कळमनुरी, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका, हिंगोली व वाशीम जिल्ह्यांतील गावे या ठिकाणी आठवड्यातील एका दिवस निश्‍चित करून विक्री होते. गुरुवारी सुट्टी असते. शनिवार, रविवारी घरगुती कामांचे नियोजन होते.

उलाढाल

 • आठवड्यातील चार दिवस सरासरी ७ ते १० क्विंटल बेसन पीठ विक्री.
 • आखाडा-बाळापूर येथे शेतकरी उत्पादक व विक्री गटाची स्थापना पंडित यांच्या पुढाकाराने झाली.
 • गटामार्फत हिंगोली शहरात ‘विकेल ते पिकेल’ योजनेअंतर्गत डाळी, बेसन पिठाची विक्री.
 • एकूण ७० ते ८० लाख रुपयांपर्यंत वार्षिक उलाढालीची मजल.

उद्योजक घडले
पंडित विक्री व्यवस्थापन तर पत्नी त्रिशला निर्मिती प्रक्रिया सांभाळतात. उद्योगात सहा जणांना कायम स्वरूपी रोजगार मिळाला आहे. उत्पन्नातून बॅंकेच्या कर्जाची परतफेड केली आहे. सन २०१० मध्ये लघुउद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंडित यांना राज्य शासनाचा जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेत परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत उद्योजक घडले आहेत. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे विविध प्रशिक्षणांत पंडित मार्गदर्शन करतात.

‘ॲग्रोवन’चे नियमित वाचक
पंडित ‘ॲग्रोवन’चे सुरुवातीपासून नियमित वाचक आहेत. त्यातील लेख, पूरक व्यवसाय, बाजारभाव व यशोगाथा त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.

संपर्क : रमेश पंडित, ९४२१३८८६१०


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
आंबा, काजू, फणसापासून चॉकलेट मोदकांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरे (वाडोस) येथील...
सेंद्रिय उत्पादनांचा ‘सात्त्विक कृषिधन...नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक...
श्रमदानातून ‘चुंब’ गाव झाले जल...स्वच्छता, रस्ते, भूमिगत गटार आदी विविध पायाभूत...
‘कोरोना’नंतर आकार घेतेय फुलांची...गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पुणे...
मोसंबी, शेडनेटसह सेंद्रिय पद्धतीने...पारंपरिक मोसंबी बागेतील लागवड अंतर व वाणातील बदल...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
शास्त्रीय, उत्कृष्ट व्यवस्थापनातून बीटल...सातारा जिल्ह्यातील शेळकेवाडी येथील जितेंद्र शेळके...
कांदा- लसूण शेतीत जरे यांचे देशभर नावबहिरवाडी (ता. जि. नगर) येथील कृषिभूषण...
नगदी पिकांना हंगामी पिकांची जोड देते...आपली शेती प्रयोगशील ठेवत मुदखेड (जि. नांदेड)...
कुक्कुटपालन, पोषण बागेतून प्रगती न्यू राजापूर (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील २४...
पूरक उद्योगातून गटाने तयार केली ओळखदेवनाळ (ता. जत, जि. सांगली) गावातील उपक्रमशील...
खारपाणपट्ट्यात फुलवली प्रयोगशील...सांगवी मोहाडी (ता.. जि.. अकोला) येथील मनोहर...
केळी निर्यातीत ‘सुरचिता’चे पदार्पण करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुरचिता ॲ...
फळबागांसाठी प्रसिद्ध झाले सोनोरीपुणे जिल्ह्यात सासवड शहरापासून काही किलोमीटरवर...
पेठमधील मोगऱ्याचा नाशिकमध्ये दरवळनाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात आदिवासी...
सणासुदीच्या आशेवर कोल्हापूरचा फुलबाजार...गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत कमी दरांवर...
यांत्रिकी पूरक उद्योग ठरताहेत...औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील आठवडी...
दर्जेदार रेशीम कोष उत्पादनात पाटील...जळगाव जिल्ह्यात देवपिंप्री येथील विकास पाटील...